Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

राष्ट्रपतिपदक नव्हे, सेवेला मिळालेला आशीर्वाद!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जेथे जिवलग व्यक्तीच्या मृतदेहाला स्पर्श करण्यास लोक धजावत नाहीत, तेथे ही असामी ६० फुटांपर्यंतच्या खोल पाण्यात उतरून मृतदेह शोधून बाहेर आणते. थोडेथोडके नव्हे, असे ७०० मृतदेह गोविंद तुपे या अवलियाने बाहेर काढले. बुडणाऱ्या १८ जणांना जीवदान दिले. तुपे यांना राष्ट्रपतींचे उत्तम जीवनरक्षक पदक जाहीर झाले असून, महाराष्ट्र दिनी ते प्रदान करण्यात येणार आहे. आजवरच्या सेवेला प्राप्त होणारा हा आशीर्वादच असल्याची भावना तुपे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना व्यक्त केली.

सिन्नर तालुक्यातील बेलू हे त्यांचे गाव. शेतीवरच कुटुंबाची उपजीविका चालते. १९८४ मधील एका प्रसंगाने तुपे यांच्या जीवनात कमालीचे परिवर्तन घडविले. तेव्हा ते अवघ्या १६ वर्षांचे होते. चुलती आणि चुलत बहिणीसमवेत ते दारणा नदी पार करीत होते. बहिणीला ते सुखरूप नदीपार घेऊन गेले. परंतु, चुलती नदीमध्ये बुडू लागली. त्यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्नही केला. परंतु, दुर्दैव आड आले. स्वत:ला सावरत त्यांनी चुलतीचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. तिला वाचवू शकलो नाही, याचे शल्य त्यांच्या मनात कायमस्वरुपी राहिले. तेव्हापासून त्यांनी सेवाव्रत म्हणून जीवरक्षकाचे काम स्वीकारले. गेली २९ वर्षे रुपयाच्याही मोबदल्याची अपेक्षा न करता ते हे सेवाव्रत जोपासत आहेत. त्यांच्या या सेवाकार्याबद्दल त्यांना अनेक संस्थांनी गौरविले. वामनदादा कर्डक संस्थेने राज्यस्तरीय शौर्य पुरस्कार दिला. अनेक पोलिस स्टेशन्सने त्यांना पोलिसमित्र म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच सरकारने त्यांना अतिशय मानाचे राष्ट्रपतींचे ‘उत्तम जीवनरक्षक पदक’ जाहीर केले आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी त्यांना मान्यवरांच्या हस्ते हे पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे.

इतर जिल्ह्यांतही सेवा

केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे, तर जवळच्या अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यातही त्यांनी कुणाच्याही मदतीशिवाय अनेक मृतदेह बाहेर काढले आहेत. आतापर्यंत ७०० हून अधिक मृतदेह बाहेर काढण्याचा विक्रमच त्यांनी केला असून, ‍पाण्यात बुडणाऱ्या १८ जणांचे प्राणही वाचविले आहेत. याखेरीज २०० हून अधिक रस्ता अपघातांत त्यांनी जखमींना सर्वतोपरी मदत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोंबकळत्या वीजतारांचे घोंघावतेय संकट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्याच्या ग्रामीण भागातील बऱ्याच ठिकाणचे कलंडलेले, तिरपे झालेले वीज वाहिन्यांचे खांब, तारांना पडलेल्या झोळमुळे भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो. महावितरण कंपनीने येत्या पावसाळ्यापूर्वी हे पोल व तारा दुरुस्त करावेत, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी केली आहे. अन्यथा जनआंदोलन छेडण्यात असा इशारा भागवत यांनी महावितरणला निवेदनाद्वारे दिला आहे.

तालुक्यात शेतशिवारासह इतरही अनेक ठिकाणाहून गेलेले पोल तिरपे झाले आहेत. परिणामी अनेक ठिकाणी वीजतारांना मोठा झोळ पडलेला आहे. अनेक ठिकाणी तर वीजतारांची अवस्था बिकट झाली आहे. या सर्व दुरवस्थेबाबत गावोगावच्या ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता रुपचंद भागवत यांनी पुढाकार घेतला आहे. या समस्यांबाबत महावितरण कंपनीचे दार ठोठावले आहे. भागवत यांनी महावितरणचे शहर व ग्रामीण या दोन्ही उपविभागांच्या उपकार्यकारी अभियंत्यांचे निवेदनाद्वारे या समस्येकडे लक्ष वेधले आहे. वीज तारांना अनेक ठिकाणी पडलेल्या झोळमुळे तारा एकमेकांत गुंतण्याचे वाढलेले प्रमाण, कलंडलेले व तिरपे झालेले पोल बघता भविष्यात वारा आणि पावसामुळे हे पोल जमीनदोस्त होऊन दुर्घटना होण्याच्या शक्यता भागवत यांनी व्यक्त केली आहे. विद्युत तारा तुटल्याने कंपनीचे नुकसान होतानाच शॉर्टसर्किट व इतर संभाव्य संकटामुळे शेतकरी, पशुधनाला धोका पोहोचण्याची दाट शक्यता भागवत यांनी या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी विजेचे पोल, तारा यांची दुरुस्ती करावी, असे साकडे भागवत यांनी घातले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूरला पाणीटंचाईचे सावट

$
0
0

आठ दिवस पुरेल एवढाच साठा; नगरपरिषदेला प्रतीक्षा धरणातील रोटेशनची

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगुरवासियांना गेल्या दोन दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला नाही. कारण सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने येथील नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या पंप हाऊसमधील बिघाड कारणीभूत होता. तरीही प्रशासनाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे केला होता. भविष्यात भगूर नगरपालिकेकडे केवळ आठ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे भगुरकरांना पाणीटंचाईचा फटका बसणार आहे, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.

शनिवार (दि. २९) पासून भगुरकरांना नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. दारणा पात्रातून पाण्याची पातळी राहिलीच नसल्याने पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी भरणे जिकरीचे झाले असून, आठ दिवसानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. दारणा नदीपात्रात लष्कराने नवीन पाणी साठवण बंधारा निर्माण केल्यामुळे भगुरकरांना मिळणाऱ्या पाण्यामध्ये कपात झाली आहे. मागील वर्षापर्यंत बंधाऱ्यातून गळती होणाऱ्या पाण्यामधून भगुरकरांना लागणाऱ्या पाण्याची पूर्तता सहज होत असे. आता नवीन बंधाऱ्यामुळे पाणी गळतीदेखील होत नाही. तरीही परिसरातील काही नागरिक चक्क सार्वजनिक शौचालयाच्या नळावरून पिण्याचे पाणी भरत असल्याचे वास्तववादी चित्र दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्तिनाथ समाधी मंदिरासाठी एकमत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

देशविदेशातील कोट्यवधी वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर भव्य व्हावे. संजीवन समाधी स्थळावर उभी राहणारी वास्तू जगाला मानवतेचा संदेश देणारी ठरणार असल्याने ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा निर्धार वारकरी सहविचार सभेत एकमुखाने व्यक्त करण्यात आला.

सभेत मंदिर विकासाच्या दृष्टीने तयार केलेला प्रस्तावित आराखडा हा उपस्थित वारकऱ्यांसमोर अमृता पवार यांनी सादर केला. मंदिराला आंतरराष्ट्रीय झळाळीसाठी करोडो रुपये खर्च करण्यात येणार असून, निधी जमविण्यासाठी वारकऱ्यांनी कामास लागण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

संत निवृत्तिनाथ समाधी मंदिर जीर्णोद्धार तसेच परिसर विकासाच्या संदर्भात जिल्ह्यातील कीर्तनकार, वारकऱ्यांची विचार सभा त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ समधी मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

आगामी काळाच्या पाऊलखुणा ओळखून मंदिराचे काम करण्यात यावे, अशी सूचना माधव महाराज राठी यांनी केली. आपली मत मतांतरे सर्वच उपस्थित व्यक्त करत असतांना वारकरी महामंडळाचे राज्याचे प्रसारक राम खुर्दळ यांना शांत राहण्याचा सल्ला दिल्याने अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. लहवितकर यांनी सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांना निधी जमा करण्याचे आवाहन यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाआरोग्य शिबीर आजपासून

$
0
0

धुळे : राज्य सरकारतर्फे नंदुरबार शहरातील मोदी मैदानावर आज, रविवारी महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन होणार आहे. शिबिरात दोन हजार तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करणार आहेत. शनिवारी शिबिरस्थळी सुरू असलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह अधिकाऱ्यांनी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोमेजलेली उद्याने चिमुकल्यांनी फुलली!

$
0
0

सुट्यांचा परिणाम; काही उद्यानांची दुरवस्था

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

सध्या सुरू असलेल्या सुट्यांमुळे चिमुकल्यांना उद्यानाचे विशेष आकर्षण असते. त्यामुळे कॅन्टोन्मेंटमधील खंडेराव टेकडी परिसरातील उद्यानात सकाळी व सायंकाळी चिमुकल्यांसह ज्येष्ठांचीही रेलचेल वाढली आहे. बालगोपाळांसह नाशिकच्या इतरही भागातून व उन्हाळ्याच्या सुटीत लामरोड भागात असणाऱ्या विविध आरोग्यधाममध्ये येणाऱ्या जैन बांधवासह स्थानिक नागरिक उद्यानात येतात. मात्र परिसरातीलच काही उद्याने अजूनही दुरवस्थेत असून, त्यांना सुगीचे दिवस केव्हा येणार, असा प्रश्न त्या परिसरातील नागरिकांना पडला आहे. तसेच स्वा. सावरकर उद्यानाचीही अवस्था निधीअभावी तशीच आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या वतीने व नगरसेवकांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे देवळालीतील वार्ड क्रं. २, ३, ४, ६, ७ यात सार्वजनिक उद्यान आहेत. त्या उद्यानांची स्थिती चांगली असून, खेळण्यांसह लॉन्सही नियमित स्वच्छ व कटिंग करण्यात येत असते. मात्र वॉर्ड क्रमांक १ मध्ये उद्यान नसल्यासारखीच परिस्थिती आहे. वार्ड क्रं. ५ मध्ये जागेअभावी उद्यान निर्माण करणे अवघड आहे. तर वार्ड क्रं. ८ मध्ये प्रस्तावित उद्यानाच्या उभारणीला लवकरच सुरुवात होणार आहे. देखभालीसाठी या उद्यानात १ माळीकाम करणारा व १ सहाय्यक अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. सद्यस्थितीला कॅन्टोन्मेन्ट प्रशासनाने येथील उद्यानांमध्ये मुलांच्या खेळणीही मोडकळीस आलेल्याने ते सुस्थितीत ठेवण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

भगूर नगरपालिकेच्या वतीने दारणाकाठी उभारण्यात येणाऱ्या स्वा.सावरकर उद्यानाचे काम मंजूर झाले तेव्हा त्याची असलेली निधी मंजुरी ७.५० कोटी एवढी होती. मात्र एवढा मोठ्या मिळणारा निधी हा टप्प्याटप्प्याने मिळत असल्याने दरवर्षी त्या खर्चात वाढ होत आहे. आतापर्यंत सुमारे ४.२५ कोटी रुपये एवढा निधी नगरपालिकेला मिळाला असून, उर्वरित निधी मंजूर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू

$
0
0

धुळे : धुळे तालुक्यातील कुसूंबा गावालगत असलेल्या भवानी माता मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीत गावातील आठ तरुण शनिवारी दुपारी पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी सागर उर्फ धर्मराज सूर्यकांत शिंदे (वय २०, रा. कुसूंबा ता. जि. धुळे) आणि कमलेश पंडित चौधरी (वय १९, रा. कुसूंबा ता. जि. धुळे) हे दोन्ही विहिरीत बुडून मृत झाले आहेत. मात्र, विजेचा शॉक लागल्याचा प्राथमिक अंदाज सोबत पोहत असलेल्या मित्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुलभूषण जाधवांची शिक्षा रद्द करूच’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

माजी सैनिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने किडनॅप करून नेले आहे. त्यांच्यावर भारताचा एजंट असल्याचा आरोप ठेवून चुकीच्या पद्धतीने शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानकडे २० वेळा मागणी करून त्यांनी ती फेटाळली आहे. जाधव यांच्या विरोधात ते पुरावे देऊ शकले नाहीत. असे असतानाही जर त्यांना शिक्षा केली तर त्यास आम्ही हत्या समजू. हा अन्याय भारत सरकार कधीही सहन करणार नाही. आम्हाला विश्वास आहे, की त्यांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. पूर्वसैनिक सेवा परिषद या माजी सैनिक संघटनेची १८ वी सर्वसाधारण सभा तथा अधिवेशनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते.

श्री स्वामीनारायण मंदिरात झालेल्या कार्यक्रमास पूर्वसैनिक सेवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी लेफ्टनंट जनरल व्ही. एम. पाटील, दिल्लीचे मार्गदर्शक इंदेश कुमार, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते. अधिवेशनासाठी देशभरातून काश्मीर ते कन्याकुमारी येथून ३६० जिल्ह्यांतील सुमारे ४०० पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. भामरे म्हणाले, की शेजारी कोणते देश असावेत या विषयीची निवड करता येत नाही. शेजारी देशाशी संबंध चांगले राहावे, अशी इच्छा आहे. पाकिस्तानच्या लोकांशी भारताची दुश्मनी नाही. तेथील सैनिक आणि राजकीय लोक यांना राष्ट्रप्रेम नाही. त्यामुळे त्यांची परिस्थिती कशी आहे हे आपण ओळखतो. पाकिस्तानची सरळ मार्गाने लढण्याची क्षमता नाही. म्हणून ते टुरिझमऐवजी टेररिझमचा वापर करीत आहे. त्यामुळे काश्मीर निर्माण झाला आहे.

माजी सैनिकांच्या अनेक मागण्या आहेत. त्यांचा अभ्यासपूर्ण विचार करून त्या मागण्या संवेदनशीलतेने पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. माजी सैनिकांनी जीवनातील उमेदीचे वय देशाच्या संरक्षणासाठी खर्च केले आहे. शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती असलेले सैनिक जेव्हा निवृत्त होतात, तेव्हा त्यांच्यावर मुलांची आणि वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी पडते. दर वर्षी ६० हजार सैनिक निवृत्त होतात. देशाच्या निर्माणासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खेळण्यांना आली अवकळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेने शहरात असलेल्या अनेक उद्यानांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले होते. यात सातपूर विभागातही उद्यान व त्याठिकाणी असलेल्या खेळण्यांची दुरुस्ती करण्यात आली. परंतु, अशोकनगरच्या सप्तशृंगी मंदिर परिसरात असलेल्या खेळण्यांना अवकळा आली आहे. तुटलेल्या खेळण्यांवर ऐन सुट्यांमध्ये मुलांना मुकावे लागत आहे. त्यातच स्थानिक नगरसेवकदेखील लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. नगरसेवकांना मतदान केले नसल्याचा राग मनात धरून दुर्लक्ष केले जात असल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मुलांकडून केली जात आहे.

क्रमांक चारच्या रहिवाशांसमोर समस्येसाठी प्रभागात नेमके कुठल्या नगरसेवकाकडे जावे, असा प्रश्न उभा राहत असतो. यामुळे नागरी समस्यांना अनेक ठिकाणी रहिवाशांना तोंड देण्याची वेळ येत असते. अशोकनगर भागातील सप्तशृंगी मंदिर परिसरात असलेल्या खेळण्यांना अवकळा आली आहे. तुटलेल्या खेळण्यांमुळे मुलांनी सुट्टीचा आनंद घ्यावयाचा कुठे, असा सवाल रहिवाशी उपस्थित करत आहेत.

महापालिकेनेच देवी मंदिराच्या परिसरात मुलांसाठी खेळणी बसवली परंतु, कालांतराने खेळणी नादुरूस्त झाल्याने त्याकडे उद्यान विभागाचे यंत्रणाच लक्ष देण्यास तयार नाही. विशेष म्हणजे, महापालिकेत उद्यान विभागांच्या दुरुस्तीसाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र त्यात नगरसेवकांच्या मर्जीतील उद्याने व त्याठिकाणी असलेल्या खेळण्यांची दुरूस्ती करण्यात आल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात रेखाटला ‘बाहुबली २’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नुकताच प्रदर्शित झालेल्या बाहुबली २ या चित्रपटाचे प्रेक्षकांना याड लागलं असून अनेक रसिक या चित्रपटाच्या प्रेमात सैराट झाले आहेत. या प्रेमापोटीच येथील साई आर्ट अकादमीने या चित्रपटातील काही दृश्यांची हुबेहुब रांगोळी साकारली आहे. साई आर्टचे संचालक रांगोळी रेखाटनकार प्रमोद आर्वी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली ही रांगोळी पाहण्यासाठी गर्दी होत आहे. रांगोळीतील कटप्पाने अनेकांना भूरळ घातली.

बाहुबली २ शुक्रवारी प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने हे रांगोळी रेखाटन करण्यात आले. कॅम्प रोडवरील साई आर्ट अकादमीत ही रांगोळी काढण्यात आली आहे. सासाठी सांगली येथून रंगीत रांगोळी मागव‌ण्यिात आली आहे. आर्वी यांच्यासमवेत त्यांच्या विद्यार्थिनी रेणूका पाटणकर, श्रद्धा बागुल, गायत्री निकम, मोनाली बच्छाव यांनी रेखाटनासाठी मेहनत घेतली. हे रेखाटन पुढील तीन दिवस मालेगावकरांना पाहता येणार आहे. शुकवारी, शनिवारी ही रांगोळी पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

अशी आहे रांगोळी

६ फूट बाय ८ फूट आकार

तीन दिवसांपासून तयारी

४० तासांत रेखाटन पूर्ण

१२ किलो रांगोळीचा केला वापर

पाच हजार रुपये खर्च

कट्टाप्पा, बाहुबलीचे उत्तम रेखाटन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्यांवर रामबाण उपाय

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सने उपलब्ध करून दिलेले सिटिझन रिपोर्टर हे अॅप अतिशय लोकप्रिय झाल्यामुळेच दररोज असंख्य नाशिककर नागरी समस्या, अडीअडचणी या अॅपद्वारे पाठवित आहेत. अतिशय कळीच्या असलेल्या या समस्यांची दखल घेणे विविध यंत्रणांना त्यामुळे भाग पडत आहे. परिणामी, दररोज प्रसिद्ध होणाऱ्या समस्या आणि त्यांची तातडीने घेतली जाणारी दखल असा मोठा सिलसिलाच आता सुरू झाला आहे. महापालिका, पोलिस, एसटी महामंडळ, महावितरण, महसूल विभाग, आरोग्य विभाग, औद्योगिक महामंडळ, बांधकाम विभाग अशा विविध विभागांशी संबंधित आणि शहराच्या वेगवेगळ्या भागातील सार्वजनिक हिताच्या समस्या मांडण्याचे मोठे व्यासपीठच सिटिझन रिपोर्टर बनले आहे. लोकप्रतिनिधींसह विविध सरकारी यंत्रणांना घ्यावी लागणारी दखलच मटा सिटिझन रिपोर्टर या अॅपचे श्रेष्ठत्व अधोरेखित करीत आहे.

--

‘मटा’ची कौतुकास्पद संकल्पना

महाराष्ट्र टाइम्सने सुरू केलेली सिटिझन रिपोर्टर अॅपची ही संकल्पना अतिशय कौतुकास्पद आहे. मी दररोज या कॉलममध्ये येणाऱ्या समस्या पाहतो. ‘मटा’चे खरोखरच आभार मानायला हवेत. सर्वसामान्यांना एक सशक्त माध्यम ‘मटा’ने उपलब्ध करून दिले आहे. पोलिसांशी संबंधित समस्याही या ठिकाणी येतात. तसेच, वाहतुकीशी निगडित अनेक विषय त्यात हाताळले जातात. झेब्रा क्रॉसिंगच्या नियमाची होणारी पायमल्ली हा विषय अनेकांना खटकलेला दिसतो. मटा सिटिझन रिपोर्टरचा उपयोग करणाऱ्या नाशिककरांना मी धन्यवाद देतो. यापुढेही त्यांनी समाजाला जागरूक करण्याचे काम करावे. जे चुकते आहे ते पाठवावे, तसेच जे चांगले आहे तेसुद्धा पाठवावे.

-डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

---

सिटिझन रिपोर्टर्सला शुभेच्छा

‘मटा’ने सिटिझन रिपोर्टर हे अॅप सुरू करून नाशिककरांच्या हाती शस्त्रच दिले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वेगळेपण खूप मोठे आहे. या दैनिकात एखादी बातमी प्रसिद्धी व्हावी यासाठी अनेक जण इच्छुक असतात. विविध नागरी समस्यांसाठी महापालिकेनेदेखील स्मार्ट नाशिक हे अॅप उपलब्ध करून दिले आहे. मला असे वाटते, की या दोन्ही अॅपवर नाशिककर समस्या पाठवतात. ‘मटा’मध्ये आलेली तक्रार संबंधित विभागाकडे जाते आणि त्यावर कार्यवाही होते. काही समस्या तातडीने सुटू शकत नाहीत, त्याला काही कालावधी लागतो. काही किरकोळ समस्या असतील, तर त्या तातडीने सोडविल्या जातात. ‘मटा’ने हा उपक्रम असाच सुरू ठेवावा. मटा आणि सिटिझन रिपोर्टर्सला शुभेच्छा!

-हरिभाऊ फडोळ, उपायुक्त, महापालिका

---

अन् तळ्यात आले पाणी...

बोटॅनिकल गार्डमधील तळे आटल्याची समस्या मटा सिटिझन रिपोर्टरमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच कार्यवाही झाली आहे. बोटॅनिकल गार्डनमधील तळ्यात पाणी टाकून ते पुनरुज्जीवित करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील प्राण्यांना पाणी पिण्याची सोय उपलब्ध झाली असून, येणाऱ्या पर्यटकांनाही तळ्याचे दर्शन सुखावणारे ठरेल. समस्या मांडल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी संपर्क करून आपल्यामुळे ही कार्यवाही झाल्याचे समाधान व्यक्त केले. त्यामुळे महाराष्ट्र टाइम्स आणि सर्व टीमला खूप खूप धन्यवाद!

-अनिल लवटे

---

कामगारवर्गाला दिलासा

‘मटा’चे अॅप अतिशय उत्तम आहे. फ्रेश अप बेकरीसमोर रस्त्यावर दिवेच बंद होते. ही समस्या मी पाठविली त्याचा तातडीने इम्पॅक्ट झाला. त्यामुळे कामगारवर्गाला मोठा दिलासा मिळाला. सातत्याने मी समस्या पाठवत असतो. यापुढेही पाठवत राहीन. ‘मटा’ने असेच उपक्रम राबवावेत.

-प्रणव मानकर

--

अन् पथदीप झाले बंद

‘मटा’मध्ये काही समस्या प्रसिद्ध झाल्याबरोबर त्यांची दखल घेण्यात आली. भरदिवसा विजेचे दिवे सुरू असल्याची समस्या मी मांडली. त्यावर तातडीने कार्यवाही झाली. इतर समस्यांबाबतही कार्यवाही सुरू आहे. मात्र, तात्पुरत्याएेवजी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे.

-चंद्रशेखर साठे

--

समस्या निराकरणाचा विश्वास

‘मटा’च्या या प्रभावी अॅपवर समस्या पाठविताना त्यांचे निराकरण होण्याचा विश्वास वाटतो. त्यांना प्रसिद्धीही तत्काळ मिळते. काही तरी होतेय, आपण करू शकतो, याची जाणीवही झाली. समस्येची दखल घेतली जाते. ही बाब मला खूप महत्त्वाची वाटते. यापुढेही समस्या पाठवीन.

-तेजल चौधरी

--

एक उत्तम व्यासपीठ

एक चांगले काम करण्याची संधी ‘मटा’ने उपलब्ध करून दिली आहे. हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे ‘मटा’चे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. हे एक उत्तम व्यासपीठ आहे. या अॅपद्वारे मी वेळोवेली पाठविलेल्या बहुतांश समस्यांचे निराकरण झाले आहे.

-अशोक आरोटे

--

तातडीने होते कार्यवाही

अशा प्रकारचे अॅप सध्या कुठेच नाही. विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ देखावा नाही, तातडीने कामे होतात. वेळोवेळी संबंधित बाबींची दखल घेतली जाणे हे खूप महत्त्वाच आहे. समस्येला लगेच मिळणारी प्रसिद्धी आणि त्याची घेतली जाणारी दखल यामुळे मी खूपच समाधानी आहे.

-रवीराज खिल्लारे

--

सिग्नल, रस्त्यांची दुरुस्ती

आता अॅप अपडेट करण्यात आले आहे. त्यामुळे तांत्रिक त्रुटी नाहीत. पूर्वी काहीसा वेळ लागत होता. शिवाय मराठीतही मजकूर पाठविण्याची सुविधा आहे. रिझल्ट लगेच मिळतात, ही बाब उत्तम आहे. सिग्नल, रस्त्याच्या समस्या मी पाठविल्या. त्यांची दखल घेण्यात आली.

-संजय फडोळ

--

समस्या तातडीने निकाली

हे एक अत्यंत उपयुक्त अॅप ‘मटा’ने उपलब्ध करून दिले आहे. अतिशय सोपे माध्यम सर्वसामान्यांना उपलब्ध झाले आहे. सार्वजनिक समस्यांची तातडीने घेतली जाणारी दखल खूपच दिलासादायक आहे. मी पाठविलेल्या बहुतांश समस्या तातडीने निकाली निघाल्या आहेत.

-आकाश तोटे

--

यापुढेही कनेक्टेड राहणार

बस स्टॉप, रस्ता आणि अन्य प्रकारच्या समस्या मी वेळोवेळी पाठविल्या आहेत. अॅपद्वारे समस्यांचा मजकूर पाठविणे सोपे आहे. तो प्रसिद्धही होतो आणि त्याची तातडीने दखलही घेतली जाते, ही बाब खूप महत्त्वाची आहे. यापुढील काळातही मी कनेक्टेड राहणार आहे.

-ज्ञानेश्वर आहेर

--

अनेक समस्या त्वरित सुटल्या

एक प्रभावी अॅप आणि चांगला उपक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘मटा’चे आभार. अॅपद्वारे आपण पाठविलेली समस्या खात्रीशीर प्रसिद्ध होतेच, शिवाय त्याची दखलही घेतली जात असल्याने ही बाब लोकप्रिय ठरते आहे. मी पाठविलेल्या अनेक समस्या त्वरित सुटल्या आहेत.

-पल्लवी चंपानेरकर

--

तातडीने दखल वाखाणण्याजोगी

करंट इश्यूची तातडीने घेतली जाणारी दखल वाखाणण्याजोगी आहे. मात्र, काही बाबतींत प्रशासन खूपच हलगर्जीपणा करते, असे वाटते. आमच्या घराजवळील गार्डनचा विषय अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील हे चित्र बदलायला हवे.

-सचिन मिसाळ

--

अनेकांकडून अॅप डाऊनलोड

सिटिझन रिपोर्टर या अॅपद्वारे फोटो पाठविण्याची संकल्पनाच अतिशय कल्पक आहे. मी समस्या पाठविली आणि अवघ्या तीन दिवसांत त्यावर कार्यवाही झाली. ही बाब लक्षात घेऊन माझ्या ओळखीच्या अनेकांनी हे अॅप डाऊनलोड करून समस्या पाठवायला सुरुवात केली.

-रवींद्र आपटे

इतरांनीही पाठवाव्यात समस्या

‘मटा’ने अतिशय प्रभावी अॅप उपलब्ध करून दिले, ही खूप चांगली बाब आहे. अनेक नागरी समस्या मी आजवर पाठविल्या. त्या तातडीने प्रसिद्ध होत आहेत. छोट्या समस्या तातडीने निकाली निघत आहेत. मोठ्या समस्यांसंदर्भात ठोस कार्यवाहीची अपेक्षा आहे. यापुढेही मी समस्या पाठवणारच आहे. इतरांनीही हे अॅप डाऊनलोड करून समस्या पाठवाव्यात.

-चंद्रकांत महाले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कर्जमाफीसाठी ठराव करावे’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमीभावासाठी १ मे या महाराष्ट्र दिनी राज्यभरातील हजारो ग्रामसभांमध्ये ठराव मांडले जाणार आहेत. नाशिक जिल्ह्यातही काँग्रेसने जिल्ह्यातील १३६८ ग्रामपंचायतीमध्ये कर्जमाफी व हमीभावाचे ठराव करण्याची तयारी पूर्ण केली असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी दिली.

शेतकरी कर्जमाफी होऊन सातबारा कोरा झाला पाहिजे आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल इतका हमीभाव देण्याची मागणी सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी आणखी एक सनदशीर प्रयत्न काँग्रेस व राष्ट्रवादीकडून केले जात आहेत. संघर्ष यात्रेच्या नाशिक दौऱ्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये हे ठराव मंजूर करण्याचे आवाहन केले आहे. या अनुषंगाने त्यांनी राज्यातील हजारो ग्रामपंचायतींना इमेल व टपालाद्वारे पत्रेही पाठवली आहेत. शेतकरी कर्जमाफी व शेतमालाच्या हमीभावाची लढाई निर्णायक टप्प्यावर आली असताना बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनीही जिल्ह्यातील सर्व १३६८ ग्राम सभांमध्ये हे ठराव मंजूर करून मांडण्याच्या अनुषंगाने सर्व काँग्रेस तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन रणनीती आखली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचिवांच्या कामकाजावर संचालक संतप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांचा कारभार समाधानकारक नसल्याचे १२ संचालकांचे लेखी पत्र, या पुढील कामकाज पारदर्शी करण्याचा संचालकांचा आग्रह यामुळे बाजार समितीची सभा तहकूब करण्यात आली. संचालकांनी संतप्त होत सचिव अरुण काळे यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली.

संचालकांच्या तक्रारीचा विचार पुढील सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर घेण्यात यावा, झालेल्या सभेचे इतिवृत्त सर्व संचालकांना देण्यात यावे याबाबतच पुढील सभेत निर्णय घेण्यात येणार असल्याचे संचालकांनी सांगितले. यापुढील कामकाज पारदर्शी करावे, असा आग्रह संचालकांनी धरला. संचालकांच्या डोळ्यात धूळफेक करून त्यांच्या खोट्या सह्या केल्या जात असल्याने आजपासून सर्व सभांचे इतिवृत्त सर्व संचालकांना देण्याचे सभेत ठरविण्यात आले. तसेच बाजार समितीच्या आवारात जागा नसल्याने नवीन अडतदारांना परवाने देण्यात येणार नसल्याचा निर्णयही घेण्यात आला. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला महागाई भत्ता आणि बोनस हा विषय सर्वसाधारण सभेत नसताना मनमानी पद्धतीने मंजूर करून कर्मचाऱ्यांची रक्कम हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जुन्याच उपसमित्या बरखास्त कराव्यात. त्यांची नव्याने बांधणी करावी, अशी मागणी संचालकांनी केली. यापुढे बाजार समितीच्या कोणत्याही कामाचा ठेका देताना तो ई टेंडर पद्धतीनेच द्यावा, तसेच या सभेत आलेल्या विषयांना मंजुरी देण्यासाठी पुढील १५ दिवसात पुन्हा सभा बोलवावी असे सांगत ही सभा तहकूब करण्यात आली. प्रभारी सभापती श्याम गावित, शिवाजी चुंभळे, तुकाराम पेखळे, संपत सकाळे, युवराज कोठुळे, प्रभाकर मुळाणे, शंकर धनवटे, विमलबाई जुंद्रे, सचिव अरुण काळे, जिल्हा उपनिबंधक कार्यालय अधिकारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेच्या विकासाची कॉपी

$
0
0

स्मार्ट सिटीप्रश्नी प्रशासनाची बनवेगिरी उघड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेच्या यशस्वीतेसाठी महापालिका प्रशासनाकडून आता बनवेगिरी सुरू झाली असून, मनसेच्या योजनांची आता पळवापळवी सुरू झाली आहे. निवडणूक काळात स्मार्ट सिटी ही मनसेच्या विकासाची कॉपी असल्याचा आरोप करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांना आता पुष्टी मिळण्यास सुरुवात झाली आहे.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट सिटी योजनेला येत्या २५ जून रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नाशिकची स्मार्ट सिटी योजनेत निवड झाली. निवड होऊन आठ महिने झाले तरी, स्मार्ट सिटी योजनेत एकाही प्रकल्पाची वीट पुंजली गेलेली नाही. परंतु, प्रधानमंत्र्यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने त्यात शहराचा विकास कुठल्याही परिस्थितीत सुरू असल्याचे दाखवण्यासाठी पालिका प्रशासनाने आटापिटा सुरू केला आहे. त्यासाठी चक्क मनसेने शहरात सीएसआर अंतर्गत उभारलेल्या विकासकामांचा समावेश केला आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर स्मार्ट सिटीत केलेल्या कामांचा पाढा वाचला जाणार आहे.

मनसेचा दावा प्रबळ

स्मार्ट सिटीत नाशिकचा समावेश होऊन आठ महिने झाले. परंतु, अद्याप एकही काम उभे राहिलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने मनसेच्या विकासकामांची स्मार्ट सिटीत कॉपी करून एकप्रकारे मनसेच्या विकासाच्या दाव्याला पुष्टी दिली आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी चिल्ड्रन पार्कची स्तुती करून मनसेच्या विकासाचा दावा प्रबळ केला होता. आता प्रशासनाने आपली कामगिरी दाखवण्यासाठी मनसेच्या योजनांची कॉपी करून भाजपलाही उघडे पाडण्याची तयारी सुरू केली आहे.

सात प्रकल्पांचा समावेश

नाशिकच्या एसपीव्ही कंपनीने मात्र स्मार्ट सिटीची कामे दाखवण्यासाठी मनसेच्या सत्ताकाळातील सात प्रकल्पांची निवड केली आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत शहरातील सात प्रकल्पांचे सादरीकरण द्वितीय वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. मनसेने गोदावरी नदीवर उभारलेला संगीत कारंजा, घंटागाडी प्रकल्प, इतिहास संग्रहालय, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क, मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण, बॉटनिकल गार्डन यांचा त्यात समावेश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक विकसित होत असल्याचे दाखवण्याचा आटापिटा एसपीव्हीच्या शिलेदारांनी सुरू केला आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे स्मार्ट सिटीतली भंपकता आता हळूहळू समोर येत आहे. या बनवेगिरीमुळे सत्ताधारी भाजपचेही हसू होणार आहे. एसपीव्हीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी ही कामे पालिकेचीच असल्याने त्यांचे प्रेझेंटेशन केले जाणार असल्याचा दावा केला आहे. सत्ता कोणाचीही असली तरी, कामे पालिकेचीच असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

विद्यमान भाजप पदाधिकाऱ्यांकडून मनसेच्याच योजनांची कॉपी केली जात असून, त्यांच्या या प्रयत्नामुळे मनसेच्या विकासावर शिक्कामोर्तब होत आहे. नाशिकसारखा विकास कोणत्याही शहरात झाला नसल्याचे सिद्ध होत आहे. स्मार्ट सिटीत मनसेच्या योजनांचा समावेश केल्यामुळे ही योजनाच भंपक असल्याचे आता समोर येत आहे.

- सलीम शेख, गटनेता, मनसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैशाखात कोसळल्या धारा

$
0
0

टीम मटा

वैशाख मासात रणरणते ऊन, असह्य करणारा उकाडा अन् अंग भिजवून टाकणारा घाम असे वातावरण असते. मात्र, एप्रिल महिन्याचा अखेरचा रविवार नाशिक शहरासह जिल्हावासीयांसाठी धक्का देणारा ठरला. दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्याने नाशिक शहरात धुळीचे लोट उठविले, तर जिल्हाभरात विविध ठिकाणी अर्धा ते दोन तास अवकाळी पाऊस झाला. त्यामध्ये शेतकऱ्यांचे पिकांसह पशुधनाचे नुकसान झाले. अवकाळी पावसाने बळीराजापुढे संकट निर्माण झाले आहे.

चांदवड, मनमाडला हलक्या सरी

मनमाड : चांदवड शहरासह परिसरात रविवारी दुपारी सुमारे तासभर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पावसामुळे वातावरण शीतल झाले. उन्ह आणि घामाने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मनमाड शहरात दुपारी तीन वाजेनंतर ढगाळ वातावरण झाले. अचानक आलेल्या वादळाने रविवारच्या बाजारासाठी आलेल्या शेतीमाल विक्रेत्यांसह ग्राहकांचीही धावपळ उडाली. नांदगावमध्येही ढगाळ वातावरण होते.

गारांसह मुसळधार पाऊस

निफाड : तालुक्यातील चितेगाव, चेहडी, खेरवाडी या भागात काही ठिकाणी वादळ वाऱ्यासह गाराही पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी शेतात कांदे काढून साठवून ठेवले होते. कांद्याच्या चाळीतही पाणी शिरल्याने कांद्याचे नुकसान झाले. लासलगाव, विंचूर भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या भागातील कांद्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कळवणला अर्धा तास पाऊस

कळवण : कळवण परिसरात रविवारी सुमारे अर्धा तास पाऊस झाला. मात्र, दुपारपासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते. शेतकरी वर्ग प्लास्टिक कागद खरेदीला लागलेले दिसून आले. अचानक पावसाने आगमन केले. संततधार सुरू असल्याने शेतकरी, कष्टकरी वर्गाची मोठी तारांबळ उडाली.

वादळी वाऱ्यांमुळे आंब्याचे नुकसान

नाशिकरोड : नाशिकरोड परिसरात सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटून ढगाळ हवामान तयार झाले. काही ठिकाणी वीजपुरवठा थोड्या वेळासाठी खंडित झाला. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या कैऱ्या पडल्याने उत्पादकांचे नुकसान झाले आहे. नाशिकरोड, जेलरोड, शिंदे, पळसे, टाकळीरोड परिसरात शेतांमध्ये आंब्याचे भरपूर झाडे आहेत. जुन्या-नवीन कॉलन्यांमध्येही आंब्याची झाडे आहेत. वादळी वारा सुटल्याने अनेक ठिकाणी कैऱ्या पडल्या. तयार झालेल्या कैऱ्या बाजारात आणण्याचे नियोजन सुरू असतानाच हा फटका बसला.

‘अवकाळी’ने वाढली धास्ती

येवला : येवल्यास दुपारी तीन ते साडेचारच्या सुमारास अवकाळी पावसान‍े शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकविला. मुखेड, पाटोदा, नगरसूल, राजापूर, अंदरसूल अशा सगळ्याच ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. रविवारच्या या निसर्गाच्या बदलेल्या कूसने आता पुढ्यात नेमकं काय वाढून ठेवल आहे? याची बळीराजाला चिंता लागली आहे.

देवळ्यात तिघे जखमी

कळवण : देवळा तालुक्यात दुपारी ३ वाजेच्या दरम्यान झालेल्या अवकाळी गारपीट व पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विठेवाडी येथे दोन तर देवळा शिवारातील एका घराचे पत्रे उडून गेल्याने तीन जण जखमी झाले. प्रमिला हिरामण आहेर (३९), कुणाल हेमंत आहेर (६) आणि एकनाथ यशवंत सोनवणे (१९) अशी जखमींची नोवे आहेत. त्यांच्यावर देवळा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच उखा मोहन अहिरे यांच्या शेतातील पत्र्याचे शेड उडून विजेच्या तारांवर जाऊन पडले. शेतात काढून ठेवलेल्या कांद्यासह डाळिंब, मिरची, टमाटे, कोथंबीर, मेथी, कैऱ्यांचे नुकसान झाले. दरम्यान तहसीलदार कैलास पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधित तलाठ्यांना दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम यांनी केली आहे.

देवळा मुसळधार, येवल्यात हलक्या सरी

देवळ्यातही धुव्वाधार पाऊस झाला असून, नुकसानीचा नेमका अंदाज येऊ शकलेला नाही. चांदवड शहर परिसरातही पावसाने हजेरी लावली. मनमाडमध्ये दुपारी तीननंतर वादळी वाऱ्याने विक्रेते व ग्राहकांची धांदल उडवली. येवला शहर व तालुक्यात सव्वाचारच्या सुमारास काही ठिकाणी पाच मिनिटे पावसाचा हलकासा शिडकावा झाला. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे ढगाळ वातावरणामुळे धाबे दणाणले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.

नाशिकमध्ये हलक्या सरी

शहरात दुपारपासून ढगाळ वातावरण होते. इंदिरानगर, सिडको परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तर सायंकाळनंतर गारठा वाढला. पावसाच्या शक्यतेमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. उष्म्यामुळे त्रस्त झालेले नागरिक आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले.

कांदा उत्पादक चिंतेत

निफाड : तालुक्यातील लासलगाव विंचूर परिसरात रविवारी अवकाळी पावसाने कहर केला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागणार असल्याची स्थिती आहे अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान कांदा, द्राक्ष व डाळिंब पिकांचे झाल्याची प्राथमिक माहिती आहे. धो-धो कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने जगाच्या पोशिंद्याच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. सरकारकडून तुटपुंजी मदत मिळत असतांना आता बँका, सरकारी, निमसरकारी संस्था, सोसायट्या यांच्याकडून शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे यांची चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे.

वादळी वाऱ्याचा जोर

निफाड : निफाड तालुक्यातील उगाव, शिवडी, वनसगाव भागात काही ठिकाणी पाऊस झाला. काही द्राक्ष उत्पादकांचे द्राक्ष काढणीचे काम सुरू होते. अचानक वादळ, वाऱ्यासह आलेल्या पावसमुळे त्यांची धावपळ झाली. सुमारे तीन तास सोसाट्याचा वारा वाहत होता. परिसरात वादळी रविवारी दुपारी दोन वाजेनंतर वाऱ्यासह ढगाळ हवामान होते. वेगवान वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले. सायंकाळी पाचच्या दरम्यान वातावरण निवळले. मात्र हवेचा झोत काही प्रमाणात सुरूच होता.

सातपूरला बत्ती गूल
सातपूर : सातपूर, अशोकनगर, श्रमिकनगर परिसरात सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान जोराचा वारा सुटला. पावसाच्या हलक्या सरी झाल्याने वातावरणात गारवा पसरला. महावितरण कंपनीने कोणतीही अनुचित घटना घडून नये म्हणून वीज पुरवठा खंडित केला. सायंकाळनंतर पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये मुरतेय सूक्ष्म सिंचन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी मिळणाऱ्या अनुदानातून विभागातील नाशिक जिल्ह्यात सर्वांधिक शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर केला आहे. विभागातील १५ हजार २८१ पैकी निम्म्याहून अधिक म्हणजे तब्बल सात हजार ८७८ इतके लाभार्थी एकट्या नाशिक जिल्ह्यातील आहेत. या योजनेमुळे जिल्ह्यातील ५ हजार १४६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली गेले आहे.

शेतकऱ्यांना पाणी बचतीची सवय लागावी आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून कमीत कमी पाण्यात पिक घेता यावे, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक सहकार्याने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबविली जाते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्राचा ६० व राज्याचा ४० टक्के इतका वाटा आहे. गेल्या वर्षात नाशिक विभागात या योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती. नाशिक महसूल विभागातील मात्र स्वतंत्र कृषी विभाग असलेल्या नगर जिल्ह्यातही ९ हजार ६०५ इतक्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.

कंपन्या मात्र नाखूश

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सूक्ष्म सिंचन संचाचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येते. यापूर्वी मात्र ठिबक सिंचन संचाचे अनुदान व्यापाऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत असे. त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी कंपन्यांनाच जास्त फायदा होत आला होता. सरकारने मात्र गेल्या वर्षापासून या योजनेचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी केल्याने ठिबक सिंचन संच उत्पादित करणाऱ्या कंपन्या नाखुष झाल्या आहेत. काही वर्षांपर्यंत ठिबकचा वापर वाढावा, यासाठी संबंधित कंपन्याच शेतकऱ्यांचे प्रबोधन करीत होत्या. आता कंपन्यांनी यातून अंग काढून घेतले. तरीही सिंचन योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे.

सिंचन साक्षरतेत वाढ

विभागातील सर्वच जिल्ह्यातील शेतकरी सूक्ष्म सिंचनाला प्राधान्य देत असल्याचे या योजनेला मिळालेल्या प्रतिसादातून उघड झाले आहे. दरवर्षी हा प्रतिसाद वाढत आहे. दरवर्षी पाणी टंचाईचा कालावधी वाढू लागल्याने शेतकरी उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापरास प्राधान्य देत आहेत. शेतकऱ्यांमधील सूक्ष्म सिंचनाची साक्षरता वाढत असल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘न्यू स्टार’ने जिंकला आमदार सानप चषक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रभाग क्रमांक चारमध्ये आमदार बाळासाहेब सानप यांच्या सन्मानार्थ झालेल्या क्रिकेट स्पर्धेत न्यू स्टार इलेव्हन संघाने आमदार चषक जिंकला. ‘ओन्ली भाऊज्’ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

नगरसेवक हेमंत शेट्टी यांनी आयोजित या स्पर्धेचे पारितोषिक वितरण नुकतेच झाले. विजेत्या न्यू स्टार इलेव्हन संघाला १ लाख ११ हजार १११ रुपये व आमदार चषक देऊन सन्मानित करण्यात आले. उपविजेत्या ‘ओन्ली भाऊज्’ संघाला ७७ हजार ७७७ रुपये, तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या आरसीसी संघाला ४४ हजार ४४४ रुपये व प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी लक्ष्मण सावजी, नगरसेवक जगदीश पाटील, शांता हिरे, मच्छिंद्र सानप, पूनम सोनवणे, दामोदर मानकर, सचिन हांडगे, माजी नगरसेविका रुपाली गावंड आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सचिन पाटील, कुणाल पाटील, भारत पुराणिक, रोहित केणी, सचिन गायकवाड, नागेश मोरे, अनिल गायकवाड, दीपक कडाळे, हेरंभ मतवाड, कैलास पाटील आदींनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेहेडी बंधारा कोरडाठाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

चेहेडी पंपिंग स्टेशन येथील दारणा नदीपात्रातील बंधारा कोरडाठाक पडल्याने नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्राला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. या आकस्मिक पाणीटंचाईमुळे चेहेडी पंपिंग स्टेशन गेल्या तीन दिवसांपासून बंद करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. सध्या नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्राला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

चेहेडी येथे दारणा नदीवरील बंधाऱ्यातून नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रासह एकलहरे, पळसे, नायगाव, सिन्नर औद्योगिक वसाहत व सिन्नर नगर परिषद या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. परंतु, या बंधाऱ्यातील पाणी संपुष्टात आल्याने येथील पंपिंग स्टेशन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्राला होणारा पाणीपुरवठाही बंद झाला आहे. चेहेडी पंपिंग स्टेशन येथील दोन जॅकवेलपैकी एका जॅकवेलचे स्टेनर आठवडाभरापूर्वीच उघडे पडल्याने तेव्हापासूनच एक जॅकवेल बंद पडले होते. त्यानंतर आठवडाभर एकाच जॅकवेलवर नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा सुरू होता. परंतु, दुसऱ्या जॅकवेलचे स्टेनरही गेल्या शुक्रवारी उघडे पडल्याने दुसरे जॅकवेलही बंद करण्यात आले आहे. चेहेडी पंपिंग स्टेशन येथून नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्राला प्रतिदिन ५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. गेल्या वर्षीही दि. १२ मे ते ११ जुलै या कालावधीत पाणीटंचाईमुळे चेहेडी पंपिंग स्टेशन बंद करावे लागले होते.

--

नाशिकरोडला दूषित पाणी

चेहेडी पंपिंग स्टेशन बंद झाल्यानंतर नाशिकरोडला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, दोन दिवसांपासून शहरातील बहुतांश भागात गढूळ पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

--

एकलहरे, पळसेत पाणीबाणी

चेहेडी पंपिंग स्टेशन येथील बंधारा कोरडाठाक झाल्याने पळसे व एकलहरेतही पाणीबाणी निर्माण झाली आहे. या गावांना कमी पाणीपुरवठा केला जात आहे. पळसे ग्रामपंचायतीने नदीपात्रातील डोहातील पाण्यापर्यंत पाइप टाकून काही प्रमाणात पाणी उपलब्ध करून दिले आहे. शिवाय गावातील सार्वजनिक विहिरीतील पाण्याचाही उपसा सुरू केला आहे.

--

सिन्नर एमआयडीसीलाही फटका

सिन्नर एमआयडीसीसह सिन्नर नगर परिषदेलाही चेहेडी पंपिंग स्टेशन येथूनच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. एमआयडीसीच्या जॅकवेलजवळील पाणी पाच दिवसांपूर्वीच संपल्याने सिन्नर एमआयडीसी व नगर परिषदेच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. सिन्नर एमआयडीसीला दररोज ११ ते १२ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. सध्या केवळ ६ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत आहे. अजून, दोन दिवसांत दारणाचे आवर्तन न मिळाल्यास सिन्नर एमआयडीसीचाही पाणीपुरवठा खंडित होण्याची चिन्हे आहेत. सध्या डोहातील पाणी दुसऱ्या पंपाद्वारे उचलून विहिरीत टाकले जात आहे. शिवाय दारणापात्रात छोटासा गोण्यांचा बांधही घालण्यात आला आहे.

--

गेल्या शुक्रवारपासून साठवण बंधाऱ्यातील पाणी संपल्याने चेहेडी पंपिंग स्टेशन बंद करण्यात आले आहे. सध्या गंगापूर धरणाचे पाणी वापरले जात आहे.

-एस. टी. जाधव, उपअभियंता, पाणीपुरवठा, महापालिका

--

चेहेडी पंपिंग स्टेशन येथील साठवण बंधाऱ्यातील पाणी संपल्याने एमआयडीसीला १२ दशलक्ष लिटरची गरज असताना केवळ ६ दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे. एक-दोन दिवसांनंतर हे प्रमाण अजून कमी होईल. आवर्तन मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.

-नितीन पाटील, अभियंता, सिन्नर एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काजी बंधूंना पोलिस महासंचालक पदक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पोलिस दलात निष्ठेने कर्तबगारी सिध्द करणाऱ्या दोन भावांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर झाले आहे. हे दोन्ही भाऊ शहर पोलिस दलात कार्यरत असून, एकाच दिवशी दोघांचा सन्मान होणे नाशिककरांसाठी दुर्मिळ योग ठरला आहे. सोमवारी सकाळी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना एकावेळी पुरस्कार स्वीकारताना पाहणे हा कुटुंबीयांसाठी देखील अविस्मरणीय क्षण ठरणार आहे.

सलिम फकीर महंमद काजी आणि अलिम फकीर महंमद काजी यांना त्यांच्या पोलिस दलातील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल पोलिस महासंचालकांचे मानाचे पदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र दिनी (१ मे) पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांना मान्यवरांच्या हस्ते हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. सलीम काझी यांची नेमणूक अंबड पोलिस स्टेशनला असली तरी सध्या ते परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. २७ वर्षांच्या सेवाकाळात त्यांना २९१ बक्षिसे मिळाली आहेत. अलिम काझी यांची नेमणूक मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये असून, ते सहायक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या कार्यालयात कर्तव्यावर असतात. त्यांना वीस वर्षांच्या कार्यकाळात २९८ बक्षिसे मिळाली आहेत. सलीम यांनी पंचवटी व नाशिकरोडसह विविध पोलिस स्टेशन्समध्ये

कर्तव्य बजावले आहे.

गुन्हे लेखनिक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. १९९६ व २००० मध्ये त्यांना पोलिस महासंचालकांकडून आगाऊ वेतनवाढ मिळाली होती. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन पदकप्राप्तीसाठी कारणीभूत असल्याचे हे बंधू सांगतात. कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या मार्गावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अलिम यांनी बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन केले होते.

दुर्गम भागातील निरीक्षकाचाही होणार गौरव

सुरगाणासारख्या अत्यंत दुर्गम भागात वरिष्ठ निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या लिलाधर कानडे यांनाही पोलिस महासंचालकांच्या पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. नर्मदा बचाव आंदोलन त्यांनी कुशलतेने हाताळले आहे. २००६ ते २०११ या कालावधीत नाशिक एटीएसमध्ये कार्यरत असताना बिलाल बाबा या दहशतवाद्यास अटक करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. २६/११ दहशतवादी हल्ला, जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, जव्हेरी बाजार बॉम्बस्फोट तसेच मालेगाव बॉम्ब स्फोट-२००८ या गुन्ह्यांमध्ये त्यांनी सहतपासी अधिकारी म्हणून काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रामसभेत कर्जमुक्तीचा ठराव करावा’

$
0
0

पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्र दिनानिमित्त प्रत्येक गावात होणाऱ्या ग्रामसभेत शेतकऱ्यांनी उपस्थित राहून शेतकरी कर्जमुक्तीचा ठराव मंजूर करून घ्यावा. तसेच या ठरावाची प्रत नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जमा करावी, असे आवाहन स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार व उपाध्यक्ष साहेबराव मोरे यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी, गत अनेक वर्षांपासून शेतमालाला समाधानकारक भाव नसल्याचे सांगितले. शेतमालाला मिळणारा भाव व उत्पादन खर्च याचा मेळ बसत नाही, या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कर्जमुक्ती अभियान राबविले जात आहे, असेही पगार म्हणाले.

प्रत्येक गावातील ग्रामसभेतील ठराव कर्जमुक्तीबाबत सरकारवर दबाव वाढविण्यासाठी महत्त्वाचा आहे. यांसह विविध मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मांडल्या आहेत. या सर्व मान्य होण्यासाठी ग्रामसभेत शेतकऱ्यांची उपस्थिती आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images