Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रणरागिणींचा उद्रेक

$
0
0

सटाण्यात दारू दुकान पेटविले; महामार्गावर ठिय्या आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरालगतच्या आरम नदीपात्रातील देशी दारू दुकान बंद करण्याच्या मागणीकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष, मद्यपींकडून होणारी छेडछाड व संसाराच्या होणाऱ्या राखरांगोळीने मळगावच्या रणरागिणींच्या संतापाचा शनिवारी उद्रेक झाला. संतप्त महिलांनी देशी दारू दुकानाची तोडफोड करून पेटविण्याबरोबरच दुकानमालक भाऊसाहेब सूर्यवंशी यांनाही चोप दिला. तसेच, पोलिसांना न जुमानता राज्य महामार्गावर रास्ता रोको करीत प्रशासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. दरम्यान, रात्री उशिरा पोलिसपाटीलसह चार जणांवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्य महामार्गावरील दारूचे दुकाने बंद झाल्याने सटाणा शहरापासून हाकेच्या अंतरावरील आरम नदीपात्रातील देशी दारूचे दुकानात सातत्याने मद्यपींची गर्दी वाढत होती. मळगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे, याकरिता महिलांसह ग्रामस्थ सातत्याने मागणी करीत होते. दुकानमालकाला या संदर्भात नोटीसदेखील बजाविण्यात आली होती. मात्र याकडे कानाडोळा करित दुकान सुरूच होते. मद्यपींकडून महिलांच्या छेडछाडीचे प्रकारही वाढले होते. या गोष्टींचा परिपाक म्हणून की काय शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास महिलांनी एकत्रित येऊन कोणतीही पूर्वसूचना न देता मोर्चा देशी दारू दुकानाकडे वळविला. दुकानावर हल्लाबोल करीत दुकानातील साहित्यासह दारू बाटल्यांची तोडफोड करण्यास प्रारंभ केला. पत्र्यांचे शेडही उद्‍ध्वस्त केले. पोलिसांनी अधिक तणाव निर्माण होऊ नये, यासाठी जमाव पांगविण्यास प्रारंभ केला असता संतप्त महिलांनी पोलिसांवरच हल्लाबोल केला.

सिलिंडरचा स्फोट

संतप्त झालेल्या महिलांनी दुकानाला आग लावून दारूचे खोके पेटविले. या आगीत दुकानातील गॅस सिलिंडर व फ्रिजचा स्फोट झाला. आग विझविण्यासाठी आलेला पालिकेचा बंबदेखील महिलांसह ग्रामस्थांनी परतून लावल्याने पोलिसदेखील हतबल झाले होते. या धुमश्चक्रीत महिलांनी अधिक आक्रमक होत आपला मोर्चा राज्य महामर्गावर वळविला. सुमारे २०० हून अधिक महिलांनी शहरातील ताहाराबाद नाक्यावर असलेल्या चौकात रास्ता रोकोस प्रारंभ केल्याने पोलिसांची धावपळ उडाली. देशीदारू दुकानाच्या तोडफोडीनंतर पोलिसांनी पोलिस पाटलांना या घटनेस जबाबदार धरून ताब्यात घेतले असता, ग्रामस्थ व महिला अधिक संतप्त होत रास्ता रोको केला.

सोमवारी बैठक

शनिवारच्या सुटीमुळे अधिकारी अनुपस्थित असल्याने सोमवारी (दि. २४) मळगाव ग्रामपंचायतीत ग्रामस्थांसह महिलांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन नायब तहसीलदार दीपक धिवरे यांनी दिले.

कळवणमध्ये अड्डे उद्ध्वस्त

दारू दुकाने ५०० मीटर बाहेर नेण्यास बंधन टाकल्यामुळे ग्रामीण भागात गावठी दारूला मागणी वाढली आहे. खेड्यापाड्यावर गावठीचे पेव फुटल्याने पोलिस यंत्रणेने त्याविरोधात मोहीम उघडली आहे. कळवण तालुक्यातील बेजनंतर गिरणा नदीकाठी पिळकोस शिवारात गावठी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाडकरांना अंशतः दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तब्बल २२ दिवसाआड पाणी मिळणाऱ्या मनमाड शहराला यंदा सात ते आठ दिवसाआड पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळत आहे. गेल्या दोन वर्षात प्रथमच आठ दिवसाआड नळांना पाणी मिळत असल्यामुळे शहरवासीय काही प्रमाणात का असेना आनंदात आहेत.

गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा मनमाड शहराला येत्या मे महिन्यातही पाणीटंचाईच्या झळा जाणवणार नसल्याचे चित्र आहे. वर्षानुवर्षे कधी एकवीस दिवसाआड तर कधी सोळा दिवसाआड नळाला पाणी आलेले पाहण्याची सवय मनमाडकरांना झाली आहे. यंदा मात्र किमान आठ दिवसाआड पाणी मिळणार असल्याने गेल्या काही वर्षांच्या भीषण पाणीटंचाईच्या तुलनेत मनमाडमध्ये काही प्रमाणात दिलासादायक चित्र आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ मनमाडकरांवर येते. पाणीटंचाई पाचवीलाच पुजल्यामुळे अनेक कुटुंबांनी येथून इतर शहरात स्थलांतर केले आहे. मनमाडला पाणीटंचाई असते म्हणून येथे मुलगी देतांनाही चारवेळा विचार केला जातो. गेल्या वर्षी शहर परिसरातील

विहिरी बोअरवेल आटून गेल्याने पाणी टंचाईची तीव्रता जाणवली. यंदाही परिस्थिती कशी असेल याबाबत जनमानसात साशंकता होती. मात्र एप्रिल अखेरीस पाणी टंचाईने फारसे भेडसावले नसल्याचे दिसून येत आहे. २५ एप्रिलपर्यंत पालखेड डाव्या कालव्यातून शहरासाठी आवर्तन मिळणार असल्याने मे महिन्यात प्रथमच सात ते आठ दिवसाआड पाणी पुरवठा करणे पालिकेला शक्य असल्याचे प्रशासन आत्मविश्वासाने सांगत आहे. आवर्तनाला उशीर झाला तरच मनमाडची पाणी समस्या गंभीर होईल, मात्र आवर्तनाचे पाणी मिळणार हे स्पष्ट असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी खूप पायपीट करण्याची व खासगी टँकरकडे डोळे लावून बसण्याची गरज नसल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाचे प्रयत्न

नगराध्यक्ष पद्मावती धात्रक गटनेते गणेश धात्रक मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी अधिकारी कर्मचारी वर्गाची बैठक घेऊन नियोजन केल्याचे सांगितले जाते. पाण्याची नासाडी कमी करणे, काटकसरीने वापर करणे यासाठी जागृती, पाणीगळती शोधून तत्काळ दुरुस्ती करणे, वागदर्डी धरणातून पाणी चोरीला जात असल्याच्या तक्रारी वरून दक्षता पथक नेमणे, नळांना तोट्या बसविणे आदी प्रयत्न करण्यात आले आहेत. मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, पाणी पुरवठा विभाग अधिकारी शेषराव चौधरी, चेतन विसपुते, सभापती विनय आहेर आदींना यासाठी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात ३० मोबाइल टॉयलेट्स

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात शहर हागणदारीमुक्त करण्याचा विडा पालिकेने उचलला असून, तब्बल साडेसहा हजार लाभार्थ्यांना शौचालय बांधून दिले आहेत. वैयक्तिक शौचालयापाठोपाठ गटशौचालय उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. मात्र, जागेअभावी अनेक ठिकाणी गटशौचालयांची उभारणी शक्य नसल्याने अशा ठिकाणी आता मोबाइल टॉयलेट्स बसविले जाणार आहेत. सोबतच नदीकाठावरही काही ठिकाणी मोबाइल टॉयलेटचा वापर केला जाणार आहे. नव्याने ३० मोबाइल टॉयलेट खरेदीसाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत.

केंद्र सरकारने २०१८ पर्यंत शहरे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी वैयक्तिक व गटशौचालये दिली जात आहेत. महापालिकेने शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण करून नुकतीच साडेसहा हजार वैयक्तिक शौचालये पूर्ण केली आहेत, तसेच काही ठिकाणी गटशौचालये उभारण्याचाही प्रस्ताव ठेवला होता. मोठ्या झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी गटशौचालये उभारली जाणार होती. मात्र, या ठिकाणी जागेची कमतरता असल्याने गटशौचालय उभारले गेले नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी महापालिकेने आता मोबाइल टॉयलेटचा प्रस्ताव ठेवला आहे. दहा टॉयलेटचे तीन नग खरेदी करण्यासाठी आरोग्य विभागाने निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे झोपडपट्टीच्या ठिकाणी मोबाइल टॉयलेटचाही वापर केला जाणार आहे, तसेच गोदावरीच्या नदीकाठावरही काठी ठिकाणी हे मोबाइल टॉयलेट बसविले जाणार आहेत. त्यामुळे गोदावरीचे प्रदूषण नियंत्रित होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठरावाला ठोकरून ‘अड्डा’ सुरूच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आरम नदीपात्रातील मळगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे, याकरिता महिलांसह ग्रामस्थांनी सातत्याने मागणी केली होती. इतकेच नव्हे तर ग्रामसभेत तब्बल तीन वेळा ठराव करण्यात करण्यात आला होता. देशी दारू दुकानमालक यांना या संदर्भात नोटीसदेखील बजावण्यात आली होती. मात्र याकडे कानाडोळा करित देशीदारूचे दुकान सुरूच होते. तसेच देशी दारू दुकान परवाना मुंजवाड येथील असतांना दुकान मात्र मळगाव हद्दीत असल्याचेदेखील निष्पन्न झाल्याने अधिक संताप व्यक्त करण्यात आला.

शासनाने राज्य महामार्गावरील विदेशी दारू दुकाने बंद केल्याने मद्यपींची गैरसोय झाली आहे. परिणामी मद्यपींनी आपला मोर्चा सद्या देशी दारू दुकानाकडे वळविला आहे. यामुळे दररोज या ठिकाणी गर्दी व दर्दी वाढू लागले होते. या गर्दी व दर्दी मद्यपींनी मुजवांड व मळगाव परिसरातील गावाकडे जाणाऱ्या महिलांची छेडछाड करण्यासदेखील सुरुवात केली होती. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. प्रशासनाचे दुर्लक्ष व होणाऱ्या त्रासामुळे म‌हिलांचा संताप झाला. तालुका महिला हक्क समितीच्या अध्यक्षा अ‍ॅड. सरोज चंद्रात्रे यांनी रास्ता रोकोचे नेतृत्व करीत तहसीलदार, पोलिस उपविभागीय अधिकारी, प्रांताधिकारी तसेच उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी येऊन दारूदुकान बंद करण्याचे लेखी आश्वासान देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसरा शनिवार असल्याने अधिकारी अनुपस्थित असल्याने सोमवारी (दि. २४) मळगाव ग्रामपंचायतीत ग्रामस्थांनासह महिलांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन नायब तहसीलदार दीपक धिवरे यांनी दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. रास्ता रोकोप्रसंगी वैशाली देवरे, मंगलाबाई सोनवणे, शीतल दात्रे, विद्याबाई जाधव, सुनीता पवार, कौशल्याबाई सावकार, ललिता सांवत, वत्सला सोनवणे, कलाबाई बागूल, यशोदा पवार आदींसह महिला सहभागी झाल्या होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईटीसाठी जिल्ह्यातून २१ हजार विद्यार्थी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) इंजिनीअरिंग आणि फार्मसीच्या पदवी अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) ११ मे रोजी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातून या परीक्षेसाठी सुमारे २० हजार ९७२ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. शहरातील ५० केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे.
११ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत ही परीक्षा पार पडणार आहे. या वेळेत फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ्स (पीसीएम) आणि फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी (पीसीबी) हे दोन पेपर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेच्या नियोजनासाठी शहरात ५० परीक्षा केंद्रांवर सुमारे १३०० कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यातून ३ लाख ८९ हजार ३९६ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यंदा ही संख्या गत काही वर्षांच्या तुलनेत जास्त असल्याची माहिती तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. या परीक्षेसाठी अर्ज करण्यास अगोदर ३० मार्चपर्यंत मुदत होती. मात्र, या तारखेनंतरही अनेक इच्छुक विद्यार्थी अर्ज भरण्याचे शिल्लक राहीले असल्याचे लक्षात आल्यानंतर या विद्यार्थ्यांना १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
नाशिक विभागातून ४६ हजार विद्यार्थी
तंत्रशिक्षण विभागाने सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय आकडेवारीही जाहीर केली आहे. यानुसार यंदा नाशिक विभागातील चार जिल्ह्यातून ४६ हजार १८७ विद्यार्थी परीक्षा देतील. पुणे विभागामधून सर्वाधिक ९२ हजार ८८४ अर्ज दाखल झाले आहेत. मुंबई विभागातून ८० हजार ३०४, सांगली विभागातून ३२ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. औरंगाबाद विभागातून ३२ हजार ९०१, नांदेड विभागातून २७ हजार ११९ विद्यार्थी, अमरावती विभागातून ३२ हजार १५८ आणि नागपूर ४५ हजार ४६६ अशा एकूण आठ विभागांमधून ३ लाख ८९ हजार ३९६ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.


...म्हणून वाढली विद्यार्थीसंख्या

खासगी मेडिकल कॉलेजेसमध्ये एमबीबीएस किंवा बीडीएस या अभ्यासक्रमांनाच प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ परीक्षा सक्तीची आहे. मात्र, या कॉलेजेसच्या रांगेत ज्यांना उभे राहायचे नाही ते विद्यार्थी इंजिनीअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमांना प्राधान्य देत आहेत. या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने जास्त असल्याकारणाने यंदा सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित खासगी, ऑटोनॉमस संस्थांमध्ये प्रवेशासाठी या परीक्षेमार्फत प्रवेश दिले जातील. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त (सीईटी सेल) यांच्या वतीने सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीप उलटून ११ जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दशक्रिया विधी आटोपून घराकडे परतणारे वाहन उलटून झालेल्या अपघातात एका बालकासह ११ जण जखमी झाले. अपघाताची घटना शनिवारी सुरगाणा तालुक्यातील खोडीपाडा घाटात झाली. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सायंकाळी दाखल करण्यात आले असून, यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

राक्षसभुवन येथे दशक्रिया विधीसाठी विविध ठिकाणचे नातलग खासगी मॅक्स गाडी करून गेले होते. दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपून सर्व बाऱ्हेकडे परतत असताना दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. खोडीपाडा घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीपने तीन पलट्या घेतल्या. अपघातात ११ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये जीवला मांगू ढोके (वय ३८), कल्याणी जीवला ढोके (१०, रा. करंजखेड, ता. दिंडोरी), रामचंद्र खांडवेकर (६५), रामचंद्र गायकवाड (४२), इंदूबाई विजय गायकवाड (४०), एकनाथ शंकर गायकवाड (५२, रा. उंबरपाडा, ता. सुरगाणा), यमुना चंदर गायकवाड (४५, रा. राक्षसभवन), गीता महादेव पालवा (४०, रा. बुबळ, ता. सुरगाणा), लवंगाबाई चिमणराव चौले (७५, उंबरपाडा), कुसुम पालवा (४२, रा. म्हसरूळ, नाशिक) जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​स्वस्थ महाराष्ट्र अभियान तयारीला वेग

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत पथदर्शी प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेल्या राज्यातील सहा जिल्ह्यात नाशिकचा समावेश असून अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा पातळीवर सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.
अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आल होतेे. बैठकीस जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एस. पी. जगदाळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी उपस्थित होते.
गावपातळीवर अभियानाबाबत माहिती देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या पातळीवर प्रयत्न करण्यात यावेत. रुग्णांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून अचूक निदान करण्यासाठी शासकीय तसेच खासगी रुग्णालयाचे सहकार्य घेण्याबाबत नियेाजन करण्यात यावे, अशा सूचना शंभरकर यांनी यावेळी दिल्या.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे २६ एप्रिल रोजी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. अभियान १ ते २७ मे या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबिराचे नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले असल्याने त्याच धर्तीवर या अभियानाचेदेखील सूक्ष्म नियेाजन करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र तपासणी कक्ष स्थापन करण्याच्या सूचनादेखील बैठकीत देण्यात आल्या. गरजू रुग्णांना विविध शासकीय योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत. शासकीय योजनांचा लाभ न घेऊ शकणाऱ्या रुग्णांवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जिल्ह्याच्याच ठिकाणी मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गोऱ्हेंच्या कार्यक्षमतेचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकशाहीवरचा तरुण मंडळींचा विश्वास उडाला, तर काय होईल हे सांगता येणार नाही. महिलांवरील अत्याचार सातत्याने वाढत आहेत. पुरुष एकीकडे आईला देव मानतो, तर दुसरीकडे बायकोला लाथा मारतो, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासारख्या चळवळीतल्या आमदारांचा कार्यक्षम आमदार पुरस्काराने सन्मान केला जातो, ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केले.

सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे देण्यात येणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार त्यांच्या हस्ते शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या समारंभाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राज्यमंत्री दादा भुसे, माजी मंत्री विनायकदादा पाटील, आमदार हेमंत टकले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

रामराजे निंबाळकर म्हणाले, की भारतीय लोकशाही पवित्र असून, ती अधिक सक्षम करण्याची गरज आहे. लोकशाही व्यवस्था कार्यक्षम राहण्यासाठी अधिक अभ्यास करून प्रशासनावरची पकड मजबूत

करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

विनायकदादा पाटील यांनी डॉ. गोऱ्हे यांचा परिचय करून दिला. निवड समितीतर्फे हेमंत टकले यांनी मनोगत व्यक्त केले. वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर जयप्रकाश जातेगावकर यांनी सूत्रसंचालन केले.


पुरस्काराची रक्कम आपत्तीग्रस्तांना

सत्काराला उत्तर देताना आमदार डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, की सार्वजनिक वाचनालयासारख्या संस्थेच्या हातून माझा कार्यक्षम आमदार म्हणून सत्कार होतो, हे मी भाग्य समजते. लोकांच्या प्रश्नांवर तुम्ही काम केले, तरच लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात. पुरस्काराची ५० हजारांची रक्कम मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त महिलांच्या पुनर्वसनासाठी देण्याची घोषणाही आमदार डॉ. गोऱ्हे यांनी केली.


‘न्यायव्यवस्था चालवतेय देश’

खासदार संजय राऊत म्हणाले, की बहुमत हा दहशतवाद झाला आहे. त्यामुळे कुणाचा वचक राहिलेला नाही. राजकीय पाठबळ असल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत, असेही ते म्हणाले. सध्या सरकार देश चालवत

नसून, न्यायव्यवस्था चालवत आहे. न्यायाधीश या देशाचे राज्यकर्ते झाले असून, दारू कोणी प्यावी, हेदेखील न्यायालय सांगणार असेल, तर कठीण आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. डॉ. गोऱ्हेंनी समाजकारणात संघर्ष केला, पाण्यापासून महागाईपर्यंत आंदोलने केली, त्याचे हे फलित असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लुटारूंची टोळी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पिस्तुलचा धाक दाखवत चारचाकी, मोबाइल आणि रोकड असा मुद्देमाल लंपास करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. यातील सराईत गुन्हेगारांनी केलेले आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

घोटी येथील सिन्नर फाटा येथे ९ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास लूटमारीची घटना घडली होती. आरोपींनी सिल्व्हर रंगाच्या कारमधील चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडूल मोबाइल व २,८०० रुपयांची रोकड घेतली, तसेच चालकाला संगमनेर येथे सोडून त्याची कार पळवून नेली. या प्रकरणी घोटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची पोलिस अधीक्षक अकुंश शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी माहिती घेऊन तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले यांना सूचना केल्या. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वेहेळगाव येथे राकेश राजेंद्र संसारे (वय २१, देवळाली प्रवरा, ता. राहुरी), रजनीकांत संजय गरुड (२१, नागपूर एमआयडीसी, अहमदनगर) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी त्यांचे साथीदार रामा वस्ताद आणि राहुल जायभावे यांच्यासह लूटमार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांकडून कार (एमएच ४१/व्ही ७५१६) एक मोबाइल जप्त केला.

संशयित आरोपी राकेश संसारे सराईत गुन्हेगार असून, मालेगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात तो फरार होता. संसारेने मालेगाव मनमाड रोडवर चोंढी घाटात तब्बल १६ टन लसूण भरलेला मालट्रक दरोडा टाकून पळवून नेला होता. या गुन्ह्याची कबुलीदेखील संसारेने दिली असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​भालेकर शाळा बंद पाडली!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहराच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली बी. डी. भालेकर शाळा बंद पडली नसून ती बंद पाडण्यात आली आहे. शिवाय आपले हितसंबंध जोपासण्यासाठी ही शाळा भाडेतत्वावर देण्याची तयारी महापालिकेने केली आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया बी. डी. भालेकर बचाव समिती व शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच तसेच शिक्षण चळवळीशी संबंधित संस्था, संघटना यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत. ही शाळा सुरू राहावी, यासाठी शहरातील यांसारख्या संघटनांकडून शर्थीची पराकाष्ठा करण्यात आली आहे. तरीदेखील प्रशासन शाळा वाचविण्याऐवजी ती पैसे मिळविण्याचा स्त्रोत बघत असेल तर ते निषेधार्ह असल्याचे या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जिल्हा परिषदेसमोरील बी. डी. भालेकर शाळेचा प्रश्न विद्यार्थी नसल्याच्या कारणाने नेहमी चर्चेत राहिला. ही शाळा टिकावी, येथे वर्ग भरावेत, यासाठी बी. डी. भालेकर हायस्कूल बचाव समितीचीही स्थापना करण्यात आली होती. सद्यस्थितीत या शाळेत साठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्था एकीकडे शाळा वाचविण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे ती भाड्याने देऊन पैसे मिळविण्याचे साधन म्हणून शाळेकडे पाहिले जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारविण्यासाठी शाळांचे माध्यम वापरणे हा पर्याय नसल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.


खासगी क्लासचालकाचा डोळा
ही जागा भाडेतत्वावर मिळावी, यासाठी खासगी क्लासेस चालविणाऱ्या शिक्षणसंस्थेचा डोळा पूर्वीपासूनच भालेकर शाळेवर असल्याचे शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाच्या वतीने सांगण्यात येत आहे. खासगी क्लासेस चालविणारा व्यक्ती विद्यार्थी आणू शकतो, तर प्रशासनाला विद्यार्थी आणणे काय कठिण आहे, असा सवाल यानिमित्त उपस्थित करण्यात आला आहे.

प्रशासनाधिकाऱ्यांना निवेदन
सरकारी मालकीची जागा २०१२च्या शासननिर्णयानुसार खासगी संस्थांना देता येत नाही, असे आडगाव येथील एका जागेबाबत सरकारी यंत्रणेनेच तेथील गावकऱ्यांना सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर बी. डी. भालेकर शाळेची जागा कोणत्या कायद्यांतर्गत देण्यात येणार आहे, असा प्रश्न शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाच्या वतीने मनपा शिक्षणसमितीच्या प्रशासनाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे विचारण्यात आला आहे. याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी उपलब्ध कागदपत्रे द्यावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या शाळेच्या स्थितीला प्रशासन जबाबदार असून शाळेचे नेमके काय करायचे, हे पूर्वनियोजित आहे. काही अधिकारीच आपले हितसंबंध जोपासण्यासाठी शाळा भाडेतत्वावर देण्याचा घाट घातला जात आहे. आता जाहिराती देऊन केवळ आव आणला जात आहे.
- डॉ. मिलिंद वाघ, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच
मनपा शाळांची स्थिती अगोदरच वाईट असताना अशाप्रकारे पैसे मिळविण्यासाठी शाळेचा मजला भाडेतत्वावर देणे निषेधार्ह आहे. गेल्या तीन वर्षात मनपा शाळांची विद्यार्थीसंख्या हजारोनी रोडावली आहे. अशी स्थिती असतानाही इतका मोठा निर्णय प्रशासन देत असेल तर शिक्षणाविषयी त्यांची अनास्थाच दिसून येते आहे. या निर्णयाला आमचा पूर्ण विरोध असून अजूनही शाळा वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.- वसंत एकबोटे, बी. डी. भालेकर हायस्कूल बचाव समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रासबिहारी शाळेत विपश्यना वर्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल येथे दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय विपश्यना शिबिर घेण्यात आले. शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनापाना या विपश्यनेमधील मुलभूत ध्यान प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांना ध्यानधारणा यांच्या साहाय्याने नवचैतन्य, ऊर्जा तसेच आयुष्यात नव्याने सुरुवात करण्यासाठीचा केंद्रबिंदु, आत्मविश्वास याची जाणीव प्रत्यक्ष अनुभवातून देण्यात आली.
यात कुठलाही मंत्र किंवा कल्पना नसून आपला श्वास हेच सत्य आहे याची अनुभूती यातून मुलांना घडली. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या या प्रशिक्षणामुळे त्यांची अभ्यासातील एकाग्रता व सातत्य कायम राहील असा विश्वास यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका बिंदु विजयकुमार
यांनी व्यक्त केला. तसेच या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक सजगता निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी या प्रशिक्षण वर्गाचा मुलांना दैनंदिन जीवनात सातत्याने उपयोग होणेकारिता गेल्या ७ वर्षांपासून शाळेत दररोज सकाळी दहा मिनिटांची विपश्यना घेण्यात येते हेदेखील त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना विपश्यना प्रशिक्षक अश्विनी घैसास यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा चार अंशांनी घसरला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळेच काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. शहरात शनिवारी ३६, तर किमान १९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा कमी झाला आहे. गेल्या मंगळवारी चाळिशी पार केलेला पारा आता थेट ४ अंशांनी घसरला आहे. त्यामुळे भरदुपारी शुकशुकाट असलेले शहरातील रस्तेही गजबजत आहेत. ऐन लग्नसराईत उन्हामुळे विविध व्यवसायांवर परिणाम झाल्याचे दिसून येत होते. पारा घसरल्याने आता व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शहरात शनिवारी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत हे तापमान बरेच खाली आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये ३२.६ अंश सेल्सिअस तापमान असून, त्यानंतर नाशिकचे तापमान आहे. नाशिकच्या किमान तापमानातही घट झाली आहे. त्यामुळेच रात्री गारवा आणि दुपारी ऊन असे वातावरण सध्या आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हंडाभर चांदण्या’ची रसिकांना मेजवानी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठी रंगभूमी गाजवीत असलेल्या आणि दुष्काळग्रस्तांच्या दाहकतेवर टोकदार भाष्य करणाऱ्या ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाचा विशेष प्रयोग खास ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. येत्या शनिवारी (दि. २९) सायंकाळी सहा वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात हा नाट्यप्रयोग रंगणार आहे.

नाशिकच्याच मातीतील दत्ता पाटील यांनी या नाटकाचे लेखन केले असून, दिग्दर्शन सचिन शिंदे यांचे आहे. प्रमोद गायकवाड नाटकाचे निर्माते आहेत. सध्या सर्वत्र या नाटकाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. मटा सन्मान नाट्य महोत्सवात या नाटकाने बाजी मारली आहे. राष्ट्रीय नाट्य शाळेच्या (एनएसडी) भारतरंग महोत्सवासाठी देश-विदेशांतील ६९ नाटकांमध्ये निवडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील या एकमेव नाटकाचा प्रयोग पाहावयास मिळणे ही ‘मटा’च्या वाचकांसाठी पर्वणी ठरणार आहे. मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही हे नाटक गौरविले जात आहे. विविध प्रश्नांचे बिऱ्हाड पाठीवर घेत जगणे सहज करून घेणाऱ्या ग्रामीण भागातील लोकजीवनाचा हुंकार या नाटकाच्या माध्यमातून उमटणार आहे. शहरी नागरिकांना टँकरचे महत्त्व नसले, तरी ग्रामीण भागात पाण्यासाठी आसुसलेले लोक मात्र अत्यंत आतुरतेने टँकरची वाट पाहत असतात. टँकर येत नाही हे लक्षात आल्यानंतर जी काही टोकाची पावले उचलली जातात ती पाहताना दुष्काळाची दाहकता संवेदनशील रसिकांच्या अंगावर आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हे नाटक एक वेगळा अनुभव देणारे ठरेल यात शंका नाही.


नवीन मेंबर्सनाही प्रवेशिका

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कल्चर क्लब सदस्यांना या नाटकासाठीच्या प्रवेशिका मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. कल्चरल क्लबची नवीन मेंबरशिप घेणाऱ्यांनाही या नाटकाच्या प्रवेशिका दिल्या जाणार आहेत. नवीन मेंबरशिपसाठी २९९ रुपये शुल्क असून, सदस्यांना वर्षभर भरगच्च कार्यक्रम आणि उपक्रमांचा लाभ त्याद्वारे मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगचा तिढा सुटणार

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका प्रशासनाने शहरातील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पार्किंगच्या समस्येकडे लक्ष केंद्रित केले आहे. शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रहदारीच्या दृष्टीने वाहनतळांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे रहदारीवर ताण पडून वाहतूक कोंडी होत असते. यावर पर्याय म्हणून महापालिकेने शहरात १२ वर्दळीच्या ठिकाणी चारचाकी वाहनांसाठी रोटरी पार्किंग सिस्टिम उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. सीबीएस, शालिमार, अशोक स्तंभ या वर्दळीच्या ठिकाणी रोटरी पार्किंग होणार आहे. दरम्यान, या १४ रोटरी पार्किंग स्थळांसह उर्वरित ४१ पार्किंग स्थळे आउटसोर्सिंगद्वारे चालविली जाणार असून, सर्व पार्किंग स्थळे अॅपद्वारे नियंत्रित केली जाणार आहेत. त्यामुळे पार्किंग, तसेच वाहतूक कोंडीच्या कटकटीतून नाशिककरांची सुटका होणार आहे.

शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय म्हणून पार्किंगकडे पाहिले जाते. शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने व पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिक रस्त्यावरच वाहने पार्क करतात. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सीबीएस, शालिमार, रविवार कारंजा, भद्रकाली, अशोक स्तंभ, मेनरोड आदी ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न बिकट बनला आहे. पार्किंगसाठी ठिकाणच नसल्याने येथे रस्त्यावरच पार्किंग केले जात असल्याने सर्वसामान्यांना येथून वाट काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या वाहतुकीच्या कटकटीतून आता नाशिककरांची सुटका होणार आहे.

अशी असेल रचना

शहरात १२ ठिकाणी १४ रोटरी पार्किंग स्टेशन उभारले जाणार आहेत. एका पार्किंग स्टेशनमध्ये १४ कार बसणार आहेत. हे सात मजली रोटरी पार्किंग हायड्रोलिक पद्धतीचे राहणार असून, त्याचा संपूर्ण खर्च महापालिका उचलणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका मुख्यालय, अशोक स्तंभ, शालिमार, रविवार कारंजा या वर्दळीच्या ठिकाणी हे पार्किंग स्टेशन उभारले जाणार आहेत. या ठिकाणी जवळपास १६० वाहनांचे पार्किंग होणार असून, त्यासाठी महापालिकेने निविदा काढली अाहे. कंपन्यांना रोटरी पार्किंगसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. संबंधित कंपनीलाच तीन वर्षांचे देखभाल व दुरुस्तीचे काम दिले जाणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.


५५ ठिकाणी ट्रॅफिक मॅनेजमेंट

महापालिकेचे शहरात सध्या ३६ वाहनतळ हे रस्त्यांवर, तर ५ वाहनतळ मध्यवर्ती भागांमध्ये आहेत. या सर्व ४१ वाहनतळांचे मॅनेजमेंटही आता एकाच ठिकाणाहून केले जाणार आहे. सोबतच नव्याने उभारल्या जाणाऱ्या १४ रोटरी पार्किंग स्टेशनचेही नियंत्रण या ट्रॅफिक मॅनेजमेंटच्या माध्यमातूनच होणार आहे. त्यासाठी महापालिकेत स्वतंत्र ट्रॅफिक सेल स्थापित करण्यात येणार आहे. या सर्व ५५ पार्किंग स्थळांच्या नियंत्रणासाठी अॅप विकसित केले जाणार आहे. या अॅपवरच वाहनधारकाला आपले वाहन कुठे पार्किंग केले आहे, त्याची माहिती समजणार आहे. त्यासाठी एका एजन्सीलाच ट्रॅफिक नियंत्रणाचे काम दिले जाणार आहे.


१२ ठिकाणे, १४ पार्किंग

महापालिका मुख्यालय- २

-महापालिका मुख्यालय- २

-जिल्हाधिकारी कार्यालय- २

-जिल्हा न्यायालय- १

-अशोक स्तंभ- १

-शालिमार- १

-मालेगाव स्टँड- १

-निमाणी चौक- १

-रोटरी क्लब पंडित कॉलनी- १

-सराफ बाजार- १

-नाशिक पश्चिम कार्यालय- १

-सोमाणी गार्डन, नाशिकरोड- १

-इंद्रकुंड- १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये आज उटीची वारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथे रविवारी निवृत्त‌िनाथांची उटीची वारी होत आहे. चैत्र वद्य एकादशी ही वरूथिनी एकादशी आहे. या दिवशी वारकरी बांधव संत निवृत्त‌िनाथ महाराज यांच्या समाधीला चंदनाचा लेप म्हणजेच उटी लावतात. यावेळेस शनिवार, रविवार असे दोन दिवस एकादशीचा योग आला आहे. वारकरी संप्रदाय भागवत एकादशी करत असतात. म्हणून रविवारी उटीची वारी होत आहे.

चैत्र संपतो आणि वैशाख सुरू होता. या संक्रमण कालावधीत तापमान प्रचंड वाढलेले असते. संत निवृत्त‌िनाथांना वैशाख वणवा त्यांना सुसाह्य व्हावा म्हणून त्यांच्या समाधीस चंदनाचा लेप लावण्याची प्रथा आहे. अर्थात उटीचा हा सोहळा अनुभवण्यासाठी आणि प्रसाद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने वारकरी येथे हजेरी लावतात. चैत्रपंचमीपासून चंदन उगळण्यास प्रारंभ झाला आहे. ५० किलो चंदन उगाळण्यात आले आहे. हे चंदन उगाळताना भाविक मोठ्या भक्तिभावाने ओव्या, अंभग म्हणतात. हे उगाळलेले चंदन दुपारी दोन वाजेच्या सुमारास समाधीस विधीपूर्वक लावले जाणार आहे. रात्री ११ वाजेनंतर हा चंदनाचा लेप उतरवून भाविकांना प्रसाद म्हणून वाटला जाईल. या सोळ्यासाठी त्र्यंबकनगरीत शनिवारी सायंकाळी वारकरी दाखल झाले आहेत. निवृत्तीनाथ मंदिर परिसरात प्रसाद, खेळण्यांची दुकाने, फराळांच्या पदार्थांची स्टॉल लागले आहेत. नगरपालिकेकडून पाणी, स्वच्छता, वीज आदींची सोय करण्यात आली आहे. मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे-केरुरे या स्वतः लक्ष ठेऊन आहेत. नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी यात्रोत्सवासाठी सहकार्य करण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृक्षसंवर्धनासाठी सरसावले विद्यार्थी

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
चेहेडी येथील आई सोशल ग्रुपने सुरू केलेल्या अंकुर या उपक्रमात जेलरोड येथील अभिनव आदर्श मराठी या शाळेतील ८० विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमातील सहभागी विद्यार्थी येत्या जागतिक पर्यावरण दिनापर्यंत विविध झाडांच्या बियांपासून अंकुर अथवा सीड बॉल्स तयार करण्याचे काम करणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात शनिवारी जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने झाली.
आई सोशल ग्रुप पर्यावरण, वृक्षलागवड व संवर्धन या क्षेत्रात अभिनव उपक्रम राबवित आहेत. या ग्रुपने लहवित येथे गेल्या वर्षी ७०० रोपे लावून त्यांचे संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यासाठी एक रविवार, एक झाड, एक कुटूंब हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. त्यानंतर आता शालेय विद्यार्थ्यांसाठी अंकुर हा नवीन प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पात शहरातील शाळांनाही सहभागी करून घेत शालेय विद्यार्थ्यांवर पर्यावरण संवर्धनाचा संस्कार रुजविण्यास प्रारंभ केला आहे.
या प्रकल्पाचे प्रात्यक्षिकही आई सोशल ग्रुपचे अध्यक्ष संतोष बोराडे, दीपक भागवत, शाम आकुल, संतोष एलिंजे, विनायक खुळे, जमीर पटेल, योगेश सोनवणे, सुचिता आकुल, योगेश जोशी यांनी या विद्यार्थ्यांना करून दाखविले.
सीड बॉल्स प्रकल्प


ज्या विद्यार्थ्यांना अंकुर तयार करता येणार नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी सीड बॉल्स हा प्रकल्प राबविला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी शेण व माती समप्रमाणात घेऊन त्याचा गोळा तयार करावा व त्यात एक बी घालावी. असे सीड बॉल्स प्रवासादरम्यान अथवा गड किल्ले, डोंगर, टेकड्यांवर टाकावे. केवळ बिया टाकल्या तर बिया नष्ट होण्याची शक्यता असते. मात्र, सीड बॉल्समधील बिया काही काळ सुरक्षित राहतात व पाऊस झाल्यावर त्यास अंकुर फुटतो.

असा आहे प्रकल्प
अंकुर प्रकल्पात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरीच मिळेल त्या वृक्षाच्या बियांची रोपे तयार करायची आहेत. येत्या जागतिक पर्यावरण दिनापर्यंत हे काम विद्यार्थ्यांनी आपल्या घरी अथवा शाळेत करायचे आहे. यापासून तयार होणारे अंकुर आई सोशल ग्रुपमार्फत पावसाळ्यात इतरत्र लागवडीसाठी वापरली जाणार आहेत. ग्रुपचे अध्यक्ष संतोष बोराडे यांची ही संकल्पना आहे.
पर्यावरण समस्यांची भीषणता, दुष्परिणाम व उपाययोजना याविषयीचे संस्कार विद्यार्थ्यांवर शालेय वयातच झाले तर भावी पिढी पर्यावरण संवर्धनाकडे वळेल. हा संस्कार प्रत्यक्ष कृतीद्वारे रुजविण्यासाठी अंकुर प्रकल्प हाती घेतला आहे.
- संतोष बोराडे, अध्यक्ष, आई सोशल ग्रुप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायर व सिक्युरिटीच्या सबचॅप्टरचा प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल बिल्डिंग कोड २०१६ हा सुरक्षेच्या दृष्टीने सर्वसमावेशक असून, अनेक नव्या बाबींचा यात समावेश करण्यात आला आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी असून, त्यातील सूचनांचा स्वीकार प्रत्येक शहरातील सरकारी संस्थांनी करावा, असे प्रतिपादन नॅशनल बिल्डिंग कोड २०१६ व्हॉइस चेअरमन व्ही. सुरेश यांनी केले. ते फायर व सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक सबचॅप्टरच्या प्रारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

वाढती लोकसंख्या व त्यामुळे वाढलेल्या शहरीकरणाने बांधकाम व इमारतींचे स्वरूप बदलत असून, वाढीव उंचीमुळे अग्नी व सुरक्षा उपकरणांची गरज वाढली आहे. यासोबतच प्रशिक्षित मनुष्यबळासोबत सुरक्षिततेसाठी तिचे महत्त्व या जागृतीसाठी फायर व सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया कार्य करेल, असा आशावादही व्ही. सुरेश यांनी व्यक्त केला.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज धारकर म्हणाले, की आकड्यानुसार दरवर्षी वीस हजारहून अधिक मृत्यू आगीमुळे होतात. अपुरी अग्निशमन यंत्रणा किंवा ती कशी वापरावी याच्या माहितीचा अभाव यामुळे ही अमूल्य जीवित व वित्तीय हानी होते. फायर व सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने याकरिता अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्यासोबतच शाळा, महाविद्यालये, कंपन्या, सरकारी संस्था, महिला, वरिष्ठ नागरिकांसाठी प्रशिक्षण व जनजागृती, तसेच अभियंते, वास्तुविशारद यांच्यासाठी तांत्रिक प्रशिक्षणाचा समावेश आहे. महाराष्ट्र फायर सेवेचे माजी संचालक एम. व्ही. देशमुख उपस्थित होते. नाशिकमध्ये या विसाव्या चॅप्टरच्या उद्घाटनप्रसंगी १०० सदस्यसंख्या पार झाली असून, आगामी काळात अनेक जनजागृतीपर व शैक्षणिक उपक्रम घेण्यात येतील असे नाशिक चॅप्टरचे नवनियुक्त सहसचिव जितेंद्र कोतवाल यांनी नमूद केले. नाशिक मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारीख व उपमुख्य अग्निशमन अधिकारी मिलिंद ओगले यांनीही मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलस्त्रोतांच्या तपासणीस अॅपचा आधार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील जलस्त्रोतांची मोबाइल अॅपद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील जवळपास २५० कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. हे कर्मचारी जिल्ह्यातील तीन हजार जलस्त्रोतांच्या नमुन्यांची तपासणी मोबाइल अॅपद्वारे करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून नुकतीच देण्यात आली.

धुळे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष हा उपक्रम राबवित असून, या कक्षाच्या पाणी गुणवत्ता शाखेकडून शुद्ध निर्जंतुक पाणी ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यासाठी दरवर्षी जून महिन्यात पाणी गुणवत्ता कार्यशाळा घेतली जाते. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी आणि नंतर स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम जैविक तपासणी अभियान राबविले जाते.

३,००० जलस्त्रोतांचे नमुने संकलन

यंदा नागपूर येथील एमआरएसएसी निर्मित अॅप्सची मदत घेतली जात आहे. ‘जिओफेन्सिंग मोबाइल अॅप्लिकेशन’ असे या अॅप्सचे नाव आहे. त्याच्या मदतीने पाण्याच्या नमुन्यांचे संकलन तसेच जलस्त्रोतांचे मॅपिंग केले जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सुमारे तीन हजार जलस्त्रोत असून, या सर्व स्त्रोतांची तपासणी याद्वारे होणार आहे. त्यासाठी गेल्या आठवड्यात धुळे, शिरपूर, शिंदखेडा साक्री तालुक्यातील आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. तसेच प्रशिक्षणानंतर कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवातही केली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या पूर्ण तपासणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भांडी विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

सध्या लग्नसराई सुरू असल्याने भांडी दुकानात लग्न समारंभ विशेषत: कन्यादानासाठी लागणारी भांडी तसेच भेटवस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. मात्र, या वर्दळीचा फायदा घेत अनेक भांडी दुकानात ग्राहकांची सर्रास लूट केली जात आहे. अर्थात, असा अनुभव सर्व दुकानांमध्ये नाही.

भांडी दुकानांत स्टील, पितळ, तांबे, अल्युमिनियम, निकवेल अशा सर्व प्रकारची भांडी विक्री उपलब्ध असतात. यामध्ये हलक्या वजनाचे आणि भरीव वजनाचे भांडी असतात. पॅकिंगसाठी असलेले जाड प्लास्टिक किंवा आच्छादन ठेवून या भांड्यांचे वजन केले जाते. या आच्छादनामुळे भांड्यांचे वजन किलो मागे १०० ते १५० ग्रामच्या सुमारास जादा भरते. जाड प्लास्टिकचे वजनासह वस्तुची किंमत ठरविली जाते. यात ग्राहकांना तोटा होत आहे.

याबाबत ग्राहकांनी संबंधित भांडीविक्रेत्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उत्पादन कंपनी आम्हाला सुद्धा अशा पॅकिंगसह वस्तुची किंमत आकारते, असे स्पष्टीकरण दिले जात आहे. कंपनीकडून अशाच प्रकारे वस्तू मिळतात, तुम्हालाही त्या वजनातच वस्तू घ्यावी लागतील, असे सांगून विषय टाळले जात आहेत. मात्र, यात ग्राहकांना तोटा सहन करावा लागतो.

अशी होते फसवणूक

तांबे धातूची सध्या किरकोळ बाजारात ७०० ते ८०० रुपये किलोने विक्री केली जात आहे. तांब्याच्या प्रत्येक वस्तूमागे १०० ते १५० रुपयाचा तोटा ग्राहकाला सहन करावा. लग्नसमारंभात तांब्याचे फिल्टर, पातेले, ग्लास, ताम्हण, पाणी पिण्याचा जग-तांबे, घंघाळ, अशा अनेक छोट्या मोठ्या वस्तू दिल्या जातात. या सर्व वस्तुंचे पॅकिंग जाड प्लास्टिकमध्येच असते. एका पिशवीचे साधारण ५० ते १०० ग्रॅम वजन असते. ते वजन भांड्यांच्याच वजनात गृहित धरले जाते, त्यानुसार पैसे आकारले जातात.

प्रशासन अनभिज्ञ!

प्रशासनाकडून मिठाई दुकानांत बॉक्स सहित वस्तूचे वजन करणाऱ्या व्यावसायिकांना कारवाई केली जाते. याबाबत अनेक जाहिरातीदेखील प्रसार माध्यमातून दाखविल्या जातात. अशा बाबतीत ग्राहकदेखील जागृत झाला आहे. भांडीविक्रेते मात्र ग्राहकांची सर्रास फसवणूक करत आहेत. फसवणूक करणाऱ्या भांडीविक्रेत्यांवर कारवाई करून ग्राहकांची लूट थांबवावी अशी मागणी जागरुक ग्राहकांकडून केली जात आहे.

भांडी दुकानांत अनेक पॅकिंगच्या वस्तूंचे कवर न काढताच वजन केले जाते. त्यामुळे ग्राहकांचा तोटा होतो. ग्राहकांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. फसवणूक करणाऱ्या अशा विक्रेत्यांवर कारवाई करावी.
- सुमन पाटील, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ डीपी रस्ते कामांची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अशोकनगर भागातील पिंपळगाव बहुला शिवारात विकास आराखड्यांतर्गत (डीपी) रस्त्यांसाठी आरक्षण टाकून २५ वर्षांहून अधिक काळ उलटला. मात्र, अद्याप काम सुरू न झाल्याने महापालिका प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींना डीपी रस्ते कामांचा विसर पडला का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महापालिकेची स्थापना झाल्यावर वाढत्या लोकवस्तीचा भविष्यातील विचार करून शहरात अनेक ठिकाणी विविध कामांसाठी आरक्षणे टाकण्यात आली. यात डीपी रस्त्यांचाही समावेश होता. परंतु, शहरातील अनेक डीपी रस्ते झालेले नाहीत. महापालिकेच्या सातपूर विभागातील अशोकनगरच्या वाढत्या लोकवस्तीतही डीपी रस्त्याचे आरक्षण टाकण्यात आले होते. अशोकनगरच्या मुख्य रस्त्यावर रोजच रहदारीच्या कोंडीचा वाहनचालकांना सामना करावा लागतो.

विशेष म्हणजे महापालिकेची स्थापना झाल्यापासून निवडून आलेल्या एकाही नगरसेवकाने डीपी रस्त्याचे काम हाती घेतले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिका आयुक्तांनीच आरक्षित असलेला डीपी रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावे, अशी मागणी अशोकनगरवासीयांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>