Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

राष्ट्रीय एकात्मतेचा खंदा पुरस्कर्ता

$
0
0

बाबरी मशिदीचा ढाचा पडला त्यावेळी जे. पी. जाधव यांच्या मनात एकच काहूर माजलं. या कालावधीत अनेक ठिकाणी जातीय दंगली सुरू झाल्या. माणसं माणसाशी अशी का वागतात, या विचारांनी त्यांना भंडावून सोडलं. दंगलींसंदर्भात येणाऱ्या वर्तमानपत्रांतील बातम्या वाचून त्यांचे मन विषण्ण झाले. यासंदर्भात आपण काहीतरी केले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात आला आणि मग भारतीय एकात्मता समितीच्या कामाला त्यांनी सुरुवात केली. या संस्थेच्या माध्यमातून धर्मा-धर्मांत जातीय सलोखा, बंधुभाव कसा राहील यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. आज वयाच्या सत्तरीतही त्यांचे कार्य अविरत सुरू असून, भारतीय एकात्मता समिती आणि जे. पी. जाधव हे एक अतूट समीकरण झाले आहे.

जे. पी. जाधव यांचा जन्म मालेगाव जिल्ह्यात झाला. वडील सरकारी नोकरीत असल्याने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, येवला, नांदगाव अशा बदल्यांच्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण पार पडले. लहान काका मुंबईला असल्याने उच्च शिक्षणासाठी वडिलांनी त्यांच्याकडे पाठ‍विले. बी.एस्सी.पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांना मालेगाव येथे शिक्षकाची नोकरी लागली. मात्र, या नोकरीत ते फारसे रमले नाहीत. त्यांनी गव्हाचा व्यवसाय सुरू केला. यादरम्यान वेळ मिळत असल्याने काही ना काही सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. स्वतःच्या खिशात पैसा नव्हता. मात्र, समाजसेवा करण्याची धडपड पाहून अनेकांनी त्यांच्या कार्याला हात दिला. स्थानिक वर्तमानपत्रात एका मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपनीत जागा भरायच्या असल्याची जाहिरात वाचायला मिळाली. तेथे त्यांनी अर्ज केल्यावर त्यांना लगेचच रुजू करून घेण्यात आले. पुढे अनेक वर्षे या व्यवसायात ते होते. १९९२ पासून त्यांनी स्वतःच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायास प्रारंभ केला. तेव्हापासून ते या व्यवसायात आजही कार्यरत आहेत. घरातील जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर समाजकार्याला खऱ्या अर्थाने जोर आला. भारतीय एकात्मता समितीत काम करीत असल्याने २६ जानेवारी, १५ ऑगस्ट रोजी लहान मुलांमध्ये एकात्मतेची भावना रुजावी यासाठी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची मुहूर्तमेढ रोवली. त्याचप्रमाणे बैसाखीच्या काळात शहरातील गुरुद्वारांमध्ये जाऊन तेथे कार्यक्रम सुरू केले. रमजान ईदच्या दिवशी गोल्फ क्लब येथे येणाऱ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याची प्रथा सुरू केली. बाबरी मशीद ज्यावेळी पाडली गेली त्यावेळी शहरातील वातावरण कलुषित झाले होते. अशा वेळी त्यांनी सर्वधर्मीयांची मानवी साखळी तयार करून एक आदर्श समाजापुढे निर्माण केला. ही साखळी नाशिक शहरातील अशोक स्तंभ ते मुंबई नाका इतक्या मोठ्या अंतराची होती. शहरापासून दूर असलेल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नाताळच्या कालावधीत सत्कार घडवून आणला. ज्या महिलांनी त्यांच्या कर्तृत्वाने समाजाला वेगळी दिशा दाखवली, अशा महिलांचादेखील दर वर्षी सत्कार करीत असतात. शहरातील अनेक मुस्लिम वस्त्यांमध्ये जाऊन मोतीबिंदू शिबिरे घेतली असून, दोन हजारांच्या वर ऑपरेशन्स त्याद्वारे केली गेली आहेत. याला लागणार सर्व खर्च भारतीय एकात्मता समिती करीत असते. त्याचप्रमाणे आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या सत्काराचेदेखील सातत्याने आयोजन करीत असतात. मुलांमध्ये एकात्मतेचे बीज रोवल्यास येणारी पिढी अधिक सक्षम होईल, असे ते म्हणतात. या कामाव्यतिरिक्त त्यांनी जेसीज्, जायंट्स ग्रुप, लायन्स क्लब यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून काम केले आहे. त्याचप्रमाणे कॉलेजरोडवरील निरामय जॉगिंग ट्रॅकचे ते अध्यक्ष असून, आजपर्यंत लाखो रुपये महापालिकेकडून मिळवून अनेक सुधारणा केल्या आहेत. नाशिक शहरात एकात्मता भवन असावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु, त्याला यश आलेले नाही. जे सरकार एकीकडे राष्ट्रीय एकात्मतेच्या गोष्टी करीत होते, त्याच्या प्रचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत होते, त्याच सरकारच्या काळात मान्यता मिळवण्यासाठी सरकारी बाबूंकडून पैशाची मागणी करण्यात आली. त्यामुळे एकात्मता भवन उभे राहू शकले नाही, ही खंत त्यांच्या मनात घर करून राहिली आहे. ज्या दिवशी शाळेच्या दाखल्यावरून जात आणि धर्म जाईल तो दिवस माझ्यासाठी भाग्याचा असेल, असे ते सांगतात.


नाशिककरांनो, लिहिते व्हा!

ज्येष्ठ नागरिक म्हटले, की वयाचा उत्तरार्ध आणि त्यामुळे कमी झालेला अॅक्टिव्हनेस असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण, अनेक ज्येष्ठ हे केवळ वयाने वृद्ध असतात, त्यांचे मन मात्र तरुणच असते. त्यांच्या कामातून, समाजसेवेतून किंवा अन्य अॅक्टिव्हिटीजमधून ते आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवून देतात. अशाच ज्येष्ठांसाठीचे हे व्यासपीठ म्हणजे आमचा ‘यंग सीनिअर्स’ कॉलम. चला तर मग, तुम्ही जर असे यंग सीनिअर असाल, तर थेट आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या ओळखीत, पाहण्यात असे कोणी असेल, तर त्यांचे नाव सुचवा. योग्य व्यक्तींना या सदरातून नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, तिसरा मजला, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, ना‌शिक.

समन्वय : फणिंद्र मंडलिक- ९४२३१७४४९५.

ई-मेल : fanindra.mandlik@timesgroup.com

(पाकीट आणि ई-मेलवर ‘यंग सीनिअर्स’ उल्लेख करावा.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंदीचा आदेश असूनही शहरात वृक्षतोड सुरूच

$
0
0

म. टा.वृत्तसेवा, नाशिकरोड

हायकोर्टाच्या आदेशानुसार सध्या शहरात वृक्षतोडीवर स्टे असताना महापालिकेने नाशिकरोडला महावितरण कार्यालयाशेजारी आंब्याच्या जुन्या झाडाची मोठी फांदी तोडली. मात्र, ही फांदी रात्री पडल्याचा दावा ठेकेदाराने केला आहे. ऐन उन्हाळ्यात ही फांदी तोडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

वृक्षप्रेमींनी ही फांदी तोडल्याची बाब आज सकाळी महापालिकेला कळवली. महापालिकेने ठेकेदारामार्फत त्वरित ही फांदी व पालापाचोळा ट्रॅक्टरद्वारे हटवला. वाहतुकीला अडथळा येत

असल्याने ही फांदी तोडल्याचा खुलासा करण्यात आला. मात्र, येथे अनेक वर्षांपासून हे झाड महावितरणच्या भिंतीलगत आहे. परंतु, कधी फांदीचा अडथळा झाला नाही, मग आताच कसा झाला, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. ठेकेदाराला नागरिकांनी फांदी तोडल्याचा जाब विचारला असता त्याने फांदी आपोआप पडल्याने वाहतुकीला अडथळा झाला म्हणून ती हटविल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्ष यात्रा आज जिल्ह्यात

$
0
0

समृध्दी महामार्ग, जिल्हा बँकेबाबतच्या भूमिकेकडे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि शेतमालाला सरकारने हमीभाव द्यावा या मुख्य मागण्यांसाठी निघालेली संघर्ष यात्रा सोमवार (दि. १६ एप्रिल) रोजी नाशिक मुक्कामी येणार आहे. जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांबरोबरच समृध्दी महामार्गाचा तिढा आणि जिल्हा बँकेकडून सुरू असलेली शेतकऱ्यांची पिळवणूक या विषयावर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील बडे नेते काय भूमिका मांडतात याकडे नाशिकककरांचे लक्ष लागले आहे.

संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात हजेरी लावल्यानंतर आता ही संघर्ष यात्रा नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १७) पोहोचणार आहे. सकाळी १० वाजता मालेगाव येथील गिरणा पुलाजवळ मनमाड चौफुलीवर, दुपारी दोन वाजता सटाणा येथे, सायंकाळी ४.३० वाजता पिंपळगाव बसवंत येथे सभा होणार आहेत. संघर्ष यात्रेमध्ये सहभागी नेते व आमदार पाच पैसे किलो भावाने कांदा विकला गेलेल्या नामपूर बाजार समितीत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी दुपारी ३.३० वाजता देवळा येथील पाचकंदील चौकात, दुपारी चार वाजता वडाळीभोई येथे तर सांयकाळी सहा वाजता आडगाव येथे संघर्ष यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. सोमवारच्या मुक्कामानंतर मंगळवारी (दि.१८ एप्रिल) रोजी ही संघर्ष यात्रा समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शिवडे गावात येणार आहे. देवळाली कॅम्प, भगूर, पांढुर्लीमार्गे ही संघर्ष यात्रा येईल. तेथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी १ वाजता घोटी येथे सभा होणार आहे. त्यानंतर ही संघर्ष यात्रा शहापूरकडे मार्गस्थ होणार आहे.

संघर्ष यात्रेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, माजी मंत्री सुनील तटकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, प्रा. जोगेंद्र कवाडे, अबू आझमी यांसह शेकडो आमदार सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्षयात्रा म्हणजे प्रस्थापितांचे ढोंग

$
0
0

प्रा.शरद पाटील, संजय शर्मा यांचे पत्रक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे-नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पैशांवर उभे राहिलेल्या सहकारी संस्था उद्ध्वस्त करून खासगी प्रतिष्ठाने उभी करणाऱ्या सत्तेच्या ठेकेदारांना सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. त्यांची ही संघर्षयात्रा म्हणजे निव्वळ ढोंग असल्याचे पत्रक माजी आमदार प्रा. शरद पाटील व भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजय शर्मा यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना उद्देशून या पत्रकात त्यांनी अकरा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात धुळे तालुक्यासह जिल्ह्यात बंद पडलेले सहकारी उद्योग, शिंदखेडा सहकारी, संजय सहकारी, पांझराकान सहकारी कारखान्यांचा व सूतगिरण्यांच्या उल्लेख करण्यात आला आहे. जिल्हा बँकेतून कॉटन फोल्डरच्या नावाने दिलेले गेलेले 90 कोटीचे कर्ज, जिल्हा बँकेचे जळीत प्रकरण, जिल्हा परिषदेत वीस वर्षांत भास्कर वाघाने केलेला अपहार, त्यातील लाभार्थी नेते, एकाधिकार तूर खरेदी केंद्रावर बाजार समितीच्या कोणत्या संचालकांना फायदा झाला याची नावे जाहीर करावीत अशा ११ प्रश्नांचा या पत्रकात समावेश आहे. संघर्षयात्रा शेतकऱ्यांप्रती कळवळा

दाखवून काढलेल्या संघर्षयात्रेच्या निमित्ताने या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असेही प्रा. पाटील व शर्मा यांनी पत्रकात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्या जनावरांसाठी माणुसकीचा पाझर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापुरुषांची जयंती साजरी करणे म्हणजे कर्णकर्कश आवाजातील डीजे, आक्षेपार्ह नाचगाणे, अडथळा ठरणारे मंडप अशी प्रतिमा झाली आहे. या प्रतिमेला छेद देणारी कृती नाशिकरोडच्या आनंदनगर मित्रमंडळाने केली आहे. त्यांनी वाढलेल्या उन्हाने कासावीस झालेल्या मुक्या प्राण्यांसाठी पाणपोई सुरू करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यामुळे या सामाजिक जाणीवने मुक्या प्राण्यांना उन्हाळ्यात पाण्याचा आधार मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह नाशिक शहरात उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिकांबरोबरच मुक्या प्राण्यांचाही जीव कासावीस होत आहे. अनेक ठिकाणी त्यासाठी प्रवाशांसाठी पाणपोई सुरू केल्या जात आहेत. परंतु, मुक्या प्राण्यांचा आवाज कोणीच लक्षात घेत नाही. याची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने आनंदनगर मित्र मंडळातर्फे प्रभाग २१ मध्ये जनावरांना पाणी पिण्याची सुविधा विविध ठिकाणी करण्यात आली आहे.

याठिकाणी

पाणपोईची सुविधा

परिसरातील आनंद नगर चौक, महापालिकेची शाळा क्रमांक १२५ चे मैदान, जिजाऊ तरण तलावासमोर, गवळी वाडा, मुक्तीधाम येथे पाण्याची भांडी ठेवण्यात आली आहेत. त्यात नियमित शुद्ध व थंड पाणी भरले जात आहे, अशी माहिती आनंदनगर मित्र मंडळातर्फे देण्यात आली आहे. नुकतेच या पाणपोईस सुरुवात ककरण्यात आली. याप्रसंगी आनंदनगर विचार मंचचे ज्येष्ठ नागरिक तसेच नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, दीपक लोखंडे, पवन शिरसाठ, अतुल गवळी, विजय गायकवाड, मनीष सर्वटकर, भारत जगताप उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकाने बंद करण्यासाठी एकजूट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरातील महाकाली चौक परिसरात असलेल्या देशी दारू दुकानातील मद्यपींमुळे नागरिकांना अनेक समस्या सामोरे जावे लागत असून आता तर या मद्यपींकडून महिला व युवतींच्या छेडछाडीचे प्रकारही होवू लागल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट हे देशी दारूचे दुकानच पेटवून देण्याची भूमिका घेतली होती. मात्र नगरसेवक मुकेश शहाणे यांनी कायदा हातात घेण्याऐवजी कायद्याने लढा देण्याचा विश्वास नागरिकांना दिल्याने नागरिकांनी आज (दि. १७) जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबड गावाजवळील एका वाईन शॉपवर अशाच पद्धतीने संतप्त नागरिकांनी मोडतोड केल्याचा प्रकार घडल्यानंतर आता थेट देशी दारू दुकान पेटवून देण्यापर्यंत नागरिकांची तयारी केली गेली होती. सध्या सिडकोतील मद्यविक्रीचे दुकाने व हॉटेल्स म्हणजे नागरिकांची डोकेदुखी ठरत असून पोलिस कठोर कारवाई का करीत नाही, असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

येथील महाकाली चौक मुख्य रस्त्यावर दारूचे दुकान सिडकोतील एका राजकीय नेत्याचे आहे. नागरिक वस्तीत असलेले हे दुकान यापूर्वी अशाच प्रकारे पेटवून देण्यात आले होते. मात्र त्यानंतर हे दुकान पुन्हा कायदेशीररित्या सुरू करून घेण्यात आले. तरी आता पुन्हा हे दुकान नागरिकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरू लागले आहे. मद्यपी दुकानाच्या बाहेर रस्त्यावर येऊन मद्यप्राशन करत असून, रस्त्याने येजा करणाऱ्या महिला व युवतीची छेडछाड करीत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी सदस्य निवडीचा वाद थंडावला

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेवर विविध दहा समितीवर सदस्य निवडीची रविवारी सभा झाल्यानंतर दिवसभर सर्व सदस्यांच्या नाराजी दूर करण्यात सर्वच पक्षांना यश आले आहे. काही समित्यावरच बहुतांश सदस्यांनी आग्रह धरल्यामुळे ही नाराजी सर्वच पक्षात होती. पण पुढील काळात संधी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे नाराजीचे सत्र थांबले. या नाराजीमुळे सभागृहात जाहीर केलेल्या नावांची यादी देण्यात आली नव्हती. सोमवारी मात्र ही यादी सार्वजनिक करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीबरोबरी एकूण ९ समितीवर सर्व सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. या सर्व समित्यात अर्थपूर्ण समजल्या जाणाऱ्या बांधकाम समितीत सर्वच दिग्गजांना स्थान देण्यात आले आहे. या सर्व

समित्यावर सर्वच पक्षाचे सदस्य असल्यामुळे कमी जास्त प्रमाण असले तरी यानिमित्ताने सर्वांना सामावून घेण्यात आले आहे.

बांधकाम समिती : अशोक टोंगारे, अश्विनी आहेर, संजय बनकर, सुरेखा दराडे, मंदाकिनी बनकर, रुपाजंली माळेकर, उदय जाधव, सिमंतिनी

कोकाटे

आरोग्य समिती : दादाजी शेजवळ, यशवंत गवळी, कलावती चव्हाण, सारिखा नेहरे, डॉ. सयाजीराव गायकवाड, ज्ञानेश्वर जगताप, यशवंत ढिकले, हरीदास लोहकरे

महिला व बालकल्याण : गणेश आहिरे, रेखा पवार, कविता धाकराव, कमल आहेर, सुनिता सानप, वैशाली खुळे, आशा पवार, सुमन बर्डे

समाजकल्याण समिती : कन्हु गायकवाड, यशवंतराव शिरसाठ, जयश्री पवार, ज्योती जाधव, रोहिणी गावित, शोभा कडाळे, सुरेश कमानकर, हिरामन खोसकर, रमेश बरफ, वनिता शिंदे, सुमन निकम

अर्थ समिती : छाया गोतरणे, दिपक शिरसाठ, सुशिला मेंगाळ, कावजी ठाकरे, रत्नाकर चुंभळे, केसरबाई आहेर, विमलबाई सोनवणे, नितीन गांगुर्डे

शिक्षण समिती : मिना मोरे, राजेंद्र सोनवणे, जगन्नाथ हिरे, नुतन आहेर, आशाबाई जगताप, सुनिता पठाडे, सिध्दार्थ वनारसे, पंडित आहेर

जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती : धनश्री आहेर, नितीन पवार, अनिता बोडके, धनराज महाले, रमेश बोरसे, अमृता पवार

कृषी समिती :लताबाई बच्छाव, बलवीरकैर निर्मल गिल, महेंद्रकुमार

काले, ज्योती वाघले, निलेश केदारे, पुष्पा गवळी, ज्योती राऊत, सुवर्णा

गांगोडे, एकनाथ गायकवाड, आशाबाई साळवे

पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती : साधना गवळी, समाधान हिरे, संगिता निकम, हेमलता गावित, शकुंतला डगळे, सुशिला मेंगाळ, कल्पना हिंदोळे, प्रतिभा सूर्यवंशी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उधारी मागितल्याने तरुणाची मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उधारीचे पैसे घरी जावून मागितल्याचा राग आल्याने सदर ग्राहकाने दुकानमालकास बेदम मारहाण केली. ही घटना भारत नगर परिसरात घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरूण गुलाबचंद वडनेरे (रा. म्हाडा कॉलनी, भारतनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वडनेरे यांचे किराणा दुकान आहे. संशयित राजू श्रीपत टोमचे उर्फ पगारे (३०, रा. भारतनगर) हा दुकानातून विडी काडी व पाण्याच्या बाटल्या उधारीत घेत असे. मात्र, गेल्या काही दिवसात त्याने उधारीचे पैसे दिले नाही. त्यामुळे वडनेरे यांनी त्याचे घर गाठून पैशांची मागणी केली. उधारी मागण्यास घरी आला का असे म्हणत राजूने वडनेरे यांना बेदम मारहाण केली. संशयिताने वडनेरे यांच्या डोक्यात लोखंडी टॉमी मारून जखमी केले. दरम्यान, याबाबत वडनेरे यांचा मुलगा महिंद्र उर्फ लखन हा जाब विचारण्यासाठी राजूच्या घरी गेला असता त्यालाही राजूने बेदम मारहाण करीत जखमी केले.

दुकानातून दीडलाख चोरीस

दुकानाच्या काऊंटरमधून महिलेची पर्स चोरट्यांनी चोरी केली. पर्समध्ये सुमारे एक लाख ४८,५०० रुपये, मोबाइल व महत्त्वाची कागदपत्र होते. ही घटना मेनरोडवरील चांदवडकर लेन भागात घडली. भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये राखी अरुण वारे यांनी तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदूरमध्ये वाहनांची जाळपोळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

नांदूर शिवारात पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. त्यामध्ये तीनचाकी रिक्षाचेही नुकसान झाले. घराला आग लावण्याचा प्रयत्नात असतांना संशयितांनी हा प्रकार केल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. या प्रकरणी दोन संशयितांना आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.

शंकर गोवर्धन वाडेकर (३६, रा. प्लॉट नं. ७, चौंडेश्वरी नगर, नांदूर शिवार) यांनी आडगाव पोलिसात फिर्याद दिली. दीपक सहादू सूर्यवंशी व राजू मधुकर करंडे (दोघेही रा. नांदूरगाव) यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास, वाडेकर यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांवर काही तरी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना घडली. यात स्कोडा कार (एम. एच. ४, डी. एन. ९५९३) व वॉक्स वॅगन कार (एम. एच. ४, एफ. एम. १५५) या गाड्या जळून खाक झाल्या. बेकरीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅपे रिक्षाचेही (एम. एच. १५, ए. जी. ४४०७) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय बेकरी पदार्थही जळून गेले. संशयितांनी फिर्यादीच्या घराची बाहेरून कडी लावून घेत वाहनांची जाळपोळ केली. परिसरातील नागरिक जागे झाल्याची चाहूल लागताच संशयित घटनास्थळावरून पसार झाले. येथील नागरिकांना वाहने जळत असल्याचे लक्षात आल्याने ताबडतोब अग्निशामक दल व आडगाव पोलिसांना फोनवरून माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी एका बंबांच्या सहाय्याने आग विझवण्यात आली. दरम्यान, आडगाव ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सानप घटनास्थळी येऊन घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक सदाफुले अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएममध्ये आठवडाभर जाणवणार खडखडाट

$
0
0

एटीएममध्ये आठवडाभर जाणवणार खडखडाट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात आणि जिल्ह्यात निर्माण झालेल्या चलन टंचाईवर तोडगा म्हणून मंगळवारी, १८ एप्रिल रोजी स्टेट बँकेला ६५ कोटींचे चलन मिळेल, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परंतु हे चलन बँकांमधील व्यवहारांसाठीच वापरण्याचे धोरण अवलंबिण्यात आल्याने एटीएममध्ये किमान आठवडाभर खडखडाट जाणवण्याची शक्यता आहे. केवळ गर्दीच्या मोजक्याच एटीएम केंद्रामध्येच नोटा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील ७० टक्के एटीएम बंद आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर स्टेट बँकेने रिझर्व्ह बँकेकडे सुमारे ३५० कोटी रुपयांची मागणी केली. परंतु रिझर्व्ह बँकेने केवळ ६५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी ही रोकड उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यापैकी ४० कोटी शहरासाठी तर २५ कोटी ग्रामीण शाखांसाठी देण्यात येणार आहेत. स्टेट बँकेकडे सद्यस्थितीत ३५ कोटी तर खासगी बँकांकडे ७० कोटी रूपये शिल्लक आहेत. रिझर्व्ह बँकेकडून नव्याने प्राप्त होणारे चलन केवळ बँकेतील व्यवहारांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचप्रकरणी लिपिकास अटक

$
0
0

नाशिक : कर्जफेडीबाबतचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्यासाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या जिल्हा कोषागार कार्यालयातील लिपिकाला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली.

स्वप्नील दादाजी पवार असे त्याचे नाव आहे. लेखा लिपिक म्हणून तो जिल्हा कोषागार कार्यालयात नोकरीस आहे. तक्रारदाराने सरकारकडून जीआयएसचे कर्ज घेतले होते. या कर्जाची व्याजासह परतफेडही केली होती. या कर्जफेडीबाबतचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळावे, यासाठी तक्रारदाराने कोषागार कार्यालयात अर्ज केला होता. कर्जफेडीबाबतचे विवरण तयार करून ते पुढे पाठविण्यासाठी पवार याने त्यांच्याकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखा कोषागार कार्यालयात सापळा रचला होता. तेथे ही रक्कम स्वीकारता पवार याला अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचएएलची प्रवासी विमानसेवा

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशाच्या संरक्षणसिद्धतेत मानाचा तुरा रोवणाऱ्या हिंदूस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड (एचएएल) ने आता प्रवासी विमानांचे उत्पादनही सुरू केले आहे. येत्या १ मे रोजी दोन विमाने ओझर येथे दाखल होणार आहेत. याच विमानांद्वारे प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचे संकेत एचएएलचे महाव्यवस्थापक बी. व्ही. पी. शेखागिरीराव यांनी व्यक्त केला. याकरीता नाशिकहूनच सेवा सुरू करण्यासंदर्भात प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

कानपूर येथील कारखान्यात प्रायोगिक तत्वावर दोन प्रवासी विमान तयार केली आहेत. एक मे रोजी ही दोन्ही विमाने ओझर एचएएलकडे येणार आहेत. ही विमाने प्रवासीसेवा देणाऱ्या हवाई कंपन्यांना भाडेतत्वावर देण्यास आमचे प्राधान्य राहणार आहे. शिवाय एचएएलही विमानसेवा सुरू करण्याबाबत विचाराधीन आहे. याकरीता वरिष्ठांशी चर्चा करून नाशिकहून ही सेवा सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत. नाशिकहून मुंबई, पुणे ऐवजी नाशिक दिल्ली किंवा हैद्राबाद या मार्गांवर सेवा सुरू करण्याचा आमचे प्रयत्न राहणार आहेत, असे शेखागिरीराव यांनी सांगितले.

फ्लाईंग क्लब

मुंबई फ्लाईंग क्लबच्या धर्तीवर ओझर येथेही असा क्लब साकारण्याबाबत ओझर एचएएलमध्ये सोमवारी बैठक झाली. यावेळी मुंबई फ्लाईंग क्लबचे सदस्य फिरोज मसानी यांनी एचएएलच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.

आम्हाला स्वतःला सेवा सुरू करण्याबाबत काही परवानग्या मिळवाव्या लागतील. एचएएएलची स्वतःची दोन प्रवासी विमाने लवकरच धावपट्टीवर येणार आहेत. ही विमाने हवाई कंपन्यांना भाडेतत्वावर देणे किंवा स्वतः विमानसेवा सुरू करणे असे दोन पर्याय आहेत. यासाठी निमाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.

- शेशिगिरी राव, महाव्यवस्थापक, एचएएल, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्ल्यूचा चौथा बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एप्रिल महिन्याच्या भर कडक उन्हात जीवघेण्या स्वाइन फ्ल्यूचा प्रार्दुभाव कायम आहे. या आजाराने आतापर्यंत २९ बळी घेतले असून, चालू महिन्यात चार व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. मालेगाव तालुक्यातील वजीरखेडे येथील ६५ वर्षीय महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. महिनाभरात या जीवेघेण्या आजाराने चौथा बळी घेतला असून लक्षणे जाणवल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

कमळाबाई कौतिक पाटील (६५, रा. वजीरखेडे, ता. मालेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. कमळाबाई यांना गेल्या आठवड्यात स्वाइन फ्ल्यूची लक्षणे जाणवली. प्रारंभी त्यांना मालेगाव येथील व नंतर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. खासगी हॉस्पिटलच्या तपासणीत पाटील यांना स्वाइन फ्ल्यू झाल्याचे समोर आले. प्रकृती खालावल्याने सोमवारी दुपारी त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या महिन्यात स्वाइन फ्ल्यूचा हा चौथा बळी ठरला. कमळबाई पाटील यांचा स्वॅप दुपारीच पुण्याला पाठवण्यात आला आहे. दरम्यान, सिव्हिलच्या स्वाइन फ्ल्यू कक्षामध्ये सोमवारी सायंकाळपर्यंत एक पुरुष व तीन महिलांवर उपचार सुरू आहेत. या चारही पेशंटचे वैद्यकीय अहवाल अद्यापपर्यंत आलेले नाहीत. दरम्यान, आत्तापर्यंत स्वाइन फ्ल्यूमुळे जिल्ह्यात २९ पेशंट दगावले आहेत. यातील नऊ जणांचा मृत्यू सिव्हिलमध्ये झाला असून, उर्वरित घटना महापालिका हॉस्पिटल, खासगी हॉस्पिटल तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण हॉस्पिटलमध्ये झाला आहे.

जनजागृतीची गरज

भर उन्हात स्वाइन फ्ल्यूचा प्रार्दुभाव वाढत असून, नागरिकांनी सर्दी खोकल्याची प्राथमिक लक्षणे दिसल्याबरोबर उपचार सुरू करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. स्वाइन फ्ल्यूच्या वाढत्या उद्रेकाला सामोरे कसे जावे, असा प्रश्न महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह नागरिकांनाही पडला आहे. याबाबत नागरिकांमध्ये पुन्हा जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘आपलं सरकार’वरील ८२ टक्के तक्रारींचे निरसन

$
0
0

‘आपलं सरकार’वरील ८२ टक्के तक्रारींचे निरसन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या आपले सरकार वेब पोर्टलवर प्राप्त १०२८ पैकी जिल्ह्यातील ८५६ तक्रारींचे जिल्हा प्रशासनाने निरसन केले आहे. ८२ टक्के तक्रारदारांनी या पोर्टलद्वारे केलेल्या तक्रारींचे निरसन झाल्याबद्दल समाधान व्यक्त केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. अजूनही १४९ तक्रारींचा निपटारा

होणे बाकी आहे.

कामे मार्गी लावताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विविध सरकारी कार्यालयांमधील सरकारी बाबूंकडून योग्य वागणूक न मिळाल्यास नागरिकांचा हिरमोड होतो. म्हणूनच सरकारने सेवा हमी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा आग्रह धरला आहे. नागरिकांना आपल्या तक्रारी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविता याव्यात यासाठी आपले सरकार वेब पोर्टलचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या वेब पोर्टलवर प्राप्त तक्रारी आणि त्याचा निपटारा याबाबतचा आढावा सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आला. मंत्रालयीन स्तरावरील अधिकारी सुदाम गवळी यांनी हा आढावा घेतला.

आतापर्यंत एक हजार २८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ८५६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. १४९ तक्रारींचा अद्याप निपटारा झालेला नाही. तर २३ तक्रारी प्राप्त होण्यास २१ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामध्ये महावितरणच्या १२, आदिवासी विकास महामंडळाशी संबंधित तीन, आदिवासी आयुक्तालय आणि वन विभागाशी संबंधित तक्रारींचा समावेश आहे.


शिक्षण समितीसाठी

५५ कोटींची तरतूद

नाशिक :महापालिकेने शिक्षण समितीच्या बजेटमध्ये तब्बल दहा कोटीची वाढ केली असून, शिक्षण समितीचे २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे बजेट हे ५५ कोटीपर्यंत पोहचले आहे. गेल्या वर्षी शिक्षण समितीच्या बजेट हे ४५ कोटी ६६ लाख एवढे होते. चालू वर्षात त्यात तब्बल दहा टक्के वाढ करण्यात आली आहे.

वृक्ष समितीसाठी ५ कोटी

नाशिक : महापालिकेच्या बजेटमध्ये वृक्ष प्राधीकरण समितीसाठी स्वंतत्र तरतूद करण्यात आली आहे. बजेटमध्ये वृक्ष प्राधिकरणासाठी ५ कोटी २८ लाखांची तरतूद असून, दोन कोटी वृक्षसंवर्धन करण्यात येणार आहे. तर दोन कोटी ८५ लाख रुपये पालिकेचे अनुदान असणार आहे.

कडलग पुरस्कार जाहीर

नाशिक : इंडियन चेंबर ऑफ अॅग्रिकल्चर ‘एम्पॉवरींग फार्मर्स’ मिशन २०२० अंतर्गत, शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना यंदाचा दौलतराव कडलग प्रेरणा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळा शुक्रवारी (दि. २१) दुपारी सव्वा बारा वाजता कालिदास कलामंदिर येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिकेसाठी १८००२७००५११ या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर बाजारावर व्याख्यान

नाशिक : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंड्रस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर आणि एल. के. पी. सिक्युरीटीज तसेच एनएसडीसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने श...शेअर बाजाराचा या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि. १८) दुपारी साडेचार वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृहात पार पडणार आहे. यावेळी अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर बोदडे मार्गदर्शन करतील.

कृतज्ञता सोहळा

नाशिक : नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लांइडतर्फे रोटरी हॉल येथे दरवर्षीप्रमाणे ऋणनिर्देश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अपर जिल्हाधिकारी दिलीपस्वामी, उद्योजक सोहनराज भंडारी, नगरसेविका हेमलता पाटील, डॉ. लकेश नहारा आदी उपस्थित होते.

वेंकय्या नायडूंचे आभार

नाशिक : नाशिकरोड गोंदिया जिल्ह्यासाठीचा ५५ कोटींचा निधी नाशिक महापालिकेच्या मुकणे पाणीपुरवठा योजनेस दिल्याबद्दल खासदार हेमंत गोडसे यांनी नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांचे आभार मानले. त्यांनी नायडूंची नवी दिल्लीत भेट घेतली. अडचणीत सापडलेल्या मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेला केंद्र व राज्य सरकारच्या ७७ कोटींच्या अनुदानामुळे जीवदान मिळाले. यात केंद्राचे ५५ कोटी तर राज्याचे २२ कोटी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड, येवल्याची भागणार तहान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनमाड तसेच येवल्यासह ३८ गाव पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या गावांसाठी पालखेड धरणातून पुढील आठवड्यात ७५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. पाण्याच्या वहन मार्गावर पाणीचोरी होऊ नये, यासाठी फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिले आहेत.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मनमाड, येवलेकरांसाठी पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. २० जूनपर्यंत हे पाणी पुरणे प्रशासनाला अपेक्षित आहे. मात्र, सोडलेले पाणी शेतकरी डोंगळे करून अडवितात. त्यामुळे पाणी देऊनही अनेक गावे तहानलेलीच राहतात. असे होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी केले. पालखेडमधून सोडण्यात येणारे आवर्तन हे केवळ पिण्याच्या पाण्याचे आहे. ते सिंचनासाठी अडविले जाऊ नये, याची काळजी घेतली जाणार आहे. पाणी सोडल्यानंतर वहन मार्गावरील वीज पुरवठाही खंडीत केला जाणार आहे. तसेच प्रत्येक पाच किलोमीटरवर कार्यकारी अभियंता, पोलिस कर्मचारी, वीज महावितरणचे कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत राहणार आहे. दहा दिवस हे आवर्तन सुरू राहील असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. निफाड, येवला नगरपालिका, येवला ३८ गाव पाणीपुरवठा योजना, मनमाड नगरपालिका, मनमाड रेल्वे, निफाड प्रासंगिक गावे, विनायकसागर बंधारे, भोई नदीवरील गावे आदींना याचा लाभ होणार आहे. पाणी चोरणाऱ्यांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मनमाड शहराला महिन्यातून एक वेळा तर येवला शहरास साधारण आठवड्यातून एक वेळा पाणी मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. लहाडेंची जामिनासाठी धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवैध गर्भपात प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करताच डॉ. वर्षा लहाडे यांनी अॅड. राहुल कासलीवाल यांच्या मार्फत आणखी अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा कोर्टात सादर केला आहे. या पूर्वीच्या खासगी हॉस्पिटल प्रकरणात देखील डॉ. लहाडे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला असून, त्यावर मंगळवारी (दि. १८) सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात झाल्याप्रकरणी डॉ. वर्षा लहाडे, डॉ. कमलाकर जाधव तसेच गर्भवती महिलेसह तिच्या नातेवाईकांवर सरकारवाडा पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात आज, सोमवारी अॅड. अॅड. कासलीवाल यांनी लहाडेंच्यावतीने अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. डॉ. लहाडे यांच्याविरोधात खासगी हॉस्पिटल चालवणे, कागदपत्रांमध्ये फेरफार करणे, नियम बाह्य गर्भपात केंद्र चालवणे आदी कारणांमुळे म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात डॉ. लहाडे यांच्यातर्फे अॅड. कासलीवाल यांनी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. काही तांत्रिक बाबींमुळे कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. आता, या प्रकरणात मंगळवारी (दि. १८) जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. शर्मा यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे. दरम्यान, एकाच व्यक्तीकडून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात अटकपूर्व अर्ज सादर झाले असून, याची सुनावणी वेगवेगळी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन गुन्हे दाखल होऊनही डॉ. लहाडे यांची अद्याप पोलिसांनी चौकशी केलेली नाही, हे विशेष!

‘त्या’ भूलतज्ज्ञांबाबत आठ दिवसात अहवाल

डॉ. वर्षा लहाडे यांच्या प्रयाग हॉस्पिटलशी संबंधित असलेल्या त्या भूलतज्ज्ञाचा शोध घेण्यासाठी गठीत केलेल्या समितीची चौकशी सुरू आहे. या आठवड्याअखेरपर्यंत तीन सदस्य आपला अहवाल सादर करणार आहे. या चौकशीकडे आरोग्य विभागातील सर्वच डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात ‘मटा’ने १४ एप्रिल रोजी सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते.

आरोग्य विभागात भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या सदर डॉक्टरच्या शिक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नोकरी मिळाल्यानंतर भूलतज्ज्ञ विषयाचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या संबंधित डॉक्टरने याचधर्तीवर इन्क्रीमेंट तसेच प्रमोशन मिळवले. अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या डॉ. लहाडे यांच्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये सदर डॉक्टरचे सतत संबंध येत होता. यासंबंधी ‘मटा’ने सविस्तर वृत्त प्रसिध्द केल्यानंतर सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी तीन सदस्यीय कमिटी गठीत करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. याबाबत माहिती देताना डॉ. जगदाळे यांनी सांगितले, की सध्या चौकशीचे काम सुरू आहे. कमिटीला अहवाल सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली होती. लवकरच हा अहवाल समोर येईल, असे डॉ. त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दारू दुकाने बंद करा अन्यथा उपोषण’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

दत्तचौक व महाकाली चौकात असलेल्या देशी दारूच्या दुकानांमुळे परिसरातील नागरिकांना खूप त्रास होत असून, येथील नागरिकांनी संतापाच्या भरात दोन दिवसांपूर्वी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भातच सोमवारी (दि. १७) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित दुकानांमुळे होणाऱ्या त्रासाची चर्चा करून निवेदन दिले. हे दुकाने बंद न केल्यास बेमूदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक मुकेश शहाणे यांनी दिला आहे.

सिडकोतील दत्त चौक व महाकाल चौक येथे असलेल्या देशी दारू दुकानांमुळे या परिसरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या दुकानांच्या जवळ महाकाली व महालक्ष्मीचे मंदिर असल्याने याठिकाणी महिलांची वर्दळ जास्त असते. मात्र या दोन्ही दुकानांमधून मद्यपान करून आलेले मद्यपी या महिलांची छेडछाड करीत असतात. त्याचबरोबर या परिसरातील महिलांची किंवा मुलींची छेडछाड करून शिवीगाळ केल्याचे प्रकार होत असतात. नागरिकांनी दोन्ही दुकाने तातडीने बंद करून येथील नागरिकांचा त्रास बंद करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह शशिकांत जाधवही उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना या दोन्ही दुकानांबाबत निवेदन देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतप्त शिक्षकांनी ठोकले बँकेला टाळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील दाभाडी येथील जिल्हा बँकेच्या शाखेतील कर्मचाऱ्यांना संतप्त शिक्षक, पेन्शनर यांनी सोमवारी बँकेला टाळे ठोकून काही काळ डांबून ठेवले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा बँक शाखांमध्ये सातत्याने चलन तुटवडा भासत असल्याने अनेक खातेधारकांचे पैसे अद्यापही मिळालेली नाही. ग्रामीण भागातील शाखांमध्ये शेतकरी शिक्षक, पेन्शनर यांची खाती आहेत. हे सर्व बँकेत येवूनही पैसे मिळत नसल्याने दाभाडी येथील जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांना संतप्त शिक्षकांनी डांबून ठेवले होते. अचानक झालेल्या या प्रकाराने येथे काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. शाखाव्यवस्थापक यांनी शिक्षकांची समजूत काढून गुरुवारपर्यंत पगाराचे पैसे देण्याचे आश्वासन दिल्याने बँक अधिकारी, कर्मचारींची सुटका झाली.

घोटीत अधिकाऱ्यांना घेराव

घोटी ः इगतपुरी तालुक्यात जिल्हा बँकेच्या घोटी शाखेत चलनटंचाई कायम असल्याने शेतकरी, खातेदार व नोकरदार यांची आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे सोमवारी शेतकऱ्यांसह, नोकरदारांना त्यांच्या खात्यातून रक्कम न मिळाल्याने त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. जिल्हा बँकेचे चेअरमन व पदाधिकाऱ्यांनी सोमवारपासून नोकरदारांना पगाराची रक्कम अदा केली जाईल, अशी ग्वाही दिली होती. या पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळेचे व प्राथमिक शाळेचे शिक्षक सकाळपासूनच बँकेत आले होते. मात्र तेथेही रक्कम न मिळाल्यामुळे संताप व्यक्त करत बँक अधिकाऱ्यांना घेराव घातला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीची टांगती तलवार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची खालावलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नावाढीवर प्रशासनाने भर दिला असून, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये करवाढ प्रस्तावित केली आहे. मालमत्ता करात सरासरी १४, तर पाणीपट्टीत करात पाच टक्के करवाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर झाला आहे. प्रभारी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सुमारे १४१० कोटींचे बजेट सोमवारी स्थायी समितीला सादर केले. सत्ताधाऱ्यांनी मालमत्ता करासह पाणीपट्टी करात वाढ करण्याचे संकेत दिले असून, प्रस्तावित करवाढीला मंजुरी दिल्यास साधारण १५ ते २० कोटी रुपये प्रतिवर्षी वाढ होण्याची शक्यता आहे. यासदंर्भात आता गुरुवारी निर्णय घेतला जाणार आहे.

महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे नियोजित १४१०.७ कोटींचे वार्षिक बजेट सोमवारी प्रभारी आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले. गेल्या वर्षाच्या तुलनेत बजेटमध्ये ६२ कोटींची वाढ झाली असली, तरी महसुली खर्च व विविध योजनांंच्या दायित्वामुळे महापालिकेच्या बजेटमध्ये विकासकामांना मोठी कात्री लावण्यात आली आहे. बजेटमध्ये १२२८ कोटी रुपयांचे उत्पन्न गृहित धरण्यात आले असले, तरी भांडवली खर्चात मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठी कपात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी भांडवली खर्चासाठी साडेचारशे कोटींची तरतूद होती. यंदा मात्र महसुली खर्च ८७५ कोटींवर गेल्याने व विविध योजनांचा भार वाढल्याने भांडवली खर्चासाठी केवळ १३० कोटी रुपयेच उरले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पन्नवाढीवर प्रशासनाने भर दिला असून, मालमत्ता करासह पाणीपट्टीत सरासरी १४ आणि ५ टक्के वाढ सुचविण्यात आली आहे.

गतवर्षीही मालमत्ता कर व पाणीपट्टी करात वाढ सुचविली होती. परंतु, महापालिका निवडणुकीमुळे सत्ताधारी मनसेने प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळला होता. यावर्षी मात्र सत्ताधारीच मालमत्ता करासह पाणीपट्टी कराच्या वाढीला अनुकूल असल्याने नाशिककरांवर करवाढीचा बोजा पडणार आहे. मालमत्ता करांच्या दरामध्ये सर्वसाधारण करात ५ टक्के, सर्वसाधारण स्वच्छता कर, जललाभ कर, पथकर व महापालिका शिक्षण करात प्रत्येकी एक टक्का व मलनिस्सारण लाभ करात ५ टक्के अशी एकून सरासरी १४ टक्के करवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेला यातून सरासरी वार्षिक १० कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. याचा निर्णय आता गुरुवारी सत्ताधाऱ्यांकडून घेतला जाणार आहे.

-

ना नफा, ना तोटा

पाणीपट्टी दरातही सरासरी ५ टक्के दरवाढ चक्रवाढ पद्धतीने प्रस्तावित करण्यात आली आहे. महापालिकेत पाणीपट्टीचा प्रतिहजार लिटर पाच रुपये असलेला दर तीन वर्षांत आठ रुपयांपर्यंत जाणार आहे. बिगर घरगुती पाणीपट्टी प्रतिहजार लिटर २२ रुपयांवरून ३० रुपयांपर्यंत नेला जाणार आहे. व्यावसायिक वापरासाठी पाणीपट्टी प्रतिहजार लिटर २७ वरून ४० रुपयांपर्यंत नेली जाणार आहे. येत्या तीन वर्षांत पाणीपट्टीत ५० टक्के वाढ होणार आहे. पाणीपुरवठा विभाग स्वावलंबी करण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी ना नफा, ना तोटा तत्त्वावर हा विभाग चालविणार असल्याने पाणपट्टीत भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे.

--

गुरुवारी होणार निर्णय

महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नवाढीशिवाय अन्य पर्याय नाही. त्यामुळे आयुक्तांनी करवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यात घरपट्टीत सरासरी १४ टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. त्यात सर्वसाधारण करात ५ टक्के, तर इतर करांमध्ये ९ टक्के अशी एकूण १४ टक्के वाढ आहे. महापालिकेत पाणीपट्टीच्या प्रतिहजार लिटर पाच रुपये असलेल्या दरात पाच टक्के वाढ केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांवर अतिरिक्त करभार पडेल. आयुक्तांच्या बजेटवर चर्चा करण्यासाठी आता गुरुवारी स्थायीची बैठक होत असून, त्याच दिवशी निर्णय घेतला जाणार आहे.

--

ऑनलाइन सवलत कायम

सोलर वॉटर हीटरचा वापर केल्यास मालमत्ता करात ५ टक्के सूट देण्यात येत आहे. ई-पेमेंटद्वारे कर भरणाऱ्यांना सूट दिली असून, मालमत्ता करासाठी १ टक्का व ५०० रुपयांपर्यंत पाणीपट्टीसाठी अर्धा टक्का व कमाल १०० रुपये राहील.

--

शिवसेनेचा विरोध

दरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या करवाढीला शिवसेनेचा विरोध राहणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून नगरसेवकांनी करवाढीविरोधात आक्रमक होण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपची पंचाईत होणार आहे. शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेही विरोध करण्याची शक्यता आहे. दत्तक नाशिकसाठी करवाढीची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे.

---

महापालिकेत उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. प्रशासनाने मालमत्ता कर व पाणीपट्टी करात वाढ सुचविली आहे. पाणीपट्टी करात वाढ आवश्यक असून, या दोन्ही करवाढींच्या प्रस्तावासंदर्भात सदस्यांशी चर्चा व अभ्यास करून गुरुवारच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

-शिवाजी गांगुर्डे, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांना लागणार कात्री

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका प्रशासनाकडून सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीचे बजेट सोमवारी स्थायी समितीला सादर करण्यात आले. स्थायीला सादर केलेल्या एकूण १४१० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये महसुली खर्च तब्बल ८७५ कोटी रुपये दाखविण्यात आला असून, विकासकामांसाठी केवळ १३० कोटी ५८ लाख रुपये शिल्लक ठेवण्यात आले आहेत. सोबतच प्रशासनाने यंदाचे वर्ष हे प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीचे वर्ष म्हणून जाहीर केल्याने अधिकच्या विकासकामांना थेट कात्रीच लावण्यात आली आहे. त्यामुळे विकासकामांचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला असून, दत्तक नाशिकचा विकास सरकारच्याच हातात राहणार असल्याचे चित्र आहे.

महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्याकडे १४१० कोटी सात लाख रुपयांचे बजेट सादर केले. त्यात मागील वर्षाचे पाच कोटी ९८ लाख रुपये शिल्लक राहिल्याने शिलकी बजेट सादर केले आहे. या बजेटमध्ये महापालिकेचे स्वतःचे उत्पन्न १२२८ कोटी ९२ लाख रुपये, अनुदान स्वरुपातून ५६ कोटी ९६ लाख रुपये, इतर उचल रक्कम ९० कोटी ८२ लाख, कर्जाच्या माध्यमातून २० कोटी असे एकूण १३९६ कोटी ७० लाख व सुरुवातीची शिल्लक १३ कोटी ३८ लाख रुपये असे एकूण १४२० कोटी आठ लाख रुपयांचा गोषवारा मांडण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे महसुली खर्चात मोठी वाढ दाखविण्यात आली आहे. यामध्ये कर्मचारी वेतन ३०८ कोटी, पेन्शन खर्च ७२ कोटी, शिक्षण समिती ५५ कोटी, कर्ज परतफेड १५ कोटी, कर्जावरील व्याज ३२ कोटी व कार्यालयीन खर्चाचा अंतर्भाव ९८ कोटी गृहित धरण्यात आला आहे. जमा रकमेपैकी एकूण ८७५ कोटी ७४ लाख रुपये म्हणजेच ६० टक्के उत्पन्न हे महसुलावर खर्च होणार आहे.

महापालिकेवर विविध योजनांपोटी तब्बल ३९३ कोटी ७५ लाखांचे दायित्व आहे. त्यात सिंहस्थ कामांसाठीचे १० कोटी रुपये महापालिकेला अदा करावे लागतील. मुकणे धरणासाठी ६० कोटी रुपये, भूसंपादनासाठी ७० कोटी ७४ लाख, सिंहस्थ भूसंपादनासाठी २४ कोटी ५० लाख, स्मार्ट सिटीसाठी ५० कोटी व अमृत योजनेसाठी २०, तर पंतप्रधान आवास योजनेसाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विविध दायित्व व महसुली खर्चाची रक्कम ही जवळपास १२६९ कोटींपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे विकासकामांसाठी फक्त १३० कोटी ५८ लाख रुपये शिल्लक राहणार आहेत. यंदाचे वर्ष प्रशासनाने दखभाल व दुरुस्ती वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे जवळपास २९६ कोटी रुपये त्यावर खर्च केला जाणार आहे. त्यामुळे नगरसेवक निधीसोबतच नव्या विकासकामांसाठी पैसाच शिल्लक राहणार नसल्याने भाजपच्या मनसुब्यांना कात्री लागणार आहे. परिणामी दत्तक नाशिकच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांना केंद्र व राज्याच्या अतिरिक्त निधीवरच अवलबूंन राहावे लागणार आहे.

--

स्पीलओव्हर ६०७ कोटी

महापालिकेचा स्पीलओव्हर हा ६०७ कोटींवर पोहोचला आहे. त्यात चालू कामांसाठी ३५९ कोटी रुपये धरण्यात आले आहेत. निविदा मंजूर कामांसाठी २ कोटी १७ लाख, वित्तीय मंजुरीच्या प्रतीक्षेत ५१ कोटी, निविदा प्रक्रियेत ७ कोटी आणि मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या कामांसाठी १८९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे नव्या कामांना आपोआप ब्रेक लागणार आहे. नव्या कामांसाठी विकासशुल्काचीच वाट पाहावी लागणार आहे.

--

प्रशासनाची कबुली

प्रशासनाने बजेटमध्ये महापालिकेच्या आर्थिक स्थितीचे वर्णन केले आहे. त्यावरून आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे दर्शविण्यात आले आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत एलबीटी आहे. यंदा शासनाकडून सहाय्यक अनुदान किती मिळेल याबाबत खात्री नसल्याचे सांगून निधीबाबत भीती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे विकासकामे करायची असतील, तर करवाढ अटळ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर करवाढीसाठी अप्रत्यक्षरीत्या दबाव टाकण्यात आला आहे.

--

रुपया जमा-खर्च अहवाल

--

असा जमा होणार पैसा

महापालिका उत्पन्न- १२२८.९२ कोटी

विविध अनुदाने- ५६.९६ कोटी

इतर उचल- ९०.८२ कोटी

कर्ज- २०.०० कोटी

शिल्लक- १३.३७ कोटी

एकूण रक्कम- १४१०.०७ कोटी

--

असा होणार पैसा खर्च

सामान्य प्रशासन- २९६.१० कोटी

सार्वजनिक सुरक्षितता- ५०.९५ कोटी

सार्वजनिक आरोग्य- ३०५.१४ कोटी

सार्वजनिक शिक्षण- ०९.०५ कोटी

सार्वजनिक संस्था अनुदान- १० लाख

संकीर्ण- ६३.९३ कोटी

जलदाय व्यवस्था वितरण- ६६.७९ कोटी

मलनिस्सारण व्यवस्था- २५.२० कोटी

जलनिस्सारण व्यवस्था- १.५० कोटी

गरिबांसाठी सेवा- ५६.९८ कोटी

भांडवली खर्च- ४०५.९० कोटी

इतर उचल रकमा-५५.३५ कोटी

अन्य खर्च- ६७.१० कोटी

अखेर शिल्लक- ५.९८ कोटी

एकूण- १४१०.०७ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images