Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पंचवटीत पैशांची बॅग लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘कट का मारला?’ अशी कुरापत काढून वाद घालणाऱ्या दोघा संशयितांनी शेतकऱ्याकडील पाऊणेचार लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लांबवली. ही घटना बुधवारी दुपारी निमाणी बस स्टॅण्डजवळ घडली. सीबीएस येथे असाच प्रकार घडल्याची घटना अद्याप ताजी असून, बॅग लिफ्टिंग करणाऱ्यांना रोखण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

प्रमोद सुभाष घुले (२२, रा. रामाचे पिंपळस, ता. निफाड) यांनी या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. शेतमालाचे पैसे घेण्यासाठी घुले बुधवारी (दि. २२) दुपारी साडेचारच्या सुमारास वडिलांच्या सांगण्यावरून पंचवटी कारंजावरील किरीट लखाने यांच्याकडे आले होते. पैशांची वसुली करीत घुलने चारचाकी स्विफ्टकार (एमएच २०, बीसी ४३४३) मध्ये क्लिनर साईडला तीन लाख ७५ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग, घुलेंनी ठेवली होती. या बॅगेत शैक्षणिक कागदपत्रे होते. निमाणी बस स्टॅण्डच्या पुढे सेवाकुंजजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी घुलेला गाडी बाजूला घेण्याचा इशारा केला. काय झाले हे पाहण्यासाठी घुलने कार थांबवली. त्यावेळी संशयितांनी कारला कट का मारला, अशी विचारणा करीत वाद घालण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्रसंगानंतर घुलेने संशयिताची माफी मागत वाद मिटवला. हा प्रकार सुरू असताना संशयितांपैकी एकाने घुलेला बोलण्यात गुंतवून ठेवत अलगद पैशांनी भरलेली बॅग काढून घेतली.

रिक्षातून दागिने लंपास

रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेतील दागिने अज्ञात सहप्रवाशांपैकी कोणीतरी चोरी केल्याची घटना सीबीएस ते सिडकोतील रायगड चौकादरम्यान घडली. या प्रकरणी शिवाजी धोंडू मानकर (५५, रा. रायगड चौक,सिडको) यांच्या फिर्यादीनंतर अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानकर दाम्पत्य मंगळवारी बाहेरगावाहून परतल्यानंतर सिडकोत जाण्यासाठी रिक्षातून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. दोन सहप्रवाशांपैकी अज्ञात महिलेने आसनाच्या पाठीमागे ठेवलेल्या बॅगेतील पर्स काढून त्यातील सुमारे ७६ हजार रुपयांचे अलंकार हातोहात लांबविले.

दोन दुचाकींची चोरी

मोटारसायकली चोरीप्रकरणी गंगापूर आणि नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. महात्मानगर येथील दीपांशू कुलभूषण खन्ना (रा. तारांगण सोसा.) यांची दुचाकी (एमएच १५ सीव्ही ९४१२) १३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी लंपास केली. दरम्यान, जेलरोड येथील लोखंडे मळा भागात राहणारे विनायक राजेंद्र मैंद (रा. चंद्रविजय सोसा. लक्ष्मणनगर) हे १५ मार्च रोजी नाशिकरोड येथे गेले होते. हॉटेल कृष्णा समोरील उड्डाणपुलाखाली त्यांनी उभी केलेली दुचाकी (एमएच १५ इके ५३०५) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

विवाहितेची आत्महत्या

सातपूर : श्रमिकनगरमधील पठार भागात राहणाऱ्या विवाहितेने घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी विवाहितेचे मामा अरुण केसकर यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मोनाली रवी काळे (३०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. त्या पती व दोन मुलांसह भाडेतत्वाने खोली घेऊन राहत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निफ फिल्म फेस्टिव्हलचे उद्‍घाटन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मेट्रो फाऊंडेशन ऑफ इंडिया व कलावैभव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे (निफ) रावसाहेब थोरात सभागृहात उद्‍घाटन गुरूवारी करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, प्रसिध्द अभिनेता रणजित, किशोरी शहाणे, दिलीप शुक्ला, दीपक बलराज वीज, कपिल शर्मा, माजी मंत्री बबन घोलप यांची उपस्थिती होती. यंदाचा निफ जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द दिग्दर्शक लेख टंडन यांना देण्यात आला. आयोजक मुकेश कणेरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी महापौर रंजना भानसी, दीपक विज, दिलीप शुक्ला, सतीश राय, लक्ष्मण सावजी यांनी मनोगत व्यक्त केले. लेख टंडन यावेळी म्हणाले, की महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे. मराठी मला अधिक आवडणारी भाषा आहे. सिमरन आहुजा यांनी सूत्रसंचालन केले.

फेस्टिव्हलमध्ये चित्रपटांचे स्क्रिनिंग

निफ फेस्टिव्हलमध्ये ७० आंतरराष्ट्रीय, ५० प्रादेशिक व २०० डॉक्युमेन्ट्रीज तसेच इतर शॉर्ट फिल्मसचा समावेश आहे. त्यात २४ मार्चला सकाळी ११.४५ वाजता बियाबान-क्रिष्णकांत पांडे, २५ मार्चला दुपारी १२.१५ वाजता दास्ता ए रफी-रजनी आचार्य, २५ मार्चला सायंकाळी ७ वाजता कासव-सुमित सुखटणकर हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटांनतर डॉ. मोहन आगाशे यांच्याशी विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे. या चित्रपटांदरम्यान ‘मनटुस्तान-रहात काजमी’ हा चित्रपटही दाखविण्यात येणार आहे.

फेस्टिव्हलमध्ये आज

फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी, २४ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता स्थानिक खाद्यप्रेमींसाठी देशाविदेशातील पारंपरिक खाद्यांविषयी असलेली स्पेशल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेलिब्रेटी मास्टर शेफ विष्णू मनोहर यांची उपस्थिती राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

सौंदाणे (ता. मालेगाव) येथील महादू कारभारी पवार (वय ५७) व डोंगरगाव (ता. देवळा) येथील जगन विठ्ठल अहिरे (वय ५०) या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

पवार यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पवार यांच्यावर सोसायटीचे ६० हजार रुपयांचे कर्ज असून, अडीच लाख रुपयांच्या आसपास हातउसनवारी आहे. त्यांच्या मागे तीन मुली, एक मुलगा, पत्नी असा परिवार आहे. डोंगरगाव येथील रहिवासी व नांदगाव (बु.) येथे शेती असलेले जगन आहिरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आहिरे यांच्या आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांच्या मागे दोन मुली, मुलगा, पत्नी असा परिवार आहे. दोन गावांतील शेतकऱ्यांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधा मदनगोपालजींना एक टन पुष्पांचा अभिषेक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

द्वारका येथील इस्कॉनच्या राधा मदनगोपालजी मंदिराला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवारी एक टन पुष्पांचा अभिषेक करण्यात आला. त्यानिमित्त ‘राधा कृष्ण गोपाल कृष्ण’ नामाचा एकच जयघोष करण्यात आला.

यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. भगवंताची सेवा हेच आयुष्याचे ध्येय असले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबईच्या इस्कॉन मंदिर समितीचे अध्यक्ष गौरांग प्रभू यांनी केले. ते म्हणाले, की श्री चैतन्य महाप्रभूंनी कलियुगातील बद्ध जिवांसाठी सुमारे पाचशे वर्षांपूर्वी ‘हरे कृष्ण’ हा महामंत्र दिला होता. आपण कृतज्ञतेने त्याचा स्वीकार करून आपले जीवन सफल करायला हवे.

महोत्सवाला पहाटे ५ वाजता मंगल आरतीने सुरुवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद् भागवत प्रवचन झाले. सायंकाळी ७ वाजता मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर गौरांग प्रभूंचे प्रवचन झाले. नंतर श्रील प्रभुपादांचे वरिष्ठ शिष्य तितिक्षवा कारुणिका प्रभू यांच्या रॉक संगीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी एक टन पुष्पांनी श्री श्री राधामदनगोपालजींना अभिषेक करण्यात आला. मोगरा, गुलाब, चाफा, झेंडू, सोनचाफा, चमेली इत्यादी फुलांचा अभिषेकासाठी वापर करण्यात आला. पुष्पांनी, तसेच द्राक्षांनी वेदी सजविण्यात आली होती. अत्यंत विलोभनीय असे दृश्य नाशिककरांना यावेळी पाहायला मिळाले. हजारो नाशिककरांनी या नयनरम्य महोत्सवाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंदिराचे अध्यक्ष गोपालानंद प्रभू आणि कृष्णधन प्रभू जानकीनाथ प्रभू, सहस्रशीर्ष प्रभू, तसेच मुंबईहून आलेले प्रेमकिशोर प्रभू, माधवाचर्य प्रभू, अंतरंग शक्ती माताजी आणि पूर्ण शक्ती माताजी आदींनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलांसाठी २२ दिवसांत ५७ हजार अर्ज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचा घरकुलासाठी गेल्या २२ दिवसांत अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. गेल्या २२ दिवसांत ५७ हजार ९९ अर्जांची विक्री झाली आहे. या अर्जासांठी पालिकेकडे अजूनही तगादा सुरूच असल्याने आवास योजनेवरील भार चांगलाच वाढला आहे.

नाशिक पूर्वमध्ये १२ हजार ६०० तर पंचवटीतून १२ हजार अर्ज आले आहेत. महापालिकेने या अर्जांसोबतच झोपडपट्ट्यांमधील बेघरांचेही सर्वेक्षण सुरू केले आहे. नाशिक पश्चिममध्ये जवळपास तीन हजार ८६८ झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण झाले असून, त्यात ५ हजार २७२ कुटूंबे आढळून आली आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरकुलांसाठी अर्ज आल्याने सर्वांना घरे उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर उभे ठाकले आहे.

केंद्र सरकारने २०२२मध्ये प्रत्येकाला घर देण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी पालिकेच्या वतीने १ मार्चपासून शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. या आवास योजनेअंतर्गत चार घटक करण्यात आले असून, पहिल्या घटकात झोपडपट्टीधारकांचा समावेश आहे. तर दुसऱ्या, त‌िसऱ्या आणि चौथ्या घटकात सहा लाखांपर्यंत उत्पन्न असणारे नागरिक पात्र ठरणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेत घर मिळवण्यासाठी नागरिकांनी पालिकेच्या विभागीय कार्यालयांवर अक्षरशः उड्या टाकल्या आहेत. १ मार्चपासून पालिकेने या घरकुलांसाठी अर्जांची विक्री सुरू केली आहे. पालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांमध्ये हे अर्ज विक्री केले जात आहेत. काही जण महा- ई- सेवा केंद्रांकडून अर्ज दाखल करीत आहेत.

या घरकुलांसाठी अक्षरशः अर्जांचा पाऊस पडला आहे. पहिले दोन आठवडे तर पालिकेला पोलिस बंदोबस्तात अर्ज विक्री करावी लागली होती. विशेषतः फुकटात घर मिळेल या आशेने झोपडपट्टीतील रहिवाशांनी अर्ज खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. सर्वाधिक अर्ज हे नाशिक पूर्व विभागातून १२ हजार ६०० इतके आले आहेत. त्यापाठोपाठ पंचवटीतून ११ हजार ८६८ अर्ज आले आहेत. सर्वात कमी अर्ज नाशिकरोड विभागतून ५ हजार ९८२ अर्ज आले आहेत. त्यातच महा ई-सेवा केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. २० एप्र‌िलपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्जांची छाननी करून घरांची पूर्तता करणे पालिकेसमोर मोठे आव्हान असणार आहे.

झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण

आवास योजनेत झोपडपट्ट्यांचे स्वतंत्र सर्वेक्षण केले जात आहे. शहरातील १६८ झोपडपट्ट्यांपैकी २९ झोपडपट्टीधारकांना जेएनयूआरएमअंतर्गत घरे दिली आहेत. उर्वरित झोपडपट्टीधारकांचे एजन्सीमार्फत डोअर टू डोअर सर्वेक्षण केले जात आहे.


विभाग अर्जांची संख्या

नाशिक पश्चिम ९,०५२

नाशिक पूर्व १२,६००

नाशिकरोड ५,९८२

सिडको ९,६७४

सातपूर ७,९२०

पंचवटी ११,८६८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपचाराविना रुग्णांचे प्रचंड हाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारत रुग्णसेवा बंद केल्यामुळे रुग्णाचे प्रचंड हाल झाले. जिल्ह्यात अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे रुग्णांना दवाखान्यांतून उपचाराविना परतावे लागले. काम बंद केलेल्या या डॉक्टरांनी सर्व रुग्णांना आम्ही महानगरपालिका व जिल्हा रुग्णालयात पाठवत असल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी या डॉक्टरांना अतिदक्षता विभाग सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे आंदोलन तीन दिवस सुरू ठेवण्याची घोषणा अगोदर करण्यात आली होती. पण नंतर डॉक्टरांच्या संघटनेने जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

या आंदोलनामुळे जिल्ह्यातील तब्बल पाच हजार डॉक्टरांनी संपात भाग घेतल्यामुळे जिल्ह्यातील ९०० हून अधिक दवाखाने ठप्प झाले आहेत. आयमा हॉलमध्ये सकाळी डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठक झाली. त्यावेळी डॉक्टरांनी आपला संताप व्यक्त करत काम बंद आंदोलनाचा निर्ण घेतला. त्यानंतर सकाळी डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी आडगाव येथे मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ रॅली काढली. त्यानंतर आयमा व विविध वैद्यकीय संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दुपारी शहरातील सर्वच डॉक्टरांनी कॉलेजरोडवरील बिग बाजारपासून निषेधाचे फलक हातात घेऊन रॅली काढली. ही रॅली नंतर कॅनडा कॉर्नरपर्यंत गेली व पुन्हा बिग बाजार येथे तिचा समारोप करण्यात आला. रात्री आयामच्या या संपाला होमिओपॅथिक, आयुर्वेद, डेंटल व विविध वैद्यकीय उपचार पध्दती असलेल्या संघटनांनी पाठिंबा देत या आंदोलनात सहभाग घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे सरकारी दवाखान्यावरचा ताणही वाढला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जिल्हाधिकाऱ्यांना आयमातर्फे निवेदन देण्यात आले. यात मारहाणीच्या धुळे व नाशिकच्या घटनेबरोबरच राज्यातील झालेल्या घटनांचाही निषेध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सरकारने ‘डॉक्टर सुरक्षा कायदा २०१०’ अंतर्गत कायद्याचे संरक्षण दिले आहे. पण दुर्दैवाने पोलिस यंत्रणेकडून या कलमाचा वापर होताना दिसत नाही. आतापर्यंत या कायद्यानुसार कोणावरही कारवाई झालेली नाही, अशी नाराजीसुध्दा व्यक्त केली. त्याचप्रमाणे सतत दडपणाखाली डॉक्टरांना काम करणे अशक्य आहे. डॉक्टरांच्या सहनशिलतेचा अंत झाल्याने आम्ही काम बंद आंदोलन सुरू केले असल्याचे म्हटले आहे.

काही डॉक्टर सहलीला

संपाची घोषणा होताच काही डॉक्टर हे सहलीला निघून गेले. बहुतांश डॉक्टरांनी आंदोलनात सहभाग नोंदवत आपला संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या या संपामुळे अनेक हॉस्पिटलमध्ये बंदचे फलक होते.

जिल्ह्यातील वैद्यकीय स्थिती


खासगी डॉक्टर

शहर– ३०००

जिल्हा – १५००

एकूण – ४५००


खासगी हॉस्पिटल्स

शहर – ७००

जिल्हा – ५००

एकूण – १२००


स्त्री रोग तज्ज्ञ – २५०

एमडी मेडिस‌िन – १५०

बालरोग तज्ज्ञ – ६५

पेडियाट्रिशिअन्स – ७१

अस्थ‌िरोगतज्ज्ञ – ७५

मेंदूविकार तज्ज्ञ – ३८

कान, नाक, घसा तज्ज्ञ - ४९


मेडिकल कॉलेजमध्येही शुकशुकाट

आडगावः येथील डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात डॉक्टरांच्या संपामुळे शुकशुकाट होता. त्यामुळे नियमित तपासणीसाठी आलेल्या पेशंटना डॉक्टर नसल्याने परत जावे लागले. रुग्णालयात अॅडमिट असलेल्या पेशंटवर नियमित उपचार सुरू होते आणि आपत्कालीन विभागामध्येसुद्धा फक्त अपघात झालेल्या रुग्णांना भरती करून घेतले जात होते. त्याठिकाणी देखील डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने त्यांना बेसिक ट्रिटमेंट दिली गेली. येथील बाह्यरुग्ण विभाग सकाळी १०.३० ते ११ पर्यंत सुरू होता. पण त्यानंतर आलेल्या पेशंटची नोंदणी थांबवून ओपीडी बंद करण्यात आली.त्यामुळे शेकडो पेशंटना परत जावे लागले. दुपारनंतर हॉस्पिटलमध्ये शुकशुकाट बघायला मिळाला.

मॅग्मोही संपाच्या तयारीत

सिन्नर फाटाः निवासी डॉक्टरांच्या पाठीशी आयएमए उभी राहिली असली तरीही सरकार बधत नसल्याने आता सरकारी डॉक्टरांची संघटना ‘मॅग्मो’ही संपाच्या तयारीत आहे. त्यामुळे आणखी काही दिवस संप चिघळला तर रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे. नाशिकरोडला आयएमए पदाधिकाऱ्यांची व खासगी डॉक्टरांची सुजाता बिर्ला हॉस्पिटल येथे गुरुवारी रात्री बैठक झाली. उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बैठकीत निवडणुकीसह संपाबाबत पुढील भूमिकेबाबतही चर्चा झाल्याची शक्यता आहे.

एका रुग्णालयात उपचारासाठी आलेले रघुनांथ शिंदे म्हणाले की, माझ्या कुटुंबातील रुग्णाचे गुरुवारी ऑपरेशन होणार होते. परंतु, संपकरी डॉक्टरांनी ऐनवेळेला ऑपरेशनला नकार दिला. रुग्ण काही दिवसांपासूनच रुग्णालयात अॅडमिट आहे. भूलतज्ञ उपलब्ध होत नसल्याचे कारण डॉक्टर पुढे करीत आहेत.

‘मार्ड’च्या डॉक्टरांच्या संपावर सरकारने लवकर तोडगा काढला पाहिजे. डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. त्यासाठी पुरेसे सुरक्षा उपाय योजले पाहिजेत. दडपशाहीने डॉक्टरांत नैराश्य निर्माण होऊन त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होईल. मार्डच्या डॉक्टरांच्या मागण्या सरकारने मान्य न केल्यास सरकारी डॉक्टरांची संघटना मॅग्मो देखील संपात उतरणार आहे.
-डॉ. प्रदीप जायभावे, राज्य सहसचिव, मॅग्मो

सातपूरला संमिश्र प्रतिसाद

सातपूर ः सातपूर परिसरात डॉक्टरांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. फॅमिली डॉक्टरांनी आपली दैनंदिन आरोग्य सेवा देण्याचे काम सुरूच ठेवल्याचे पहायला मिळाले. डॉक्टरांवर होत असलेले हल्ले चुकीचे असून, सिटूने त्याचा तीव्र निषेध नोंदविला आहे. याबाबत सिटूने जाहिर केलेल्या पत्रकात डॉक्टरांवर होत असलेले हल्ले लोकशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारकांकडे वसुली मोहीम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने थकबाकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या मालकीच्या गाळ्यांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी गाळेधारकांकडे थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे. नव्या रेड‌ीरेकनर दराने भाडेवाढीला गाळेधारकांचा विरोध असताना पालिकेने वसुली मोहीम सुरू करत तीन दिवसांत ३८ लाखांची वसुली केली आहे. जुन्या तसेच नव्या दराने पालिकेकडून वसुली मोहीम सहा विभागांत राबवली जाणार आहे. सोबतच जाह‌िरात करातूनही पालिकेला २९ लाख ८५ हजार रुपये मिळाले आहेत.

महापालिकेने आपल्या १९७३ गाळ्यांना रेडीरेकनरच्या दराप्रमाणे भाडेवाढ केली आहे. त्यामुळे या भाडेवाढीला गाळेधारकांचा तीव्र विरोध असून, गाळेधारक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यातच मार्च मह‌िना असल्याने पालिकेने वसुलीवर जोर दिला आहे. सोमवारपासून पालिकेने सहा विभागांत गाळेधारकांकडे असलेल्या थकबाकीची वसुली सुरू केली आहे. नाशिक पश्चिम, पंचवटी आणि नाशिक पूर्व या तीन विभागांत पहिल्या टप्प्यात मोहीम सुरू आहे. त्यात आतापर्यंत ३८ लाखांची वसुली करण्यात आली आहे. नाशिक पूर्वमधून ७ लाख २७ हजार, नाशिक पश्चिममध्ये २० लाख ५१ हजार रुपये आणि पंचवटीतून १० लाख ७८ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जुन्या दराने वसुलीला प्राधान्य दिले जात असून, भाडेवाढीचा फरकही तत्काळ गाळेधारकांना दिला जात आहे.

जाह‌िरात करावरही जोर

मालमत्ता कर, गाळेधारकांच्या वसुलीसोबतच पालिकेने जाह‌िरात कराचीही वसुली जोमात सुरू केली आहे. तीन दिवसांत जाह‌िरात कराची वसुली ही २९ लाख ८५ हजारांपर्यंत पोहचली आहे. त्यात नाशिक पूर्वमधून ८ लाख ७७ हजार, नाशिक पश्चिम १७ लाख ६ हजार, पंचवटी ४ लाख २ हजाराची वसुली झाली आहे. उर्वरीत तीन विभागांतही ही वसुली मोहीम राबविली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्ही फुटेज, डीएनए रिपोर्ट मुंबईला

$
0
0

धुळ्यातील आरोपीच्या गळफासप्रकरणी सीआयडी तपासाला गती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील शासकीय हिरे महाविद्यालयातील निवासी डॉक्टर रोहन म्हामूनकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली होती. यातील संशयित आरोपी प्रदीप वेताळ याने पोलिस ठाण्यातच आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यासंदर्भात सीआयडीने पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज आणि मृत प्रदीपचे डीएनए रिपोर्ट तपासणीसाठी मुंबईला पाठविले आहेत. तर इतर संशयितांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

डॉक्टर मारहाणीच्या चौकशीत सीआयडी विभागाने शहर पोलिस ठाण्यातील चार गार्ड कर्मचारी, दोन ऑफिस पहारा कर्मचारी, एक सीसीटीएनएस कर्मचारी, मृताचे दोन नातेवाईक, तपासी अंमलदार राजेंद्र माळी यांची चौकशी केली आहे. तसेच मृताच्या शरीरातील काही अंश धुळ्यातील पॅथोलॉजी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले आहे. यापुढे १२ जणांचे जवाब घेण्याचे बाकी असून, ते घेतल्यानंतर व सर्व तपासणीचे अहवाल आणि शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील तपासाला चालना मिळणार असल्याची माहिती धुळे सीआयडी विभागाने दिली आहे. याप्रकरणाचा सखोल तपास उपविभागीय अधिकारी गणेश चौधरी, कर्मचारी नरेंद्र कुलकर्णी, मनोहर जाधव, उमेश येवलेकर, शरद काटके, सुरेश भालेराव हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिरे वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर्स सेवेत

$
0
0

‘आयएमए’च्या संपाचे धुळ्यातही संमिश्र पडसाद

म. टा. वृत्तसेवा, धुळे

येथील निवासी डॉक्टर रोहन म्हामूनकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर राज्यातील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. दोन दिवसानंतर नाशिक व ठाण्यातील रुग्णालयातही डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना घडल्या. यामुळे आता ‘आयएमए’सह निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मात्र, धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सर्व डॉक्टर आपली सेवा बजावत आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यातील सर्व डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. मात्र, डॉक्टरांच्या मारहाणीच्या घटनेला धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयापासून सुरुवात झाली. त्याठिकाणी मात्र सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी कामावर आहेत. तर दुसरीकडे राज्यातील सर्व डॉक्टर्स हे काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. तसेच शहरातील सुमारे तीनशेहून अधिक खासगी रुग्णालयांनी बुधवारी (दि. २२) बंद ठेवून राज्यातील काम बंद आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांनी माघारी परतावे लागले.

दुसरीकडे राज्यातील निवासी डॉक्टरांवर सरकारने चालविलेली निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ आयएमए संघटनेने खासगी रुग्णसेवा बंदचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारपर्यंत हा संप सुरूच होता. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा असल्याची माहिती धुळ्याच्या आयएमए अध्यक्षा विजया माळी यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंड परिसरात मासेमारी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सध्या रामकुंडातील पाणी सोडून देण्यात आलेले आहे. परिणामी येथील उथळ पाण्यात जाळे टाकून, कपडे पसरवून मासेमारी करण्यात येत आहे. देशभरातील भाविक रामकुंडात अस्थिविसर्जनासाठी येत असतात. रामकुंडाच्या पश्चिमेला त्यासाठी खास व्यवस्था करण्यात आलेली आहे. या अस्थिविसर्जनाच्या जागेवर व्यवस्थित बांधकाम होणार असल्याने या जागेचे मोजमाप करण्यासाठी रामकुंडातील पाणी सोडून देण्यात आले आहे.

रामकुंडाच्या पात्रात बांधण्यात आलेल्या बांधाच्या मोऱ्या सध्या सोडून देण्यात आलेल्याने रामकुंड रिकामे झाले आहे. रिकाम्या झालेल्या रामकुंडाच्या पायाऱ्यांवर महापालिका आरोग्य विभागाकडून जंतुनाशक पावडर टाकण्यात आलेली आहे. रामकुंडाच्या अरुंद पात्राकडून गांधी तलावाकडच्या रुंद पात्राकडे वाहत जाणाऱ्या अस्थींचा ढिगारा साचत असतो. हा ढिगारा उपसण्यात आला आहे. रामकुंडातील पाणी कमी झाल्यानंतरच या ढिगाऱ्याची साफसफाई करण्यात येत असल्यामुळे येथील साफसफाई गुरुवारी करण्यात आली.

होळकर पुलाखालून लक्ष्मण कुंड आणि त्यानंतर रामकुंडात सध्या पाण्याचा प्रवाह सुरू आहे. हा प्रवाह वाहता ठेवण्यात आलेला असल्याने या प्रवाहातील मासे सहज नजरेस पडत आहेत. हे मासे पकडण्यासाठी मुले-मुली आणि तरुण येथे प्रयत्न करताना दिसतात. लक्ष्मण कुंडात जाळे टाकून मोठ-मोठे मासे पकडण्यात येत आहेत. रामकुंड्याच्या पात्रातही हातात कपडा धरून मासे दिसत असलेल्या भागात टाकून मासे पकडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.


नाणी शोधण्याची धडपड

रामकुंडात स्नान करताना काही भाविक अंगावरील वस्त्र तसेच पाण्यात सोडून देतात. अस्थिविसर्जनानंतर मातीची मडकीही येथेच टाकली जातात. पाणी कमी झाल्यामुळे अशी वस्त्रे आणि मडकी दुतोंड्या मारुतीच्या समोरच्या पात्रात जमा झालेली दिसत आहेत. या ठिकाणी नाणी शोधण्याची धडपडही अनेक जण करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादावादीने पहिली ठिणगी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयात माहिती देण्यावरून सध्या वादावादी सुरू असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हा वाद ओढावला असल्याने पहिली ठिणगी पडली आहे. माहिती द्यायची की नाही याबाबत हा वाद असून, आता त्यावर अंतिम निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत जनस्थान पॅनलकडून कार्यकारी मंडळ सदस्यत्वासाठी उमेदवारी करणारे विनोद राठोड यांनी वाचनालयाकडे सभासदांचे दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी देण्याची मागणी केली होती. मात्र, राठोड यांना प्रथम हे नंबर देण्यात येतील असे सांगून, नंतर ‘सावाना’ने घूमजाव केले असून, असे नंबर देता येत नाही. ती सभासदांची खासगी स्वरूपाची माहिती आहे आणि ही माहिती उघड करू नये, असे आदेश राज्य माहिती आयुक्त खंडपीठाने ४ जुलै २०१५ रोजीच ‘सावाना’ला दिले असल्याचे पत्र ‘सावाना’ने विनोद राठोड यांना दिले आहेत. राजकारण करून जनस्थान पॅनलला हे नंबर मिळवून देण्यात येत नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याप्रश्नी काही तोडगा काढावा, असेही सांगण्यात आले आहे.


सभासदांचे दूरध्वनी मिळण्यासाठी ‘सावाना’कडे अर्ज केला होता. परंतु, अध्यक्षांनी कार्याध्यक्षांकडे बोट दाखवले. कार्याध्यक्षांनी असे काही असते का, असा प्रश्न करीत कर्मचाऱ्यांना बोलावून विचारले असता त्यांनी आपल्याकडे ८५०० सभासदांचे नंबर आहेत, असे त्यांनी सांगितले. कार्याध्यक्षांनी मी बघतो, असे सांगून दुसऱ्या दिवशी खंडपीठाचा आदेश असल्याने ते नंबर देता येणार नाहीत, असे सांगितले.

-विनोद राडोठ, उमेदवार


सभासदांचे नंबर्स दिल्याने त्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब होऊ शकते. त्यामुळे ते नंबर कुणालाही देता येत नाहीत. खंडपीठाचा तसा आदेश आहे.

-विलास औरंगाबादकर, अध्यक्ष, सावाना

---

लिखित आचारसंहितेच्या अभावाने संभ्रमाची स्थिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावणेदोनशे वर्षांची दीर्घ परंपरा सांगणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाला अद्याप लिखित आचारसंहिताच नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे उमेदवारांना डूज व डोन्ट काय आहे हेच कळायला मार्ग उरलेला नाही.

कोणत्याही संस्थेची निवडणूक म्हटली, की त्याला आचारसंहिता असणारच. परंतु, ‘सावाना’ला अद्याप अशी काही लिखित आचारसंहिताच नसल्याचे उघडकीस आले आहे. ‘सावाना’च्या घटनेनुसारच हा सर्व कारभार सुरू आहे. ‘सावाना’ची घटनादेखील अत्यंत जुनी आहे तिच्यातदेखील बदल करण्याची गरज आहे. परंतु, त्याबाबत कार्यकारिणीने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे जुन्याच घटनेनुसार आतापर्यंत कामकाज सुरू आहे. आता मात्र निवडणुका लागलेल्या असताना आचारसंहितेची पदोपदी गरज भासू लागली आहे. त्याला कारणही तसेच घडले. ग्रंथमित्र पॅनलने प्रचाराचा नारळ ‘सावाना’ आवाराबाहेर फोडला असला, तरी ग्रंथदिंडी घेऊन सर्वजण थेट आतपर्यंत चालत आल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याचे बोलले जात आहे. ‘सावाना’च्या परिसरात दृश्य स्वरूपात कोणतीही प्रसिद्धी होईल असे वर्तन कोणत्याही उमेदवाराने करायचे नाही, असे ठरलेले असताना ग्रंथमित्र पॅनलच्या काही उमेदवारांनी दिंडी ‘सावाना’च्या मध्ये आणली आणि प्रचार कसा केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अर्थात, लिखित आचारसंहिताच नसल्याने त्याबाबत कोणी काहीही बोलायला तयार नसले, तरी आचारसंहितेची खरी गरज अशा ठिकाणी भासणार आहे. त्यामुळे ‘सावाना’ला लिखित स्वरूपात आचारसंहिता असावी, अशी मागणी काही उमेदवार करीत आहेत. जेणेकरून त्यांना डूज व डोन्ट कळतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

प्रचाराचे अनोखे फंडे

सावानात ग्रंथमित्र, जनस्थान आणि परिवर्तन असे तीन पॅनल झालेले असून, प्रचारासाठी तिघेही अनोखे फंडे राबवत आहेत. यात जनस्थान पॅनलतर्फे ग्रंथ परिक्रमा नावाचा उपक्रम आज, शुक्रवार (दि. २४)पासून सुरू होत आहे. यात पुस्तके घेऊन एक वाहन सार्वजनिक वाचनालयाच्या बाहेर उभे राहणार आहे. त्यातील एक पुस्तक वाचकाने न्यायचे आहे व त्याबदल्यात तेथे एक पुस्तक ठेवायचे आहे. यामुळे आपल्याकडील पुस्तकांना नवे वाचक मिळणार आहेत. ग्रंथमित्र पॅनलतर्फे सोशल मीडियाचा वापर सुरू असून, प्रचाराचा डिजिटल फंडा ते आजमावत आहेत. अनेक स्लोगन त्यांनी तयार केले असून, ते व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत. परिवर्तन पॅनलतर्फे भेटीगाठींवर भर दिला जात असून, वैयक्तिक प्रचार सुरू आहे. प्रचाराचे हे अनोखे फंडे सावानाच्या निवडणुकीत आजमवले जात असून, उमेदवारांनी कंबर कसली आहे.

‘सावाना’च्या परिसरात कोणताही प्रचार करण्यास बंदी आहे. जरी लिखित स्वरूपात कोणतीही आचारसंहिता नसली, तरी तसा अलिखित नियम आहे. हे सर्व घटनेनुसारच चालले आहे.

-माधवराव भणगे, निवडणूक निर्णय अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सक्तीने बिल वसुलीचा ‘शॉक’

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

‘मार्चएण्ड’मुळे डेडलाइनच्या नावाखाली शहरात महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वीजबिलांची जणू फतवा काढल्यागत सक्तीने वसुली करण्यात येत आहे. या सक्तीच्या वसुलीचा ‘शॉक’ अनेकांना बसल्याचे दिसून येत आहे. नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांनाही त्याचा फटका बसत असल्याचे आरोप होत आहेत. मात्र, असे असले, तरी वीजबिल वसुलीची सक्ती करण्यात आलेली नसल्याचे सांगत महावितरणचे अधिकारी सरकारी सोपस्कार पूर्ण करीत आहेत.

‘मार्चएण्ड’च्या नावाखाली महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वीजबिल वसुलीसाठी धडक मोहीम राबविली जात आहे. या सक्तीच्या वीजबिल वसुली मोहिमेचा शॉक नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांनाही बसला आहे. त्यामुळे शहरातील दोन्हीही परिमंडळांतील वीजग्राहकांकडून महावितरणच्या या तुघलकी कामकाजाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. महावितरणचे कर्मचारी वीजग्राहकांच्या घरी भेट देऊन वसुलीच्या नावाखाली थेट वीजपुरवठाच खंडित करीत असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नियमित ग्राहकांनाही फटका

शहरातील सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, सिडको, जेलरोड, इंदिरानगर, अंबड या भागातील नियमीत वीजबिल भरणा करणाऱ्या अनेक वीजग्राहकांना सक्तीने वीजबिल वसुली मोहिमेचा शॉक बसला आहे. चालू वीजबिल भरण्याची अंतिम मुदत उलटून आठवडा उलटलेल्या वीजग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित करण्याचा आडमुठेपणा महावितरणचे कर्मचारी सर्रासपणे करीत आहेत. महावितरणच्या या आडमुठेपणाच्या कारवाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

बड्या थकबाकीदारांना सवलती

नियमित वीजबिल भरणाऱ्या सामान्य वीजग्राहकांवर सक्तीच्या वसुलीचा बडगा उचलणाऱ्या महावितरण कंपनीकडून बड्या थकबाकीधारकांपुढे मात्र ‘नवप्रकाश’, ‘प्रोत्साहन’ यांसारख्या सवलतींच्या पायघड्या टाकल्या जात आहेत. या विरोधाभासामुळे शहरात महावितरणच्या कारभाराविरोधात असंतोष पसरला आहे.

नोटिशीविना कारवाई

नियमित अथवा दोन महिन्यांचे थकलेले वीजबिल भरण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून थेट वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यापूर्वी द्यावयाच्या कायदेशीर नोटिशीचाही महावितरणच्या अधिकाऱ्यांना विसर पडला असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

ऑनलाइनला पद्धती अमान्य

ऑनलाइन वीजबिल भरण्याची सोय महावितरणने उपलब्ध केलेली आहे. बहुतांश नागरिक त्याला प्राधान्य देत आहेत. मात्र, महावितरनचे कर्मचारी ऑनलाइन वीजबिल भरणा केलेल्या ग्राहकांकडे पुराव्याची मागणी करीत आहेत. एकीकडे कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्याचे धोरण राबविण्याचा प्रयत्न होत आहे, तर दुसरीकडे महावितरणसारख्या कंपनीचे कर्मचारी या धोरणालाच खोडा घालताना दिसून येत आहेत.


सक्तीने वीजबिल वसुलीच्या सूचना दिलेल्या नाहीत. नोटिशीविना वीजपुरवठाही खंडित करता येत नाही. वीजपुरवठा खंडित करण्यात येत असेल, तर कर्मचाऱ्यांना त्याबाबत सूचना दिल्या जातील. थकबाकीदार वीजग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे

-डी. टी. सायनेकर, कार्यकारी अभियंता, शहर परिमंडळ


वीजबिल थकलेले नसतानाही आइस्क्रिम शॉपचा वीजपुरवठा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी खंडित केल्याने शॉपमधील हजारो रुपयांचा माल मेल्ट झाला. त्यामुळे हकनाक मोठे आर्थिक नुकसान झाले.

-राजेश शिरसाट, आइस्क्रिम शॉप चालक, नाशिकरोड


आकडे सांगतात...

-७ लाख ३५ हजार रुपये- शहरातील एकूण वीजग्राहक

-२० हजार १२५- थकबाकीदार वीजग्राहक

-१५ हजार ८५२- घरगुती थकबाकीदार

-३ हजार ९८३- व्यावसायिक थकबाकीदार

-२९०- औद्योगिक थकबाकीदार

-३ कोटी ९१ लाख रुपये- फेब्रुवारीपर्यंतची थकबाकी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे बार असोसिएशनच्या वकिलांकडून निषेध

$
0
0

धुळे : गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील फाशीपूल चौकाजवळ गटारीचे काम रखडलेले आहे. या कामाची स्थिती कधी सुरू तर कधी बंद अशी आहे. यामुळे सहा महिन्यांपासून वाहतुकीची कोंडी होवून नागरिकांना मोठा संघर्ष वाहन चालवितांना करावा लागत आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी धुळे बार असोसिएशनच्या वकिलांनी बुधवारी फाशी पूल चौकात गटारीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आंदोलन केले. मनपा विभागाकडे नागरिकांनी मनपाकडे तक्रार करूनही गटारीचे काम पूर्ण करण्यात येत नाही, अशी तक्रारही यावेळी करण्यात आली. यावेळी अॅड. शामकांत पाटील, अॅड. समीर सोनवणे, अॅड. मधुकर भिसे, अॅड. अमित दुसाणे यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेली रेज‌िमेनद्वारे क्षयरोगाला टक्कर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संसर्गजन्य क्षयरोग (टीबी) या जीवघेण्या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने उपचार पध्दतीत अमुलाग्र बदल केले आहेत. दररोजच्या औषधपोचार पध्दतीचा (डेली रेजिमेन) परिणाम दिसून येतो आहे. सरकार एका पेशंटसाठी अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करते. मात्र, तरीही शेकडो नागरिक आजाराचे बळी ठरतात. डेली रेज‌िमेनद्वारे क्षयरोगाला आळा बसू शकतो.

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने शुक्रवारी (दि. २४ ) जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून, त्याची माहिती देण्यासाठी आयोज‌ित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी मेड‌िकल ऑफ‌िसर एम. बी. देशमुख यांनी सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत पेशंटला दिवसाआड उपचारपध्दती कार्यान्वित होती. मात्र, क्षयरोगाची व्याप्ती लक्षात घेता सरकारने २० फेब्रुवारीपासून दररोजची उपचार पध्दती सुरू केली. क्षयरोग फारच जुना असला तरी त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. २०१६ मध्ये सरकारी यंत्रणांकडे पोहचलेल्या ९३ टक्के पेशंटना पूर्णतः बरे करण्यात आले. तर ७३ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाने यंत्रणेपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. मागील काही वर्षांत या आजाराचे १३८ पेशंट आढळले आहेत. यातील ३३ जणांवर उपचार सुरू असून, ३६ पेशंट पूर्णतः‍ बरे झाले आहेत. या आजारासाठी एका पेशंटमागे दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. क्षयरोगाचे वेळेवर निदान झाल्यास पुढील सर्व समस्या औषधोपचाराने कमी करता येतात, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आजमितीस आदिवासी पट्ट्यातील तालुक्यांमध्ये क्षयरोगाचे सर्वाधिक पेशंट आढळून येतात. जिल्ह्याच्या उर्वरीत भागात देखील क्षयरोगाचे पेशंट मोठ्या संख्येने आढळून येतात. मात्र, याठिकाणी खासगी हॉस्पिटलचा पर्याय उपलब्ध असल्याने टीबी पेशंटची खरी संख्या पुढे येत नसल्याची खंत डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.

खासगी हॉस्पिटलची चालढकल

क्षयरोग हा काही प्रमाणात खर्चिक आणि दीर्घकालीन आजार मानला जातो. नियमाप्रमाणे टीबीचा पेशंट आढळून आल्यानंतर ही माहिती लागलीच सरकारी यंत्रणांना दिली जाणे अपेक्ष‌ित असते. मात्र, अनेकदा याकडे दुर्लक्ष होते. २०१६ मध्ये अवघ्या १५३ पेशंटची माहिती खासगी हॉस्पिटल्सनी कळवली. क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असल्याने पेशंटसह त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घ्यावी लागते. खासगी हॉस्पिटल्स हे काम त्या क्षमतेने करू शकत नाहीत, अशी खंत डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.

आज कार्यक्रम

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज सिव्ह‌िल हॉस्पिटल येथील क्षयरोग केंद्राच्या बाह्य रूग्ण विभागात सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आरोग्य अधिकारी, आरोग्य उपसंचालक तसेच इतर अधिकारी हजर असणार आहेत. याशिवाय क्षयरोग सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.


क्षयरोगाची जिल्ह्यातील व्याप्ती

४५ लाख लोकसंख्या

१५ क्षयरोग पथके

७० मान्यताप्राप्त सूक्ष्मदर्शक केंद्र

१३८ अशासकीय आरोग्य संस्था

२०१६ मध्ये ३५४८ पेशंट उपचाराखाली

३५४८ पैकी १९८९ थुंकीदूष‌ित क्षयरुग्ण

६५६ थुंकी अदूषित क्षयरूग्ण

४१२ पुनर्उपचार व ४९१ इतर अवयवांचे क्षयरुग्ण

२७ प्रतिजैविकांना दाद न देणारे क्षयरुग्ण

२०१६ मध्ये ९३ टक्के पेशंट पूर्णतः बरे तर ७३ जणांचा मृत्यू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९ महिन्यांत २४ लाख टन कांदा निर्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

दरातील चढ-उताराचे फटके सोसणाऱ्या कांद्याने गेल्या ९ महिन्यांत २४ लाख टन निर्यातीचा टप्पा पार केला. कांदा निर्यातीने २००९-१० झालेल्या १८.७३ लाख टन निर्यातीचे रेकॉर्ड या २०१६-१७ च्या निर्यातीने मोडले आहे. नाफेडने केलेल्या कांदा निर्यातीचा हा उच्चांक असल्याचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.

कांद्यावरील किमान निर्यात मूल्यदर हे शून्य केल्याने निर्यातीत वाढ झाली आहे. देशातून झालेली २४ लाख टन कांदा निर्यात ही एप्रिल ते डिसेंबर २०१६या महिन्यातील आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत कांदा निर्यातील टप्पा ३० लाख टनचा आकडा पार करण्याची दाट

शक्यता आहे.

कांदा निर्यातीत भरगोस वाढ झालेली असलेली तरी तो पिकवणाऱ्या शेतकऱ्याची झोळी मात्र रिकामीच राहत आहे. यंदा कांद्याचे बंपर उत्पादन होत असल्याने बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक होत आहे. त्यामुळे कांद्याला अवघा चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादकांचा लागवडीचा खर्चही निघत नसल्याने त्यांच्यावरची आर्थिक चिंता कायम आहे.

यंदा निसर्गाने शेतीला चांगली साथ दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. गेल्या वर्षी उन्हाळ कांद्याला उच्चांकी असा चार आकडी म्हणजे ५७०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला होता. मात्र यंदा कांद्याला प्रती क्विंटल ४५० ते ५०० रुपये सरासरी भाव मिळत आहे. घरात मुला मुलींचे लग्न, शिक्षण कसे करावे असे प्रश्न कांदा उत्पादनावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी कुटुंबासमोर आहे. डोक्यावर तर कर्जाचा डोंगर कसा दूर सारायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावर आहे.

या देशात होते कांदा निर्यात

बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, सिंगापूर, इंडोनेशिया, कतार, कुवेत, मोरिशस, सौदी अरेबिया, बेहरीन, ओमान, व्हियेतनाम, सोशल रिपब्लिक, मालदीव, युनायटेड किंगडम, रियुनियन, थायलंड, ब्रुनेई, रशिया, ग्रीस, हाँककाँग, पाकिस्तान, इटली, नेदरलँड्स, सेशल्स, कोमोरेझ, फ्रान्स, केनिया, कॅनडा, स्पेन, युनायटेड स्टेटस आदी देशांसह एकूण ७६ देशांमध्ये कांदा निर्यात केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉक्टरने ऑपरेशन अर्धवट सोडले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

राज्यात सर्वत्र डॉक्‍टरांनी पुकारलेल्या बंदचा फटका आज खुटवडनगरमधील सुखकर्ता हॉस्पिटलमधील एका रुग्णाला बसला आहे. ऑपरेशन सुरू असतानाच काही वैद्यकीय संघटनांनी हे ऑपरेशन बंद पडल्याचे समजले आहे. संबंधित रुग्णाला काही त्रास झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न रुग्णाची आई मंगला परदेशी यांनी व्यक्‍त केला आहे.

कामटवाडे परिसरातील परदेशी हे घंटागाडीवर कामास असून, त्यांचा एकुलता एक मुलगा अजय हा बिगारी काम करतो. बुधवारी काम करीत असताना त्याच्या हाताला मोठ्या प्रमाणावर इजा झाली होती. त्यानंतर त्यास खुटवडनगर येथील सुखकर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हाताची बोटे निकामी होण्याची शक्‍यता असल्याने डॉ. संदेश चव्हाण यांनी गुरुवारी दुपारी या मुलावर शस्त्रक्रिया करण्याची तयारी केली होती. शस्त्रक्रिया सुरू होताच याठिकाणी काही वैद्यकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन ही शस्त्रक्रिया बंद पाडली. अर्धवट शस्त्रक्रिया करून अजय याच्या हाताला केवळ पट्टी बांधून डॉक्‍टर याठिकाणाहून रवाना झाले. त्यामुळे संबंधित रुग्णाला खूपच त्रास सहन करावा लागला. या प्रकारानंतर अर्धवट शस्त्रक्रियेमुळे या रुग्णाला काही गंभीर समस्या निर्माण झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न विचारात रुग्णाच्या नातेवाईकांनी गर्दी केली. या प्रकाराची माहिती मिळताच नगरसेवक मुकेश शहाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत डॉक्‍टर निघून गेल्याचे समजले.

या प्रकरणाबाबत संबंधित डॉक्‍टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. याबाबतचे वृत्त समजताच अनेकांनी या हॉस्पिटलकडे धाव घेतली होती. मात्र, कोणाशीही त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.

डॉक्‍टरांना देव मानले जात असते. त्यांच्यावर अन्याय होत असला तरी अर्धवट पद्धतीने शस्त्रक्रिया सोडायला लावणे चुकीचे आहे. झालेला प्रकार हा अत्यंत चुकीचा असून त्यामुळे माझ्या मुलाला काही त्रास झाला व त्याची बोटे निकामी झाली तर त्यास जबाबदार कोण? एकुलत्या एक व कमावत्या मुलाच्या हाताचे काही झाल्यास डॉक्‍टरांनी त्याची जबाबदारी घ्यावी.
- चंद्रकला परदेशी, रुग्णाची आई


डॉक्‍टरांवरील हल्ले हे निषेधार्हच आहेत. मात्र, रुग्णाला अशा अर्धवट शस्त्रक्रियेच्या अवस्थेत सोडून जाणे चुकीचे आहे. त्यामुळे झालेला प्रकार निंदनीय असून डॉक्‍टरांकडे विश्वासाने येणाऱ्या रुग्णांनी काय करावे?
- मुकेश शहाणे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांचे निलंबन मागे घ्या

$
0
0

धुळे : शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी आवाज उठवल्यामुळे भाजप सरकारने १९ आमदारांचे निलंबन केले. यात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या आमदार कुणाल पाटील यांना निलंबित केल्याचा निषेध म्हणून गुरुवारी (दि. २३) धुळे शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन करण्यात आले. यावेळी आमदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, याविषयी त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. याप्रसंगी शहराध्यक्ष युवराज करणकाळ, साबीरशेठ, मुजफ्फर हुसेन, इस्माईल पठाण, अफसर पठाण, वेणूबाई शिरसाठ, भिवसन अहिरे, सदाशिव पाटील, संजय बैसाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याचा गुन्हा उघड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

दिंडोरी येथून विदेशी मद्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला अडवून लुटणाऱ्या पाच संशयित आरोपींना पकडण्यात वाडीवऱ्हे पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून सुमारे ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हे रायगडनगर शिवारात सिडकोतील पवननगर येथील नीलेश देसले त्यांच्‍या आयशर ट्रकमध्ये (एमएच-४१-जी ७०२९) दिंडोरी येथील मद्य कंपनीचा माल घेऊन मुंबईला जात होते. यावेळी रायगडनगर परिसरात एका काळ्या रंगाचे कारमधून आलेल्या पाच जणांनी ट्रक अडवून देसले यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील मोबाइल जप्त केला होता. त्यानंतर देसले यांना सिन्नर-घोटी मार्गावरील जंगलात सोडून दिले होते. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीसांना नियामत खान अजमत खान, (२८, रा. पखालरोड), अझरुद्दीन महम्मद शेख, (२६, नानावली), आनंद प्रभाकर कोकाटे, (३१, आनंदवल्ली), राहुल संतोषलाल चावला, (२८, आनंदनगर नाशिकरोड) व दिलीप रामचंद्र लालचंदानी, (५१ उपनगर) यांना ताब्यात घेतले. पोलिसांना त्यांच्याकडून आयशर ट्रकसह गुन्ह्यात वापरलेली कार (एम- एच-०४ इएच ५७६९), विदेशी मद्याचा सुमारे ३४ लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यातील संशयित आरोपी अझरुद्दीन शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चाकण व वणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर नवले यांच्या पथकाने राबविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासासाठी बीओटीचा टेकू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘शहराचे पालकत्व घेतो, साथ द्या’ असे सांगून महापालिकेत भाजपला निर्विवाद सत्ता मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा शब्द खरा ठरवण्यासाठी महापौर व उपमहापौरांनी बैठकींचा सिलसीला सुरू केला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने शहरातील उर्वरित प्रकल्प खासगीकरणातून पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील उर्वरित रिंगरोड, रस्त्यांची कामे तसेच पालिकेच्या सुविधा खासगीकरणातून करण्याची चाचपणी सुरू झाली असून, त्यांसदर्भात येत्या पंधरा दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले आहेत.

महापौर भानसी यांनी पदभार घेतल्यानंतर गुरुवारी बांधकाम विभागाची बैठक घेतली. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, गटनेता संभाजी मोरुस्कर, शहर अभियंता यू. बी. पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शहरात कोणती कामे तातडीने करणे आवश्यक आहेत, त्याची माहिती सादर करण्याचे आदेश त्यांनी महापौरांनी दिले. शहरात नव्याने काही रस्ते करण्यासह अपूर्ण रिंगरोडचे काम पूर्ण करता येईल असा सल्ला यू. बी. पवार यांनी दिला. रिंगरोड, रस्ते डांबरीकरण, खडीकरणाचे कामांसदर्भात प्रकल्प अहवाल १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना महापौरांनी केल्या. सोबतच ही कामे खासगीकरणातून करता येतील काय याची तपासणी करा, तसेच नागरिकांना आवश्यक सुविधांची पूर्तता खासगीकरणातून करता येईल काय याचाही तपशील तयार करण्याच्या
सूचना केल्या. चांगल्या प्रकल्पांबाबत विकासात्मक अहवाल तयार करून त्यासाठी लागणारा निधी मुख्यमंत्र्यांकडून मिळवू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सूचनांचा पाऊस

महापौर, उपमहापौरांनी घेतलेल्या बैठकीत अनेक सूचना आणि विविध विकासकामांबाबत आदेश देण्यात आले. त्यात महापालिकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने उत्पन्नाचे अधिकाधिक साधने वाढविण्यासाठी प्रयत्न करा, रस्त्यावरील ड्रेबेजची पाहणी करून त्यांची तत्काळ विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र उपअभियंता नियुक्त करण्याच्या करा, रस्त्याच्या साईटपट्ट्याही तातडीने भरा, रिंगरोडचा अहवाल सादर करा, रस्त्याच्यामध्ये असलेले ढापे हे रस्त्याच्या लेवलला करा, स्पिड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारा, रस्त्यात असलेली धोकादायक झाडांबाबत निर्णय घ्या, क्रीडांगण, जॉगिंग ट्रॅक आणि उद्यानांचा विकास सीएसआर उपक्रमातून करा, गोल्फ क्लबचा ट्रॅक कडक झाला असून त्याची तातडीने दुरुस्ती करा आदी सूचनांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी हटाव’वर शेतकरी ठाम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

नागपूर-मुबंई समृद्धी महामार्गासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. या महामार्गासाठी सिन्नरसह इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्ग हटाव मोहिमेवर शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी इगतपुरी तहसीलवर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपस्थित प्रांतअधिकारी व तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची भूमिका नमूद केली.

इगतपुरी हा प्रकल्पग्रस्त तालुका असून, या तालुक्याने यापूर्वी अनेक राष्ट्रीय व राज्य प्रकल्पांना जम‌िनी देऊन शेतकरी कंगाल झाला आहे. शिल्लक राहिलेल्या जम‌िनी समृद्धी महामार्गासाठी गेल्यास शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी या समृद्धी महामार्गास विरोध केला असून, यापूर्वीही अनेकवेळा गावोगावी बैठका घेऊन हरकती नोंदवल्या आहेत.

शेतकरी कृती समिती व सर्वपक्षीय पदाधिकारी भास्कर गुंजाळ, राजू देसले, वकील संघाचे तालुकाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, शिवसेनेचे निवृत्ती जाधव, जि. प. सदस्य कावजी ठाकरे, सभापती भगवान आडोळे, काँग्रेसचे मधुकर कोकणे, भाजपचे नंदू गाढवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गोरख बोडखे, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, अॅड. दामोधर पागेरे, पं. स. सदस्य सोमनाथ जोशी, विठ्ठल लंगडे, लक्ष्मण गव्हाने आदींच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे यांच्याशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images