Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एक लाख प्लास्टिक बाटल्यांचा मॉन्स्टर!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

भारतात वाहन उत्पादनात अग्रेसर असलेली महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनी सातत्याने सामाजिक उपक्रम राबवीत असते. त्याअंतर्गत पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी महिंद्राने जिल्ह्यात रस्त्यांवर पडलेल्या एक लाख प्लास्टिक बॉटल्स संकलित केल्या होत्या. या संकलित केलेल्या एक लाख प्लास्टिकच्या बाटल्यांचा मॉन्स्टर महिंद्राने उभारला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिकमुक्त अभियानात महिंद्राने पुढाकार घेतला असल्याचे औपचारिक कार्यक्रमात महिंद्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष हिरामण आहेर यांनी सांगितले.

महिंद्राचे उमेश जोशी, महिंद्रा इगतपुरी प्लँटचे व्यवस्थापक नासिर देशमुख, सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक प्रभावळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कुढे, इगतपुरीचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक उपस्थित होते. यावेळी इगतपुरी महिंद्रा राबवीत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती चित्रफितीद्वारे सादर करण्यात आली.

सामाजिक बांधिलकी उपक्रमात महिंद्राचे योगदान मोठे आहे. परंतु, पर्यावरणरक्षणाचा संदेश समाजातील सर्वच घटकांमध्ये पोहोचावा या हेतूने महिंद्राने प्लास्टिकमुक्त अभियान हाती घेतले आहे. महिंद्रा कंपनीच्या इगतपुरी प्लँटमधील कामगार व अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यात रस्त्यांवर व फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बॉटल्स संकलित करण्याचे काम हाती घेतले होते. विविध ठिकाणांहून तब्बल एक लाख प्लास्टिक बॉटल्स महिंद्राने संकलित केल्या होत्या. याप्रसंगी महिंद्राचे अधिकारी जोशी यांनी महिंद्रा विविध सामाजिक उपक्रम राबवीत असल्याची माहिती चित्रफितीद्वारे दाखविली. विशेष म्हणजे प्लास्टिकमुक्त अभियानात कामगार व अधिकाऱ्यांनी मोठा सहभाग दाखविल्याचेही जोशी यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हाभरातून एक लाख प्लास्टिक बॉटल्स संकलित केल्यावर त्यांचे करायचे काय, असा प्रश्न कंपनी व्यवस्थापनासमोर उभा राहिला होता. यात इटलीत ४५ हजार प्लास्टिक बॉटल्सचा मॉन्स्टर उभा केला असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाला मिळाली होती. त्यामुळे संकलित केलेल्या एक लाख प्लास्टिक बाटल्यांचा मॉन्स्टर उभा करण्याचा संकल्प व्यवस्थापनाने हाती घेतला. औपचारिक कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्लास्टिकच्या बाटल्यांच्या या मॉन्स्टरचे उद्घाटन करण्यात आले.


गीनिज बुकात होणार नोंद

एक लाख प्लास्टिकच्या बॉटल्स संकलित करून तब्बल २१ मीटर उंचीचा मॉन्स्टर महिंद्राने उभारला आहे. जगातील सर्वांत मोठा प्लास्टिक बाटल्यांचा मॉन्स्टर महिंद्राने उभारल्याने त्याची गीनिज बुकात लवकरच नोंद केली जाणार असल्याचे व्यवस्थापनाचे जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सिटिझन रिपोर्टर’ प्रभावी व्यासपीठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’ने उपलब्ध करून दिलेल्या सिटिझन रिपोर्टर्स अॅपमुळे आमच्या परिसरातील समस्या प्रशासनासमोर आणणे सहजशक्य झाले आहे. या अॅपची परिणामकारकता मोठी असून, त्याद्वारे समस्या ताबडतोब सोडविल्या जात असल्याचे अनुभव आम्हाला येतात. या अॅपमुळे सामान्य नागरिकांना प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे, अशा भावना ‘मटा सिटिझन रिपोर्टर्स’नी व्यक्त केल्या.

शहरात विविध ठिकाणी जाणवणाऱ्या सार्वजनिक समस्या प्रशासनापर्यंत प्रत्यक्ष जाऊन निदर्शनास आणून देणे शक्य नसते. मात्र, या समस्या सोडविणे प्रत्येक नागरिकासाठीच आवश्यक आहे. या दृष्टीने सिटिझन रिपोर्टर अॅपची मोठी मदत होत आहे. त्यामुळेच कमी कालावधीत हे अॅप लोकप्रिय झाले आहे. याद्वारे येणाऱ्या समस्या, तक्रारी या नाशिक प्लस पुरवणीत दररोज प्रसिद्ध केल्या जातात. दर आठवड्याला निवडक मटा सिटिझन रिपोर्टर्सचा गौरवही करण्यात येतो. शनिवारीही ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाशिक कार्यालयात पाच सिटिझन रिपोर्टर्सना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. संजय फडोळ, आकाश तोटे, परवेझ शेख, दर्शन देवरे व लक्ष्मण खडके यांचा यात समावेश होता.

नाशिकच्या महापौरांपासून देशाच्या पंतप्रधानांपर्यंत भाजपची सत्ता आल्याने आता सत्कार पुरे करून, समस्या सोडवा, असे वृत्त संजय फडोळ यांनी, तर आकाश तोटे यांनी शिवाजी चौकात किल्ला बांधून शिवजयंती साजरी केल्याचे वृत्त अॅपद्वारे कळविले होते. इंदिरानगर येथे भर उन्हाळ्यात पाण्याअभावी झाडांच्या दुर्दशेवर परवेझ शेख यांनी प्रकाश टाकला होता. दर्शन देवरे यांनी उपेंद्रनगर येथे भरदिवसा पथदीप सुरू असल्याचे निदर्शनास आणले होते. लक्ष्मण खडके यांनी रेल्वेच्या जनरल बोगींची सद्यस्थिती समोर आणली होती. आपापल्या भागात किंवा शहरात वावरताना जाणवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाबद्दल त्यांनी ‘मटा’चे आभार मानले, तसेच यापुढेही या अॅपद्वारे आम्हाला जाणवणाऱ्या समस्या आम्ही समोर आणू, असा निर्धारही त्यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४८८ बालकांचा शिक्षण हक्क निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वंचित व गरजू बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शिक्षण हक्क प्रक्रियेत पहिल्या सोडतीतील २४८८ विद्यार्थ्यांचे प्रवेश शनिवारी सायंकाळपर्यंत निश्चित झाले. जिल्ह्यातील ६ हजार ३८० जागांसाठी ४५८ शाळांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

शिक्षण हक्क प्रक्रिया राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने पार पडत असून, नाशिकमध्ये या प्रक्रियेस सर्वप्रथम सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा या प्रक्रियेस प्रतिसादही चांगला मिळत आहे. तसेच नियोजित वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया पार पाडण्यावर शिक्षण विभागाकडून भर दिला जात आहे. त्यानुसार शनिवारी वाढीव मुदतीची प्रवेश प्रक्रिया संपली. यापुढील कामकाजाची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असून, प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाइन कामकाज उद्या (२० मार्च) पर्यंत पूर्ण करायचे आहे. ज्या शाळांनी विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले असतील व अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेचा निर्णय मान्य नसल्यास २० मार्च रोजीच गटशिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी मनपा शिक्षण मंडळाकडे लेखी तक्रार देता येणार आहे. त्यावर ताबडतोब २१ मार्चपर्यंत निर्णय दिला जाणार आहे.

या प्रक्रियेसाठी निवड झालेल्या ४५७६ प्रवेशांबाबत प्रवेश घेतलेल्या, प्रवेश नाकारलेल्या तसेच संपर्क न साधलेल्या यापैकी योग्य पर्याय निवडून मुख्याध्यापकांनी २१ मार्चपर्यंत शिल्लक विद्यार्थी हा पर्याय शून्यापर्यंत न्यायचा आहे. जोपर्यंत ही संख्या शून्यापर्यंत जात नाही तोपर्यंत दुसरी फेरी घेता येणार नसल्याने ही प्रक्रिया वेळेत करणे गरजेचे असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिली. प्रवेश नाकारल्यास पालकांना लेखी पत्र देणेही शाळांना बंधनकारक आहे.

वेबसाइटवर मिळणार माहिती

पालक वेबसाइटवर अॅप्लिकेशन वाइज डिटेल्स हा नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या टॅबवर क्लिक केल्यावर अॅप्लिकेशन नंबर या पर्यायात नंबर टाकून अर्जाची स्थिती पाहता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर तालुक्यात मुलींचा जन्मदर फक्त ८४४!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारने सोनोग्राफी सेंटर्सवर लादलेल्या अटी जाचक ठरू लागल्याने नाशिकमध्ये काही वर्षांत तब्बल १५१ सोनोग्राफी सेंटर्स डॉक्टरांनी बंद केली आहेत. अशा सेंटर्सचे परवाने कायमस्वरूपी रद्द होणार असल्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात दरहजारी मुलांमागे ९२५ मुलींचा जन्मदर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, सिन्नर तालुक्यात सर्वांत कमी ८४४ पर्यंत मुलींचा जन्मदर घसरला आहे. पेठसारख्या आदिवासीबहुल तालुक्यात मात्र मुलींचा जन्मदर सर्वाधिक १०३२, तर त्याखालोखाल येवला तालुक्यात ९७० एवढा आहे.

सोनोग्राफी सेंटर्स चालकांकडून गर्भलिंगनिदान चाचण्या, तसेच मुलीचा गर्भ आढळल्यास गर्भपाताचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे मुलींचा जन्मदर घसरत असून, प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गर्भातच कळी खुडण्यास सोनोग्राफी सेंटर्स कारणीभूत ठरत असून, असे अक्षम्य गुन्हे रोखण्यासाठी सरकारही कठोर पावले उचलू लागले आहे. सोनोग्राफी सेंटरवर येणारी प्रत्येक गर्भवती महिलेची माहिती एफ फॉर्ममध्ये भरणे आवश्यक असून, ती माहिती प्रशासनाकडे सादर करणे आवश्यक आहे.

गर्भलिंग निदानासाठी येणाऱ्या महिलेकडून रेडिओलॉजिस्टला एफ फॉर्म, संमतीपत्र, जाहीरनामा भरून घ्यावा लागतो. अशा कारकूनी कामात काहीवेळा महिलेची स्वाक्षरी, तपासणीची तारीख अशा किरकोळ त्रूटी राहतात. संबंधित डॉक्टरांना दोषी धरून त्यांच्यावर सरसकट फौजदारी गुन्हा दाखल केला जातो. आरोग्य विभागाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनेक डॉक्टरांनी सोनोग्राफी सेंटर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ६१८ नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटर्स आहेत. त्यापैकी ३६७ केंद्रच कार्यान्वित असून ८४ सेंटर्स तात्पुरते तर १५१ सेंटर्स कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहेत. ते सर्व महापालिका क्षेत्रातील आहेत. १० सोनोग्राफी सेंटर्सच्या बाबतीत न्यायालयीन प्रकरणांचा अडसर निर्माण झाला आहे.

एकीकडे शहरात अशी परिस्थिती असताना जिल्ह्यात मुलींचा जन्मदर ९२५ एवढा आहे. सिन्नर तालुक्यात हा जन्मदर अवघा ८४४ आढळून आल्याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्याखालोखाल चांदवडमध्ये ८५८ एवढा जन्मदर आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर ९२५ पेक्षा कमी आहे. सटाणा, कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव या तालुक्यांमध्ये तो ९२५ ते ९५३ या दरम्यान असून येवल्यात ९७० आणि पेठमध्ये १०३२ एवढा मुलींचा जन्मदर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नाशिक शहरात हाच जन्मदर ९३५ एवढा आहे.

तालुका मुलींचा जन्मदर

सिन्नर ८४४, चांदवड ८५८, इगतपुरी ८७८, त्र्यंबकेश्वर ८८७, मालेगाव ८९९, दिंडोरी ९११, नाशिक ९२०, सुरगाणा ९२०, निफाड ९२३, सटाणा ९२९, कळवण ९३२, ‍नाशिक शहर ९३५, नाशिक ब्लॉक ९३६, देवळा ९४६, मालेगाव शहर ९४७, मालेगाव ब्लॉक ९५३, येवला ९७०, पेठ १०३२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरांचा सुळसुळाट

$
0
0

सिडको, इंदिरानगर परिसरात वाढलेल्या घटनांनी पोलिसांना आव्हान

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोसह इंदिरानगर परिसरात मोबाइल चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या घटनांकडे पोलिस अधिक गांभीर्याने पहात नसल्याने चोरांचे धाडस वाढत आहे. मोबाइल चोरट्यांना जेरबंद करीत त्यांच्याकडून मोबाइल हस्तगत करण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

सिडकोतील त्रिमूर्ती चौक भाजी मार्केट, शिवाजी चौक, पाथर्डी फाटा किंवा इंदिरानगर परिसरातील बापू बंगल्याजवळील भाजीबाजारांसह वर्दळीच्या ठिकाणी मोबाइलची चोरी होत असल्याचे दिसत आहे. पायी चालणारी व्यक्ती मोबाइलवर बोलत जात असेल तर भरधाव वेगाने गाडीवरून येऊन तो मोबाइल चोरी करण्याचेही प्रकार सर्रास बघावयास मिळत आहेत. चेनस्नॅचिंग प्रमाणेच मोबाइलच्याही चोऱ्या वाढू लागल्या आहेत.

मोबाइलला विमा संरक्षण

महागड्या किंमतीचे मोबाइल खरेदी केल्यानंतर अनेक जण मोबाइलचा विमा सुद्धा घेत असल्याचे काही विक्रेत्यांकडून समजते. अनेक कंपन्यांनी आता मोबाइलचा विमा सुरू केला असला तरी सर्वजण त्याचा लाभ घेत नाही. परिणामी मोबाइल चोरांचे फावते. मोबाइलचा विमा असले तर चोरीस गेल्यावर त्याचा परतावा विमा कंपनीकडून मिळतो. मात्र, विमा खरेदीकडे ग्राहकांचे दुर्लक्ष असल्याचेही विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

मोबाइलचोरांची साखळी?

मोबाइल चोरीनंतर त्यातील सिमकार्ड तातडीने काढून टाकले जाते. सिमकार्ड काढल्यामुळे संबंधित व्यक्ती आपल्या मोबाइलवर फोन करतो तर तो बंद आढळून येतो. त्यानंतर हे मोबाइल फोन्स काही ठराविक विक्रेत्यांकडे विक्री केले जातात. विक्रेतेसुद्धा अत्यल्प किंमतीत मोबाइल खरेदी करून काही काळानंतर त्याची सेकंड हॅण्ड म्हणून विक्री करतात. त्यामुळे या विक्रेत्यांचीही चौकशी पोलिसांकडून झाली पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोकनगरात मोकाट श्वानांची धास्ती

$
0
0

बंदोबस्त करण्याची नागरिकांकडून मागणी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

न्यायालयाच्या आदेशावरून श्वानांना मारणे बंधनकारक आहे. यामुळे महापालिकेकडून मोकाट श्वानांवर नसबंदी करून पुन्हा सोडण्यात येतात. परंतू सोडण्यात आलेले मोकाट श्वान रहिवाशी भागात शिरकाव करत असल्याने त्यांचा त्रास सर्वसामान्यांना सहन करण्याची वेळ येते. अशोकनगरवासियांनी मोकाट श्वानांची धास्तीच घेतली असल्याचे चित्र आहे. महापालिकेने मोकाट सोडलेल्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

महापालिकेकडून वेळोवेळी मोकाट असलेल्या श्वानांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात येते. परंतु, शस्त्रक्रिया केलेल्या श्वानांना पुन्हा मोकाट सोडून दिले जाते. मोकाट सोडण्यात आलेले श्वान पुन्हा रहिवाशी भागात वावर करताना दिसत असतात. त्यातच श्वानांना मारण्यावर बंदी असल्याने त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशोकनगर भागात जाधव संकुल, वास्तूनगर, कातकाडेनगर, राधाकृष्णनगर, शिंदे मळा व पवार संकुलच्या भागात मोकाट श्वानांची रहिवाशांनी धास्ती घेतली आहे. रात्रीच्या वेळी घर परतणाऱ्या कामगारांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागतो.

शिंदे मळे परिसरात मोकाट झालेले श्वानांनी अनेकांना त्रास देत असल्याचा आरोप रहिवाशी करत आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी बाहेर सोडतांना पालकदेखील मोकाट श्वानांमुळे घाबरत असतात. पर्यायाने मुलांचे खेळणेच बंद झाले आहे. महापालिकेने मोकाट असलेल्या श्वानांना ताब्यात घेत योग्य तो बंदोबस्त लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोकाट श्वानांनी येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. रात्री उशिरा येणाऱ्या अनेकांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेने मोकाट असलेल्या श्वानांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. महिला व मुलांनादेखील मोकाट श्वानांमुळे अंधार पडल्यावर घराबाहेर जात येत नसल्याने त्यांचीही मोठी अडचण होत आहे.

-सुनिता शिंदे, रहिवाशी, शिंदे मळा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायदे कागदावरच!

$
0
0

‘जलयुक्त’ची परिणामकारकता तपासण्याची आवश्यकता

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

‘सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र-२०१९’ हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान २०१५ पासून राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचे झालेले फायदे प्रशासनाकडून कागदावर रेखाटले जात असले तरी काही मोजक्या गावांचा अपवाद वगळता या योजनेचा टंचाई निवारणार्थ काहीही उपयोग झालेला नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नाशिक विभागातही असेच काहीसे चित्र दिसून आले आहे.

लोकसहभागातून पहिल्या टप्प्यात सुमारे ४८० कोटी रुपयांची कामे झाली. पहिल्या टप्प्यात राज्यात ६२०२ गावांत २ लाख ३ हजार ७० इतकी कामे झाली. त्यामुळे निवडलेल्या गावांत ११ लाख ६१ हजार ६२६ टीसीएम इतकी पाणीसाठ्याची क्षमता वाढल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे पिकांना दोन संरक्षित सिंचनाद्वारे सुमारे सहा लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यात काही प्रमाणात तथ्यही असेल. कारण या योजनेच्या अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्याच्या कालावधीत राज्यात पर्जन्यमानही चांगले झाले.

जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीनंतर आता दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणीही अंतिम टप्प्याकडे सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातही राज्यात ५२८१ गावांची निवड करण्यात आलेली आहे. या गावांतील कामे मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ऑगस्ट २०१६ पर्यंतच या कामांसाठी शासनाने ६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोट्यवधींचा खर्च होत असल्याने या योजनेची परिणामकारकताही तपासण्याची आवश्यकता आहे.

नाशिक विभागात टँकर संख्या वाढणार

नाशिक विभागात सन २०११-१२ वर्षी ७९१, सन २०१२-१३ मध्ये १२२६, सन २०१३-१४ यावर्षी ५९६, सन २०१४-१५ मध्ये ४९२, सन २०१५-१६ या वर्षी ११८८ टँकरचा वापर पाणीपुरवठा करण्यासाठी करावा लागला होता. मार्च २०१७ महिन्यातही विभागातील दोन जिल्ह्यांत १२ गावांना ८ टँकर्सद्वारे पिण्याचा पाणीपुरवठा केला जात आहे. ही संख्या येत्या दोन महिन्यांत हमखास वाढण्यासारखी परिस्थिती नाशिक विभागात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलसह वाहनचोरीचा जाच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूरच्या भाजीबाजारात मोबाइल आणि वाहन चोरांचा सुळसुळाट झाला आहे. बाजारातून ग्राहकांसह विक्रेत्यांच्याही मोबाइल चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून परिसरातील व्यावसायिकांनी ‘मोबाइल व मोटारसायकल सांभाळा’ असे फलकच उभारले आहेत. पोलिसांनी मोबाइल व वाहन चोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी सातपूरवासीयांकडून केली जात आहे.

एमआयडीसीला लागून असलेल्या सातपूर गावात केवळ एकच भाजी मार्केट होते. छत्रपती शिवाजी मंडईत एकेकाळी गंगापूररोड भागातून ग्राहक भाजीपाला घेण्यासाठी येत असत. शिवाजी मंडई व रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांमध्ये नेहमीच वाद होतात. परंतु, आता या बाजारात मोबाइल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रस्त्यावर भाजी विक्रेत्यांकडे भाजीपाला घेण्याच्या बहाण्याने मोबाइल चोरीचे प्रकार वाढले आहेत. तसेच भाजी विक्रेत्यांकडे भाजीपाला घेणाऱ्या ग्राहकांचाही मोबाइल हातोहात लंपास होतात. विशेष म्हणजे बुधवारी व शनिवारी चोरीचे प्रमाण अधिक असते.

दुचाकीही लक्ष्य

सातपूर गावाच्या त्र्यंबकरोडलगत असलेल्या दुकानदारांकडे ग्राहक वस्तू खरेदीसाठी आल्यावर दुचाकी रस्त्यालगतच उभी करतात. या गाड्या हातोहात लांबविल्या जात आहेत. असे प्रकार सातपूर बाजारात सातत्याने होत आहेत. मोबाइल चोरट्यांची टोळीच भाजीबाजारात सक्रिय असल्याचे विक्रेत्यांसह ग्राहकांचे म्हणणे आहे.

सातपूर गावात सायंकाळी अंधार पडल्यावर भाजी विक्रेते व ग्राहकांचे मोबाइल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहे. मोबाइल चोरींच्या सक्रिय झालेल्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळण्याची गरज आहे.

- सुनील पालवे, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रशासनाचा दावा फोल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

जलयुक्त शिवार योजनेत नाशिक विभागात पहिल्या टप्प्यात ९४१ गावांची निवड झाली. त्यात ६१०.५० कोटी खर्चून ३८ हजार २६४ कामे करण्यात आली. यामुळे पाणीपातळीत १ ते २ मीटरपर्यंत वाढ झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, ताज्या सर्वेक्षणानुसार, विभागातील भूजल पातळीत घट झालेल्या तालुक्यांची संख्या २८ वरून ३९ पर्यंत वाढली. जलयुक्तच्या पहिल्या टप्प्यातील कामांमधून भूजल पातळी वाढ होण्याऐवजी घट झाल्याचे उघड झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात २२९ गावे निवडण्यात आली. या गावांमध्ये १७७.६० कोटी रुपये खर्चून ‘जलयुक्त’ची ७९८१ कामे करण्यात आली. यात लोकसहभागातून २१.३९ कोटी उपलब्ध झाले. याशिवाय दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील २१८ गावांची निवड झाली. या गावांमध्येही ‘जलयुक्त’च्या ७,४८५ कामांची उद्दिष्ट्ये ठेवून ती ती मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले. या कामांसाठीही ६११ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला. जलयुक्त शिवार योजना अंमलात आल्यानंतर दोन पावसाळे होऊन गेले. त्यामुळे झालेली कामे जिल्ह्यातील काही गावांना फायदेशीर ठरली आहेतच. मात्र, त्याचे प्रमाण अतिशय नगण्यच आहे. तसे नसते तर सप्टेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ या चार महिन्यांच्या कालावधीत भूजल पातळीत एवढी वेगाने घट झाली नसती.

भूजल पातळीत घट

नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर २०१६ मध्ये भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, केवळ मालेगाव या एकाच तालुक्यातील तीन गावांतील भूजल पातळीत घट झाली आहे. मात्र, जानेवारी २०१७ अखेरीस भूजल खात्याने जाहीर केलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तब्बल ७ तालुक्यांमधील ७२ गावांमधील भूजल पातळी घटली आहे. विशेष म्हणजे या ७२ पैकी ११ गावांमधील भूजल पातळीत ३ मीटरपेक्षा जास्त घट आली आहे.

टिकाऊ कामांची गरज

जिल्ह्यात ‘जलयुक्त’मधून करण्यात आलेली बहुतांश कामे गेल्या पावसाळ्यात होत्याची नव्हती झाली. याप्रश्नी त्या-त्या तालुक्यांच्या आमदारांनीच जलसंधारण मंत्र्यांपुढे तक्रारींचा पाढा वाचला. विशेष म्हणजे ‘जलयुक्त’च्या कामांचे थर्ड पार्टी ऑडीट करण्याचे शासन निर्देश पाळण्यात आले नाही. औरंगाबादच्या दिलासा जनविकास प्रतिष्ठानकडून नाशिक जिल्ह्यातील कामांचे ऑडीट करण्यात आल्याची माहिती खुद्द या खात्याच्या मंत्र्यांनाच नव्हती. ‘जलयुक्त’मुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवण्याचे काम झाल्याने विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, ताज्या सर्वेक्षण आकडेवारीनुसार निम्म्या जिल्ह्याची भूजल पातळी खालावल्याचे लक्षात येते.

जिल्ह्यात घटलेली भूजल पातळी
तालुका......गावांची संख्या

- कळवण......३६
- मालेगाव......२०
- बागलाण......९
- इगतपुरी......३
- नांदगाव......२
- नाशिक......१
- येवला......१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेत सस्पेन्स कायम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषेदच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी एक दिवस बाकी असतांना माकपने आपली भूमिका जाहीररित्या स्पष्ट न केल्यामुळे या निवडणुकीत सस्पेंस कायम आहे. माकपचे तीन सदस्य जिल्हा परिषदेत निवडून आले. आपल्यासोबत एक अपक्ष असल्याचा दावा माकपने केला आहे. त्यामुळे या चार सदस्यांच्या भूमिकेवरच कोणाची सत्ता येते हे ठरणार आहे.

जिल्हा परिषदेत एकूण ७३ सदस्य निवडून आले असून या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी वेगवेगळी मोट बांधली. शिवसेनेने काँग्रेसला बरोबर घेऊन एका अपक्षाच्या मदतीने आपला आकडा ३४ वर नेला. तर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच दोन अपक्षांच्या मदतीने आपल्या संख्याबळाचा आकडा ३५ पर्यंत नेला आहे. या दोन्ही पक्षांना बहुमतासाठी लागणारा ३७ चा आकडा पार करण्यासाठी माकपची गरज लागणार आहे. त्यामुळे या सत्ता संघर्षाचा सस्पेन्स कायम आहे. माकपने आपली कोणतीही भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे दोन्ही आघाडीने माकप आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे.

सत्तेच्या राजकारणात राजकीय भूमिकेमुळे माकपची अडचण झाली आहे. एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे भाजप आहे. धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करतांना आपणच जातीयवाद पक्ष असल्याचा आरोप केलेल्या भाजप किंवा शिवसेनेला पाठिंबा देणे धोक्याचे ठरू नये, अशी चिंता माकपला सतावू लागली आहे. त्यामुळे कधी आम्ही तटस्थ राहू तर कधी उमेदवार देऊ, अशी उत्तरे माकप नेते देत आहेत. तसेच पाठिंब्याविषयी वेळेवर बघू, असे सांगून या दोन्ही आघाड्यांना ताटकळत ठेवत आहेत.

बहुतांश सदस्य सहलीला

शिवसेना व काँग्रेसचे सदस्य पहिले स्वतंत्ररित्या सहलीला गेले. त्यापाठोपाठ माकपचेही सदस्य गेले. राष्ट्रवादी व भाजपनेही आपले सदस्य शनिवारी (दि. १८) स्वतंत्ररित्या पाठवले. त्यामुळे या निवडणुकीत ऐनवेळी काय घडते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नासाका’च्या पारदर्शी कारभारावर असणार भर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

सरकारने निश्चित केलेल्या ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव दिला जाईल. नाशिक साखर कारखान्याचे (नासाका) कामकाज पारदर्शक करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक क्षेत्र ऊस लागवडीखाली आणावे, असे आवाहन ‘नासाका’ अशासक‌ीय प्राधिकृत मंडाळाचे अध्यक्ष तानाजी गायधनी यांनी केले.

गेल्या चार गळीत हंगामांपासून बंद असलेल्या ‘नासाका’वर सरकारने काही महिन्यांपूर्वी १२ अशासकीय प्राधिकृत सदस्यांचे संचालक मंडळ नियुक्त केले. या मंडळाने गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी येत्या गळीत हंगामापासून कारखाना पुन्हा सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर या संचालक मंडळाकडून ‘नासाका’ कार्यक्षेत्रातील सिन्नर, इगतपुरी, नाशिक व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांतील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतुकदार व कामगार यांच्याशी संपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या प्रारंभी कोटमगाव, मोहगाव व बाभळेश्वर या ठिकाणी झालेल्या ऊस उत्पादक व सभासदांच्या मेळाव्यात गायधनी बोलत होते.

याप्रसंगी अशासकीय संचालक प्रकाश घुगे, कैलास टिळे, सुदाम भोर, श्रीकृष्ण जानमाळी, प्रल्हाद काकड, मोहन डावरे, अरुण जेजुरकर, हेमंत गायकवाड, अनिता सहाणे, कमळाबाई थेटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. बाळासाहेब म्हस्के, अंबादास घुगे,देवराम म्हस्के यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. आगासखिंड येथे सोमवारी (दि. २०) शेतकरी मेळावा होणार आहे.

मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. ‘नासाका’ सुरू व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. यासाठी अशासकीय प्राधिकृत संचालक मंडळाला नासाका कार्यक्षेत्रातील सभासद, ऊस उत्पादक, कामगार या सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
- तानाजी गायधनी, अध्यक्ष, अशासकीय प्राधिकृत संचालक मंडळ, नासाका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे तीन संशयित रुग्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वाइन फ्लूच्या तीन संशयित पेशंटवर सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यात दोन महिला, तर एका पुरुषाचा समावेश आहे.

स्वाइन फ्लूच्या संशयितावर उपचार करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विभाग सुरू असून, यात १७ ते १८ मार्च या दरम्यान एकूण तीन संशयित पेशंट दाखल करण्यात आले आहेत. यातील पुरुषाचे वय ४५ इतके असून, तो इंदिरानगर परिसरातील रहिवासी आहे. दरम्यान, कळवण व नांदगाव येथील अनुक्रमे २४ आणि २५ वर्षांच्या महिलांवर देखील उपचार सुरू आहेत. यातील एक महिला गर्भवती आहे. दरम्यान, संशयित पेशंटचे स्वॅब पुणे येथे पाठवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

वाढत्या स्वाइल फ्लूमुळे जिल्हा रुग्णालयात स्वंतत्र कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे. खबरदारीचे उपाय म्हणून आरोग्य विभागाकडून सूचना करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात स्वाइन फ्लूचा शहरापेक्षा प्रसार जास्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारच्या निर्णयाकडे धरणग्रस्तांच्या नजरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारच्या २००९ च्या शासन निर्णयानुसार नोकर भरतीत प्रकल्प बाधितांना केवळ पाच टक्केच आरक्षण आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील ३७ काश्यपी प्रकल्पबाधितांना नोकरी कशी द्यावी, याबाबतचे मार्गदर्शन महापालिकेने सरकारकडे मागवले आहे. नगरविकास विभागाशी याबाबतचा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पालकमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने प्रकल्प बाधितांच्या बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

काश्यपी धरणासाठी जागेची आवश्यकता असल्याने येथील ग्रामस्थांनी आपल्या हक्काच्या जमिनी या प्रकल्पासाठी दिल्या. धरणग्रस्तांना महापालिकेत नोकरी देऊ, अशी ग्वाही त्यावेळी देण्यात आली होती. २३ तरुणांना नोकरी देण्यात आली. परंतु, अजूनही ३७ धरणग्रस्त कुटुंबांतील सदस्यांना नोकरी मिळू शकलेली नाही. याबाबत धरणग्रस्त गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहेत. त्यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र, अजूनही त्यांचा प्रश्न निकाली निघालेला नाही. करो या मरो शिवाय पर्याय नसल्याचे धरणग्रस्तांच्या लक्षात आल्यानंतर गतवर्षी १५ ऑगस्ट रोजी त्यांनी काश्यपी धरणात उड्या मारून आंदोलन केले होते. पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेतली. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यावेळी बैठक बोलावण्यात आली होती. महापालिकेने आपला शब्द पाळून धरणग्रस्तांना नोकरी द्यावी, असे आदेश बैठकीत देण्यात आले. मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्यास अनेक मर्यादा असून, या मर्यादा महापालिकेने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून दिल्या. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर महापालिकेने पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

निर्णयाची आडकाठी

२००९ मधील शासन निर्णयानुसार प्रकल्प बाधितांना केवळ पाच टक्के कोटा राखीव आहे. ३७ जागा भरण्यासाठी तब्बल ७५० जागांची मेगा भरती करावी लागेल. परंतु, एवढी भरती शक्य नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस पत्नीची पतीविरोधात छळाची तक्रार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शारीरिक व मानसिक छळ करून फारकत मागणाऱ्या पोलिस खात्यात अधिकारी असलेल्या पतीविरुद्ध त्याच्या पत्नीने नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सध्या नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असलेल्या रोहिणी पुंडलिक पावशे (वय ३२) रा. पार्थप्रभा अपार्टमेंट, राहुलनगर, जेलरोड यांनी आपल्याच पती विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात शारी‌रिक व मानसिक छळ करणे, लग्नातील दागिने परस्पर विक्री करणे, सासू व नणंद यांच्याकडून मानसिक छळ, जेलरोडचा फ्लॅट व कार नावे करुन द्यावा, आपल्या मैत्रिणीने केलेला बलात्काराचा आरोप व अॅट्रॉसिटीची केस मागे घेण्यासाठी फारकत मागणे, आपल्या आईवड‌िलांना मारुन टाकण्याची धमकी देणे अशा अर्धा डझन आरोपांसाठी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी रोहिणी पावशे यांच्या पतीची २०१४ मध्ये स्पर्धा परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली होती. त्यांची सुरुवातीला शिर्डी पोलिस ठाण्यात नेमणूक झाली होती. रोहिणीस मिळणारा पगार रोहिणीने तिच्या पतीकडे द्यावा यासाठी तिचे पती पुंडलिक धोंडीराम पावशे यांनी आग्रह धरीत तिला मारहाण केली होती. यात सासू गुंताबाई पावसे व नणंद शैला शरद शिंदे (रा. सातपूर) यांचाही सहभाग होता. २०१५ मध्ये फिर्यादी रोहिणीच्या वाढदिवसासाठी तिची औरंगाबाद येथील मैत्रिण दीपमाला अमृत बिलाडे ही शिर्डी येथील साईसंगम या हॉटेलात आली होती. येथे दीपमालाशी रोहिणीचे पती पुंडलिक पावशे यांच्याशी झालेल्या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमसंबंधांत झाल्याचे लक्षात आल्यावर रोहिणीने त्यासंदर्भात पती पुंडलिक पावशे यांना विचारणा केली. त्यानंतर रोहिणीस फारकतीसाठी पती पुंडलिक पावशे यांनी दबाव टाकत तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. यादरम्यान रोहिणी गरोदर असताना तिला नगर येथे पुंडलिकने मारहाण केल्याने बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे रोहिणीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. पुढे चालून फेब्रुवारी २०१७ मध्ये दीपमाला बिलाडे हीनेही पुंडलिक पावशेविरोधात औरंगाबादच्या बेगमपुरा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याशिवाय तिने फिर्यादी रोहिणी, तिचे आईवडील, दोन बहिणींसह मावसभावावर अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हाही दाखल केला. हा गुन्हा सध्या नंदुरबार पोलिस ठाण्यात वर्ग झालेला आहे.

फिर्यादी रोहिणीने फारकत दिल्यास दीपमाला बिलाडेसुद्धा बलात्काराचा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यास तयार आहे, असे सांगून तिचा पती पुंडालिक पावशे याने फिर्यादीवर मानसिक दबाव आणल्याने शेवटी रोहिणी पावशे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आपल्या पतीसह सासू व नणंदेविरोधात फिर्याद दाखल केली आहे. नाशिकरोड पोलिसांनी रोहिणी पावशे यांच्या फिर्यादीवरुन त्यांचे पती पुंडलिक पावशे, सासू गुंताबाई पावशे व नणंद शैला शरद शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांचा तपोवनात पाणी बचतीचा नारा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीला लाभलेल्या पौराणिक व धार्मिक महत्त्वामुळे नाशिककरांचे गोदेशी एक वेगळचं नातं जडलं आहे. मात्र आता ‘गोदावरीशी नातं जोडूया’ या उपक्रमातंर्गत शंभरहून अधिक नाशिककरांनी तपोवनातील मलशुद्धीकरण प्रकल्पाला भेटत देत ‘सांडपाण्याचे नेमके काय होते’ हे समजून घेत पाणी बचतीचा नारा दिला. सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने होणारे गोदेचे प्रदूषण व मलशुद्धीकरण प्रकल्पांवर होणारा खर्च टाळायचा असेल तर कचरा व सांडपाणी घराबाहेर पडणारच नाही याची काळजी घेण्याची गरज ओळखत सांडपाण्याच्या समस्येच्या स्वरूप लक्षात घेऊन उपस्थितांनी पाणी बचतीचा ठराव केला.

‘गोदावरीशी नातं जोडूया’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र टाइम्स, नाशिक महापालिका व मोहाली येथील इंडियन इन्स्ट‌िट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च यांच्यातर्फे जागतिक पाणी दिनानिमित्त रविवारी तपोवनातील मलशुद्धीकरण केंद्राला भेटीचे आयोजन केले आहे. यावेळी आर्किटेक्चर अॅण्ड सेंटर ऑफ डिझाइन कॉलेजच्या प्राचार्या व जलतज्ज्ञ डॉ. प्राजक्ता बस्ते, जलबिरादरी उत्तर महाराष्ट्र संघटक राजेश पंडित, गोदाप्रेमी नागरिक सेवा समितीचे संस्थापक देवांग जानी, इको हाऊसिंगचे तज्ज्ञ नरेश भडकवाडे व इंडियन इन्स्ट‌िट्यूट विद्यार्थीनी शिल्पा डहाके यांनी उप‌स्थितांशी संवाद साधला. तर महापालिकेचे अधिकारी एक्झ‌िक्युटीव्ह इंजिनीअर बाजीराव माळी व पाणीपुरवठा विभागाचे ए. व्ही. धनाईत, डेप्युटी इंजिनीअर बी. एस. बागूल, सेक्शन इंजिनीअर संदेश ठाकूर व प्लांट इनचार्ज अन‌िल कुलकर्णी यांनी उपस्थितांना प्रकल्पाची माहिती गरज व उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी शंभरहून अधिक नाशिककर सहभागी झाले होते.

सकाळी नऊ वाजता तपोवनातील मलशुद्धीकरण केंद्राच्या कार्यालयात प्रकल्पाच्या माहितीचा स्लाईड शो दाखविण्यात आला. त्यानंतर मलशुद्धीकरण प्रकल्पाचे प्रत्येक टप्प्यावर कसे काम चालते याची प्रत्यक्ष भेट घडवित महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना माहिती दिली. सांडपाण्याच्या प्रक्रियेदरम्यान तयार होणारा खत आणि मिथेनचा वापर पुन्हा कशापद्धतीने केला जातो हेही सांगितले. त्यानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे देत नाशिकच्या विकासासाठी सांडपाणी व्यवस्थापनाची गरज देवांग जानी, राजेश पंडित, प्राजक्ता बस्ते व नरेश भडकवाडे यांनी पटवून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सटाणा नगरपरिषदेचा अर्थसंकल्प सादर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपरिषदेचा सन २०१७-१८ या आर्थिक वर्षांचा कोणताही करवाढ नसलेला सुमारे २६ लाख ६९ हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प जिल्हाधिकारी नाशिक यांना सादर करण्यात आला. यामध्ये शहर विकासासाठी सुमारे ६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सटाणा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सटाणा शहरासाठीच्या या अर्थसंकल्पात सटाणा शहर स्वच्छ, सुंदर निरोगी व हरित साकारण्यासाठी शहर विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे, असे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सांगितले. शहर पाणीपुरवठा योजना मार्गी लावणे, जलवाहिन्या समपातळीवर आणणे, मोकळ्या भूखंडाचे विकसन करणे, चौक व स्मारकांचे सुशोभीकरण करणे, जॉगिंग ट्रॅक ग्रीन ज‌िम उभारणे, स्वागत कमानी उभारणे इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. नदी संवर्धन योजनेतंर्गत आरमनदीवर विकास प्रकल्पासाठी ३० लक्ष रुपये, घनकचरा व्यवस्थापनाकरिता १.६५ कोटी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ५५ कोटीच्या योजनेच्या खर्चाच्या प्रस्तावासाठी १.५० कोटींची तरतूद केली आहे. शहरात हरित पट्टे निर्माण करण्यासठी २००० वृक्षांची लागवड व वृक्षसंवर्धनासाठी ३० लक्ष रुपयांची तरतूद केली आहे. या प्रसंगी उपनगराध्यक्षा निर्मला भदाणे, संदीप सोनवणे, महेश देवरे, राकेश खैरनार, दीपक पाकळे, भारती सूर्यवंशी, मुख्याधिकारी हेमलता डगळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिव्ह‌िलमध्ये रेब‌िज लस उपलब्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी रेबिज लस उपलब्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिक‌ित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली. मात्र, मागणी करूनही ४० हजार लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने अखेर खासगी कंपन्यांकडून एक हजार लसी खरेदी करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे.

श्वानदंश झाल्यानंतर रुग्ण उपचारासाठी सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये धाव घेतात. अशा रुग्णांना तात्काळ रेब‌िजची लस दिली जाते. हॉस्पिटलमधील रेब‌िज लसींचा साठा काही दिवसांपुर्वी संपुष्टात आला होता. याबाबतची मागणीही सिव्ह‌िल हॉस्पिटलकडून नोंदविण्यात आली. ४० हजार लसींची मागणी करण्यात आली. परंतु, राज्यस्तरावर रेब‌िज लस पुरविणाऱ्या कंत्राटदाराकडून वेळेत लसी उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगत लस उपलब्धतेबाबत असमर्थता दर्शविण्यात आली. परिणामी सिव्ह‌िल हॉस्पिटलसह जिल्ह्यातही लसींचा तुटवडा निर्माण झाला. ही परिस्थिती हाताळणाऱ्या सिव्ह‌िल हॉस्पिटल प्रशासनाने खासगी कंपन्यांच्या माध्यमातून एक हजार लसींची उपलब्धता केल्याची माहिती जगदाळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस भरतीची आज रंगीत तालीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलाच्या शिपाई व बॅण्ड्समन पदाच्या ९७ जागांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २० ) रोजी सकाळी १० वाजता रंगीत तालीम आयोज‌ित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष भरती प्रक्रिया २२ मार्चपासून होणार असून, त्यादृष्टीने पोलिसांचे नियोजन सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी १६ मार्चअखेरीस शहर पोलिस आयुक्तालयातील शिपाई व बॅण्ड्समन पदाच्या रिक्त जागांपैकी शासन आदेशानुसार ७५ टक्के म्हणजेच अनुक्रमे ७९ व १८ जागांसाठी ही भरती प्रकिया राबविली जात आहे. यासाठी २४ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज स्वीकृती सुरू करण्यात आली. १६ मार्च पर्यंत एकूण नऊ हजार ५९३ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. त्यात ८ हजार १३६ पुरुष तर एक हजार ४५७ महिला इच्छुकांचा समावेश आहे. दरम्यान, गृह विभागाने अर्ज भरण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदतवाढ दिली असून, उमेदवारांचे अर्ज दाखल होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकूण उमेदवारांचा निश्चित आकडा सोमवारी उशिरा समजेल. दरम्यान, या भरती प्रक्रियेसाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलिस उपायुक्त, तीन सहायक पोलिस आयुक्त, ४२ पोलिस निरीक्षक व इतर अधिकारी तसेच १५७ पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. भरती प्रक्रिया पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी रंगीत तालीम आयोजीत करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लांब उडी, गोळा फेक आणि १०० मीटर पळण्याची परीक्षा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडेल. एक हजार ६०० मीटर धावण्याची स्पर्धा मात्र गंगापूररोडवरील बापू ब्र‌िजजवळील गोदापार्क येथे पार पडणार आहे. दररोज किमान एक हजार इच्छुक उमेदवारांना बोलवण्यात येणार असून, सकाळी सहा वाजेपासून भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वी इच्छुक उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच मैदानी व लेखी परीक्षा पार पाडली जात होती. यावेळी उमेदवारांना थेट रीस‌िट घेऊन बोलवण्यात आले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरापत काढून तरुणास बेदम मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किरकोळ कुरापत काढून सहा जणांनी मिळून युवकास बेदम मारहाण केली. ही घटना उपनगर परिसरातील शांतीपार्क येथे घडली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

हर्षद उल्हास जाधव (वय २५, सेंट झेव्हियर्स शेजारी, सूर्योदय सोसायटी, उपनगर) याच्या तक्रारीनुसार, हर्षद १७ मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास त्याचा मित्र गौरव काळे याच्या समवेत आजीला भेटण्यासाठी चारचाकी वाहनातून निघाला होता. शांतीपार्क गार्डनजवळ इतर मित्रांना भेटण्यासाठी ते थांबले असता, तिथे असलेल्या स्वप्निल पगारे आणि गौरव काळे यांच्यात वाद सुरू झाला. याच वेळी संशयित आरोपी निरज तेजाळेने हर्षदकडे सिगारेट देण्याची मागणी केली. तसेच हर्षदला बाजुला ओढीत नेले. यावेळी तिथे आलेल्या अनोळखी तिघांनी हर्षदला खाली पाडले. संशयित अंकुश डांगळेने हर्षदच्या डोक्यात लोखंडी गजाने मारले. इतर संशयितांनी देखील त्यास जबर मारहाण केली. या प्रकरणी हर्षदच्या फिर्यादीनुसार उपनगर पोलिसांनी निरज तेजाळे, स्वप्निल पगारे, अंकुश डांगळे याच्यासह अन्य तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रीराव करीत आहे.

जुगारी गजाआड

भद्रकाली पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करीत पाच जणांना अटक करीत जुगाराचे साहित्य जप्त केले. पंचशीलनगर येथील विजय ममता टॉकीजसामेर जुगार खेळणाऱ्या देवीदास बाबुराव जगताप यास पोलिसांनी अटक केली. संशयित मटका खेळताना सापडला. कथडा भागात जुगार खेळणाऱ्या शकील अकील पठाण व त्याच्या आणखी तीन साथिदारांना देखील पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी या कारवाईत जुगाराचे साहित्य आणि जवळपास अडीच हजार रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाची आत्महत्या

मखमलाबादरोडवरील खालकर चाळ येथे राहणाऱ्या प्रकाश ठकाजी जाधव (५०) यांनी शनिवारी संध्याकाळच्या सुमारास विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. बाळासाहेब खालकर यांच्या भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या जाधव यांनी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विषारी औषध सेवन केले होते. या प्रकरणी खालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

जखमी तरुणाचा मृत्यू

भाजून जखमी झालेल्या २७ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उमेश काळू गायकवाड (कुंभारवाडा, जुने नाशिक) असे त्याचे नाव आहे. ९ मार्च रोजी राहत्या घरी ३५ ते ४० भाजल्याने गायकवाडला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणसांनी नाकारलेल्यांना ‘त्यांनी’ मायेने स्वीकारलं!

$
0
0

रेल्वे स्टेशनमधील निराधारांना मिळतोय मुक्या प्राण्यांचा आधार

डॉ. बाळकृष्‍ण शेलार, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वेस्थानक म्हणजे भटके, गरीब, साधू यांचे आश्रयस्थान झाले आहे. वंशाच्या दिव्याने घरच्या लक्ष्मीचा सल्ला ऐकून घरातून बाहेर काढलेली वृध्द जोडपीही येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात. या निराधारांना आपल्यासारखी माणसे लळा लावत नसली, तरी मुकी जनावरे मात्र माया लावत असल्याचे चित्र आहे.

कुंभमेळ्यात वृध्द माता पित्यांना नाशिकसारख्या धार्मिक नगरीत सोडून जाणारे अनेक ‘दिवटे’ असतात. या बिचाऱ्यांना देवदर्शन करुन आल्यावर नाशिकरोड स्थानकाचाच आधार उरतो. लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवाशीही ओझे झालेल्या मातापित्यांना, दोन-चार दिवसांच्या स्त्री अर्भकांना स्थानकात खुशाल सोडून निघून जातात. शहरातील श्रीमंतांची पोरंही आजारी मातापित्यांना गाडीत आणून रेल्वेस्थानकावर सोडून पळून गेल्याचे पाहिलेले येथील कुली सांगतात. त्यामुळे त्यामुळे या निराधारांना भिकारी म्हणण्यास जीभ धजावत नाही, असेही ते म्हणतात.

नाशिकरोड रेल्वेस्थानकात चार प्लॅटफॉर्म आहेत. चौथा फ्लॅटफॉर्म कुंभमेळ्यात नव्याने बांधण्यात आला आहे. तो इतर तीनपेक्षा मोठा असला तरी तेथे रेल्वेगाडी थांबत नसल्याने त्याचा उपयोग फारसा होत नाही. त्यामुळे तेथे भटके, गरीब, निराधार रात्र घालविण्यासाठी येतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्लॅटफॉर्मवरही या गरीबांचीची गर्दी असते. सकाळी प्रवाशांकडून भीक मागायची, ती कमी पडल्यानंतर मुक्त‌िधाम मंदिरातील भाविक आणि परिसरातील दुकानदारांकडे भीकेसाठी हात पसरायचा. सूर्य पश्चिमेला झुकला की अंधारलेली रात्र काढण्यासाठी पुन्हा रेल्वे स्टेशनचा आसरा घ्यायचा, असा या भटक्यांचा दिनक्रम असतो.

मुक्या प्राण्यांची इमानदारी

प्रवाशांना हे चेहरे रोजचेच झाल्यामुळे ते या लोकांशी फटकून वागतात. त्यामुळे या भटक्या व निराधारांनी कुत्री, माजरांसारख्या मुक्या जनावरांशी मैत्री केली आहे. आपल्या भ‌‌ीकेतील दोन-चार तुकडे ते या अतिथींनाही देतात. निराधार हे स्थानकात जेथे जातील, त्यांच्यामागे ही जनावरे जातात. ते स्थानकाबाहेर भीकेसाठी गेल्यावर त्यांची प्रतीक्षा करतात. रात्री धनी परतल्यावर किंवा दिवसा त्याचा डोळा लागल्यावर त्याच्या ‘ऐवजा’चे रक्षण करतात. स्थानक परिसरात गुंड, लोफर वरचेवर येत असतात. विनयभंग, बलात्कार, चोरी असे प्रकार स्थानकात घडत असतात. त्यामुळे विधवा व वृध्द निराधारांना त्यांचा मोठा आधार वाटतो.


न संपणारी प्रतीक्षा!

पोलिसांनाही या भटक्यांची परिस्थिती माहिती आहे. तेही त्यांच्याप्रती दयाभाव ठेवतात. भुसावळ किंवा मुंबईच्या साहेबाची रेल्वेस्थानकाला व्हिज‌िट असेल तर या निराधारांना हाकलले जाते. ते गेल्यावर पुन्हा रेल्वेस्थानकच त्यांचे घर होते. कधी अचानक आयुष्याची संध्याकाळ झाली, तर मग बेवारस मृतदेह अशी त्यांची नोंद होते. मग सरकारी रुग्णालयात काही दिवस शवागारात मृतदेह पडून राहतो. नंतर एखाद्या स्मशानभूमीत त्यांना चिरविश्रांती घ्यावी लागते, जेथून त्यांना कोणीच हाकलत नाही. त्यांनी जीव लावलेली जनावरे मात्र स्थानकावर त्यांची प्रतीक्षा करत असतात, वंशाच्या दिव्यासारखी!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images