Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दुष्काळ निधी जिरला मातीत

$
0
0

नवनाथ वाघचौरे, सिन्नर फाटा

पाणीटंचाईच्या दुष्टचक्रातून कायमची सुटका व्हावी यासाठी शासकीय पातळीवर विविध योजनांमधून कोट्यवधी रुपये खर्च केला जातात. मात्र, यातून भूजल पातळी वाढण्याऐवजी घटत असल्याचे दिसून आले आहे. नाशिक विभागात गेल्या चार महिन्यात ११ तालुक्यांमधील भूजल पातळी घटली आहे. अशा तालुक्यांची संख्या २८ वरून ३९ पर्यंत वाढली आहे. दुष्काळमुक्तीसाठी केलेल्या उपाययोजनांवरील कोट्यवधींचा खर्चही मातीत जिरल्याचे उघड झाले आहे.

पावसाळ्यात सुरुवातीला ओढ दिलेल्या वरुणराजाने ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात नाशिक विभागातील बहुतांश तालुक्यांना धो-धो धुतले होते. त्यामुळे यंदा दुष्काळमुक्तीचे स्वप्न प्रशासनासह नागरिकांना पडले. मात्र, सप्टेंबर २०१६ मध्येच भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार, नाशिक विभागातील ५४ पैकी २८ तालुक्यांतील भूजल पातळी कमी अधिक प्रमाणात घटल्याचे उघड झाले. परंतु, यावर्षी जानेवारीमध्ये नवीन सर्वेक्षणानुसार नाशिक विभागात भूजल पातळी घटलेल्या तालुक्याच्या संख्येत ११ ने वाढ होऊन ही संख्या आता ३९ पर्यंत वाढली आहे.

४४८ गावांची भर

सप्टेंबर २०१६ अखेरीस नाशिक विभागातील भूजलपातळी घटलेल्या गावांची संख्या केवळ ६६७ इतकी होती. मात्र, नंतरच्या चार महिन्यांत यात ४४८ गावांची भर पडली. त्यामुळे भूजलपातळी घटलेल्या गावांची संख्या आता तब्बल १११५ वर जाऊन पोहचली आहे. प्रत्येक महिन्याला सुमारे ११० गावांमधील पाणी वेगाने घटले आहे.

धुळे जिल्हा विभागात अग्रभागी

विभागातील धुळे जिल्ह्यात चार तालुक्यांतील ४५९ गावांतील भुजल पातळीत घट आली आहे. त्यात धुळे तालुक्यातील १२३, साक्रीतील ८३, सिंदखेड्यातील ११९ व शिरपूरमधील १३४ गावांचा समावेश आहे. ही संख्या विभागातील इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा नंबर लागतो.

कळवण, मालेगावसाठी धोक्याची घंटा

गेल्या सप्टेंबरमध्ये नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील ३ गावांमधील भूजल पातळीत घट झाली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच भूजल पातळी घटल्याने या तालुक्यांची गावांची संख्या ७ इतकी झाली. पाणी घटलेल्या ७२ पैकी ११ गावांमधील भूजल पातळी तीन मीटरपेक्षा जास्त घटली. कळवण व मालेगाव या दोन तालुक्यांमधील बदलती स्थिती बघता तेथे भविष्यात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आडगावात बीएसएनएल सेवा विस्कळीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

पंचवटी परिसरातील हनुमाननगर, जत्रा हॉटेल, सागर व्हिलेज, आडगाव या भागातील बीएसएनएल टेलिफोन आणि ब्रॉडबँडची सेवा विस्कळीत झाली आहे. नागरिकांना बीएसएनएलचे कनेक्शन मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत बीएसएनएलचे अधिकारी आणि कर्मचारी केबल पोहोचलेली नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देत नवीन कनेक्शन देण्यास नकार देतात. शिवाय, जत्रा हॉटेल येथील कार्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कंत्राट संपलेले आहे, त्यामुळे संबंधित बीएसएनएलच्या कार्यालयात कर्मचारीदेखील नाहीत. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यास अडचणी निर्माण होत आहे. तरी, त्वरित पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी परिसरातील ग्राहक करीत आहेत.

आडगाव परिसरातील जत्रा हॉटेलमागील आडगाव कार्यालयात विचारणा केली असता ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आमचे कर्मचारी कमी आहेत. तर कंत्राटी कामगारांचा संप सुरू असल्याने आम्ही काही करू शकत नाही, असे कार्यालयातून सांगण्यात आले. अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे व्यवसाय वाढवण्याऐवजी कमी होत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी दखल ग्राहकांना दिलासा द्यावा. हनुमाननगर परिसरात अमृतधामपर्यंत लाइन टाकलेली होती. पण काही कर्मचाऱ्यांनी येथील पोलदेखील तोडून विकल्याची माहिती परिसरातील नागरिक देत आहेत. त्यामुळे तेथील पोल चोरीची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगर रस्त्याचे अखेर डांबरीकरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

उपनगर येथील महत्त्वाच्या रस्त्याचे अखेर डांबरीकरण झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्यावर केवळ खडीकरण केल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याचे वृत्त ‘मटा’ने छायाचित्रासह प्रसिद्ध केले होते.

जेलरोडहून उपनगरला गेल्यानंतर एक रस्ता उपनगर नाक्याकडे तर दुसरा महाराष्ट्र हायस्कूलकडे जाते. या जोड रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले होते. त्यामुळे यावरून वाहन चालविणे अवघड झाले होते. वळणावरच खड्डे पडलेले असल्याने ते चुकवताना वाहनांची धडक होत असे. नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. तथापि, केवळ खडीच टाकल्याने खडीचे कण उडून वाहनचालकांच्या डोळ्यात जात होते. वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाणही वाढले होते. परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये धूळ येऊ लागल्याने श्वसनाचे विकार जडू लागले होते. त्यामुळे नागरिकांनी या रस्त्याने जाण्याचे टाळले होते. नागरिकांनी डांबरीकरणाची मागणी केल्यानंतरही प्रशासनाने लक्ष दिले नाही.

‘मटा’मध्ये छायाचित्रासह वृत्त प्रसिध्द होताच प्रशासन जागे झाले आणि रस्ता त्वरित डांबरीकरण झाले. आता या रस्त्याने प्रवास करण्याचा आनंद वाहनचालक लुटत आहेत. वळणावरील खड्डे बुजविल्याने अपघातही टळत आहेत.

उपनगरचा रस्ता खराब झाला होता. नागरिकांच्या मागणीनंतर त्याचे कसेबसे खडीकरण करण्यात आले. मात्र, डांबरीकरण बाकी ठेवल्याने रहिवाशी आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. डांबरीकरण झाल्यामुळे प्रशासनाचे आभार.

गणेश कपोते, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतन भेदभावाच्या निषेधार्थ वीज कामगारांची निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महावितरण कंपनी कंपनीतील कायम कामगार व कंत्राटी स्वरुपातील कामगार यांच्यात वेतनाच्या बाबतीत भेदभाव करित असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने गुरुवारी (दि. १६) नाशिकरोड येथील महावितरणच्या परिमंडळ मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली.

या अन्यायाविरोधात महावितरणच्या मुंबईतील प्रकाशगड येथील मुख्य कार्यालयासमोर महाराष्ट्रातील सर्व वीज कंत्राटी कामगार दि. २२ मार्चपासून बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशाराही प्रशासनाला दिला आहे. वीज उद्योगातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपनीतील रिक्त पदांवर काही वर्षांपासून शेकडो कामगार कंत्राटी स्वरुपात काम करीत आहेत, असा आरोप कामगार संघाने केला. यावेळी प्रदेश सचिव सचिन मेंगाळे, एस. ए. कुलकर्णी, इद्रीस शेख, रिझवान शेख, कुंदन भास्करे, सचिन पाटील, सागर टिळे, सुरेश नवसार आदी उपस्थित होत‌े.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या जीवनची सूक्ष्म कला गेली लंडनला!

$
0
0

फणिंद्र मंडलिक, नाशिक

भगवंत सूक्ष्म आहे. त्याला जाणून घ्यायचे म्हणजे जडातून सूक्ष्माकडे जावे लागते असे म्हणतात... नाशिकच्या जीवन जाधवची कलाही अशीच जडातून सूक्ष्माकडे जाणारी आहे. ती कला म्हणजे लीड कार्व्हिंग. त्याची हीच कला लंडनमध्ये पोहोचली असून, ०.५ एमएम आकारातील कोरीव कामात त्याने जागतिक विक्रमाशी बरोबरी केली आहे. या आकारात पेन्सिलीच्या शिश्यावर काम करणारा तो जगातला दुसरा कलाकार असून, यात आतापर्यंत तैवानचा चीन चु ली हाच एकमेव कलाकार होता. आता या कलेच्या माध्यमातून जीवनच्या रूपाने नाशिकचं नाव जगाच्या नकाशावर झळकलं आहे.

असा झाला सूक्ष्माकडे प्रवास

जीवन हा कम्प्युटर इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असून, आजपर्यंत त्याने या प्रकारात विविध व्यक्तींची शिल्पे साकारली आहेत. त्याचे शालेय शिक्षण सुरू असतानाचा त्याला खडू कोरण्याचा छंद जडला. या माध्यमात काम करताना त्याने महात्मा गांधी, नरेंद्र मोदी, कटाप्पा अशा विविध प्रकारची हजारो शिल्पे साकारली आहेत. यात मास्टरकी मिळवल्यानंतर आणखी सूक्ष्म आकारात काम करावे अशी इच्छा झाल्याने त्याने पेन्सिलच्या लीडची निवड केली. यात त्याने मायकेल जॅक्सनपासून ते ऑस्कर अवॉर्डच्या प्रतिकृतीपर्यंत अनेक शिल्पे साकारली आहेत. यातही आणखी सूक्ष्म काम करता यावे यासाठी त्याने ०.९ एमएमच्या लीडची निवड केली. यातही त्याने विविध शिल्पे कोरली.

जगातला दुसरा कलाकार

जीवनने ०.९ पासून ते ०.५ एमएमच्या लीडवर अल्फाबेट अक्षरे कोरली असून, लंडनच्या एका कुटुंबाने ती विकत घेतली आहेत. त्याच्या या प्रयोगाची माहिती भारतात पसरल्यानंतर मुंबई, पुणे, चेन्नई येथील कलाप्रेमींनी त्याच्याकडून लीडवर कार्व्हिंग करून घेतले आहे. त्याने नुकतेच ०.५ एमएमच्या लीडवर अल्फाबेट कोरण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. याआधी हा विक्रम तैवानच्या चीन चु ली या कलाकाराने केला होता. या माध्यमात काम करणारा तो सर्वांत लहान कलाकार आहे. जगातील ‘बेस्ट कलाकार’ म्हणून सला विथ फिदाई यांना ओळखले जाते. त्यांचे वय ४५ आहे. सर्वांत कमी वयाचा जीवन हा ०.५ या आकारात काम करणारा एकमेव कलाकार ठरला आहे. कला प्रकाराचे त्याने कुठेही शास्त्रीय शिक्षण घेतले नसून, त्याने आवड म्हणून एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या परीक्षा दिल्या आहेत. याच कला प्रकारात त्याला संशोधन करायचे असून, संपूर्ण जगात अव्वल स्थान मिळवायचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..तर बँकांतील खाती बंद होतील!

$
0
0

बँकांनी लावलेल्या चार्जेसवर ग्राहकाचे उद्विग्न पत्र

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बँकांनी लावलेल्या विविधा चार्जेसमुळे एकीकडे बँक ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. एका ग्राहकाने बँकांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आपल्या भावना एका पत्रातून व्यक्त केल्या आहेत. भरत जैन यांनी लिहिलेल्या पत्रात बँकांनी चार्जेस रद्द न केल्यास ग्राहक बँकेत खाती तर उघडणार नाहीत, पण असलेली बंद करतील व बँकेच्या माध्यमातून व्यवहार करण्याची सवय लावण्यापेक्षा टाळण्याची सवय लावेल, असे म्हटले आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे ग्राहक संघटना व सरकारने लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

या पत्रात जैन यांनी वास्तव मांडत म्हटले आहे की, बँका सध्या ग्राहकावर मोकाट सुटल्यासारखे चार्जेस व दंड लावत आहेत, की ग्राहकांना बँक ग्राहक होणे ही शिक्षा वाटावी, गुन्हा वाटावा. या बँकांनी दिलेली कारणेही अतार्किक वाटतात. खात्यात कमीत कमी शिल्लक एरियाप्रमाणे एक हजार होती, तिथे पाच हजार केली. चार वेळा महिन्यातून व्यवहार झाल्यास पाचव्या व्यवहारावर दंड आकारणार. याचे समर्थन करताना बँकेच्या उच्चपदावर असलेल्या अधिकाऱ्याने तर जनधनसारख्या सरकारी योजनेंतर्गत खाती उघडणे बँकांना परवडत नाही. त्यामुळे हे चार्जेस लावले तर ते सोयीस्कर होईल, असे उत्तर दिले. त्यामुळे इतर बँक ग्राहकांचा यात काय दोष की बँकांना सरकारी आदेशामुळे जनधन खाती उघडावी लागली. हजारो कोटींचा नफा कमवणाऱ्या बँकांना एवढीशी समाज व देश सेवा करता येत नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

हँडलिंग चार्जेस, पाचव्या वेळेस पैसे काढले तरी चार्जेस, किमान शिल्लक ठेवली नाही तरी चार्जेस, एटीएममधून पाचवेळा पैसे काढल्यास चार्जेस, त्यानंतर सर्व्हिस टॅक्स त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप होत आहे. अनेक बँकांची एटीएम बंद असतात. एका बँकेने लाखो रुपये खर्च करुन इ टच स्क्रिन बँका उघडल्या. त्या बँकेत गेलो तर तेथे बँकेचे पासबुक भरण्याचे मशिन, चेक भरण्याचे मशिन बंद होते, तर एटीएमध्ये कॅश नव्हती. सर्व मशिनवर चालणारी ही शाखा सर्व्हिस देऊ शकत नाही, तर पैसे का उकळतात असा प्रश्नही विचारला आहे. उलट बँकांनी ग्राहकांना नुकसानभरपाई देणे अपेक्षित आहे. नोटाबंदीत या बँका अतिरेक करत आहेत, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् आगपेट्या आग ओकतात तेव्हा...

$
0
0

म . टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड-मालेगाव रस्त्यावर दहेगाव शिवारात गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास पुणे येथून इंदूरकडे आगपेटीचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यामुळे आगपेट्यांनी भरलेल्या ट्रकने पेट घेतला. काही मिनिटातच संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. चालकाने प्रसंगवधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून उडी घेतली. या अपघातातून लागलेल्या आगीमुळे मनमाड-मालेगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशामक दलाने प्रयत्नांची शर्थ करून आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चांदवड पोलिसांनी या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथून इंदूरकडे आगपेटींचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक (टीएन १९ यू 4135) गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास मनमाड मालेगाव रस्त्यावर दहेगाव शिवारात पोहोचला. याचवेळी ट्रकला समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रकने धडक दिली. या धक्क्यामुळे ट्रकमधील आगपेटींच्या बॉक्सला आग लागली. काही क्षणातच संपूर्ण ट्रक आगीत सापडला. ट्रकला आग लागल्यामुळे रस्त्यावर धुराचे लोट पसरले होते. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

या आगीत आगपेटी बॉक्स घेऊन जाणारा ट्रक पूर्ण जळाला. मनमाड, चांदवड तसेच मंगरूळ येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विझव‌िण्यात आली. या आगीत ट्रकचे खूप नुकसान झाले. ट्रकला आग लागलेली असताना सोडून काही बघ्यांनी आगीचे झळ न पोहचलेले आगपेटीचे बॉक्स उचलून घरी नेण्यासाठी गर्दी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..तर वाहन परवाना निलंब‌ित करणार!

$
0
0

वाहतूक पोलिस आणि आरटीओची संयुक्त मोहीम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतूक विभागासह प्रादेश‌िक परिवहन विभाग बेशिस्त वाहनचालकांविरोधात आक्रमक झाले असून, मोबाइल वापरणाऱ्या, वेगात वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांचा थेट वाहन परवानाच तीन महिन्यांसाठी निलंब‌ित करण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक पोलिस आणि आरटीओ संयुक्त मोहीम राबवणार आहे.

शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढते. गेल्या काही दिवसांत ‘हिट अॅण्ड रन’सारख्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे रिक्षा चालकांविरोधात पोलिसांना सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आणि प्रादेश‌िक परिवहन विभागाने संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. यात, बेशिस्त रिक्षाचालक आणि वाहतूक नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना टार्गेट करण्यात येणार आहे. साधारणतः तीन महिन्यांसाठी परवाना निलंब‌ित केला जाऊ शकतो. वाहन परवाना निलंब‌ित करण्याचा अधिकार एआरटीओ दर्जाच्या अधिकाऱ्यांना असतो. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेनुसार कारवाईची ठिकाणे दररोज ठरवली जातील. वर्दळीच्या रस्त्यांसह सिग्नल्सवर बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे.

रिक्षांना स्टीकर

बेशिस्त रिक्षाचालकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता पोलिस आणि प्रादेश‌िक परिवहन विभागाने रिक्षा चालकांना रडारवर घेतले आहे. शहरात रिक्षांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या रिक्षांना एक विशिष्ट स्ट‌ीकर लावण्यात येणार आहे. एकदा स्टीकर लावले की, त्या रिक्षाचालकाची कागदपत्रे तपासली जाणार नाहीत. उर्वरित रिक्षा चालकांची मात्र सातत्याने तपासणी केली जाईल. या शिवाय परवाना, ड्रेस, फ्रंटसीट यांसह इतर नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बेशिस्त चालकांचा परवाना निलंब‌ित करणे, रिक्षा जप्त करणे, स्क्रॅप रिक्षा जागेवर तोडणे आदी ठोस कारवाई केली जाणार आहे. रिक्षा तपासणीची मोहीत गुरूवारपासून सुरू झाली आहे. हळुहळू त्याची व्याप्ती वाढवली जाणार आहे. विशेषतः अनधिकृत रिक्षा व त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी कमी करण्यासाठी ही मोहीम महत्वाची असल्याचे सूत्रांनी सांगितले.


गंगापूर नाका सिग्नलचा बदलला चेहरा

बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघातासारख्या समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गंगापूर नाका सिग्नलचा चेहरामोहरा बदलला आहे. झेब्रा क्रॉस‌िंगसह लेफ्ट मोकळा ठेवणे, लेन कट‌िंग अशा अगदी छोट्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास लागलीच वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. गंगापूर नाका सिग्नलनंतर शहरातील इतरही ठिकाणी अशाच पध्दतीने कारवाई करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी अगदी छोट्या नियमांचेदेखील पालन करणे आवश्यक असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले.


यामुळे होणार लायसन्स निलंब‌ित

१ सिग्नल जम्प/धोकादायक वाहन चालवणे

२ ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह

३ मोबाइलचा वापर

४ ओव्हर स्पीड

५ मालवाहू वाहनातून प्रवाशी वाहतूक

६ जास्त मालाची वाहतूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकची नाट्यगृहे तांत्रिकदृष्ट्या मागास

$
0
0

नाशिकमधील कलाकारांनी काढले नाट्यगृहांच्या अवस्थेचे वाभाडे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोणतीही कला सादर करण्यासाठी शहराला जे सर्वसोयींनी युक्त अद्यावत नाट्यगृह आवश्यक असते, ते नाशिकला नाही. या बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सने एक कॅम्पेन केले होते. त्यावर नुकतीच एक राऊंड टेबल कॉन्फरन्सही घेण्यात आली. तरीही अनेक कलाकारांना आपल्या अपेक्षा मांडायच्या होत्या. या नाट्यगृहांचा नाशिकमधील कलाकारांनी परखडपणे समाचार घेतला आहे.

प्रोफेशनल साऊंड सिस्टिम हवी

नाशिकच्या कोणत्याही थिएटरला प्रोफेशनल साऊंड सिस्ट‌िम नाही. ती होणे गरजेचे आहे. ती चांगली असेल तर बाहेरुन साऊंड आणण्याची गरज भासणार नाही. बऱ्याच ठिकाणी अॅकोस्ट‌िक प्रॉब्लेम आहेत, ते दूर होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे थिएटरचे दरवाजे हे थेट उघडले जातात. त्यामुळे प्रकाश आत येतो. त्यामुळे कलाकारांना डिस्टर्बन्स निर्माण होतो. त्यासाठी मध्ये स्टॉपर असणे गरजेचे आहे.

-रागिणी कामतीकर, गायिका


ही तर मंगल कार्यालये!

नाशिकची नाट्यगृहे म्हणजे मंगल कार्यालये झाली आहेत. पुण्या-मुंबईच्या तुलनेत आपण खूप मागे आहोत. मुंबईच्या नाट्यगृहात प्रवेश केल्यानंतर जी प्रसन्नता लाभते, ती येथे मिळत नाही. गाणे सादर करताना मनाची एकाग्रता लागते, ती येथे होत नाही. येथे अनंत अडचणी आहेत, त्या सोडवण्यातच वेळ जात असल्याने परफॉर्मन्सकेड दुर्लक्ष होते. कालिदासच्या स्टेज आणि साऊंडच्या बाबतीत तर बोलायलाच नको. आजतागायत कुठल्याही गायक कलाकाराने तेथील साऊंड वापरला असेल मला वाटत नाही. जर तशी वेळ आली तर आत्महत्या केलेली बरी.

-अविराज तायडे, गायक

बाहेरील कलाकारांना बोलावण्याची लाज वाटते

नाशिक महापालिकेच्या कुठल्याही नाट्यगृहात गायनाचा कार्यक्रम करायचा म्हटला की, अंगावर काटा उभा राहतो. गायकाचा संबंध येतो तो ग्रीन रुमशी आणि स्टेजशी. कालिदास कलामंदिरातील ग्रीन रुम अत्यंत घाणेरडे आहेत. बाहेरच्या कलाकारांना येथे बोलावण्याची लाज वाटते. मध्यंतरी एका आंतरराष्ट्रीय कलाकाराला बोलावणे पाठवले त्यांच्या माणसांनी येथील थिएटरची व्यवस्था पाहून कार्यक्रम करण्यास नकार दिला. वाद्य लावण्यासाठी येथे बैठकीची व्यवस्था नाही.

-आशिष रानडे, गायक


स्टेजवर बसायचे कुठे हा मोठा प्रश्न

गायनाचे कार्यक्रम करताना स्टेजवर बसायचे कुठे हा मोठा प्रश्न असतो. शक्यतो सर्व गायक बसण्यासाठी लेव्हल वापरतात. या लेव्हलला भेगा असल्याने अनेकदा चिमटे बसतात. स्टेजवर खिळे वर आले आहेत. पोड‌ियम अत्यंत घाण अवस्थेत आहे. अनेकदा लाइट लागतात आणि मध्येच बंद होतात. गायकवाड सभागृहाबाबत बोलायलाच नको. हे सभागृह नाटकाच्या आणि गायनाच्या कार्यक्रमाच्या लायकीचे नाही. येथे शाळेच्या स्नेहसंमेलनाव्यतिरिक्त काहीही होऊ शकत नाही.

-ज्ञानेश्वर कासार, गायक

समईचेही भाडे आकारतात

महापालिकेची नाट्यगृहे ही पैसे कमवण्याची खाण झाली आहे. अवाढव्य भाडे आकारुन कलाकाराना त्या बदल्यात काहीही दिले जात नाही. थिएटरमध्ये प्रत्येक गोष्टीचे पैसे आकारले जातात. कुठलाही लाइट लावल्यानंतर त्याच्या वापराचे वीजबील हे ५० रुपये आकारले जाते. १००० वॅटचा लाइट सलग तीन तास लावला तरीही महावितरणकडून ५० रुपये बील येणार नाही. त्यामुळे ही लूट सुरू आहे. पैसे भरुन फक्त रिकामे स्टेज आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्या इतक्याच गोष्टी दिल्या जातात. उद््घाटनाच्या समईचेदेखील भाडे आकारले जाते. महाराष्ट्रात एकमेव असे थिएटर असेल असे मला वाटते.

-रेखा नाडगौडा, कथक नृत्यांगणा

अतिशय गलिच्छ थिएटर

आजवर भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये कला सादर करण्याची संधी मिळाली. मुंबईचा ष्णमुखानंद हॉल, चेन्नई, ओरिसा, भुवनेश्वर अशा अनेक शहरांमध्ये नृत्य सादर केले. परंतु, इतके घाण थिएटर आजवर कुठेही पहायला मिळाले नाही. या ठिकाणी फोटो काढण्यासाठीदेखील चांगली जागा नाही. भिंतींवर पानाच्या पिचकाऱ्या, पडद्यांना टाचण्या टोचलेल्या अशी परिस्थ‌िती आहे. स्टेजचा विचार केल्यास त्याची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे. नृत्य सादर करताना येथे पाय घसरतात. त्यासाठी याची शास्त्रशुध्द रचना सादर करणे आवश्यक आहे. लाइट ज्या ठिकाणी टांगले जातात, ते लोखंडी बार अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. कधीही ते कलाकारांच्या अंगावर कोसळू शकतील. ग्रीन रुममध्ये मेकअप करण्यासाठी पुरेसा उजेड नाही.

-संगीता पेठकर, भरतनाट्यम नृत्यांगणा


केवळ बाह्यस्वरुप बदलले

परशुराम साईखेडकर नाट्यगृहाचे बाह्यस्वरुप बदलले. मात्र अंतर्गत स्वरुप तसेच आहे. कलाकारांना कला सादर करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात, त्या येथे उपलब्ध नाहीत. स्टेजचा विचार केल्यास आजही त्या ठिकाणी भरमसाठ खड्डे आहेत. स्टेजच्या फळ्या उखडलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रयोग सादर करताना एका तरी कलाकाराच्या पायाला जखम होते. येथील साऊंड सिस्ट‌िम भयानक आहे. ती सुरू झाली हे आपले भाग्य समजायचे. मेकअप रुममध्ये स्पार्टेक टाइल्स टाकल्या आहेत. त्यामुळे पाय घसरतात.

-विद्या देशपांडे, नृत्यांगणा


मेकअपसाठी पुरेशी जागा नाही

नृत्यांगनांना मेकअप करण्यासाठी पुरेशी जागा नाही. अनेकदा मेकअप रुममध्ये लाइट उपलब्ध नसतात. विनंती करुनही त्याची दखल घेतली जात नाही. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात मेकअपसाठी अत्यंत छोटी जागा आहे. त्यात याठिकाणी टॉयलेटचे पाणी गळत असते. सर्वच थिएटरला लेव्हल्सची बोंब आहे. त्या देण्यासाठी कुणीही माणूस नसतो. बाहेरच्या थिएटरला गेले तर अभिमान वाटतो तसा येथे काम करताना अभिमान वाटायला पाहिजे. या दुरवस्थेमुळे अनेक बाहेरचे लोक येथे येण्यास नकार देतात. त्यामुळे मुलांना चांगल्या कलाकारांच्या कलाकृती पहाता येत नाहीत.

-सुमुखी कुलकर्णी-अथनी, नृत्यांगणा


कम्फर्ट झोन मिळत नाही

नाटक करताना कलाकाराला जो कम्फर्ट झोन आवश्यक असतो, तो नाशिकमधल्या कुठल्याही थिएटरला मिळत नाही. त्याचा परिणाम सादरीकरणावर होतो. परवाचेच उदाहरण द्यायचे झाल्यास परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आमच्या नाटकाचा प्रयोग तब्बल दीड तास उशिराने सुरू झाला. ऐनवेळी साऊंड सुरूच होत नव्हता. त्याचप्रमाणे येथे टेक्निकल ज्ञान असलेला माणूस उपलब्ध नाही, तर तुम्ही थिएटर भाड्याने का देता? लाइटची अत्यंत दुरवस्था आहे. चार लाइट लावण्यासाठी चार तास लागत असतील, तर किती भयानक बाब आहे? येथे टॉयलेटची अत्यंत दुरवस्था आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

-गीतांजली घोरपडे, अभिनेत्री


तांत्रिकदृष्या मागसलेले

नाशिक शहरातील सर्वच नाट्यगृहे तांत्रिकदृष्या अत्यंत मागसलेली आहेत. येथे सेटसाठी आवश्यक असणाऱ्या पुरेशा लेव्हल्स उपलब्ध नाहीत. लेव्हल्स उचलायला गेल्यास हातात फळ्या येतात, अशी अवस्था आहे. विंगा हालत नाहीत. महापालिकेकडे आमची प्रमुख मागणी आहे की, आम्हाला मोठी थिएटर नकोत. प्रायोगिक नाटक सादर करण्यासाठी अत्यंत कमी दरात २०० ते ४०० आसन क्षमता असलेली थिएटर प्रत्येक भागात तयार करुन दिली, तर चांगले होईल.

-अपूर्वा देशपांडे, अभिनेत्री


पालिकेला सोयरसुतक नाही

कालिदास कलामंदिराची ज्यावेळी रचना झाली त्यानंतर आधुनिकीकरण झाले नाही. नाटकांचे तंत्र बदलले. परंतु, कालिदास कलामंदिर आहे त्याच स्थितीत आहे. अनेकदा थिएटर भरत नाही. यासाठी दोन खुर्च्यांमधील गॅप वाढवावी. त्याचप्रमाणे बुकींग ऑफिसच्या शेजारी मोकळी जागा आहे. त्या ठिकाणी अॅम्फि थिएटर सुरू केले तर छोटे प्रयोग करणे सोयीचे होईल. सेट, लाइट, स्वच्छतागृहे याबाबत अनेकदा तक्रार अर्ज, विनंत्या करुन झाल्या. परंतु, महापालिकेला त्याचे काहीही सोयरेसुतक नाही.

-रवींद्र ढवळे, दिग्दर्शक


मेकअप रुममध्ये एसी असावा

काही वर्षांपूर्वी मेकअप रुमची जी अवस्था होती आजही ती तशीच आहे. मेकअपसाठी लाइट मिळत नाही. अनेक आरसे स्वच्छ नसतात. याच ठिकाणी टॉयलेट आहेत. त्याचा अत्यंत घाण वास येत असतो. याठिकाणी असलेले एसी बंद अवस्थेत आहेत. मेकअप करताना कलाकारांना घाम येतो. यासाठी मेकअप रुममध्ये एसी असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मेकअप रुममध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. या गोष्टी अनेकदा बोलून झाल्या. परंतु, त्यात फरक पडत नाही.

-नारायण देशपांडे, मेकअपमन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नो वॉशिंग’झोन नावापुरताच

$
0
0

दंडात्मक कारवाईच्या घोषणेनंतरही गोदावरीचे प्रदूषण सुरूच

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हायकोर्टाने गोदावरीसह तिच्या उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध प्रकारचे आदेश काढले होते. त्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तरीही गोदावरीचे प्रदूषण थांबले नाही. महापालिकेने वारंवार आवाहन करूनही गोदावरी प्रदूषणाला आळा बसू शकलेला नाही.

गोदावरीत प्रदूषण केल्यास पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी महापालिका प्रशासनाने बुधवारी (दि. १५) निर्णय घेतला असला तरी या निर्णयाच्या नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला दिसत नाही. गुरुवारी (दि. १६) गोदाघाटावर धुणे धुणाऱ्यांनी आणि गोदापात्रात कचरा टाकणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही.

पवित्र तीर्थस्नान म्हणून ओळख असलेल्या रामकुंडावर स्नानानंतर तेथेच कपडे धुण्यात येतात. त्या कपडे धुणाऱ्यांकडे येथे रक्षकांचे लक्ष गेले तरच त्यांना रोखता येते. अन्यथा कपडे धुणे, कपड्यांसह स्नान केल्यानंतर ते कपडे तसेच रामकुंडात सोडून देणे हे प्रकार सर्रास चालतात. त्यामुळे रामकुंडाच्या साफसफाई करताना कपड्यांचा कचरा मोठ्या प्रमाणात निघतो. गोदाघाट हा धोबी घाट बनलेला आहे. लक्ष्मण कुंड, गांधी तलाव, यशवंतराव महाराज पटांगणासमोरील पात्र, रामसेतू पूल व गाडगे महाराज पुलाखाली परिसरापासून ते थेट टाळकुटेश्वर मंदिरापर्यंतचा परिसरात धुणे धुणाऱ्यांची गर्दी असते. ही गर्दी गुरुवारीही सुरूच होती. टाळकुटेश्वरपासून पुढे नदीपात्रात घाट नसल्यामुळे पुढे वाहने आणि कपडे धुतले जात नसले तरी तपोवनाचा घाटही धोबी घाट झालेला आहे.

प्लास्टिक कचराही नदीत

रामकुंड परिसरात वगळता गोदापात्रातील सर्वच भागात नेहमी प्रमाणे कचरा साचलेला आहे. गांधी तलावाच्या दक्षिण यशवंतराव महाराज मंदिराच्या मागील बाजूला अजूनही कचऱ्याचे ढिगारे पडलेले दिसतात. येथे कचरा टाकणाऱ्यांवर अजूनही अंकुश ठेवता आला नाही. काही ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आलेले असले तरी कलशाऐवजी त्याच्याशेजारी कचरा टाकण्यात धन्यता मानली जाते. प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात असल्याने तो उडून गोदापात्रातील पाण्यात पडतो. हा कचरा रोकडोबा मैदानासमोरील नदीपात्रात जमा झालेला दिसतो. गौरी पटांगणाजवळचा गोदापात्राचा भाग जणू वाहने धुण्यासाठीच राखीव ठेवलेला आहे की काय, अशा पद्धतीने येथे वाहने धुण्यासाठी गर्दी झालेली असते.

कपडे धुण्याच्या जागा

गांधी तलाव, दुतोंड्या पुलाच्या दक्षिणेकडील भाग, यशवंतराव महाराज पटांगणाच्या पूर्वेचा भाग, जुन्या भाजीबाजाराजवळील भाग, रामसेतू पूलाखालील भाग, कपुरथळा मैदानाच्या पूर्वेकडील भाग, म्हसोबा पटांगणाच्या पश्चिमेचा भाग, गाडगे महाराज पुलाखालील भागात, गौरी पटांगणाच्या पश्चिमेचा भाग, मुक्तेश्वर शिवलिंगाजवळील भाग, टाळकुटेश्वर मंदिराजवळील भाग, नवीन सिंहस्थ मार्गाजवळील श्रद्धा लॉन्सच्या समोरील भाग.

वाहने धुण्याच्या जागा

गाडगे महाराज पुलाखालील भाग, गौरी पटांगणाच्या पश्चिमेचा भाग, नवीन सिंहस्थ मार्गाजवळील श्रद्धा लॉन्ससमोरील भाग

कचरा टाकण्याच्या जागा

रामकुंडाजवळ पुरोहित संघाच्या कार्यालयासमोरील भाग, गांधी तलावाजवळ यशवंतराव महाराज मंदिरामागील भाग, गंगाघाट रस्त्यालगत सुलभ शौचालयाच्या शेजारी भाग, म्हसोबा पटांगणाच्या पूलालगत, रोकडोबा मैदानासमोरील भाग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडिलांना नाही, पण मुलांना पैसे द्या

$
0
0

ग्राहक मंचाचे एलआयसीला आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल आठ वर्ष शिक्षा भोगणारा पती हिंदू कायद्याप्रमाणे वारस ठरत नाही. त्यांच्या मुलांनीही १३ ते १४ वर्षांनंतर दावा दाखल केल्यामुळे तो मुदतीत नसल्याचे सांगत एलआयसीने विमा दावा फेटाळला होता. यावर एलआयसीला ग्राहक न्यायमंचाने दणका देत वारसदारांना पाच लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे मानसिक त्रासापोटी सात हजार व अर्जाचा खर्च पाच हजार असा १२ हजारांचा दंड ठोठावला आहे.

हा निकाल देताना मंचाने विमा पॉलिसीची रक्कम संबंधितांस देण्यासाठी आपली जबाबदारी टाळून संयुक्त‌िक नसलेली वेगवेगळी कारणे पुढे करुन विमा कंपन्यांकडून विमा दावे नाकारले जातात, ही बाब गंभीर असून ग्राहक हिताच्याविरुध्द असल्याचे म्हटले आहे. वैद्यकीय व्यवसाय करणारे सतीश देशमुख, त्यांचा मुलगा परिक्षित व मुलगी रुही देशमुख यांनी संयुक्तपणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात भारतीय जीवन विमा निगमविरुध्द (एलआयसी) तक्रार दाखल केली होती. देशमुख परिवाराच्या वक‌िलांनी युक्तिवाद केला की, सतीश देशमुख यांनी शिक्षा भोगलेली आहे. त्यामुळे पत्नीने घेतलेल्या पॉलिसीची रक्कम त्यांना मिळावी यासाठी अर्ज दिला होता. पण एलआयसीने हिंदू सक्सेशन अॅक्ट, १९५६ च्या कलम २५ नुसार पॉलिसीची रक्कम देता येणार नाही, असे कारण पुढे करत विमा दावा नाकारला. त्यानंतर मुलगा व मुलीला विमा रक्कम मिळावी म्हणून अर्ज केला. पण तोही नाकारण्यात आला. या तक्रारीवर एलआयसीने मात्र सतीश देशमुख यांनी पत्नी भारतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल होऊन गुन्हा शाबीत झाल्याने आठ वर्ष शिक्षा दिली आहे. त्यामुळे हिंदू वारसा कायद्याने वारस ठरत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या मुला-मुलीने १३ ते १४ वर्षांनंतर दावा दाखल केला. तो मुदतीत दाखल न केल्यामुळे हा दावा नाकारला आहे. त्यामुळे हा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा, असे म्हटले.

या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने हिंदू कायद्याप्रमाणे सतीश देशमुख वारस म्हणून अपात्र असल्याचे मान्य केले. पण पॉल‌िसीधारक मयत झाली तेव्हा त‌िचा मुलगा व मुलगी अज्ञान होते. ते जेव्हा सज्ञान झाले, तेव्हा त्यांनी पॉलिसी रकमेची एका वर्षातच मागणी केली आहे. पण एलआयसीने पॉलिसी रक्कम देण्याचे नाकारले. त्यामुळे ही सेवेत कमतरता असून, पॉलिसीची रक्कम देण्यात यावी, असे आदेश दिले. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे -कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी दिला. देशमुख परिवाराकडून अॅड. वाय. बी. इंगळे यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ट्रु व्होटर’ ठरतेय डोकेदुखी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , मालेगाव

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाकडून १४ मार्च रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर मतदारांकडून हरकती मागविण्यात आल्या आहेत. यासाठी ट्रृ व्होटर या अॅपचा वापर करण्यास सांगितले आहे. मात्र गेल्या तीन दिवसांत केवळ दोनच हरकती दाखल झाल्या आहेत. शनिवार, १८ मार्चपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. अनकांना हे अॅप हाताळता येत नसल्याचे समोर आले आहे.

गेल्या दोन दिवसात अनेक मतदारांकडून मतदार यादीतील नावे स्थलांतरित झाल्याची हरकत घेण्यात येत आहे. येथील माजी महापौर मलिक युनुस इसा यांनीदेखील या यादीवर हरकत घेतली आहे. तसेच कलेक्टरपट्टा भागात राहणारे मतदारांनीदेखील निवेदनाद्वारे नावे दुसऱ्या यादीत स्थलांतरित झाल्याबाबत हरकत नोंदवली आहे.

महापालिका प्रशासनाकडून १४ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर ट्रृ व्होटार या मोबाइल अॅप्लिकेशनद्वारेच हरकती नोंदवता येणार असल्याने स्मार्टफोन युजर नसलेल्यांना अडचणी येत आहेत. १४ व १५ मार्च या दोन दिवसांत या अॅप्लिकेशनद्वारे केवळ दोन हरकती आल्याची माहिती निवडणूक सहाय्यक अधिकारी राजू खैरनार यांनी दिली. पालिकेकडून यासाठी प्रभाग कार्यालयात तांत्रिक सहाय्यक देण्यात आले आहेत. दोन दिवसात अनेक मतदारांनी ऑफलाइन पद्धतीने हरकती नोंदवल्या आहेत.

…अन्यथा आंदोलन करणार

कलेक्टरपट्टा भागातील मतदारांनीदेखील प्रभाग ११ मधील मतदारांची नावे प्रभाग १० मध्ये असल्यामुळे हरकत नोंदवली आहे. हे सर्व मतदार गेल्या अनेक वर्षांपासून कलेक्टरपट्टा भागातील रहिवासी असून या भागातून ते मतदान करीत आहेत. मात्र प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत ही नावे स्थलांतरित झाली असून, यामुळे मतदानापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. प्रशासनाने दखल घेवून यादीत दुरुस्ती करून मुळच्या पत्यावर प्रभाग क्र ११ मध्ये त्वरित स्थलांतरित करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या निवेदनावर संजय दुसाने, विनोद वाघ, कैलास तिसगे, जयराज बच्छाव, अजिंक्य भावसार आदींसह मतदारांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदारांची नावे झळकली चौकाचौकात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपरिषदेने कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. वारंवार सूचना देवूनही कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांच्या नावांची यादी पोस्टरद्वारे चौकाचौकात लावून पालिका प्रशासनाने थकबाकीदाराविरूद्ध जप्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची थकबाकीदारांची यादी चौकाचौकात लावल्याने संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला आहे. नगरपालिकेकडून विकासकामांची अपेक्षा करायची आणि दुसरीकडे करभरणा टाळायचा हा प्रकार थांबविण्यासाठी पालिकेने उचलेले हे पाऊल स्वागतार्ह असल्याचे शहरवास‌ीयांचे म्हणणे आहे. शहरातील मुख्य चौकांत लावलेल्या थकबाकीदारांची नावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून प्रत्येकजण आपल्या ओळखीची नावे आहेत का याची खातरजमा करतांना दिसत आहेत.

काही मालमत्तांना सील
पालिकेने राबविलल्या या उपक्रमांचे शहरवासीयांनी स्वागत केले असून, मुदतीत कर भरल्यास थेट मालमत्ता सील करण्याची कारवाई पालिका प्रशासन करणार असल्याचे सांगण्यात येत असून, शहरातील काही मालमत्ता यापूर्वीच सील करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रहाडींचे खोदकाम, रंगांची तयारी पूर्ण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिकचा रंगोत्सव हा रहाडींमुळे प्रसिद्ध आहे. या रहाडींना शकडो वर्षांचा इतिहास आहे. रंगोत्सवासाठी खुल्या होणाऱ्या दगडी बांधणीच्या रहाडींची संस्कृती अनुभवली. पंचवटीतील शनिचौकात असलेल्या रहाडीच्या खोदायच्या कामाची पाहणी करीत रहाडीविषयी माहिती येथील पदाधिकाऱ्यांकडून करून घेतली. त्यानंतर दिल्ली दरवाजा आणि तांबट लेन येथील रहाडींची पाहणी केली.

शनिचौक येथे झालेल्या या पाहणीप्रसंगी प्रा. रामनाथ रावळ, सुनील महंकाळे, अविनाश दीक्षित, नितीन देशमुख, नंदकिशोर मुठे, प्रशांत पाटील, हेमंत पाटील आदी उपस्थित होते. शनि चौकातील रहाडीविषयी माहिती देताना सुनील महंकाळे म्हणाले, रहाडीतील रंगपंचमी नाशिकची खासियत आहे. शनी चौकातील रहाड ही १२ बाय १२ फुटाची असून, आठ फूट खोलीची आहे. ही रहाड रंगपंचमीनंतर पूर्णपणे मातीने बुजविली जात नाही. रहाडीत निम्म्यापर्यंत रंगाचे पाणी तसेच ठेवले जाते. त्यावर सागवान लाकडी बल्ल्या ठेवल्या जातात. त्यावर ऊसाचे चिपाड टाकून वर माती टाकली जाते आणि डांबरीकरण केले जाते.

रहाड खोदल्यानंतर त्यातील जुने पाणी काढून संपूर्ण रहाड स्वच्छ धुवून काढली जाते. रंग तयार केल्यानंतर रहाडीची अविनाश दीक्षित यांच्या हस्ते विधीवत पूजा केली जाते. चौकातील शनीच्या मूर्तीला आणि त्यानंतर रास्ते तालिम संघाच्या मारुतीला रंगाने न्हाऊ घातले जाते. रंगाची पूजा करून त्यात प्रथम अविनाश दीक्षित हे उडी घेतात. दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसहापर्यंत रहाडीत रंग खेळला जातो. पुरुष व तरुणांना उत्तरेच्या बाजूने तर लहान मुलांना पूर्वेच्या बाजूने रहाडीत उडी मारता येऊ शकते. या रहाडीत महिला आणि मुलींना उड्या मारण्याची परवानगी नसते. त्यांना रंग खेळण्याची इच्छा असेल तर रहाडीतून बादलीभर रंग देण्यात येतो. तो त्यांनी स्वतःच्या अंगावर टाकून घ्यावा असे सांगितले जाते. रहाडीत रंग खेळताना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली जाते.

प्रा. रावळ म्हणाले, रंगपंचमीला पुरातन काळापासून महत्त्व असल्याचे पौराणिक व ऐतिहासिक पुरावे आहेत. रहाडीची परंपरा जोपासणारे नाशिक हे एकमेव शहर असावे. नाशिकने ही शेकडो वर्षांची परंपरा जपली आहे. नाशिकमध्ये १८ रहाडी असल्याची नोंद आहे. त्यात तीन रहाडी दरवर्षी खोदल्या जातात. यंदा तांबटलेनमधील रहाड खोदण्यात आली. चार रहाडीचे अस्तित्व टिकून आहे. या रहाडीत रंग खेळल्याने उन्हाळा बाधत नाही, असेही म्हटले जाते.


रंगही ठरलेले

रंगपंचमी खेळण्याची नाशिककरांची पद्धत काही औरच आहे. पेशवेकालीन रहाड आहेत. शनिचौक, पंचवटीतील रहाडींत गुलाबी रंग असतो. गाडगे महाराज पुलाजवळ पिवळा रंग आणि रोकडोबा तालिम संघ, तिवंधा येथे केशरी- नारंगी रंग असे या रहाडींच्या रंगांचे वैशिट्ये आहेत. विधीवत पूजा करून रंग उकळून टाकला जातो. यात उडी मारली की निदान दोन दिवस तरी रंग जात नाही. हजोरो लोक यात उड्या मारतात. रंगात अंघोळ करतात.

रहाड म्हणजे काय?

रहाड म्हणजे पूर्वी गल्लीतील तालिम. या तालमीत पहिलवान मंडळींच्या गटा-तटांची शक्ती प्रदर्शनाची जागा होती. रंगपंचमीच्या निमित्ताने रहाडीवर किरकोळ हाणामाऱ्या होत असायच्या. यावरूनच ‘राहाडा’ हा शब्दप्रयोग दोन समुहातील भांडण या अर्थाने मराठी भाषेत रुढ झाला. रंगपंचमीच्या दिवशी पक्का नाशिककर रहाडीवर जाऊन रंगात उडी मारुन येण्याची प्रथा रुढ झाली, ती अजूनही पाळली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसाहतीला रस्ता, मग रुग्णालयाला का नाही?

$
0
0

मनपा दुजाभाव करीत असल्याचा कामगारांचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेच्या हद्दीत असलेल्या अनेक शासकीय वसाहतींमध्ये रस्त्यांची कामे होत असतात. परंतु, केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेली कार्यालये महापालिकेकडून दुर्लक्षित केली जातात. याचे उदाहरण म्हणजे सातपूर पोलिस स्टेशन व लागून असलेल्या वसाहतीला चक्क काँक्रिटीकरणाचे रस्ते केले आहेत. परंतु, कामगार उपचार घेत असलेल्या कामगार विमा योजना रुग्णालयाचा रस्ता खड्ड्यात गेला आहे. यामुळे पोलिस वसाहतीला रस्ता मात्र कामगार रुग्णालयाला का नाही, असा सवाल कामगारांकडून उपस्थित केला जात आहे.

यात महापालिका दुजाभाव करत असल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे. महापालिकेने तात्काळ कामगार विमा रुग्णालयाच्या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने कामगार रुग्णालयात अनेक वर्षांपासून मंजूर असलेली पदे रुग्णालयात भरण्यात आलेली नाहीत. यामुळे कामगारांसह डॉक्टर व त्याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

यात भर म्हणून कामगार रुग्णालयाचा रस्त्यावरील प्रवास खडतर झाला आहे. एकीकडे सातपूर पोलिस स्टेशनला व वसाहतीला महापालिका काँक्रिटीरणाचा रस्ता बनवून देते. परंतु, दुसरीकडे कामगारांना आरोग्य सुविधा देणाऱ्या कामगार विमा रुग्णालयाकडे मात्र महापालिकेने दुर्लक्षच केल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कामगार रुग्णालयात प्रवेश करताना सर्वांनाच खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. रस्त्याची दुरूस्ती करावी यासाठी प्रशासनाकडून अनेकदा केंद्राकडे मागणी करण्यात येते. मात्र त्याकडे कोणीही लक्ष घालत नसल्याचे प्रशासनाचेच म्हणणे आहे. स्थानिक नगरसेवकदेखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कामगार रुग्णालयात जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याकडे महापालिकेने लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करण्याची गरज आहे.

-कैलास मोरे, सदस्य, कामगार विकास मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फळभाज्यांपासून बनविले रंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. मात्र यंदा बाजारातून महागडे आणि रसायन मिश्र‌ित रंगांचा वापर घातक ठरू शकतो. हे टाळण्यासाठी वैनतेय विद्यामंदिरातील शिक्षक गोरख सानप यांच्या संकल्पनेतून फुलांच्या पाकळ्या, बीट, पालक, मेंदी, मुळा, हळद, डाळीचे पीठ आदींतून रंग तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यातून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक रंगपंचमीचे महत्त्व पटवून देण्यात आले.

रंगपंचमीमुळे बाजारपेठ रंगबिरंगी रंगांनी सजली आहे. विविध प्रकारच्या पिचकाऱ्या बालमनावर भुरळ घालत आहेत. मात्र बाजारातील रंग रंगपंचमीचा बेरंग करू शकतात. या रंगांमध्ये ऑक्साईड कॉपर सल्फेट, अॅल्युमिनिअम ब्रोमाईट, पर्शियन निड, मर्क्युरी सल्फाईड अशी विषारी रसायने टाकलेली असतात. या रंगांमुळे त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांची जळजळ, त्वचेचा कर्करोग, डोळ्यांना सूज, पोटात गेल्यास पचनाच्या तक्रारी तसेच जुलाब-उलट्या, मळमळ होऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगपंचमीचा सण साजरा करण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.

पालकाच्या भाजीपासून हिरवा, हळदीपासून पिवळा, टॉमेटो, बीट व डाळिंबाच्या सालींपासून लाल, गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलाबी, मुळ्यापासून दुधी अशा रंगांचा वापर करून रंगपंचमीचा सण इको फ्रेंडली पद्धतीने साजरा करू शकतो, हे या कार्यशाळेतून मांडण्यात आले. अध्यक्ष प्रल्हाद पाटील-कराड, सचिव रतन वडघुले, निफाडच्या गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी एस. बी. थोरात, केंद्रप्रमुख सोमनाथ चित्ते, अलका जाधव यांनी विद्यार्थ्यांंचे कौतुक केले.

येवल्यात आज रंगणार ‘रंगयुद्ध’

येवला : शहरातील अनेक वैशिष्ठ्यांपैकी एक मोठी खासियत म्हणजे दरवर्षी रंगपंचमीला शहरात सायंकाळी होणारे सामुदायिक रंगांचे सामने. गतवर्षीच्या एका ब्रेकनंतर यंदा पुन्हा हे सामने रंगणार असून शुक्रवारी सायंकाळी हे सामने होणार आहेत. टिळक मैदानावर पहिला, तर त्यानंतर डी. जे. रोडवर दुसरा सामना होणार आहे. ऐतिहासिक टिळक मैदानात सायंकाळी पाचच्या सुमारास हजारोंच्या संख्येने जमणारा जनसमुदाय अन् दुतर्फा ट्रॅक्टरवरील पिंपातून परस्परावर रंगाचा जोरदार वर्षाव करीत जणू काही रंगणारे ‘रंगयुद्ध’. गतवर्षी दुष्काळाच्या चपाट्यात सापडल्यामुळे येवल्यात रंगांचे सामने होऊ शकले नव्हते. यंदा मात्र रंगपंचमीच्या संध्येला परंपरेप्रमाणे सामुदायिक रंगाचे सामने होणार आहेत. टिळक मैदानावर सायंकाळी पाच वाजता, तर लगेचच दुसरा सामना डी. जी. रोड येथे होणार असल्याचे रंगपंचमी उत्सव समितीने पत्रकाद्वारे कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेश गायधनी यांचा अर्ज ठरला अवैध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयात २ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी गुरुवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यात अध्यक्षपदासाठी तीन, उपाध्यक्ष पदासाठी सात तर कार्यकारिणीसाठी ७९ अर्ज वैध ठरले आहेत. यात अध्यक्षपदासाठी दुसऱ्या पॅनलमधून उभे असलेल्या सुरेश गायधनी यांचा अध्यक्षपदाचा अर्ज अवैध ठरवल्याने अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

अध्यक्षपदासाठी प्रभाकर कुलकर्णी, विलास औरंगाबादकर व मधुकर झेंडे यांचे अर्ज वैध ठरले तर उपाध्यक्ष पदासाठी नानासाहेब बोरस्ते, प्रभाकर कुलकर्णी, कांतीलाल कोठारी, आकाश पगार, किशोर पाठक, रमेश जुन्नरे, अरुण नेवासकर असे सात अर्ज वैध झाले आहेत. त्याचप्रमाणे कार्यकारी मंडळासाठी ७९ अर्ज वैध ठरले आहेत. अध्यक्षपदासाठी उभे असलेले सुरेश गायधनी यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. अध्यक्षपदासाठी उभे असलेले तीनही उमेदवार एकाच पॅनलचे असल्याने यातून दोन जण माघार घेतील व ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वाचनालयाच्या निवडणुकीतील चुरस वाढत असून हेवेदावे, आरोप प्रत्यारोप यांनी महापालिकेच्या निवडणुकीची सीमा वाचनालयाने ओलांडली असल्याची चर्चा साहित्यक वर्तुळात होताना दिसते आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार गुरुवारच्या अर्ज छाननीनंतर अर्ज माघारी घेण्यासाठी १७ मार्च ते १९ मार्च हे दिवस देण्यात आले आहेत. २० मार्च रोजी माघार घेतल्यानंतर अंत‌िम यादी प्रसिध्द केली जाणार असून, २१ मार्च रोजी चिन्हांचे वाटप होणार आहे. २ एप्रिल रोजी निवडणूक होणार असून ३ रोजी निकाल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याचे बछडे पिंजऱ्यात कैद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील जळगाव परिसरात गेल्या एक महिन्यापासून दहशत माजवणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. जळगाव येथे बिबट्याचे अनेकदा दर्शन झाले होते. शिवाय काही शेळ्यांनाही बिबट्याने फस्त केले होते. वन विभागाने निफाड प. स. चे माजी सभापती सुभाष कराड यांच्या जळगाव काथरगाव रस्त्यावरील असलेल्या उसाच्या शेतात पिंजरा लावला होता. गुरुवारी पहाटे बिबट्याचे बछडे या पिंजऱ्यात जेरबंद झाले. परिसरातील शेतकऱ्यांना याबाबत कळताच त्यांनी येवला वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे यांना कळविले. ढोकरे यांच्यासह विंचुरचे वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक दिलीप अहिरे, विजय लोंढे, भैय्या शेख, पिंटू नेहरे, भारत माळी आदींचे पथक कराड यांच्या शेतात पोहचले.गेल्या काही दिवसात जळगाव, सुंदरपूर परिसरात बिबट्याने मोटार सायकलस्वारांचा पाठलाग केला होता. तर ११ मार्चला जुन्या सुंदरपूर रोडवर बिबट्याने भर दिवसा शेळी फस्त केली होती. एक वर्षाचे बछडे पिंजऱ्यात जेरबंद झाले असले तरी अजून एक मादी बिबट्या व एक बछड्याचा या परिसरात वावर असल्याने वन विभागाने सांगितले. यासाठी वनविभागाने कराड यांच्या शेतात पिंजरा लावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलशुद्धीकरण प्रकल्पात फुलली बाग!

$
0
0

‘मटा’तर्फे रविवारी तपोवनातील मलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सांडपाणी व मलशुद्धीकरण प्रकल्प म्हटले की, अस्वच्छता, घाण अन् सहन न होणारी दुर्गंधी, अशी प्रत्येकाची कल्पना असते. त्यामुळे तेथे जाऊन तो प्रकल्प पाहणे तर लांबच राहिले. मात्र हा नागरिकांचा दृष्टीकोन बदलावा म्हणून महापालिकेचे अधिकारी येथे राबताना दिसतात. दररोजच्या कामाशिवाय या प्रकल्पात येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने बाग फुलविण्यात आली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्यांचे मलशुद्धीकरण प्रकल्पाबाबतचे मतपरिवर्तन होताना दिसते. त्यामुळे हा प्रकल्प आवर्जून पहावा असाच आहे. त्यामुळे ‘सांडपाण्याचे नेमके काय होते?,’ हे जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने जागतिक पाणी दिनानिमित्त रविवारी, १९ मार्चला तपोवनातील मलशुद्धीकरण केंद्राला भेटीचे आयोजन केले आहे.

‘गोदावरीशी नाते जोडूया’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र टाइम्स, नाशिक महापालिका व इंडियन इन्स्ट‌िट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, मोहाली यांच्यातर्फे तपोवनातील मलशुद्धीकरण केंद्रात सकाळी ९ वाजता भेटीचे आयोजन केले आहे. २००३ मध्ये सुरू झालेल्या प्रकल्पात कर्मचाऱ्यांच्या मदतीने विविध फुलांची व तुळशीच्या रोपांनी बाग फुलविण्यात आली आहे. प्रकल्पाला देश विदेशातील अभ्यासक भेट देतात. हिरव्यागार परिसरामुळे दुर्गंधीचा कोणताही त्रास होत नाही, असे सेक्शन इंजिनीअर संदेश ठाकूर व प्लांट इनचार्ज अन‌िल कुलकर्णी यांनी सांगितले.

यावेळी महापालिकेचे अधिकारी डेप्युटी इंजिनीअर बी. एस. बागूल, एक्झ‌िक्युटीव्ह इंजिनीअर बाजीराव माळी, सेक्शन इंजिनीअर संदेश ठाकूर व प्लांट इनचार्ज अन‌िल कुलकर्णी उपस्थित नाशिककरांना मलशुद्धीकरण प्रकल्पाची माहिती करून देण्याबरोबर हा प्रकल्प पाहता येणार आहे. याशिवाय आपल्या प्रश्नांना महापालिकेचे अधिकारी उत्तरेही देणार आहेत. तसेच पाण्याशी संबंधित काम करणाऱ्या संस्था, संघटनेचे प्रतिनिधीही संवाद साधणार आहेत. यात आर्किटेक्चर अॅण्ड सेंटर ऑफ डिझाइन कॉलेजच्या प्राचार्या व जलतज्ज्ञ डॉ. प्राजक्ता बस्ते, गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे राजेश पंडित, गोदाप्रेमी नागरिक सेवा समितीचे संस्थापक देवांग जानी, इको हाऊसिंगचे तज्ज्ञ नरेश भडकवाडे व मोहाली (हरियाणा) येथील इंडियन इन्स्ट‌िट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च या संस्थेच्या विद्यार्थीनी शिल्पा डहाके यांचा समावेश आहे.

तपोवनातील प्रकल्प कसा आहे?

-मलशुद्धीकरण प्रकल्प २००३ मध्ये सुरू झाला.

-२००३ मध्ये त्याची क्षमता ७८ एमएलडी होती.

-२००५ मध्ये ५२ एमएलडीने क्षमता वाढवून ती १३० एमएलडी झाली.

-तपोवन प्रकल्पातून ३० ते ४० क्युबिक मिटर खत निर्मिती होते.

-प्रकल्पातून १५०० क्युबिक मिटर मिथेन तयार होतो.

-मिथेनचा वापर बायोगॅस इंजिनमध्ये केला जातो.

-बायोगॅस इंजिन ६०० केडब्लूएच वीजनिर्मिती करते.

-प्रकल्पात निर्मिती विजेचा वापर प्रकल्पासाठीच केला जातो.

- प्रकल्पात ४४ कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करतात.


तपोवन मलजलशुद्धीकरण प्रकल्प

वेळ : सकाळी ९ वाजता.

नाव नोंदणीसाठी संपर्क :

७०८७१९०७३८ / ८३८००९८१०७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मधुकर पिचड यांचे जातप्रमाणपत्र वैधच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर पिचड यांचे जातप्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाने वैध ठरवल्यानंतर जातपडताळणी समितीने गुरुवारी अखेर त्यांना जातवैधतेचे प्रमाणपत्र बहाल केले. यामुळे पिचड हे आदिवासी असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पिचड यांनी गुरुवारी समितीकडून प्रमाणपत्र स्वीकारल्याने आता त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचड यांनाही दिलासा मिळाला आहे. आदिवासी समाजासाठी संघर्ष केल्याने काहींचे हितसंबध दुखावले गेले होते. त्यांनीच आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पिचड यांच्या आदिवासी जात प्रमाणपत्राला आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे पिचड यांच्या अडचणी वाढल्या होत्या. कोळी महादेव आदिवासी समाजात मोडत नसल्याचा आरोप करत, हायकोर्टासह सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने पिचड आदिवासीच असल्याचे सांगत, त्यांना कोळी महादेव जातप्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी नाशिकच्या समितीने पिचड यांना आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर पिचड समर्थकांनी आदिवासी भवनाबाहेर जल्लोष करत, त्यांचा विजय साजरा केला. या वेळी पत्रकारांशी बोलताना पिचड यांनी सत्याची लढाई जिंकल्याची भावना व्यक्त केली. खऱ्या आदिवासींसाठी काम केले, यासाठी मला विरोध झाला. माझ्या विरोधात षडयंत्र रचत मी आदिवासी नसल्याचे खोटे आरोप झाले. मात्र, सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांमुळे मी महादेव कोळी असल्याचे सिद्ध झाल्याने हा सत्याचा विजय असल्याचे पिचड या वेळी म्हणाले.

आदिवासी ठरविणारे टाटा कोण?

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी टाटा समितीला सहा महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यावर पिचड यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, ‘आम्ही आदिवासी आहे की नाही हे ठरवणारे टाटा कोण,’ असा सवाल केला. टाटा कन्सल्टन्सीऐवजी गुजरात, आंध्र प्रदेश किंवा कोणत्याही राज्याच्या समितीकडे काम द्या; पण टाटाला काम देऊ नका, अशी मागणी केली. याबाबत २२ मार्च रोजी टाटा समितीसमोर जाऊन आदिवासींची बाजू मांडणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

‘यापुढे निवडणूक लढवणार नाही!’

आदिवासींची शेवटची लढाई आपण जिंकलो असून, त्याचा मोठा आंनद आहे. आपण आदिवासी समाजाचे असल्याचे प्रमाणपत्र मिळवले असले तरी आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे पिचड यांनी जाहीर केले. आदिवासींच्या न्यायापुढे आपण संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे सांगत, विरोधकांचेही त्यांनी आभार मानले. सरकारकडून आदिवासी विद्यार्थ्यांसह समाजासाठी काही चुकीच्या योजना राबविल्या जात आहेत. त्याला आमचा तीव्र विरोध असून, आपण यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

अशी होती तक्रार

मधुकर पिचड हे आदिवासी नसून त्यांनी अधिकाराचा दबाव वापरून आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप विदर्भातील माना जमात मंडळाने केला होता. दशरथ मांडे आणि अनंत तरे या दोघांनी त्यांच्या जातप्रमाणपत्राला औरंगाबाद हायकोर्टात आव्हान दिले होते. आदिवासी समाजात केवळ महादेव कोळी जमात असून, कोळी महादेव अशी जमात नसल्याचा दावा हायकोर्टात केला होता. त्यामुळे हायकोर्टाने पिचड यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द ठरवले होते. त्याला पिचड यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. महादेव कोळी आणि कोळी महादेव एकच असल्याचे पुरावे त्यांनी सुप्रीम कोर्टात दिले होते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने कोळी महादेव ही जमातही आदिवासीच असल्याचे सांगत, पिचड यांना नव्याने जातप्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images