Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चंदू चव्हाण आज धुळ्यात परतणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानच्या कचाट्यातून सुखरूप परतलेला धुळ्याचा जवान चंदू चव्हाण आज, शनिवारी धुळ्यात परतत आहे. चंदू गावी येतोय असे कळताच संपूर्ण खान्देशमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

चंदूला पाकिस्तानच्या सैन्याने पकडले असे कळताच मानसिक धक्का बसून त्याची आजी लिलाबाई यांचे निधन झाले. मात्र चंदू परत येणार की नाही याविषयी खात्री नसतानाही त्याचा भाऊ, आजोबा यांनी चंदूच आजीच्या अस्थींचे विसर्जन करेल असे ठरविले होते. त्यानुसार आता उद्या, रविवारी चंदूच्या हस्ते आजींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे, असे चंदूचा भाऊ भूषण चव्हाण याने सांगितले.

भारतीय सैन्यदलाच्या प्रयत्नांमुळे ३७, राष्ट्रीय रायफल्सचा जवान चंदू सुखरूप भारतात परतला. तब्बल नऊ महिन्यांनंतर तो शुक्रवारी सायंकाळी दिल्ली येथून विमानाने भाऊ भूषणसह इंदूर येथे आणि तेथून कारने बोरविहीर गावी परतणार आहे. आज दुपारपर्यंत चंदू धुळ्यात पोहोचेल. त्यानंतर गावामध्ये त्याची मिरवणूकही काढण्यात येणार आहे.‍

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नर्सिंग होमवर पालिकेची वक्रदृष्टी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्यभरातील सर्व नर्सिंग होम व खासगी रुग्णालयांच्या परवानग्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने जाब विचारल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. मॅटर्निटी, नर्सिंग होम व हॉस्प‌िटल्स चालवण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून परवाना नूतनीकरण करणे आवश्यक असतानाही शहरातील तब्बल ३८३ हॉस्प‌िटल्सनी नूतनीकरण केलेले नाही. पालिकेच्या वैद्यकीय विभागानेच ही आकडेवारी जाहीर केल्याने ही हॉस्प‌िटल्स बेकायदा सुरू असल्याचे समोर आले आहे.
शहरातील ५६६ मॅटर्निटी, नर्सिंग होम व हॉस्प‌िटल्सपैकी केवळ १८३ जणांकडेच परवाना आहे. २७१ हॉस्पीटल्सनी परवानगीसाठी अर्ज केले असले तरी, वैद्यकीय विभागाने त्यांना अद्याप परवाना दिलेला नाही. विशेष म्हणजे १५३ हॉस्पीटल्सनी अद्याप नूतनीकरणासाठी अर्जच केला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागासह हॉस्प‌िटल्सची बेफिकीरी समोर आली आहे.
राज्यातील अनधिकृत मॅटर्निटी, नर्सिंग होम्स व हॉस्प‌िटल्सच्या परवानगीसंदर्भात पुण्यातील अतुल भोसले यांनी अॅड. युवराज नरवणकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी ती दाखल करून सरकारचा राज्यातील किती हॉस्पिटल्स परवानाधारक आहेत, याची आकडेवारी कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. म्हैसाळ येथील घटनेनंतर या परवानग्यांचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग जागा झाला आहे. मुंबई शुश्रृषागृहे अधिनियम, १९४९ व सुधारीत नियम, २००६ अन्वये महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेली रुग्णालये व प्रसुतीगृहांना नर्सिंगहोम रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. दर तीन वर्षांनी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
वैद्यकीय विभागाने शुक्रवारी शहरातील मॅटर्निटी, नर्सिंग होम्ससह हॉस्प‌िटलच्या नूतनीकरणाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात शहरात ५६६ एकूण हॉस्पीटल्स असून, त्यात १८२ मॅटर्निटी होम व ३८४ हॉस्प‌िटल्स आहेत. परंतु, १८२ मॅटर्निटी होमपैकी १०५ मॅटर्निटी होमनीच नूतनीकरण केले आहे. ७७ मॅटर्निटी होम हे नूतनीकरणाविना सुरू आहेत. ३८४ हॉस्प‌िटल्सपैकी केवळ ७८ हॉस्प‌िटल्सनीच आपला परवाना नूतनीकरण केला आहे. ३०६ हॉस्प‌िटल्स विनापरवाना सुरू आहेत. नूतनीकरण केलेल्या ३८३ पैकी २३० हॉस्पिटल्सनी नूतनीकरणासाठी अर्ज केले असून, ते पाइपलाइनमध्ये आहेत. १५३ हॉस्प‌िटल्सनी अद्याप अर्जच केलेले नाहीत.
फायर अॅक्टची अडचण
दरम्यान, परवान्यांच्या नूतनीकरणाला नवा फायर सेफ्टी अॅक्ट कारणीभूत ठरला आहे. कोलकाता येथील दुर्घटनेनंतर आलेल्या या अॅक्टमध्ये हॉस्प‌िटल्सच्या परवानग्या अधिक कडक करण्यात आल्या असून, त्यात २० हजार लिटर पाण्याची टाकी, रस्ता रुंदीसह अनेक अटी टाकण्यात आल्या आहेत. त्या अटी बहुसंख्य हॉस्प‌िटल्सना पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे काही जणांनी कोर्टातही धाव घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना घरे ‌मिळाली, ना गुन्हा दाखल झाला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घरखरेदी केल्यानंतर जीवन सार्थक होण्याचा आनंद कुटुंबाला मिळतो. गरीब असो वा श्रीमंत, घराची ऊब प्रत्येकासाठी महत्वाची असते. मात्र, सध्या पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांना घरखरेदीचे हेच स्वप्न त्रासदायक ठरू पाहत आहे. पोलिसच पोलिसांची तक्रार दाखल करून घेत नाहीत. वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून, लवकरच हा प्रश्न कोर्टापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
आडगाव परिसरातील पोलिस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर पोलिसांसाठी एैसपैस संकुल असावे, यासाठी २०१० मध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सोसायटी स्थापन केली. तब्बल २९४ सदनिका उभारण्यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक मिलिंद भारांबे यांनी पुढाकार घेतला. भारांबे सध्या मुंबईत पोलिस महानिरीक्षक म्हणून वाहतूक विभागाचा कार्यभार पाहतात. भारांबे सोसायटीच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष झाले. स्वतः भारांबे यांनी अग्रस्थानी असल्याने महाराष्ट्र तसेच मुंबई पोलिस सेवेतील तब्बल २८८ जणांनी घरे बुक केली. यात कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश होता. बांधकामाचे भूम‌िपूजन झोकात झाले. २०१२च्या अखेरीस पोलिसांना घर मिळणे अपेक्ष‌ित होते. मात्र, अद्याप सोसायटीने किंवा बिल्डरने सदस्यांना घरांचा ताबा दिलेला नाही. घरांसाठी नाशिकरोड येथील एका राष्ट्र‌ियीकृत बँकेकडून बहुतांश सदस्यांनी कर्ज घेतले. कर्जाचे हप्ते देखील सुरू झाले. एकीकडे घराचा ताबा मिळत नाही, तर दुसरीकडे कर्जाचे हप्ते भरावे लागत असल्याची खंत काही सदस्यांनी बोलून दाखवली. या प्रकरणात मोफ्फा कायद्याचे उल्लंघन केल्याचे अनेक पुरावे सदस्य असलेल्या पोलिसांकडे आहेत. मात्र, यात भारांबे यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव येत असल्याने कारवाई होत नाही. सोसायटीचे सचिव असलेले पोलिस निरीक्षक देवीदास शेळके यांचीही आता दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली आहे.

आमच्याकडे व्हॅट आणि सर्व्हिस टॅक्सची अतिरिक्त रक्कम मागितली जात आहे. २०१२ मध्ये घरे ताब्यात मिळाली असती, तर हे नवीन कर आमच्या माथी आले नसते.
- विनय केदार, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वार तरुण अपघातामध्ये ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव वेगातील दुचाकीसमोर कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर, अन्य एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. ही शरणपूररोडवरील राजीव गांधी भवन जवळ घडली. जखमी विद्यार्थ्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघात गुरुवारी मध्यरात्री घडला.

सागर नारायण कडभाने (२४, रा. रामनगर, सायखेडा, ता. निफाड) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याचा देवेन माळी हा मित्र जखमी झाला आहे. गंगापूररोडवरील मोतीवाला कॉलेजचे हे दोघे विद्यार्थी आहेत. गुरूवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास सीबीएसकडून शरणपूररोडमार्गे ते दुचाकीने (एमएच ४६ एएल ५४१६) कॅनडा कॉर्नरकडे येत असतांना ही दुर्दैवी घटना घडली. राजीव गांधी भवन परिसरातील तनिष्क शोरूमसमोर त्यांच्या भरधाव दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा गेल्याने अपघात घडला. यामुळे भरधाव वेगातील दुचाकी दुभाजकावर आदळली आणि हेल्मेट परिधान न केलेले सागर कडभाने व त्याचा मित्र देवेन माळी दूरवर फेकले गेले. कडभानेच्या डोक्यासह इतर ठिकाणी गंभीर जखमा झाल्यात. अतिरक्तश्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाला. माळी देखील गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास उपनिरीक्षक धर्मेंद्र माळी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदाराला गंडविण्याचा प्रयत्न

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सनद घेतलेली नसताना वकिली करून सामान्यांना गंडा घालणाऱ्या तोतया वकिलाच्या अटकेनंतर अनेक कारनामे समोर येत आहे. तोतया वकिलाने काही वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक व विद्यमान आमदार सीमा हिरे यांनाही याचिका मागे घेण्यासाठी ब्लॅकमेल करीत तब्बल ५० ते ६० लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी आमदार हिरे यांच्या तक्रारीनुसार, गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, यामुळे खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब अनंत चौधरी उर्फ गोपाळ अनंत अडावदकर (रा. मंदार सोसा., गोळे कॉलनी) असे संशयित तोतया वकिलाचे नाव आहे. वकिलीची पदवी नसताना चौधरीने जिल्हा तसेच हायकोर्टात व्यवसाय करीत असल्याचे चित्र रंगवून ज्येष्ठ वकिल रमेश बाफना यांना लाखो रुपयांना गंडविले आहे. अनेक वर्षे मालमत्तेच्या वादात बाफना यांचे हायकोर्टात चौधरीने काम पाहिले. या काळात त्याने बाफना यांच्याकडून मोठी रक्कम उकळली. चौधरीची तोतयागिरी लक्षात आल्यानंतर अ‍ॅड. बाफना यांनी त्याच्या पदवीवर आक्षेप नोंदवित कायदेशीर लढा सुरू केला. यात चौधरीचे पितळ उघडे पडले. कोर्टाने त्याच्या वकिलीस प्रतिबंध घालून अटक करण्याचे आदेश सरकारवाडा पोलिसांना दिले होते. सध्या चौधरी नाशिकरोड कारागृहात आहे. दरम्यान चौधरीचा पर्दाफाश झाल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये चौधरीविरोधात फिर्याद दिली.

२०१२ मध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत असललेल्या हिरे यांच्या समर्थ महिला मंडळाविरोधात चौधरीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. जागेच्या वापराबाबत हा मुद्दा होता. या याचिकेत चौधरीने निवृत्त आयकर आयुक्त, नवी दिल्ली व लिगल प्रॅक्टीशिनल असल्याची नोंद नमुद करून याचिका मागे घेण्याच्या बदल्यात ५० ते ६० लाख रुपयांची लाच मागितली होती. ही जनहित याचिका अद्यापही हायकोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. मात्र, चौधरीला कोणतेही अधिकार नसताना फसवणुकीच्या दृष्टीकोनातून त्याने संपर्क साधल्याचे समोर आल्याने आमदार हिरे यांनी गंगापूर पोलिसांकडे फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदेश पातळीकडे सर्वांच्या नजरा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेत प्रमुख राजकीय पक्षांनी स्थानिक युती व आघाडी करून सत्ता स्थापनेचे मनसुबे आखले असले तरी प्रदेश पातळीवर होणाऱ्या निर्णयामुळे त्यांना ब्रेक लागला आहे. राज्य पातळीवर काँग्रेस व राष्ट्रवादीने राज्यात आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजपाने व शिवसेनेबरोबर प्रदेश पातळीवर युती करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात काय निर्णय होतो यावरच जिल्हा परिषदेच्या सत्तेचा मार्ग सुकर होणार आहे.

जिल्हा परिषदेसाठी प्रदेश पातळीवर होणाऱ्या निर्णयामुळे सर्वांचा तूर्त तरी सर्वांचा गोंधळ वाढला आहे. शिवसेनेची या संदर्भात बुधवारी मुंबईत बैठक झाली असून अद्याप चर्चाच सुरू आहे.तर भाजपाच्या तीन बैठका जिल्हा परिषदे संदर्भात झाल्या आहे. आता अंतिम निर्णय घेण्यासाठी एक बैठक होणार आहे. त्यानंतर राज्याबरोबरच नाशिकचे चित्र स्पष्ट होणार आहे. स्थानिक पातळीवर शिवसेनेने काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्या तर भाजपने राष्ट्रवादी बरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे आखले. पण या सर्व पक्षाच्या या हालचालीला तूर्त प्रदेश पातळीमुळे ब्रेक लागला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ७३ सदस्यांमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक २५ सदस्य निवडून आले. त्याखालोखाल राष्ट्रवादीचे १८, भाजप १५, काँग्रेस ८, माकप ३, अपक्ष ४ सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनासाठी ३७ मॅजिक फिगर लागणार आहे. त्यासाठी शिवसेनेने आपल्या २५ सदस्याबरोबर काँग्रेसचे ८ सदस्य बरोबर घेऊन अपक्ष व माकपच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. तर दुसरीकडे भाजपने आपल्या १५ सदस्याबरोबर राष्ट्रवादीचे १८ सदस्य बरोबर घेऊन अपक्षांशी बोलणी पूर्ण केली. त्यामुळे ऐनवेळी प्रदेश पातळीवर स्थानिक नेत्यांना अधिकार दिल्यास ही आघाडी व युती प्रत्यक्षात येणार आहे. राज्यात काही ठिकाणी शिवसेना व भाजपला एकमेकांची गरज आहे. आघाडीचीही तशीच स्थिती आहे. त्यामुळे प्रदेश पातळीवर होणारे निर्णय भाजप-शिवसेनेला एकत्र करणारा असला तरी राष्ट्रवादी व काँग्रेसची अडचण होणार आहे. शिवसेनेला मात्र निर्णय काही झाला तरी सत्ता स्थापनेची संधी आहे.

पंचायत सभापतीची मंगळवारी निवड
जिल्ह्यात आघाडी व युतीच्या हालाचील सुरू असून १५ पंचायत समितीतही सभापतीच्या हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक तालुक्यातील तेथील राजकीय समीकरण लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे तूर्त ठरले आहे. येत्या मंगळवारी (दि. १४) या निवडणुका होणार असून प्रत्येक तालुक्यात पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार असणार आहे.

स्थानिक पातळीवर आम्ही तयारी केली असली तरी शिवसेना पक्षप्रमुख काय निर्णय देतात त्यावर सर्व अवलंबून आहे. त्यांच्याकडून निर्णय झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली गतिमान होतील.
- दादा भुसे, ग्रामविकास राज्यमंत्री

जिल्हा परिषदेची सर्व जबाबदारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिली आहे. याबाबत रविवारी (दि. १२) चित्र स्पष्ट होईल. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, त्यावर सर्व अवलंबून आहे.
- दादा जाधव, जिल्हाध्यक्ष भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूल व्हॅनमध्ये गॅस भरणारा फरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरगुती सिलिंडरमधील गॅस अवैधरित्या वाहनात भरीत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता संशयित रिकामी व भरलेले सिलिंडर तसेच मशिनरी सोडून फरार झाल्याची घटना बागवानपुरा भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, १४ हजाराच्या साहित्यासह घटनास्थळी उभी असलेली शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी मारुती व्हॅन पोलिसांनी जप्त केली आहे.

बागवानपुरा येथील सार्वजनिक ठिकाणी घरगुती सिलिंडरमधून वाहनात अवैधरित्या गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी पोलिसांनी छापा मारला. मात्र, पोलिस येत असल्याचे समजताच संशयित फरार झाला. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या रिकाम्या व भरलेल्या टाक्या, इलेक्ट्रिक मोटार, लोखंडी टॉलवर मशिन असे वाहनात गॅस भरण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. सुमारे १४ हजार रुपयांच्या या मुद्देमालासह घटनास्थळी उभी असलेली शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी मारुती व्हॅन पोलिसांनी जप्त केली. या व्हॅनच्या मालकाचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक लांडे करीत आहेत.

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ
नाशिकरोड उड्डाणपूल येथे काही महिन्यापूर्वीच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी व्हॅन गॅस लिक झाल्याने जळून खाक झाली होती. सुदैवाने चालकाला विद्यार्थ्यांना वेळीच व्हॅनमधून बाहेर काढता आले. यानंतर, पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाने अनधिकृत गॅस कीट वा इंधन वापर करणाऱ्या चालकांना रडारवर घेतले. मात्र, ही कारवाई थंडावताच पुन्हा अलबेल झाल्याचे चित्र बागवानपुरा येथील कारवाईमुळे समोर आले आहे. भद्रकाली पोलिस जप्त केलेल्या स्कूल व्हॅनच्या मालकाचा तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिकाऊ मेकॅनिक सुसाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शिकाऊ मोटार मेकॅनिककडून अनियंत्रित झालेली बस पंचवटी डेपोतील वाहन परीक्षक कक्षात शुक्रवारी शिरली. या अपघातात पाच जण जखमी झाले. यातील एकास जबर मार लागला आहे. दरम्यान, बस चालविणारा संबंधित मेकॅनिक फरार झाला असून त्याचा उशिरापर्यंत तपास लागला नव्हता.

पंचवटी डेपोत शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. डेपोतील वाहन परीक्षक कक्षात सकाळी साडेनऊच्या सुमारास अरविंद राजे, नानासाहेब पाटील, सतीश कोळी हे आपापली कामे करीत असताना शिकावू मोटार मेकॅनिकने दुरुस्तीसाठी आलेली बस (एमएच १५ एके ८०७१) चालविण्याचा प्रयत्न केला. त्याला मुळात बसचा चालविण्याचा अनुभव नव्हता. तरीही तो बस सुरू करायला गेला. यावेळी सुरू केलेल्या बसवर त्याला नियंत्रित मिळविता आले नाही. वेगाने निघालेली बस थेट समोर असलेल्या वाहन परीक्षक कक्षाला थेट जाऊन धडकली. बसचा आघात इतका जबरदस्त होता की यात पक्के बांधकाम असलेल्या वाहन परीक्षक कक्षाची भिंत कोलमडून पडली. तसेच या कक्षाशेजारीच उभी असलेली मोपेड गाडी या भितींखाली दबली गेली.बसची पुढील काच फुटली. वाहन परीक्षक अरविंद राजे, नानासाहेब पाटील, वाहन नियंत्रक सतीश कोळी, चालक सुनील शिंदे आणि भास्कर साळवे हे पाच जण जखमी झाले. यापैकी राजे यांना जबर मार लागला असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्वरित हलविण्यात आले. अपघाताची बातमी परिसरात वेगाने पसरली. त्यामुळे अनेकांना पंचवटी डेपोमध्ये गर्दी केली. अपघातानंतर शिकाऊ मोटार मेकॅनिकने तेथून पळ काढला. तो अद्याप सापडला नव्हता.

मेकॅनिकचे नाव कळेना!
शिकाऊ मोटार मेकॅनिकचे नेमके नाव काय? तो मूळ कुठला? तो किती दिवसांपासून पंचवटी डेपोमध्ये गाड्या दुरुस्तीचे काम करतो? याबाबत कोणतीही माहिती सायंकाळी उशिरापर्यंत एसटी महामंडळाकडून देण्यात आली नाही. विशेष म्हणजे पोलिसांकडेही माहिती नव्हती. त्यामुळे या प्रकरणी लपवाछपवी तर केली जात नाही ना, अशी एसटी कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

बाहेर अपघात झाला तर आम्ही तातडीने कारवाई करतो. पण हा अपघात आमच्याच डेपोमध्ये झाला आहे. त्यामुळे अंतर्गत विषय असल्याने घटनेची अगोदर चौकशी केली जाईल. कोणी व्यक्ती दोषी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल. बस दुरुस्तीसाठी डेपोत आलेल्या बसकडून हा अपघात झाला आहे.
- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकमध्ये मिशन वसुली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपरिषदेने शुक्रवारी सायंकाळपासून विविध मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कर थकीत असलेल्या अनेक इमारती सील करण्यात आल्या. या धडक मोहिमेने थकबाकीदार धास्तावले आहेत.

नगरपरिषदेने यापूर्वी नोट‌िसा बजावल्या होत्या. त्यानंतर सार्वजन‌िक ध्वनीक्षेपकावरून ८ मार्चपर्यंत बाकी भरण्यासाठी अखेरची मुदत दिली होती. ध्वनीक्षेपकावरून कर थकीत मालमत्ताधारक, भाडे थकीत असलेले व्यवसाय‌िक गाळेधारक यांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे थकबाकीदारांची झोप उडाली. दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षा असल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत शहरात ध्वनीक्षेपकावरून नावे उच्चारणे थांबविले होते.

नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे विभागीय कार्यालय येथील टिळक संकुल इमारतीत आहे. त्यांनी गाळा भाडे भरलेले आहे. मात्र, घरपट्टी भरलेली नाही म्हणून त्यांचे गाळे सील करण्यात आले.
याचसोबत वाणी धर्मशाळा, लाडशाखीय धर्मशाळा, गाडेबाबा धर्मशाळा यांनाही कारवाईस सामोरे जावे लागले. सार्वजन‌िक ध्वनीक्षेपकावरून तसे घोष‌ितदेखील करण्यात आले.

दोन हजार ६३९ मोठे थकबाकीदार

शहरात २ हजार ६३९ मोठे थकबाकीदार आहेत. यामध्ये ५० हजारांपेक्षा जास्त बाकी असेलेल्यांची नावे जाहीर करण्यात येत आहेत. यापुढे त्प्रमुख चौकात नावांचे फ्लेक्स लावण्यात येणार आहेत. आदिवासी सेवा सम‌िती, गजानन महाराज संस्थान, स्वामी समर्थ सेवेकरी इमारत अशा संस्थांकडे लाखोंचे कर थकले आहेत. त्यासोबत शैलेश शाह, सानपंत निंबेकर, युवराज कदम, दिनकर सूयर्वंशी अशी काही टॉप थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रेल्वेच्या सहकार्याने योजना मंजूर करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शहरासाठी करंजवण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करताना, जीवन प्राधिकरण विभागाला निधी देताना शहराचा घटक असलेल्या रेल्वे विभागालाही या योजनेत सामावून घेण्यात यावे. तसेच रेल्वेच्या सहकार्याने वरील योजना मार्गी लावण्याचा निर्णय मनमाड पालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला.

सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पद्मावती धात्रक होत्या. या सभेत मनमाड पालिकेच्या नवीन फिल्टर प्लांटला स्वयंचलित यंत्रणा बसवणे, पाणीपुरवठा विभाग व पथदिवे संदर्भात आवश्यक कामांना मंजुरी देणे, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून पाणी पुरवठाविषयक कामे करणे या कामांना मंजुरी देण्यात आली. मनमाड येथे दर्ग्याचे अतिक्रमण काढताना पालिका प्रशासनाने नगरसेवकांना विश्वासात न घेतल्याचा आरोप विरोधी गटाचे नगरसेवक कैलास पाटील अमजद पठाण नगरसेविका रुपाली पगारे यांनी केला तसेच अतिक्रमण काढताना प्रशासनाकडून नगरसेवकांची नावे का सांगितली जातात असा सवाल उपस्थित केला. यावेळी सत्ताधारी पक्ष शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी पालिका प्रशासनाची भूमिका मांडत काही मुद्द्यांचे खंडन केले. यावेळी अतिक्रमणे नवीन पुतळे कचरा व्यवस्थापन या विषयी चर्चा झाली. नगरसेवक रवींद्र घोडेस्वार, प्रमोद पाचोरकर, महेंद्र शिरसाठ, मयुर बोरसे यांनी चर्चेत सहभाग घेतला. बायोगॅसपासून वीज निर्मिती हा विषय स्थगित ठेवण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात परतताच चंदूच्या भावनांचा बांध फुटला

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। धुळे

पाकिस्तानच्या तावडीतून सहिसलामत सुटलेला '३६ राष्ट्रीय रायफल्स'चा जवान चंदू चव्हाण याने आपल्या धुळ्यातील बोरविहीर या गावी आज तब्बल नऊ महिन्यांनी परतला. बोरविहीर गावच्या भूमीत पाऊल ठेवताच चंदूच्या भावनांचा बांध फुटला आणि चंदूला अश्रू अनावर झाले. चंदूला पाहताच चंदूच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या महिलांचे डोळेही पाणावले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे देखील चंदूसोबत होते.

धुळ्यात पोहोचताच चंदूचे जंगी स्वागत करण्यात आले. मात्र धुळ्यात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम चंदूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन केले आणि त्यानंतर तो बोरविहीर या आपल्या मूळ गावी रवाना झाला. बोरविहीर गावात पोहोचताच चंदूला आपल्या दिवंगत आजीची आठवण झाली. चंदूला पाकिस्तानने ताब्यात ठेवल्याचे कळताच चंदूच्या आजीचे धक्क्याने निधन झाले होते. जो पर्यंत चंदू परतत नाही, तो पर्यंत आजीच्या अस्थींचे विसर्जन करणार नाही असे चंदूच्या भावाने म्हटले होते.

सर्जिकल स्ट्राइकनंतर २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी चंदू नजरचुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. भारताच्या प्रयत्नांनंतर अखेर २१ जानेवारी २०१७ या दिवशी पाकिस्तानने चंदूची सुटका केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा देशसेवेसाठी राहीन तत्पर

$
0
0

पाकिस्तानातून सुखरूप परतलेल्या चंदूचा विश्वास; बोरविहीर ग्रामस्थांचा जल्लोष

म. टा. वृत्तसेवा, धुळे

‘माझी पाकिस्तानातून सुटका करण्यासाठी देशातील सैन्य दलासह, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे मोठे योगदान आहे. मात्र मी देशाच्या रक्षणासाठी पुन्हा तयार आहे. लवकरच सैन्याच्या सेवेत हजर होऊन पुन्हा देशसेवेसाठी तत्पर राहील’, अशी प्रतिक्रिया चंदू चव्हाण यांनी धुळे तालुक्यातील बोरविहीर गावी त्याच्या घरी परतल्यानंतर दिली.

पाकिस्तानातून सुखरूप सुटका झालेला भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण याचे शनिवारी (दि. ११) दुपारी साडेबारा वाजता धुळे शहरातील मालेगाव रोडनजीक शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आगमन झाले. त्याच्यासोबत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे होते. डॉ. भामरे यांनी जवान चंदू चव्हाणची सुटका करून नातेवाईकांसह जिल्हावासीयांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली. चंदू गावी येणार म्हणून गावातील तरुणांसह महिला, ज्येष्ठ नागरिकांनी बोरविहीर गावाच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी केली होती. गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन चंदूला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी चंदूच्या गावी येथे डॉ. भामरे व चंदूचे औक्षण करण्यासाठी महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवान चंदू हा धुळे शहरात दाखल झल्यानंतर त्याठिकाणी भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, गोपाळ केले, अरविंद जाधव, संजय बोरसे आणि धुळे शहरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे स्वागत केले.

आपण चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांना दिलेला शब्द पाळला असून, त्याची पाकिस्तानच्या ताब्यातून सुखरूप सुटका करून घरी परत आणण्यात यश मिळवले आहे.

डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजीच्या पेपरला २१ भरारी पथके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुणवत्ता सुधाराच्या आकडेवारीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इंग्रजी आणि गणित विषयाच्या पेपरवर वॉच ठेवण्यासाठी नाशिक जिल्ह्यात शिक्षण विभागाने यंदा धक्कातंत्र वापरत २१ विशेष पथकांची रचना केली. परिणामी, जिल्ह्यात १५ तालुक्यांतील २१ संवेदनशील केंद्रांवर या पथकातील एकेक पथक इंग्रजीचा पेपर पूर्ण होईपर्यंत तळ ठोकून बसल्याने विद्यार्थी अन् यंत्रणेला चांगलाच घाम फुटला आहे.

राज्य शिक्षण मंडळातर्फे यंदाही कॉपीमुक्त अभियानासाठी पावले टाकली जात आहेत. शनिवारी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. या पेपरसाठी जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांना पथके अचानक भेटी देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, कुठल्या केंद्रांना भेटी देण्यात येतील याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती. अशा केंद्रांची संख्या जिल्ह्यात १४ होती. या रचनेत ऐनवेळी बदल करत जिल्ह्यातील संशयास्पद २१ केंद्रांवर पथकातील २१ जणांच्या तुकडीतील एकेका कर्मचाऱ्याची ड्युटी पूर्णवेळ लावण्यात आली. या केंद्रावर निरीक्षकाच्या रूपाने पूर्ण वेळासाठी पथक उपस्थित असल्याने इंग्रजीच्या पेपरला चांगलीच टाइट फिल्डिंग होती. परिणामी, जिल्हाभरातून अवघ्या ४ ते ५ कॉपी केसेस पथकाच्या हाती लागल्या.

सामान्यत: जिल्ह्यात सहा पथकांची व्यवस्था करण्यात येते. हे पथक संवेदनशील केंद्रांना भेट देऊन पुढची पाहणी करण्यास निघून जाते. मात्र, यंदा इंग्रजी आणि गणित या विषयांना होणारी संभाव्य कॉपी विचारात घेता यावर ‌नियंत्रण आणण्यासाठी २१ विशेष पथकांची पेपर होईपर्यंत ड्युटी नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ अवताडे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

या रचनेसाठी जिल्हा प्रशासनाकडूनही शिक्षण विभागाला मदतीचा हात देण्यात आला होता. इतरत्र मोबाइलहून प्रश्नपत्रिका फोडण्याचे प्रकार घडत असल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांपासून कटाक्षाने मोबाइल्स दूर ठेवण्यात आले. आता १४ मार्च (मंगळवार) ला दहावीचा गणिताचा पेपर होणार आहे. इंग्रजीप्रमाणे याही पेपरला कॉपी केसेस जास्त संख्येने होण्याचा धोका आहे. हे लक्षात घेता इंग्रजीप्रमाणे याही विषयाला अशीच रचना ठेवण्यात येणार असल्याचे अवताडे यांनी सांगितले. मात्र शिक्षण विभागाच्या या भूमिकेचा काही प्रमाणात नाशिक जिल्ह्याच्या निकालावर परिणाम होण्याची भीतीही शिक्षकांच्या वर्तुळात दबक्या आवाजात शनिवारी व्यक्त केली गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खबरदार, महिलांवर रंग उडवाल तर...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात होलिकोत्सव अर्थात चौकाचौकांत पेटणाऱ्या होळीची जय्यत तयारी शनिवारी सुरू होती. होळीनंतर लागलीच धुळवड आणि रंगपंचमी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, या दरम्यान महिलांच्या संमतीशिवाय रंग लावण्याचा अथवा उडवण्याचा प्रकार घडल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

शहरात होळीनंतर रंगपंचमी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. परप्रांतीय बांधव धुळवड उत्साहात साजरी करतात. या काळात महिलांच्या अंगावर रंग उडवण्याचे प्रकार घडतात. महिला अथवा मुलींची इच्छा नसताना रंग उडवण्याचा प्रकार घडल्यास संबंधित व्यक्तीविरोधात थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रविवारी साजऱ्या होणाऱ्या होळीसाठी विविध सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साह आहे. या मंडळांनी पोलिसांकडे त्या संबंधी नोंदही केली आहे. या नोंदीनुसार शहरात मोठ्या स्वरूपाच्या सुमारे ३२९, तर लहान आकाराच्या ७४१ होळ्या पेटवल्या जाणार आहेत. प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षा मोठा असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ४८० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. धूलिवंदनाच्या दिवशी सोमवारी पारंपरिक वीरांची मिरवणूक काढली जाईल. ही मिरवणूक रंगपंचमीपर्यंत असून, रंगपंचमीला गोदा घाटावर हा सोहळा पार पडेल. हा सोहळा पाहण्यासाठी नाशिककर मोठी गर्दी करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपुलावर भीषण अपघात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उभ्या असलेल्या ट्रकवर दुसरा भरधाव ट्रक आदळून झालेल्या भीषण अपघातात चालकासह क्लिनर जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी पहाटे महामार्गावरील द्वारका चौकातील उड्डाणपुलावर झाली. मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव महेशसिंग गंगासिंग (वय २७, रा. भिंडगाव, मध्य प्रदेश) असे असून, क्लिनरचे नाव समजू शकलेले नाही.अपघातात अशोक मांगीलाल चव्हाण (वय २५, रा. रुई, मध्य प्रदेश) जखमी झाला आहे.

गहू भरून पहाटे मुंबईकडे निघालेला मालट्रक (एमएच १८/एए ९९४८) हायवेवर पंक्चर झाला. चालक अमजत शकूर शेरी (वय ३२ रा. मध्य प्रदेश) याने द्वारका चौकातील जिल्हा बँकेसमोरील उड्डाणपुलावर पंक्चर मालट्रक उभा केला. तो पंक्चरचे चाक वेगळे करीत असताना अपघाताची घटना घडली. चालक शेरी व क्लिनर अशोक चव्हाण हे दोघेही चाक बाजूला सारत असतानाच मागून भरधाव आलेल्या (यूपी ७५/एम ५३५३) ट्रकने त्यांच्या ट्रकला जोरदार धडक दिली. चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला. हा ट्रक उभ्या असलेल्या मालट्रकवर आदळल्याने ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. यात ट्रकचालक महेशसिंग गंगासिंग व अनोळखी क्लिनर दबले गेल्याने गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी चालक व क्लिनरला मृत घोषित केले. अतिरक्तस्रावाने दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण टायर अंगावर पडल्याने जखमी झाला आहे. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी चालक महेशसिंग गंगासिग व रस्त्यात हलगर्जीपणे मालट्रक उभ्या करणाऱ्या दुसऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

उड्डाणपूलही धोकादायक

हायवेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल सुरू करण्यात आला. मात्र, उड्डाणपुलावर सातत्याने अपघात होत असून, द्वारका येथे वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. उड्डाणपुलावरील धोकादायक ठिकाणांचा विचार करून संबंधित विभागाने उपाययोजना राबवण्याची मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्नेहनगरमध्ये दुकान फोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी रोड भागातील स्नेहनगरमधील दुकान फोडून चोरट्यांनी गल्ल्यातील सुमारे बारा हजार रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण सुदाम बनकर (रा. दिंडोरी) यांच्या तक्रारीनुसार, बनकर यांचे स्नेहनगर येथील बस स्टॉप परिसरात साई कृषी भांडार नावाचे दुकान आहे. चोरट्यांनी बुधवारी रात्री त्यांच्या बंद दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. गल्ल्यातील सुमारे १२ हजार रुपये लंपास केले. उपनिरीक्षक सावळा तपास करीत आहेत.

ब्युटीपार्लरमध्ये चोरी

ब्युटीपार्लरमध्ये गेलेल्या महिलेच्या पर्समधून तरुणीने १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना चव्हाण मळा भागात घडली. नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी सचिन गवारे (रा. श्रीनगर, वावरे इस्टेट, ठाणे) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ठाणे येथील अश्विनी एका कार्यक्रमासाठी शहरात आल्या होत्या. कार्यक्रमास वेळ असल्याने दुपारी दोनच्या सुमारास त्या चव्हाण मळ्यातील लावण्य ब्युटीपार्लरमध्ये गेल्या असता चोरीचा प्रकार घडला. मेकअप सुरू असताना अन्य ग्राहक म्हणून आलेल्या तरुणीने बाजूला ठेवलेल्या पर्समधून मंगळसूत्र, रोख रक्कम आणि कागदपत्रे असा सुमारे १५,१०० रूपयांचा ऐवज लंपास केला. मेकअप आटोपल्यानंतर गवारे यांना चोरीची घटना लक्षात आली. त्यांनी तातडीने नाशिकरोड पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. सहाय्यक निरीक्षक पी. बी. गोसावी तपास करीत आहेत.

कार्बन नाक्यावर जुगारी गजाआड

औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका भागात सावर्जनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. या कारवाईत एक हजार रुपयासह जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा रचून टाकलेल्या छाप्यात रमेश खंडू जगताप (रा. कार्बन नाका) व त्याचे दोन साथीदार शुक्रवारी दुपारी पोलिसांच्या हाती लागले. संशयित पत्त्यावर पैसे लावून छन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत होते. हवालदार बेंडकोळी तपास करीत आहेत.

महिलेची आत्महत्या

लहवित गावातील योगिता नवनाथ काळे (वय २५) हिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. लहान मुलांसाठी लाकडी आढ्यास बांधलेल्या साडीच्या झोळीने योगिताने गळफास घेतला. हवालदार जगदाळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांना गारव्याची अनुभूती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वातावरणातील गारवा वाढल्याने नाशिककरांना उन्हाच्या झळांपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. गार हवेचा वाहण्याचा वेग वाढल्यामुळे थंडी जाणवत असून वातावरणातील या बदलामुळे आजारपणाच्या तक्रारी भेडसावू लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वातावरणात बदल होत आहेत. काही दिवसांपूर्वी उन्हाच्या तीव्र झळांचा तडाखा असह्य होऊ लागला असतानाच आता थंडी पडावी तसा गारठा जाणवू लागला आहे. शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. १ मार्च रोजी ३६.४ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली होती. असह्य उन्हाच्या झळांनी जीव कासावीस होऊ लागला होता. ३१.१ ते ३६.४ अंश सेल्सियसच्या दरम्यान तापमानाचा पारा राहात होता. साधारणत: होळीपर्यंत थंडी राहाते असे म्हटले जाते. परंतु, यंदा १५ दिवस आधीच उन्हाची धग जाणवू लागली. थंडी गायब झाली असे वाटत असतानाच पुन्हा ती परतली आहे. कोकण, विदर्भात बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळेच वातावरण थंड आणि उष्म हवेचा पट्टा तयार झाला. थंड हवा उत्तर महाराष्ट्राकडे सरकल्याने नाशिकमध्ये थंडी जाणवू लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. रविवारपर्यंत वातावरण ढगाळ राहील तसेच गार हवेमुळे थंडीचा कडाका जाणवेल असा अंदाज जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी वर्तविला असून त्यानंतर मात्र हा जोर ओसरेल असे सांगितले जात आहे. या वातावरणाचा जिल्ह्यातील द्राक्षबागांवर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. थंडीमुळे द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवर विपरीत परिणाम होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभागृह चांगले, पण अव्यवस्थेने नाडले...

$
0
0


अभिजित राऊत, आडगाव

मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे रावसाहेब थोरात ऑडिटोरियम हे सभागृह संस्थेच्या कार्यक्रमांबरोबरच विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यशाळा, चर्चासत्रे आदींसाठी उपलब्ध करून दिले जाते. याशिवाय इतर छोट्या-मोठ्या संस्थांच्या बैठका, विविध पतसंस्थाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा यांच्यासाठी ते खुले करून दिले जाते. मात्र, शहरातील अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या सभागृहाला पुरेशा नियोजनाअभावी काही समस्यांचा विळखा पडल्याचे दिसून येते. प्रामुख्याने या सभागृहासाठी पार्किंगची व्यवस्था असूनही त्याबाबतचे नियोजनच नसल्याने येथे येणाऱ्यांकडून सभागृहासमोरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्याच्या दुतर्फाच वाहने उभी केली जातात. त्यामुळे येथे वारंवार वाहतुकीचा खोळंबा होताना दिसतो.

---

सुविधा मिळतात, पण...

तब्बल ७५० आसनक्षमतेच्या रावसाहेब थोरात ऑडिटोरियमची मुहूर्तमेढ १९८९ मध्ये झाली. त्यानंतर २००१ मध्ये ६,८८८ चौरस फुटांची इमारत तयार झाली. या सभागृहात प्रवेशासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. मात्र, बऱ्याचदा त्यापैकी एकच खुले राहत असल्याने गैरसोय होताना दिसते. व्हीआयपींसाठी विशेष वेटिंग रूमची व्यवस्थाही येथे आहे. या सभागृहात आवश्यकता भासल्यास प्रोजेक्टर, साउंड सिस्टिम उपलब्ध केली जाते. येथे वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम सुरू असतात. त्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक चर्चासत्रे, वार्षिक स्नेहसंमेलने, मविप्र करंडक, राज्यस्तरीय स्पर्धा होतात. मात्र, येथे विविध सुविधा पुरविल्या जात असल्या, तरी बऱ्याचदा त्यांचा दर्जा विविध उपक्रमांना साजेसा राहत नसल्याने स्वतंत्र व्यवस्था करण्याची वेळ संयोजकांवर येताना दिसते.

दुरुस्तीची कामे नित्याचीच

येथे देखरेखीसाठी कायमस्वरूपी कर्मचारी उपलब्ध असूनही सभागृहातील काही खुर्च्या, स्वच्छतागृह व अन्य सामग्रीची काही प्रमाणात दुरवस्था झाल्याचे दिसून येते. परिणामी येथे कायमच छोटी-मोठी दुरुस्तीची काम सुरू असल्याचे दिसते. नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना बैठकांसाठी व गरज भासल्यास सरकारी व सामाजिक कार्यक्रमांसाठी गरजेनुसार हे सभागृह उपलब्ध करून दिले जाते. तीन तासांसाठी साडेबारा हजार आणि संपूर्ण दिवसासाठी साडेबावीस हजार रुपयांमध्ये हे सभागृह उपलब्ध करून दिले जाते.

---

बेशिस्त पार्किंगने विचका

रावसाहेब थोरात सभागृहाशेजारी पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे. पण, त्याच्या वापरासंदर्भात पुरेसे नियोजन केले जात नसल्याचे दिसून येते. त्यातच आजूबाजूचला कॉलेज कॅम्पस आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून, तसेच कार्यक्रमानिमित्त येथे येणाऱ्या नागरिकांकडून सर्रासपणे वाहने बेशिस्तपणे सभागृहासमोरील रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जातात. त्यामुळे अन्य वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा. येथे बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांना शिस्त लावण्याची आवश्यकता निर्माण झाला आहे.

---

प्रवेशद्वाराबाबत व्हावे नियोजन

रावसाहेब थोरात सभागृहाचे प्रवेशद्वार पुरेस रुंद नाही. सभागृहात जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी एकच मार्ग बहुधा खुला असतो. त्यामुळे एकाच वेळी खूप मोठ्याप्रमाणात गर्दी होते. एकच अरुंद प्रवेशद्वार असल्याने गर्दीमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे यासंदर्भात पुरेसे नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

---

नागरिक म्हणतात...

रावसाहेब थोरात सभागृहात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला होतात. त्या अनुषंगाने मोठी आसनव्यवस्था येथे आहे. मात्र, बऱ्याचदा वाहन पार्किंगसह काही बाबींसंदर्भात पुरेसे नियोजनच केले जात नसल्याने येथे येणाऱ्यांना काहीशी गैरसोय सहन करावी लागते. ती दूर करण्याची गरज आहे.

-विजय जगताप, नागरिक

---

रावसाहेब थोरात सभागृहात पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची चांगली सुविधा उपलब्ध आहे. शहरातील इतर सभागृहांच्या तुलनेत या सभागृहात पुरेशी स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी त्यातील उणिवांमुळे अनेकदा येथे येणाऱ्यांना गैरसोय सहन करावी लागते. प्रवेशद्वारात होणारी गर्दी टाळण्याचे नियोजन व्हावे.

-किरण जाधव

---

कलावंत म्हणतात...

रावसाहेब सभागृह हे कॉलेज कॅम्पसजवळ आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येथील कार्यक्रमांचा आनंद घेता येतो. अंकुर फिल्म फेस्टिवलचेदेखील येथे आयोजन करण्यात आले होते. येथील विविध सुविधा समाधानकारक असल्या, तरी प्रवेशद्वार अरुंद आहे. त्यामुळे थोडी गैरसोय होते, ती टाळावी.

-प्रशांत दप्तरे, कलावंत

---

अधिकारी म्हणतात...

संस्थेकडून संस्थेच्या कार्यक्रमांबरोबर इतर वेळेत सामाजिक कार्यक्रमांना प्राधान्याने सभागृह उपलब्ध करून दिले जाते. शासकीय कामांना व बैठकांनादेखील गरजेच्या वेळी सभागृह उपलब्ध असते. सभागृहाची नियमित दुरुस्तीची कामे करून घेतली जातात. मोठी कामे दोन त तीन वर्षांतून करून घेतली जातात.

-विजय काजळे, शिक्षणाधिकारी, मविप्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवडणुकीचा कलेक्टरतर्फे आढावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापौर व उमहापौरपदाची निवडणूक मंगळवारी, १४ मार्च रोजी होत आहे. या निवडणुकीच्या तयारीची जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी पाहणी केली. प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला असून, यावेळी आवश्यक सूचनाही त्यांनी यंत्रणेला केल्या. महापौर निवडणुकीच्या वेळेस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून सुरक्षा व्यवस्थेचीही माह‌िती त्यांनी घेतली.

येत्या मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत असून, महापौर व उपमहापौर पदासाठी हात उंचावून मतदान घेतले जाणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता नाशिककरांच्या नजरा महापौर व उपमहापौर निवडणुकीकडे लागल्या आहेत. येत्या मंगळवारी महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. भाजपला पालिकेत स्पष्ट बहुमत असल्याने भाजपचाच महापौर व उपमहापौर होणार निश्चित आहे. भाजपकडून महापौरपदासाठी रंजना भानसी यांनी तर उपमहापौरपदासाठी प्रथमेश गिते यांनी अर्ज भरला आहे. भाजपला बहुमत असले तरी, बिनविरोध निवडणूक होऊ नये यासाठी आघाडीने आपले उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसकडून महापौर पदासाठी आशा तडवी तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून सुषमा पगारे यांनी अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी होणाऱ्या निवडणूक तयारीचा आढावा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी महापालिकेत येऊन घेतला. यावेळी नगरसचिव ए. पी. वाघ यांच्यासोबत त्यांनी सभागृहाची पाहणी केली. सभागृहात नगरसेवकांची बैठक व्यवस्था, माध्यमांची व्यवस्था तसेच मतमोजणी साठी केलेल्या उपायोजनांची त्यांनी यावेळी माहिती जाणून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांना मिळाला निरोगी आरोग्याचा मंत्र

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुटुंबातील महिलेनेचे अंथरूण धरले, तर घराची पूर्ण घडीच विस्कटते. त्यामुळे महिलांनी स्वत:चे आरोग्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते राखण्यासाठी त्यांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी याच्या महत्त्वपूर्ण टिप्स महिलांना शनिवारी मिळाल्या. निरोगी आरोग्याच्या मंत्राबरोबरच मोफत आरोग्य तपासणीची पर्वणीदेखील साधता आल्याने महिला सुखावल्या. निमित्त होते ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि सुयश हॉस्पिटलच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे.

‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ व सुयश हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी सर्वांगीण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई नाका येथील सुयश हॉस्पिटलमध्ये हे शिबिर झाले. शनिवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ही तपासणी करण्यात आली.

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांचेच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. नोकरदार महिलांना तर नोकरी आणि कुटुंब अशी दुहेरी जबाबदारी पार पाडताना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. महिलांचे आरोग्य बिघडले, तर कुटुंबाचेच स्वास्थ्य बिघडते. म्हणूनच महिलांना निरोगी जीवनाचा मंत्र देता यावा आणि त्यांची आरोग्य तपासणीदेखील करता यावी यासाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला. सुयश हॉस्पिटलचे संचालक डॉ. हेमंत ओस्तवाल यांच्यासह स्त्रीरोगतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

सरप्राइज गिफ्टची भावना

शिबिरात ब्लडप्रेशर, उंची, वजन, रक्त तपासणी, सोनोग्राफी स्क्रीनिंग, ब्लड-शुगर रँडम, कर्करोगनिदानाशी संबंधित पॅप्समिअरसारख्या तपासण्या करण्यात आल्या. सर्व तपासण्यांचे रिपोर्टसदेखील महिलांना लगेचच देण्यात आले. मोफत आरोग्य तपासणी शिबिर हे ‘मटा कल्चर क्लब’ने दिलेले सरप्राइज गिफ्ट ठरल्याची भावना महिलांनी यावेळी आवर्जुन व्यक्त केली. या शिबिरामुळे ‘मटा’सोबतचे नाते अधिक घट्ट झाल्याचेही काही महिला म्हणाल्या.


तणाव निवारणाच्याही टिप्स

महिलांच्या जीवनातही ताणतणाव असतात. हा तणाव निवारण्यासाठी व्यायाम, योगा, मेडिटेशनची नितांत आवश्यकता असल्याचे यावेळी डॉ. ओस्तवाल म्हणाले. महिलांनी स्वत:साठी आवर्जून वेळ द्यायला हवा. सकाळी किंवा सायंकाळी मोकळ्या हवेत फिरायला गेल्याने तणाव निवारणास मदत होते, असेही ते यावेळी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images