Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ग्रामपंचायतीत टांगणार टमरेल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

स्थानिक स्तरावर विविध कल्पनेतून बांधण्यात येणाऱ्या शौचालयामुळे राज्यात शौचालय बांधणी अभियानाने गती घेतली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्यावतीने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांच्या घरातून टमरेल जप्ती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतीत गेल्या दोन दिवसात टमरेल जप्ती अभियान राबविण्यात आले. या अभियानात तालुक्यातून एक हजाराच्या आसपास टमरेल जप्त केले असून, या टमरेलवर उघड्यावर शौचास बसणाऱ्याचे नाव लिहून त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. तसेच हे टमरेल ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावण्याचा निर्णय घेतल्याने उघड्यावर प्रातर्विधीस जाणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर व पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रतिभा संगमनेरे यांच्या आदेशान्वये कळवण पंचायत समितीच्या वतीने ६ आणि ७ मार्च रोजी ही मोहीम राबविण्यात आली. टमरेल घेऊन उघड्यावर बसणाऱ्यांचा नावासह पंचनामा करण्याचा निर्णय पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांनी घेतला आहे. हागणदारी मुक्त गाव योजनेत सहभाग घेतलेल्या तसेच अन्य गावातील नागरिकांचे वारंवार प्रबोधन करूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा अनोखा निर्णय घेतला आहे. या धडक कारवाईत नेमून दिलेल्या गावात गुड मॉर्निंग पथके सकाळीच हजर झाली. एकाच वेळी ८६ गावात ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीप्रश्नावरून बहिष्कारास्त्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन हेतूपुरस्सर टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करून विरोधी नगरसेवकांनी मासिक बैठकीवर बहिष्कार टाकला. नगरसेवकांची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा शीला आहेर यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती. यावेळी सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आल्यानंतर विरोधी गटनेते जितेंद्र आहेर यांनी शहरातील पाणीप्रश्न उपस्थित केला.

गुरुवारी देवळा नगरपंचायतीची मासिक सभा बोलाव‌िण्यात आली. या सभेत शहरातील पाणीप्रश्नावर चर्चा झाली. मागील वर्षी पाणीपुरवठ्यासाठी सुचविलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच शहराला पाणीपुरवठा करण्यास नगरपंचायत प्रशासन अपयशी ठरले आहे. अशीच अवस्था राहिल्यास पुढील काळात शहराला पाण्याचे स्तोत्र असतानाही कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असा आरोप गटनेते जितेंद्र आहेर यांनी केला.

शहराला सध्या देवळा नऊ गाव सामुदायिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहरासाठीच्या जलशुद्ध‌िकरण योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र किरकोळ कामासाठी व नगरपंचायतीच्या अनास्थेपोटी सदर योजना कार्यान्वित होऊ शकलेली नाही. तसेच डोन शिवारातील विहिरीला वीजपुरवठा नसल्याने बंधाऱ्यात पाणी असूनही पाणी उचलण्यास अडचणी येत आहेत. देवळा सामुदायिक पाणीपुरवठा योजनेच्या लोहोणेर येथील मुख्य विहिरीजवळ सात कूपनलिका असल्या तरी किरकोळ दुरुस्तीच्या कामांमुळे त्या बंद आहेत. यासर्व बाबींचा उहापोह आपण मागील मार्च महिन्यातच निवेदनाद्वारे केला होता. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, असेही आहेर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर बिनविरोधची शक्यता मावळली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापौर व उमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महापौर, उपमहापौरपदासाठी प्रत्येकी दोन उमेदवारांनी तीन अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून महापौरपदासाठी रंजना भानसी यांनी प्रत्येकी दोन तर काँग्रेसकडून आशा तडवी यांनी एक अर्ज दाखल केला आहे. तसेच उपमहापौरपदासाठी भाजपकडून प्रथमेश गिते तर राष्ट्रवादीकडून सुषमा पगारे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.

महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक ही १४ मार्चला होत आहे. भाजपचे ६६, शिवसेना ३५, राष्ट्रवादी ६, काँग्रेस ६, मनसे ५, अपक्ष तीन व एक आरपीयचा सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने भाजपचा महापौर व उपमहापौर होणार हे आता स्पष्ट आहे. भाजपतर्फे महापौरपदासाठी रंजना भानसी तर उपमहापौरपदासाठी प्रथमेश गिते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भानसी व गिते यांच्या नावावर कोअर कम‌िटीने शिक्कामोर्तब केल्यानंतर गुरुवारी दोघांनी अर्ज दाखल केले. भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आले. महापौर व उपमहापौर पदाच निवडणुक बिनविरोध होवू नये म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीने अर्ज दाखल करून भाजपचा विजय काही काळासाठी रोखला आहे.

१४ पर्यंत माघार
महापौर व उपमहापौरपदासाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज माघारीसाठी १४ मार्च सकाळी १२ वाजेपर्यंत मुदत आहे. त्यामुळे भाजपकडून शेवटच्या क्षणापर्यंत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिवसेना व मनसेने तटस्थ निर्णयामुळे भाजपला काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु, काँग्रेस व राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने निवड बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.

आघाडीची एकांगी लढत

महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना व मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीने भाजपला एकांगी झुंज देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही पक्षांनी भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करून बिनविरोधला खोडा घातला. महापौरपदासाठी काँग्रेसकडून आशा तडवी तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीतर्फे सुषमा पगारे यांनी अर्ज दाखल केले आहेत. संख्याबळ कमी असले तरी आम्ही विरोधी पक्षाची भूमिका प्रखरपणे लढू असा, दावा काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी केला आहे. महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे भाजपचाच महापौर व उमहापौर होणार हे निश्चित असले तरी, काँग्रेस व राष्ट्रवादीने ही निवडणूक बिनविरोध न होऊ देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेने महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या प्रवर्गातून काँग्रेसकडून प्रभाग १६ मधून आशा तडवी निवडून आल्या आहेत. त्यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी याच प्रभागातून राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या सुषमा पगारे यांनी अर्ज भरला. मुंबई महापालिकेत काँग्रेसने महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. त्याचाच कित्ता नाशिकमध्येही काँग्रेसकडून गिरवला जाणार आहे. आघाडीच्या वतीने उमेदवार मैदानात उतरल्याने आता निवडणूक अटळ आहे. संख्यात्मक पातळीवर या पक्षांकडे बहुमत नसले तरी, सुदृढ लोकशाहीच्या सरंक्षणासाठी निवडणूक लढवून आघाडीने डावपेच आखले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणविरोधी मोहीम लांबणीवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पांझरा चौपाटीबाबत येथील स्टॉलधारक को-ऑपरेटिव्ह सोसायटीने महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी चौपाटी नियमानुकूल करण्यास नकार दिल्याच्या निर्णयावर पुनर्विलोकन अर्ज राज्य सरकारकडे दाखल केला होता. त्यावर नैसर्गिक न्याय तत्वानुसार १ एप्रिलला सुनावणी होईल. त्यामुळेच १ एप्रिलला निर्णय जाहीर होईपर्यंत जिल्हा महसूल यंत्रणेने आज (दि. १०) चौपाटीवर होणारी अतिक्रमण निर्मुलन मोहीम तूर्त थांबवावी, असे निर्देश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी (दि. ९) सायंकाळी दूरध्वनीद्वारे दिले आहेत. त्यामुळे स्टॉलधारकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे चौपाटीवरील कारवाई करू देणार नाही, अशी भूमिका लोकसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्टॉल धारकांनी गुरुवारी (दि. ९) सकाळी घेतली. तेजस गोटे यांच्या नेतृत्वाखाली चौपाटीवर स्टॉल धारकांनी कुटुंबासह आंदोलनाला सुरुवात केली आहे. पांझरा किनारी आमदार अनिल गोटे यांनी उभारलेल्या चौपाटीवर अतिक्रमण ठरवून तेथील ५३ स्टॉल, ९० बाक, पाण्याच्या टाक्या आणि बांधकाम हटविण्याची नोटीस महापालिका प्रशासनाकडून बजावण्यात आली आहे. या नोटिसीनंतर आमदार गोटे आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे शहरात चांगलेच राजकीय वातावरण तापले होते.


पक्षांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष

या सर्व प्रकाराबाबत धुळेकरांमधून निरनिराळ्या प्रकारचे तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, प्रशासनाने चौपाटीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मनपाचे पाच ट्रॅक्टर, पाच ट्रक, १ जेसीबी, क्रेन, ५ ब्रेकर, कटर या साहित्यासह ३० कामगारांची व्यवस्था केली आहे. आता या कारवाईच्या स्थगितीचे आदेश आल्यानंतर मनपा आणि महसूल विभागाची तयारी सध्या तरी थांबवावी लागणार आहे. त्यामुळे आज (दि. १०) पांझरा चौपाटीवरील अतिक्रमण काढण्यासाठी विरोध करणारे आमदार गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाची काय भूमिका असले याकडे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यामुळे अतिक्रमण निघत असल्याचा आरोपदेखील केला आहे. आता स्थगितीनंतर भूमिका काय, याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेच्या वर्धापन दिनावर पराभवाचे सावट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्याच प्रयत्नात तीन आमदार आणि महापालिकेची सत्ता देणाऱ्या नाशिकमध्येच मनसेचे अस्तित्व अवघ्या अकरा वर्षांतच क्षीण झाले आहे. महापालिकेत सत्तेनंतर नाशिककरांनी मनसेला विरोधातही शिल्लक न ठेवल्याने या पराभवाचे सावट पक्षाच्या अकराव्या वर्धापन दिनावर दिसून आले. पक्ष कार्यालयात दिवसभर शुकशुकाट पहायला मिळाला, तर पदाधिकारी मुंबईच्या कार्यक्रमासाठी निघून गेले होते. त्यामुळे मनसेच्या अकराव्या वर्धापन दिनी नाशिकमध्येच पक्ष संपला की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नाशकात पक्ष पुन्हा उभा करायचा असेल, तर राज ठाकरेंना तळापासून पक्षाची पुनर्रचना करावी लागणार आहे.

मनसेची स्थापना झाल्यानंतर पक्षाला सुगीचे दिवस आले ते नाशिकमध्येच. पहिल्याच प्रयत्नात नाशिकमध्ये पक्षाचे बारा नगरसेवक निवडून आले होते. त्यापाठोपाठ नाशिककरांनी तीन आमदार निवडून दिले. त्यानंतर गेल्या महापालिका निवडणुकीत तब्बल ४० नगरसेवकांचे दान मनसेच्या पदरात टाकले होते. त्यामुळे मनसेची राज्यातील पहिली सत्ता ही नाशिकमध्ये आली होती. एकदा भाजप व एकदा आघाडीच्या मदतीने नाशिकमध्ये दोनदा मनसेचा महापौर झाला. त्यामुळे नाशिकमध्ये मनसे हा पक्ष बहरला. राज ठाकरेंच्या पदरात नाशिककरांनी भरभरून दिले. त्याचप्रमाणे नाशिककरांच्या मोठ्या अपेक्षाही उंचावल्या. गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात राज ठाकरेंनी सीएसआरमधून शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा विकास नाशिककरांना आवडला नाही. तीन आमदारांच्या पराभवानंतर महापालिकेतही मनसेचा दारुण पराभव झाला. या पराभवाचे सावट मनसेच्या अकराव्या वर्धापन दिनावर दिसून आले.

पक्षाच्या स्थापनेवेळी असलेले सर्व पदाधिकारी पक्षाला सोडून गेेले आहेत.त्यामुळे पक्षाला पुन्हा नाशिकमध्ये उभारी द्यायची असेल तर, कार्यकर्ता ते पदाधिकारी असा नवा पूल बांधावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखणीबंद आंदोलन १५ मार्चपासून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा परिषद व पंचायत समितीत कार्यरत विविध लेखा संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि.१५ मार्चपासून लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने दिला आहे. हे आंदोलन संपूर्ण राज्यभरात राज्याध्यक्ष विजयसिंह सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात कर्मचारी संघटनेकडून आज (दि. १०) ते मंगळवार (दि. १४) या कालावधीत काळ्या फिती लावून काम करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रेड पे, पदोन्नती कोटा वाढ करणे, राजपत्रित दर्जा यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनास विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. वारंवार मागणी व पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तींना राज्य सरकारने प्रोत्साहन देऊ नये, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे.

कागदाच्या लगद्यापासून प्रदूषण होत नाही, असा अपप्रचार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आला होता. त्याचा प्रभाव पडून राज्य सरकारने ३ मे २०११ या दिवशी काढलेल्या पर्यावरण विभागाच्या ‘सणांचे पर्यावरणपूरक साजरीकरणासाठीच्या मार्गदर्शक सूचना’, या आदेशात ठिकठिकाणी ‘कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती यांना प्रोत्साहन मिळावे, अशा प्रकारच्या मूर्ती सर्वत्र उपलब्ध व्हाव्यात यांसाठी पुढाकार घ्यावा अथवा त्यांना विशेष सवलत द्यावी’, असे नमूद केले होते. हा निर्णय चुकीचा आहे, असा निकाल राष्ट्रीय हरित लवादाने दिल्याची माहिती हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी दिली.

माहिती अधिकारात काढलेल्या माहितीमध्ये शासन निर्णय काढताना कोणताही अभ्यास करण्यात आलेला नव्हता, हे पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ या दोहोंनीही मान्य केले होते. त्यानंतर सांगली येथील ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन या संस्थेने साधा कागद पाण्यात टाकून आणि त्यानंतर मुंबईतील ‘रसायन तंत्रज्ञान संस्था’ यांनी ४ कागदी लगद्यापासून बनलेल्या मूर्ती घेऊन या विषयाचे संशोधन केले.

रसायन तंत्रज्ञान संस्थेने सांगितले की दहा किलो कागदी मूर्तीमुळे एक हजार लिटर पाणी प्रदूषित होऊ शकते. या पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅडमियम, टायटॅनिअम ऑक्साइड असे अनेक विषारी धातू त्यात मिळून आले.

डॉ. सुब्बाराव यांनी या प्रकरणात संशोधन करताना डिस्ट‌िल्ड वॉटरमध्ये कागद विरघळवून प्रयोग केला होता. कागद विरघळवलेल्या या पाण्यात ऑक्सिजनची मात्रा शून्यावर आल्याचे त्यांच्या प्रयोगात स्पष्ट झाले.

कागदाचा लगदा पाण्यात गेल्यावर त्याचे बारीक कण होतात. मासे त्यांच्या कल्ल्यांद्वारे श्‍वसन करीत असतात. हे कागदी लगद्याचे बनलेले बारीक कण या कल्ल्यांमध्ये अडकून त्यांच्या श्‍वसनप्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असेही निदर्शनास आले आहे.

अंनिससारख्या संस्थांच्या सूचना काळजीपूर्वक तपासाव्यात, जेणेकरून शासनाला पुन्हा तोंडघशी पडावे लागणार नाही, असे आवाहनही हिंदू जनजागृती समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना राहणार तटस्थ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेला भाजपला स्पष्ट कौल दिला असल्याने आम्ही निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याची घोषणा शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केली आहे. शिवसेना पालिकेत प्रबळ विरोधी म्हणून भूमिका बजावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनसेनेही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने भाजपचा विजय सोपा होणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याने नाशिकमध्ये शिवसेना भाजपला पाठिंबा देईल अशी चर्चा होती. भाजपलाही तेच अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. त्यामुळे भाजपसोबत न जाता तटस्थ भूमिका घेतल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले. सकाळी शिवसेनेने नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांची मते जाणून घेतली. जनतेने विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला असल्याने भाजपसोबत फरफटत न जाता विरोधी पक्ष म्हणून काम करायचे. तसेच, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सोबत न जाता महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

मनसेही विरोधातच

गेल्या वेळी पालिकेत सत्तेत असलेल्या मनसेचे आता अवघे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने त्यांना मनसेच्या पाठिंब्याची गरज नाही. मनसेकडून गेल्या वेळची उतराई म्हणून भाजपला पाठिंबा देण्याचा विचार सुरू होता. मात्र, मुंबई महापालिकेत मनसेने मतदानावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाशिकमध्येही आम्ही तटस्थ राहणार असल्याची घोषणा मनसेचे गटनेते सलिम शेख यांनी दिली आहे. महापालिकेत मनसे विरोधकांसोबत प्रबळ विरोधकाची भूमिका बजावणार असल्याचे शेख यांनी सांगितले. भाजपने मनसेला चुचकारले नसल्यानेच मनसे विरोधात गेल्याची आता चर्चा आहे.

अपक्ष शिवसेनेच्या गोटात?

महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. दोघांचा प्रवेश तर निश्चित झाला असून, एकासोबत शिवसेनेची बोलणी सुरू आहे. निवडणुकीत विश्वासात न घेतलेले आरपीआयचे एकमेव नगरसेवकही शिवसेनेच्या गोटात जाण्याच्या तयारीत आहे. भाजपसोबत जावून काहीच मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने अपक्षांनी आता शिवसेनेच्या गोटात जाऊन एकादे पद पदरात पाडून घेण्याचा आटापीटा अपक्षांनी सुरू केला आहे. तीन अपक्षांपैकी दोन अपक्षांनी शिवसेनेसोबत घरोबा करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. तर एका अपक्षासोबत चर्चा सुरू आहे. आरपीआयच्या एका सदस्यालाही आपल्या गटात घेण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. किमान स्थायी समिती सदस्य पद तरी मिळेल यासाठी अपक्षांचा खटाटोप सुरू आहे. भाजपसाठी हा मोठा झटका असणार आहे. ‌‌शिवसेनेसोबतच्या घरोब्याबाबत अपक्षांचा शुक्रवारी निर्णय होणार असल्याचे समजते.

पारदर्शक कारभारावर लक्ष ठेवणार

निवडणुकीत भाजपला जनाधार मिळाला असल्याने आम्ही तटस्थतेची भूमिका घेतली असल्याचे अजय बोरस्ते यांनी सांगितले. आम्ही प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावणार असून, महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवार देणार नाही. विरोधकांची मोट बांधून शिवसेनेचे ३५ शिलेदार भाजपच्या पारदर्शक कारभारावर लक्ष ठेवणार असल्याचेही बोरस्ते यांनी स्पष्ट केले. येत्या काळात सभागृहात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना दिसून येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मेक इन नाशिक’चा ढोल मुंबईत

$
0
0

नाशिक

नाशिक दत्तक घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर महापालिकेत आलेल्या सत्तेमुळे ‘मेक इन नाशिक’च्या संकल्पनेला मोठे बळ मिळाले आहे. सरकारी यंत्रणा त्यासाठी झटून कामाला लागल्या आहेत. मे महिन्यात मुंबईमध्ये होणाऱ्या सोहळ्यात तब्बल दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

मुंबईत मेमध्ये होणाऱ्या ‘मेक इन नाशिक’ कार्यक्रमात नाशिकचे औद्योगिक महत्व सांगण्यासाठी एमआयडीसीने प्रेझेन्टेशन तयार केले असून, त्यात जिल्ह्याची वैशिष्ट्ये व इतर माहिती देण्यात आली आहे. अद्याप यावर बरेच काम बाकी असले तरी प्राथमिक प्रेझेन्टेशनचा एक आराखडा तयार करण्यात आला आहे.

जगभरातील उद्योजकांना नाशिकचे महत्त्व सांगण्यासाठी हा कार्यक्रम मेमध्ये मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये होणार आहे. दोन दिवसांचे नियोजन असलेल्या या कार्यक्रमाचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे निश्चित झाले असून, यात सर्व मोठ्या उद्योजकांना आमंत्रित करण्यात येणार असल्यामुळे शासकीय पातळीवरही या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये मोठ्या उद्योगांनी पाठ फिरवल्यामुळे उद्योग क्षेत्र चिंतेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठे उद्योग सुरू व्हावेत व १० हजार कोटींच्या आसपास गुंतवणूक व्हावी, असे टार्गेट ठरवत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी उद्योजकांची संघटना असलेल्या ‘निमा’ने पुढाकार घेतला असून, त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू आहे.

एमआयडीसीने केलेल्या या प्रेझेन्टेशनमध्ये जिल्ह्यात उद्योगासाठी येवला, मालेगाव, सिन्नर, दिंडोरी या ठिकाणी उपलब्ध असलेली जागा, रोड, रेल्वे व एअर कनेक्ट‌िव्हीटी, पाणी व विजेची उपलब्धता, उपलब्ध कामगार, वातावरण व धार्मिक क्षेत्राची माहिती यात असणार आहे. त्यात औद्योगिक माहितींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रेझेन्टेशन सर्वांना आकर्षित करणारे ठरावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे यात महसूलच्या मोठ्या अधिकाऱ्यांनीही लक्ष घातले आहे.

मुंबईत मेमध्ये ‘मेक इन नाशिक’चा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी हे प्रेझेन्टेशन तयार केले असून, त्यात अधिकाधिक गोष्टी सर्वांना कळाव्यात यासाठी विशेष काम केले जात आहे.

-हेमांगी पाटील-भामरे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार अपघातात सुकेणेचे दोघे ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कसबे-सुकेणे ते निफाड कारखाना रस्त्यावर बुधवारी सायंकाळी झालेल्या कार अपघतात सुकेणे येथील वस्तीवर राहणाऱ्या दोन युवकांचा मृत्यू झाला. दरम्यान, या दोघांची मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर त्यांच्या शेजारी राहणाऱ्याचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली. या अपघातात इतर दोघे जखमी आहेत.

कसबे-सुकेणे येथील निफाड साखर कारखाना रस्त्यावर ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्टो कार (एमएच ०२ एके ७७२६) कारखान्याकडून वस्तीकडे भरधाव जात असतांना चालक सागर संजय वाघ (वय २३) याचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्यावर पलटली आणि १०० फूट फरपटत गेली. यात चालक सागर, शेजारी बसलेला रवींद्र एकनाथ पैठणे (वय २२) या दोघांना जबर मार बसला. कसबे सुकेणे येथील आरोग्य केंद्र आणि निफाड उप-जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. कारमध्ये मागे बसलेले अन्य दोघे जण (नाव समजू शकले नाही) किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, ही घटना समजल्यानंतर अपघातातील मयतांच्या घराशेजारी राहणारे माधव खेताडे (वय ६२) यांना धक्का सहन न झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे कसबे-सुकेणेत शोककळा पसरली. घराशेजारी राहणारे तरुण मुले गेल्याचे कळताच खेताडे यांना मोठा धक्का बसला. पोल‌िस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहाय्यक पोल‌िस उपनिरीक्षक आर. बी. मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत युवक हे द्राक्ष बागांमध्ये मजुरी करत होते. यातील सागर वाघ विवाहित आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणासाठी बापुरावांचा उलटा पायी प्रवास

$
0
0

म. टा. वृतसेवा, मालेगाव

गेले काही दिवस मराठा आरक्षणासाठी राज्यभरात लाखोंच्या संख्येने निघणारे समाजबांधवांचे मोर्चे लक्षवेधी ठरले आहेत. मोर्चे निघूनही मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला नाही. आरक्षणाच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘त्या’ अवलियाने मात्र अनोखा मार्ग अवलंबला आहे. पुणे येथील ५७ वर्षीय बापूराव उर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड यांनी पुणे ते दिल्ली उलटा पायी प्रवास सुरू केला आहे. या अनोख्या प्रवासादरम्यान बापूराव झोडगे गावी मुक्कामाला आले होते.

वेगवेगळ्या कारणासाठी पायी प्रवास करणारे अनेकांनी पहिले असतील. परंतु, मराठा आरक्षणासाठी उलटा पायी प्रवास करणारे बापूराव मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चात ‘एक मराठा लाख मराठा’ ही घोषणा चांगलीच लोकप्रिय ठरली. याच घोषणेने बापूराव प्रभावित झाले आहेत. ५ मार्च रविवार ते झोडगे येथे मुक्कामी आले होते. झोडगे येथील तरुणांना त्यांच्या या प्रवासाची माहिती सोशल मीड‌ियावर मिळाल्याने त्यांना भेटण्यासाठी सगळेच उत्सुक होते. त्यांनी मराठा आरक्षणासोबत विविध विषयांवर आपले मते व्यक्त केले.

लक्षवेधी वेशभूषा

गुंड यांनी परिधान केलेली वेशभूषा देखील लक्षवेधी आहे. जाडजुड पिळदार मिशा, डोक्यावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेला टोप, कळ्यात लाल तबकडी माळा, हातात भगवा झेंडा, अंगात खास आरक्षणाच्या संबंधी विविध मागण्या असलेला टी शर्ट असा हटके लूक आहे.

मराठा आरक्षणाबाबत पायी प्रवास करण्याचे मनात होते. परंतु, मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा उलटा पायी प्रवास सुरू केला आहे. या प्रवासा दरम्यान गावागावात स्वागत होत आहे. लोकांशी संवाद साधला की ऊर्जा मिळते.

- श्रीपतराव गुंड

असा आहे प्रवास…

पुणे ते दिल्ली १ हजार १०० किमीचा प्रवास

२२ फेब्रुवारीपासून फुरसिंगी येथून प्रवासाला सुरुवात

मराठा आरक्षणासाठी दिल्लीत केंद्र सरकारला निवेदन देणार

पुणे ते झोडगे ४०० किमीचा टप्पा १५ दिवसात केला पार

साधारण ५० दिवसात दिल्लीला पोहचण्याचे लक्ष

दिवसभरात २५ किमी अंतर चालतात

रस्त्यावरील गाव, वस्ती कुठेही मुक्काम करतात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटकेनंतर जवान चंदू उद्या धुळ्यात येणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। धुळे

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून सुटका होऊन आपल्या मायदेशी परतलेला '३७ राष्ट्रीय रायफल्स'चा जवान चंदू चव्हाण तब्बल दीड महिन्यांनंतर म्हणजेच उद्या, शनिवारी धुळ्यातील आपल्या बोरविहिर या गावी येणार आहे. आपला चंदू गावी येणार हे समजताच त्याचे कुटुंबीय आणि गावकरी यांना एखादा सण असल्यासारखे वाटत आहे. त्यांनी जवान चंदूच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. जवान चंदू ज्या मार्गाने गावात प्रवेश करेल तो मार्ग रांगोळीने सुशोभित करण्यात येणार आहे. शिवाय त्याचे औक्षणही करण्यात येणार आहे.

याबरोबर, बोरविहिर गावच्या महिला मंडळींनी जवान चंदूच्या आवडीच्या जेवणाचा खास बेत देखील आखला आहे.

भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी जवान चंदू चव्हाण नजरचुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानाच गेला होता. चंदूला भारताच्या ताब्यात देण्यास पाकिस्तानने नकार दिला होता. भारताच्या प्रयत्नांनंतर अखेर २१ जानेवारी २०१७ या दिवशी पाकिस्तानने चंदूची सुटका केली होती.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करातील वरिष्ठ अधिकारी यांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. चंदूच्या सुटकेसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणारे डॉ. सुभाष भामरे काही कारणास्तव धुळ्यात येऊ शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात बसेसमध्ये वायफाय हॉटस्पॉट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना खूश करण्यासाठी एसटीमध्ये प्रवास करताना मोफत वायफाय सेवेचा देणार असल्याची घोषणा परिवहन केली होती. त्याबाबत येत्या दहा दिवसांत धुळे आगारातील १३५ एसटी बसेसमध्ये प्रवाशांना वायफाय सेवेचा लाभ मिळणार आहे.

एसटीच्या या वायफाय सेवेत सोशल मीडियाचा वापर प्रवाशांना करता येणार नाही. तर मराठी, हिंदी गीते, चित्रपट मालिकाचा या सेवेत लाभ होणार आहे. यामुळे एसटीकडे प्रवासासाठी नागरिकांची संख्या वाढणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. परिवहन महामंडळाच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नऊ आगारांतील सुमारे ९०० बसेसमध्ये वायफाय सुविधा सुरू करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यांत धुळे आगारातील १३५ बसेसमध्ये वायफाय सुविधा पुरविण्यासाठी यंत्र मीडिया सोल्युशन लि. कंपनीचे कर्मचारी आगारात दाखल होऊन यंत्रसामग्री बसविण्याचे काम करत आहेत.

वायफाय कसे असेल?

मीडिया सोल्यूशन कंपनीकडून एसटीमध्ये हॉटस्पॉट डिवाइस बसविण्यात येणार आहे. त्यासाठी सॅटेलाइटच्या माध्यमातून रेंज मिळविली जाणार आहे. वायफायचा कोड क्रमांक हा प्रत्येक प्रवाशाच्या सीटजवळ असेल तो आपल्या मोबाइलमध्ये प्रविष्ट केल्यास वायफाय सेवा मोबाइलमध्ये सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे मनपात समाजवादीचे अनोखे आंदोलन

$
0
0

कार्यकर्त्याने साकारला पिसाळलेला कुत्रा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील नागरिक सध्या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील कुत्र्यांचा आणि डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी समाजवादी पार्टीच्या नगरसेवक आमिन पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनपात लक्षवेधी आंदोलन केले.

या अनोख्या आंदोलनात एका कार्यकर्त्याने अंगावरील कपडे काढून पिसाळलेल्या कुत्र्याची भूमिका मनपा आवारात साकारली. कुत्रे पिसाळल्यानंतर काय अवस्था होते याचे विविध प्रात्यक्षिके समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करून दाखविले आणि शहरातील समस्येची वस्तुस्थिती दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

धुळे शहरात विविध ठिकाणी पिसाळलेल्या व रोगट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, महिला, तरुणी व वृद्धांच्या अंगावर कुत्रे चावा घेण्यासाठी धाव घेतात. अशा घटना दररोज घडत आहेत. मनपाच्या यंदाच्या आर्थिक संकल्पात मोकाट कुत्रे व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी करणारे निवेदन महापौर कल्पना महाले यांना यावेळी देण्यात आले.

शहरातील नागरिकांच्या समस्येकडे मनपाचे लक्ष वेधण्यासाठी समाजवादी पक्षाचे नगरसेवक आमिन पटेल व कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन मनपात केले. जर मनपाकडून येत्या आठ दिवसांत मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर यापुढे मनपातील अधिकाऱ्यांच्या दालनात पिसाळलेले व मोकाट कुत्रे आणून सोडण्यात येतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवमोगरा देवीच्या यात्रेस सुरुवात

$
0
0

नंदुरबार जिल्ह्यातील बर्डीपाडा येथे तयारी जोरात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देशातील आदिवासी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्डीपाडा येथील देवमोगरा देवीचे मंदिर विसरवाडी गावापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ताही नाही. अशा ठिकाणी हे देवमोगरा मातेचे मंदिर उंच डोंगरावर वसलेले आहे. पायथ्यापासून सुमारे २६४० फूट अंतर पार करून या देवीच्या दर्शनाला जावे लागते. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमधील मराठी माघ महिन्याच्या पौर्णिमेनंतरच्या आमावस्येला देवमोगराच्या मोगीची यात्रा भरते, याची तयारी आता सुरू झाली आहे.

गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील देवमोगरा मातेची ही प्रतिकृती नंदुरबारमधील बर्डीपाडा येथे पाहायला मिळते. तसेच आदिवासी भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला साकडे घालायला या ठिकाणी येतात. कणीपूजन करून मंडल शिवारातील देव देवतांचे पूजन करतात. या यात्रेसाठी आदिवासी बांधव १५ दिवसांपासून तयारीला लागतात. मोगी ही आदिवासी समाजाची कुलदेवता असून, महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होतात. मंदिराच्या पायथ्याशी सुरू होणाऱ्या पायऱ्यांपासून केलेल्या कच्च्या रस्त्याची पायवाट आहे. तेथूनच देवीच्या दर्शनासाठी भाविक मार्गस्थ होतात.

देवमोगरा देवीला आदिवासी भाषेत ‘याहा मोगी’ म्हटले जाते. ‘याहा’ म्हणजे आई असा अर्थ आहे. महादुष्काळात याहा मोगीच्या या उदात्त आणि मानवतादी कार्यामुळेच त्यांना याहा, लोकमाता, कणी, कन्सरी आपली सर्व पालनहार संबोधून देवत्व बहाल केले. आदिवासी भाषेतच देवीचे पारंपरिक पद्धतीने पूजा-विधी होतात. आजही धान्य, वन भाजी, तांदळाची व ज्वारीची भाकरी आणि मव्हाच मद्य (दारू) असा नैवेद्य देवीला दिला जातो. त्यामुळे आदिवासी भाषेतच मंदिराचे पुजारी ग्रामदैवत देवमोगरा देवीची माहिती सांगतात.

प्रशासनाची उदासीनता

आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख असून, नवापूर तालुक्यातील आदिवासींचे ग्रामदैवत असलेल्या मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग पहाडातून आणि दऱ्या, खोऱ्यातून, कच्या रस्ताने भाविकांना खडतर प्रवास करावा लागतो. येथेही सरकारी यंत्रणेची उदासीनता पाहायला मिळते. तरी देवदर्शनासाठी प्रवास सुखकर व्हावा, अशीच अपेक्षा आदिवासी बांधवांची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृषी विद्यापीठासाठी युवासेनेचा रास्तारोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उपकेंद्रास जागा न देणे आणि धुळ्यातील शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय याविरुद्ध युवासेनातर्फे बुधवारी (दि. १) पारोळा चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्गावरील वाहतूक अर्धातास ठप्प झाली होती. या वेळी युवासेना जिल्हाध्यक्ष पंकज गोरे यांच्यासह अनेक युवासैनिकांना पोलिसांनी कारवाई करीत अटक करून सुटका केली.

धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे निर्णय नेहमीच घेतले जात असून याविरुद्ध जिल्हा युवा सेनेने हे आंदोलन केल्याचे यावेळी सांगण्यात आले. पारोळा चौफुलीवर हे रास्तारोको आंदोलन करून राज्य सरकारच्या धोरणाविरोधात युवकांनी घोषणाबाजी केली.

याआधीही युवासेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढून निवेदन दिले होते. कृषी विद्यापीठ धुळ्यात साकारून जिल्ह्याला न्याय देण्यात यावा, शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय घेऊन जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. हा निर्णय सरकारने तात्काळ मागे घ्यावा. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र शहरात उभारले जावे, यासारख्या मागण्यासाठी युवासेनेने आंदोलन केले. यासाठी देवूपरातील सर्व्हे नं. १११ व ११२ या जागेचा मनपाने पुन्हा ठराव करून उपकेंद्रासाठी जागा देण्यात यावी. अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी महाराष्ट्र राज्यात एकच विद्यापीठ करावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. रेखा चौधरींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

$
0
0

धुळे : नंदुरबार येथील डॉ. रेखा चौधरी यांना भारताच्या वेलनेस ब्रॅन्ड ऍम्बेसेडर सहित दोन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘द पिलर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी’ हा पुरस्कार एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज यांच्यावतीने रेखा चौधरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या मराठमोळ्या संस्कृती आणि नंदुरबारसाठी ही अभिमानाची बाब आहे. या सोहळ्यात रशिया, यु. के., स्पेन आणि अाफ्रिका त्याचप्रमाणे अनेक देशातील जनरल कौन्सिल, राजदूत व मंत्री, अधिकारी यांचा सहभाग होता. डॉ. चौधरी यांना दुसरा महत्त्वाचा पुरस्कार मिळाला तो फेमिना महिला विशेष अच‌व्हिर पुरस्कार. २०१६-१७ या वर्षात आरोग्य, ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा अॅवॉर्ड स्वीकारल्यानंतर डॉ. रेखा चौधरी यांनी, संपूर्ण जगातील ४७ डायनॅमिक स्त्रियांमध्ये हा अवॉर्ड घेण्याचा मान मला मिळाल्यामुळे अभिमानाने माझे मन भरून आल्याचे यांनी सांगितले. डॉ. रेखा चौधरी या तैलिक समाजाचे ज्येष्ठ नेते हिरालाल चौधरी यांच्या कन्या तसेच आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमी युगुलाची धुळ्यात आत्महत्या

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,धुळे

शहरातील देवपूर परिसरातील बिलाडी गावाच्या रस्त्यालगत बुधवारी दुपारी प्रेमी युगुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. याघटनेमध्ये आत्महत्येचे कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी याबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले.

शहरातील देवूपर परिसरात सिंघलनगर, नगावबारी जवळील महिला कॉलेजमागे राहणारा कल्पेश संजय नंदन (वय ३०) अभियांत्रिकी शिक्षणासाठी धुळ्यात आला होता. त्याचे शहरातील राहत असलेल्या परिसरतील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र या दोघांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता. कारण कल्पेश हा सामान्य कुटूंबातील वाहनचालकाचा मुलगा होता. तर तरुणीला वडील नसल्याने ती आईसह मावशीच्या गावी धुळ्यात राहण्यास आली होती. त्यामुळे प्रेमीयुगुलाच्या प्रेमाला मान्यता मिळणे शक्य नसल्यानेे दोघांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवे सहावर कामबंद पाडणार

$
0
0

पंकज काकुळीद, धुळे

धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामासाठी शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यात आल्या आहेत. त्याचा सरकारने योग्यरितीने दिला नसल्याचे वृत्त ‘मटा’ने दि. २८ फेब्रूवारीला प्रसिद्ध केले होते. त्यामुळे महामार्गालगत चौपदरीकरणासाठी भूसंपादन जमीन केलेल्या जमिनीचे मालक व शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला न मिळाल्याने शेतकरी दि. २४ मार्चपासून कामबंद पाडणार असून त्याठिकाणी कुटुंबासह बेमुदत आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यानंतर अखेर ‘मटा’चे भाकित खरे ठरले असून, शेतकऱ्यांनी नवापूर ते धुळे तालुक्यातील मुकटीपर्यंतच्या तब्बल साठ गावांतील एक हजारहून अधिक शेतकऱ्यांशी संपर्क साधून आंदोलनाची दिशा ठरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केल्याची सविस्तर माहिती तालुक्यातील संग्राम पाटील व शिष्टमंडळाने ‘मटा’शी बोलताना दिली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्यालगत जमीन असलेल्या शेतकऱ्यांकडून जमिनीचे अधिग्रहण करून सरकारकडून मोबदला देण्यात आला आहे. मात्र ज्यावेळी जमीन भूसंपादित करण्यात आल्या त्यानुसार काही शेतकऱ्यांना जुन्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला एकपट मिळाला. मात्र उर्वरित शेतकऱ्यांना मोबदला नवीन कायद्यानुसार चारपट देण्यात आला. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना समन्यायी पद्धतीने मोबदला न देता शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी केंद्रिय रस्ते विकास व बांधकाम मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, महसूलमंत्री, नाशिक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता. याप्रसंगी संग्राम पाटील, शामकांत शिंदे, शेतकरी संघटनेचे बाळू सोनवणे, गोकूळ खिवसरा, संजय शिंदे, फकिरा चौधरी, पंकज खैरनार, विलास पाटील उपस्थित होते.



पोलिस कारवाईस सामोरे जाण्यास तयार

जवळपास १५० किलोमिटरच्या अंतरावरील ६० ते ७० छोटे-मोठ्या गावातील शेतकरी कुटुंबासह ज्या-ज्या ठिकाणी महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी शेतकरी कुटुंबासह आंदोलनाला बसणार आहेत. आंदोलनात काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणतेही वाहन न अडवत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये ज्याठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात जाणार आहेत त्याठिकाणीच आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जोपर्यंत सरकार यावर निर्णय घेणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल. पोलिस कारवाई जरी झाली तरी त्यास सामोरे जाण्यास शेतकऱ्यांची तयारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसरवाडीत कॉप्यांचा पाऊस

$
0
0

धुळे : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे माजीमंत्री माणिकराव गावित विद्यालयात मंगळवारी, दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी कॉप्याचा पाऊस पडला. या परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी सुरू असल्याचे समजताच नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी तातडीने माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षण विभागातील पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. सकाळी अकरा वाजता विसरवाडी येथील गावित विद्यालयात अचानक कॉपी पुरविण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली तर गाईड, झेरॉक्स प्रती व इतर साधनाचा आधार घेत वर्गात पेपर सोडविण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस व शिक्षण विभागातील यंत्रणेने मात्र बघ्याची भूमिका घेतली. हा सर्व प्रकार परीक्षा केंद्रात सुरू असताना शाळेतील पथक आणि भरारी पथक नेमके काय करत होते, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images