Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शिवसेना अडचणीत

$
0
0

उमेदवारांच्या अपात्रतेसह बंडखोरीचा प्रश्न

नाशिक : महापालिकेवर भगवा फडकविण्याचा निश्चय करणारी शिवसेना अडचणीत सापडल्याची चिन्हे आहेत. शहरातील पक्षाच्या तब्बल नऊ उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्याची बाब पक्षाने गंभीरतेने घेतली असून, या साऱ्या प्रकरणाची चौकशी होणार आहे. तर, या साऱ्या प्रक्रियेत दिरंगाई नडल्याचा ठपकाही शिवसेनेच्या नेत्यांनी ठेवला आहे.

महापालिका निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी उमेदवारी घोषित करण्याच्या आणि एबी फॉर्म वाटपाचा गोंधळ शिवसेनेच्या अंगाशी आला आहे. त्यामुळे शहरात तब्बल नऊ उमेदवार अपात्र ठरले असून, एका उमेदवारावर सोमवारी (६ फेब्रुवारी) निर्णय होणार आहे. तसेच, शहरांतर्गत नाराजीचा फटकाही शिवसेनेला बसणार आहे. युती तुटल्यानंतर शहरातील १२२ जागांसाठी तब्बल ८२३ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. उमेदवारी घोषित न करता थेट शेवटच्या दिवशी एबी फॉर्म देण्यात आले. माजी महापौर विनायक पांडे यांचे चिरंजीव ऋतुराज यांना उमेदवारी नाकारण्यातून राडा झाला. या साऱ्या प्रकरणात महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना बेदम मारहाणही झाली. त्यानंतर पांडे यांचे बंड शमले असले तरी या साऱ्या प्रकारावेळी एबी फॉर्म पळवून नेल्याचा प्रकारही घडला. त्यामुळेच शहराच्या विविध भागात अधिकचे एबी फॉर्म आढळून आले. काही उमेदवारांनी दोन फॉर्म सादर केले. या साऱ्या गोंधळाचा मोठा फटका शिवसेनेला बसला आहे. पंचवटीतील प्रभाग चारमध्ये शिवसेनेच्या चारही उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. प्रभाग ३०मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी एबी फॉर्मऐवजी झेरॉक्स जोडल्याचा प्रकार घडला. येथीलच उमेदवार संजय चव्हाण यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. प्रभाग १२मध्येही उमेदवाराचा अर्ज बाद ठरवला आहे. तर, रविवारी झालेल्या सुनावणीत प्रभाग २९मध्ये विद्यमान नगरसेवक अरविंद शेळके यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे शहरात एकूण नऊ शिवसेना उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. या साऱ्यांना आता धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविता येणार नाही. त्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. त्यातही प्रभाग ३०मध्ये सोमवारच्या सुनावणीनंतर सेनेची आणखी एक जागा कमी होणार की नाही, हे स्पष्ट होईल.

गोंधळाच्या या साऱ्या प्रकाराचा परिणाम सेनेच्या सत्ता उद्दिष्टावर होणार आहे. याची गंभीर दखल पक्ष नेतृत्वाने घेतली असून, या साऱ्या प्रकाराची चौकशी केली जाणार आहे. तसेच, या गोंधळामुळे सेनेंतर्गत बंडाळी पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. अर्ज बाद होताच सेनेतील धुसफूस बाहेर येत आहे.

दरम्यान, माजी महापौर विनायक पांडे यांचे भाचे कैलास शिंदे हे सिडकोतील प्रभाग २४मध्ये इच्छुक होते. त्यांना तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांनी पत्नीसह भाजपात प्रवेश केला. तेथे भाजपाने अर्चना शिंदे यांना पुरस्कृत उमेदवार घोषित केले आहे.

पक्षाचे अधिकृत उमेदवार बाद झाल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार गंभीर आहे. या साऱ्या प्रकाराची चौकशी केली जाईल.

- अजय चौधरी,

संपर्क प्रमुख, शिवसेना

उमेदवारी घोषित करण्याबाबत मोठा हलगर्जीपणा झाला. एकेक जागा महत्त्वाची असताना नऊ उमेदवार बाद झाले आहेत. मुंबईत उमेदवार निश्चितीनंतर कोअर कमिटीची बैठक घेऊन अंतिम निर्णय होणे आवश्यक होते.

- बबन घोलप, उपनेते, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये नव्या व्हिडीओने खळबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाजपमध्ये उमेदवारीसाठी दोन लाख रुपये मागितले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपविरुद्ध आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. दहा लाख रुपये देऊनही उमेदवारी दिली जात नसल्याचा आरोप गोपाळ पाटील यांनी केल्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाल्याने राजकीय आखाडा आरोप-प्रत्यारोपांनी रंगला आहे. मात्र, गोपाळ पाटील यांनी हे आरोप फेटाळले असून, हा व्हिडीओ जाणीवपूर्वक तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्कनेते अविनाश अभ्यंकर यांच्या विरोधात पाटील यांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या घटनेसंदर्भात कोणत्या कलमांचा वापर करावा, याबाबत पोलिस खल करीत आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा वापर सुरू झाला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्याने तिकिटासाठी दोन लाख रुपये मागितल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. भाजपला याचे उत्तर देताना नाकीनऊ आले. पक्षनिधीसाठी हे पैसे होते असे सांगत भाजपने आरोपांचा धुरळा खाली बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोच इंदिरानगर परिसरातील भाजपचे पदाधिकारी गोपाळ पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. दहा लाख रुपये देऊनही पक्षाने तिकीट दिले नसल्याचा आरोप पाटील करताना दिसले.

त्या व्हिडीओचे जाणीवपूर्वक एडिटिंग

या व्हिडीओ प्रकरणानंतर पाटील यांनी व्हॉट्सअॅपचे काही ग्रुप शोधून काढले. पाटील यांनी सांगितले, की मला तिकीट नाकरण्यात आले, अन्याय झाला हे खरे असले तरी माझ्याकडे पैशांची मागणी करण्यात आलेली नव्हती. या व्हिडीओत एडिटिंग करण्यात आले आहे. मूळ संवाद वेगळाच होता. मनसेचे संपर्क नेते अविनाश अभ्यंकर यांनी तो टाकल्याचे दिसते. त्याचे काही पुरावे समोर आल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, यासाठी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये अर्ज सादर केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. या गुन्ह्याबाबत कोणते कलम वापरावे, यासाठी पोलिस खल करीत होते. याबाबत अभ्यंकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, अभ्यंकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. मी सध्या मुंबईत असून, माझ्याकडे हा व्हिडीओ आला. त्याची चौकशी करण्याची जबाबदारी मी पार पाडली. गोपाळ पाटील ज्येष्ठ नेते असून, जाणीवपूर्वक मी किंवा माझा पक्ष कोणतेही चुकीचे काम करीत नसल्याचे अभ्यंकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कैची’च्या मदतीने प्रचाराला ‘धार’

$
0
0

Arvind.jadhav@timesgroup.com
Tweet : @ArvindJadhav

नाशिक: निवडणूक काळात मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी इच्छुक उमेदवार काय क्लुप्ती करतील याचा नेम नाही. सोशल मीडियाचा वापर, सणासुदीला भेट, स्वत:चे प्रेझेन्टेशन याद्वारे एक छाप सोडण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जातो. असाच एक अभिनव उपक्रम पाथर्डी फाटा परिसरातील इच्छुकाने हाती घेतला आहे. कैची कंगव्याच्या मदतीने सदर उमेदवार मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत असून, सध्या हा विषय चर्चेचा ठरतो आहे.

गरमागरम चर्चा झडण्याचे ठिकाण म्हणून चौकातील सलूनच्या दुकानाकडे पाहिले जाते. विविध वयोगटातील आणि विविध जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्ती काही दिवसांनी सलूनमध्ये येतातच. सलूनमध्ये फक्त कामाशी काम होत नाही. बोलणाऱ्याचे कुळीद विकले जातात, ही म्हण कोणत्याही सलूनमध्ये सार्थच ठरते. चर्चा मग ती कोणत्याही विषयाची असो, तिथे जमलेले आपली मते व्यक्त करतात. त्यात निवडणुकीचे वातावरण असेल तर विचारायलाच नको. सलूनमध्ये सततची गर्दी आणि तीही त्याच परिसरातील असते. पब्लीक कनेक्टसाठी ही जागा खरोखर प्रभावी ठरते. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी हा मार्ग सोपा असून, त्याची जाणिव झालेल्या एका उमेदवाराने चक्क सलूनमधूनच प्रचाराचा श्रीगणेशा केला. ‘सलूनमध्ये आलेल्या ग्राहकांचे हार्दीक स्वागत, ग्राहकांचे समाधान हीच आमची संपत्ती’ असा मॅटर असलेले प्रचार पत्रक पाथर्डी फाट्यापासून चार्वक चौकापर्यंतच्या सलूनमध्ये लावण्यात आले. सर्वांत खाली पक्षाची निशाणी आणि उमेदवाराचे नाव टाकण्यात आले. साधारणत‍ः सलूनमध्ये असे प्रचार पत्रक लावण्याचा विचार कोणी करणार नाही, याची जाणीव संबंधित उमेदवाराला होती. यासाठी चक्क कैची, कंगवे, लेझर असे एक कीटच संबंधित उमेदवाराने सलून मालकांना भेट दिले.
---------

१०० दुकानांमध्ये साहित्यवाटप

पाथर्डी फाटा ते चार्वाक चौक या परिसरातील सुमारे १०० दुकानांमध्ये हे साहित्य देण्यात आले आहे. अवघ्या ३० हजार रुपयांत मतदारांच्या मोठ्या संख्येपर्यंत संबंधित उमेदवाराला पोहचता येत असल्याची प्रतिक्रिया एका व्यावसायिकाने दिली. आता उमेदवाराचे तिकीट पक्के झाले असून, कैचीच्या माध्यमातून प्रचाराला मिळालेली धार प्रत्यक्ष मतदानातून दिसणार काय, याची चर्चा इंदिरानगर परिसरात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्य व्यावसायिकांचे मंत्री डॉ. भामरेंना साकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या पाचशे मीटर आतमध्ये असलेल्या परवानाधारक मद्य व्यावसायिकांच्या परवाना नूतनीकरणात जे निर्बंध लादण्यात आले आहेत. ते अन्यायकारक असून त्यामुळे भविष्यात अशा परवाना धारकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारचाही महसूल बुडणार आहे. यासाठी धुळे शहर बार असोसिएशनकडून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना निवेदनाद्वारे नियमित व्यवसाय करू देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार दि. १५ डिसेंबरला हा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय अन्यायकारक असून त्यामध्ये परवानाधारकांच्या परवान्यांचे नूतनीकरणाविषयीही निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर मद्याचे चिन्ह व मद्य जाहिरातीवर निर्बंध टाकण्यात आले आहेत. या निर्णयामुळे हजारो व्यावसायिकांवर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होणार आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सरकारने मद्य विक्रेते व परवानाधारकांवर लादलेले निर्बंध मागे घेऊन त्यांना नियमित व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन बार असोसिएशनतर्फे देण्यात आले. यावेळी सी. पी. गलाणी, सुधाकर बेंद्रे, अशोक सुडके, लोकेश चौधरी, देवा सोनार, छोटू चौधरी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घरांवरील कारवाई तातडीने थांबवावी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील देवपूर भागात असलेल्या गट नंबर नऊमध्ये रमाबाई आंबेडकर नगरात नागरिकांची घरे अतिक्रमण ठरवून पाडण्यात येत आहे. ही कारवाई तातडीने थांबवण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन सोमवारी (दि. ६) या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

देवपूरातील रमाबाई आंबेडकरनगर ही वसाहत पन्नास वर्षांपूर्वीची आहे. ‘स्लम एरिया’ म्हणून हा भाग जाहीर झाला आहे. या ठिकाणी दहा ते पंधरा हजार लोकांची वस्ती आहे. या भागातील नागरिक मनपाची घरपट्टी, पाणीपट्टी तसेच वीजबिल भरत असल्याने या नागरिकांना या सुविधा मिळत आहेत. ही घरे पाडून या जागेवर आम्हाला, पंतप्रधान घरकुल योजनेच्या माध्यमातून घरे बांधून देण्याचे सांगितले जात असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रमाबाई आंबेडकर नगरात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन अधिकारी पंकज चौबळ यांना हे निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनतेसोबत सत्याग्रह आंदोलन करू

$
0
0

पांझरा चौपाटीबाबत आमदार गोटे आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारने अतिक्रमित ठरविलेली पांझरा चौपाटी बचावासाठी आता आमदार अनिल गोटे यांनी उडी घेतली आहे. याबाबत आमदार गोटे गेल्या आठवड्यापासून आक्रमक झाले आहेत. ‘तीन दिवसांत काय तीन जन्मातदेखील चौपाटी निघू शकणार नाही’, असे खुले आव्हान आमदार गोटेंनी विरोधकांना देत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘तुम्ही धरणे आंदोलन करा, आम्ही धुळेकरांना सोबत घेऊन चौपाटीवर सत्याग्रह आंदोलन करू’, असेदेखील आमदार गोटेंनी विरोधकांना सुनावले आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक नुकतेच त्यांनी जाहीर केले आहे.

आमदार गोटेंनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात, महापालिका म्हणजे काही भामट्यांसाठी जगण्याचे साधन झाले आहे. धुळेकर जनतेने कररूपाने भरलेल्या पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारायचा हेच त्यांचे उपजीविकेचे साधन आहे. ठेकेदारांच्या नावावर स्वत: रस्ते गटारींची कामे घेत लूट करायची हा बिनभांडवल धंदा दिवाळखोरीत गेल्यामुळे पोटभरूंना चिड निर्माण झाली आहे, असेही आमदार गोटेंनी यात म्हटले आहे. माता-भगिनींनो, आपल्या बालकांचा आनंद हिरावून घेणाऱ्यांचा शांततेने मुकाबला करण्यासाठी आणि विकासाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी घरून जेवणाचा डबा घेऊन सर्वांनी सायंकाळच्या भोजनपंक्तीत सहभागी व्हावे. तसेच सत्याग्रहाचे आंदोलन हसतखेळत साजरे करावे, असे आवाहनही आमदार गोटेंनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे धुळेकरांना केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच चिन्हासाठी फिल्डिंग

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी ४८५, तर इतर छोट्या नोंदणीकृत पक्षांनी ५० च्या आसपास उमेदवारांना निवडणुकीत उमेदवारी दिल्यामुळे ८३० उमेदवार अपक्ष म्हणून या निवडणुकीत रिंगणात आहेत. यातील काही जण दोन दिवसांत माघार घेणार असले, तरी याची संख्या ५०० हून अधिकच राहणार आहे. त्यामुळे या अपक्षांना मोठ्या प्रभागात प्रचार करणे अवघड असल्यामुळे आपल्या जोडीला इतर उमेदवार असावेत यासाठी चार अपक्षांनी एकत्र येत स्थानिक आघाडी तयार केली आहे. पण, या आघाडीला राज्य निवडणूक आयोगाच्या नियमामप्रमाणे एकच चिन्ह मिळणार नसल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सोमवारी अशा अनेक अपक्षांच्या आघाडीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एकच चिन्ह देण्याची मागणी प्रभागासाठी केली. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याला सपशेल नकार दिला. विशेष म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर सर्वांच्या संमतीने याला होकार दिला असता, तरी इतर उमेदवारांनी तो मान्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे या अपक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेना-भाजपच्या मातब्बर उमेदवारांना शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेकडे काही ठिकाणी तुल्यबळ उमेदवार नाहीत. त्याचप्रमाणे प्रभागात एकाच पक्षाच्या उमेदवारांना मते मिळणे अवघड आहे. त्यामुळे अनेकांनी स्थानिक गणित मांडत चार भागांचे विविध पक्षांचे, पण अपक्ष म्हणून उमेदवारी करणारे उमेदवार एकत्र करून आघाडी करण्याचा पर्याय निवडला आहे. त्यात विद्यमान उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी पहिला प्रयोग आपल्या प्रभागात अगोदरच केला. त्यानंतर विविध प्रभागांत हा प्रयोग केला जात असून, त्यातही प्रबळ उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अपक्षांचे बळही वाढणार आहे.


शिवसेनेची अडचण

शिवसेेनेने उमेदवारी देऊनही स्थानिक पातळीवर एबी फाॅर्मचा गोंधळ झाल्यामुळे १० उमेदवारांवर अपक्ष निवडणूक लढण्याची वेळ आली आहे. आता या १० उमेदवारांना केवळ त्या प्रभागात एकच चिन्ह मिळावे यासाठी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी महापालिका आयुक्तांकडे मागणी केली. पण, आयुक्तांनी हा प्रश्न निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे टोलवत त्यांना नकार दिला. त्यामुळे शिवसेनेचे पुरस्कृतही आता वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवणार आहेत.


लक्षात ठेवणे अवघड

स्थानिक आघाडीचे उमेदवार एकत्र प्रचार करणार आहेत. पण, या सर्वांना वेगवेगळे चिन्ह मिळणार असल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडणार आहे. चार चिन्हे लक्षात ठेवून मते देणे अवघड होणार असल्यामुळे त्याचा फटकासुद्धा या उमेवदारांंना बसू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बडगुजरपुत्राचा पत्ता कट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शिवसेनेने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नसतानाही एबी फॉर्म सादर करणारे दीपक बडगुजर आणि मनसेतून शिवसेनेत आलेले भूषण देवरे यांना पक्षाने माघार घेण्याचे फर्मान काढले आहे.
प्रभाग क्रमांक २९ मध्ये मनसेतून शिवसेनेत आलेले विद्यमान नगरसेवक अरविंद शेळके, तसेच रत्नमाला राणे, तसेच माजी नगरसेवक सतीश खैरनार व सुमन सोनवणे यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी एबी फॉर्मचा गोंधळ झाला. या सर्व प्रकारात शेळके आणि खैरनार यांची उमेदवारी अडचणीत आली. या दोघांच्याही सेनेकडील उमेदवारीवर हरकत घेण्यात आली. त्यास एबी फॉर्मचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. अखेर उमेदवारी छाननी आणि सुनावणीत या दोघांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे आता या दोन्ही उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार आहे. या साऱ्या प्रकारात महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेनेने बडगुजर यांचे पुत्र दीपक आणि भूषण देवरे यांना उमेदवारी दिली नसतानाही त्यांनी त्यांच्या अर्जासोबत एबी फॉर्म सादर केले. त्यामुळे या दोघांचेही अर्ज वैध ठरले. अखेर पक्षाचे सचिव अनिल देसाई नाशिकमध्ये आले असता त्यांनी हे प्रकरण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातले. अखेर पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यानुसार दीपक बडगुजर आणि भूषण देवरे हे दोन्ही उमेदवार त्यांचे अर्ज मागे घेणार असून, या प्रभागात शेळके, खैरनार यांना शिवसेनापुरस्कृत केले जाणार आहे.
बडगुजरांची खेळी
शिवसेनेने सुधाकर बडगुजर यांच्यासह त्यांची पत्नी हर्षा बडगुजर यांना प्रभाग २५ मधून उमेदवारी दिली. मात्र, आपले पुत्र दीपक याला प्रभाग २९ मधून उमेदवारी मिळावी, यासाठी बडगुजर प्रयत्नशील होते. पक्षाने पुत्राला उमेदवारी नाकारली असली तरी एबी फॉर्मच्या गोंधळात दीपक यांनी तो मिळवून सादर केला. सेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील सेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची जबाबदारी बडगुजर यांच्यावर सोपविण्यात आली. मात्र, विद्यमान नगरसेवक शेळके यांचा पत्ता कट करून दीपक यांनी एबी फॉर्म सहीसलामत दाखल केल्याचे उघड झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला गिरवताहेत सभाधीटपणाचे धडे

$
0
0


प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

राज्यभरात महापालिका निवडणुकांसह जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये महिलावर्गाचा सहभाग ५० टक्के आरक्षणामुळे वाढला आहे. अनेक राजकारण्यांनी आपली पत्नी, मुली, सुनांना राजकारणाच्या आखाड्यात उतरवले आहे. त्यापैकी बऱ्याच महिला स्टेज डेअरिंग व आत्मविश्वासवृद्धीसाठी छोट्या-मोठ्या कोर्सेसना प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वी असे प्रक्षिक्षण मिळविण्यासाठी नाशिककरांना थेट मुंबई-पुण्यामध्ये जावे लागत होते. मात्र, आता नाशकातही असे कोर्सेस उपलब्ध झाले आहेत. अनेक महिला उमेदवारांना निवडणुकांच्या काळात महत्त्वाची बाब असणारे भाषण येत नसल्याचे व अंगी सभाधीटपणा (स्टेज डेअरिंग) नसल्याचे दिसून येते. अशा राजकारणात उतरणाऱ्या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विविध व्यावसायिक वक्त्यांकडून मार्गदर्शन घेतले जात असल्याचे दिसून येत आहे. नाशिकमध्ये अशा राजकारण इच्छुक महिलांसाठी खास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन विविध संस्था करीत असून, महापालिका निवडणुकीची चालून आलेली संधी अशा प्रशिक्षण संस्थांकडून कॅश करून घेतली जात आहे. आठवड्यातून दोन तासांच्या प्रशिक्षण वर्गाला अनेक महिला राजकारणी हजेरी लावत आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींकडून त्यांना मार्गदर्शनही मिळत आहे. काही बड्या राजकारण्यांनी तर एकत्रितपणे नको, तर खासगी प्रशिक्षण देण्याची मागणी केली असल्याचे एका संस्थाचालकांनी सांगितले.


हे प्रशिक्षण घेतले जातेय...

या कोर्सेसच्या माध्यमातून आपला आत्मविश्वास वाढीस लागावा याकरिता वक्तृत्व, सभाधीटपणा, मेक-अप, संभाषणकौशल्य, हावभाव, देहबोली, वाचिक अभिनय, शुद्ध भाषा, शब्दोच्चार यांचे प्रशिक्षण घेण्यावर भर दिसून येत आहे. यासोबतच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव समोरच्यावर कसा पडेल याकरितादेखील प्रशिक्षण घेतले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.


अनेक महिला राजकारणात आहेत. मात्र, संभाषणकौशल्य व आत्मविश्वासाचा अनेकींमध्ये अभाव दिसतो. अशा कोर्सेसच्या माध्यमातून संबंधित महिलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याचे काम केले जात आहे.

- मधुरा क्षेमकल्याणी, सेलिब्रिटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ घंटागाड्यांची ‘स्मार्ट’ सेवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या घंटागाड्यावर स्पीकर लावण्यात आल्याने नागरिकांचे उत्तम प्रकारे प्रबोधन होत आहे. शिवाय गेल्या जानेवारीपासून उपग्रहावर आधारित जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित केल्याने घंटागाड्या स्मार्ट झाल्या असून, कचरा संकलनाबाबतच्या तक्रारी कमी झाल्या आहेत.

नागरिक सुक्या कचऱ्यासोबतच ओला कचरा, खरकटे देतात. त्यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होऊन त्यांच्या आरोग्यालाही धोका होतो. हे लक्षात घेऊन नागरिकांनी सुका व ओला कचरा वेगळा करून द्यावा, असे आवाहन करणारी कॅसेट घंटागाडीत लावण्यात आली आहे. घंटागाडी आल्यावर घंटा न वाजवता कॅसेट लावली जाते. त्याद्वारे कचरा घंटागाडीतच द्या, ओला व सुकरा कचरा वेगळा करून द्या, असे आवाहन केले जाते.

सकारात्मक परिणाम

विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांनी ‘मटा’ला सांगितले, की नागरिक सुक्या कचऱ्यासोबतच वरण, पातळ भाज्या, शिळ्या पोळ्या आदी देतात. नाशिकरोडला या सीडीमुळे नागरिकांचे चांगले प्रबोधन होत असून, सुका व ओला कचरा वेगळा करून देण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन महिन्यांपासून स्पीकर लावून प्रबोधन केल्यामुळे चांगला परिणाम मिळत असून, कचरा संकलनाही वाढले आहे.

स्मार्ट घंटागाड्या

नाशिकरोडला छोट्या तीन व मोठ्या ३२ अशा एकूण ३५ घंटागाड्या आहेत. याशिवाय हॉटेल, डेब्रिज, उद्यानाचा पालापाचोळा, रात्री आणीबाणीच्या वेळी, तसेच जैविक कचरा यासाठी प्रत्येकी स्वतंत्र एक घंटागाडी आहे. नव्या करारानुसार, ठेकेदाराने नवीन गाड्या पुरवल्या आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत त्या कचरा संकलन करतात. महापालिकेने गुगल मॅपनुसार घंटागाडीचा मार्ग ठरवून दिला आहे. त्याप्रमाणे गाडी मार्गाने गेली नाही, तर महापालिकेच्या मुख्य कार्यालयात आरोग्य कक्षात संगणकावर ते दिसते. पूर्वी घंटागाडीचालक शॉर्टकट मारायचे. आता तसे केल्यास ऑनलाइन दंड केला जातो. नागरिकांच्या तक्रारीही ऑनलाइन येतात. तक्रारीचा एसएमएस विभागीय स्वच्छता निरीक्षकाकडे येतो. ते तक्रारदाराच्या घरी सुपरवायझर पाठवतात.


लोकसंख्येचा ताण

२०११ च्या जनगणनुसार नाशिकरोडची लोकसंख्या २ लाख ५८ हजार आहे. त्यानुसार नाशिकरोडला १२ प्रभागांसाठी ३५० स्वच्छता कर्मचारी आहेत आता लोकसंख्या वाढली आहे. नवीन लोकवसाहती होत आहेत. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी सफाई कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. कर्मचारी भरती झालेली नाही. नाशिकरोडला उड्डाणपूल, बिटको हॉस्पिटल, जेलरोड, दुर्गा गार्डन, पंचक, देवळालीगाव येथे आठवडेबाजार आहे. त्या ठिकाणचाही कचरा दररोज उचलावा लागतो. कर्मचारी भरती केल्यास सार्वजनिक आरोग्याला त्याचा फायदा होईल.

नाशिकरोडला स्मार्ट घंटागाड्या आल्यापासून कचरा उचलण्याचे प्रमाणही वाढले आहे. जीपीएस सिस्टीम असल्यामुळे घंटागाडीचालकांना ठरवून दिलेल्या मार्गावर जावेच लागते. नागरिकाही ओला व सुका कचरा वेगळा करून सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

-संजय दराडे, विभागीय स्वच्छता निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदामाईला ‘मैलागाडी’ बनवू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गोदावरीला आपण माता म्हणतो. त्यामुळे मातेप्रमाणेच तिचा सन्मान व्हायला हवा. तिला मैला वाहून नेणारी मालगाडी बनवू नका असे कळकळीचे आवाहन जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी सोमवारी नाशिकमध्ये केले. निवडणुकीच्या निमित्ताने दारापर्यंत येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडून गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे वचन घ्या, असेही सिंह यावेळी म्हणाले.
गोदावरीच्या जन्मोत्सवानिमित्त कुसुमाग्रज स्मारकामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंह बोलत होते. यावेळी अभिनेता चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, राजेश पंड‌ित, देवांग जानी, डॉ. प्राजक्ता बस्ते, ललिता शिंदे, गोपाळ जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिंह म्हणाले, गोदेचे पावित्र्य राखले जावे यासाठी गोदावरीच्या प्रवाहाजवळ ठिकठिकाणी कुंड बनविले गेले. परंतु, विकासाच्या नावाखाली गोदाघाट परिसरात काँक्रिटीकरण केले गेले. ज्यांच्या मनात गोदेबद्दल प्रेम, आस्था आणि डोळ्यांत पाणी नव्हते, त्यांनीच गोदावरीलाही कोरडे केले. गोदावरी ही माता आहे. तिला मैला वाहणारी मालगाडी बनवू नका, असे भावनिक आवाहन सिंह यांनी केले. गोदावरीचे पूर्वीचे सौंदर्य तिला मिळावे, ती वाहती व्हावी यासाठी काँक्रिटीकरण काढून तिला प्रवाहीत करा, असे आवाहन करण्यात आले. गोदाकाठापासून जवळच्या परिसरात १५० वर्षांहून जुन्या २० विह‌िरी आहेत. या विह‌िरींना पाणी आहे. गोदापात्रात काँक्र‌िटीकरणामुळे नैसर्गिक झऱ्यांचा गळा घोटला गेला असून, भूगर्भातील हे जलस्त्रोत जिवंत करण्याबाबत महापालिकेलाही निवेदन देण्यात आले आहे. डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी गोदावरीचा प्रवाह कसा वाहता करता येऊ शकेल, याबाबतचे प्रेझेंटेशन सादर केले. त्र्यंबकेश्वर येथे ९३ कुंड असून, त्यांचाही काँक्र‌िटीकरणामुळे गळा घोटला जात असल्याकडे ललिता शिंदे यांनी लक्ष वेधले.
गोदावरीला तिचे पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी जनस्थान परिवारासह अन्य काही घटक एकत्रित आले आहेत. ‘सेल्फी फॉर गोदा’ आणि ‘मी गोदामाई बोलतेय’ असे दोन उपक्रम त्यांनी हाती घेतले असून, प्रत्येकाने गोदामाई पुन्हा वाहती करण्याच्या संकल्पाचा व्ह‌िडीओ फेसबुकवर शेअर करावा, असे आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार पदवी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त समारंभ आज मंगळवार, ७ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या येथील मुख्यालयात सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे. या दीक्षान्त समारंभात यंदा १ लाख ४० हजार ४८४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती व दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे प्र. कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा हे उपस्थित राहणार आहेत. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर हे असतील.
यावर्षी पदवी, पदविका घेणाऱ्यांमध्ये राज्यातील १ लाख ४० हजार ४८४ विद्यार्थ्यांचा समावेश असून, या समारंभात पदवी १ लाख १४ हजार ६४३, पदविका २१ हजार ११, पदव्युतर पदविका ४ हजार ८१३ तर पीएच.डी. चे १७ विद्यार्थी पदवी ग्रहण करणार आहेत. यंदा पदवी, पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पुरुष ५६ हजार २७० तर महिलांची संख्या ८४ हजार १९७ आहे.
यावर्षी पदवी घेणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण ५५ टक्के तर महिलांचे प्रमाण ४५ टक्के आहे. स्री-पुरुष प्रमाणात सर्वाधिक महिला ९ हजार १८६ नाशिक विभागात आहेत. त्याखालोखाल ७ हजार ९०१ अमरावती आणि ७ हजार ६२७ नांदेड विभाग आहेत. शहरी भागातील विद्यार्थी ४९ हजार असून उच्च शिक्षण समाजाच्या वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय असलेल्या मुक्त विद्यापीठाने ग्रामीण भागातही मोठी विद्यार्थीसंख्या मिळवली आहे. यंदाच्या दीक्षान्त समारंभात पदवी घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८९ हजार ७१ विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. तर आदिवासी भागातील २ हजार ३९४ विद्यार्थी आहेत. याशिवाय ६१ विद्यार्थी बंदिवानांचाही त्यात समावेश आहे.
गेल्या वर्षीच्या संख्येपेक्षा यावर्षी पदवीग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर्षीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुक्त विद्यापीठाने ४०-६० वर्षे वय असलेल्या तब्बल १९ हजार ७९ व्यक्तींना पुन्हा उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. तर ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या तब्बल ११५ व्यक्ती आपले पदवीधर होण्याचे आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण करीत असून त्यात सर्वाधिक व्यक्ती ४०३१ नागपूर आणि ३०१७ मुंबई विभागातील तर ६० पेक्षा जास्त वय असलेल्या २८ व्यक्ती मुंबई तर २२ व्यक्ती नाशिक विभागातील आहेत. पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांत सर्वात जास्त विद्यार्थी बी.ए. चे ९२ हजार १८४ तर बी.कॉम.च्या ११ हजार ६५९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्यासह परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे, वित्त अधिकारी मगन पाटील, जनसंपर्क विभागाचे प्रमुख संतोष साबळे उपस्थित होते.
दीक्षान्त समारंभाचे थेट प्रसारण इंटरनेटवरून करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac संकेतस्थळावर लिंक उपलब्ध असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुत्रप्रेमामुळे नेतेच अडचणीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तीन दिवसांपूर्वीच माजी महापौर विनायक पांडे यांच्या मुलाला उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना झालेली मारहाण राज्यभर चर्चेत आली असताना सोमवारी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी पुत्र अजिंक्य गोडसे यांना जिल्हा परिषदेत उमेदवारी दिल्यामुळे ग्रामस्थांनी एकलहरे गाव बंद पाडत निषेध नोंदवला. एकामागून एक पुत्राच्या उमेदवारीवरून झालेल्या घटनेमुळे नाशिकच्या निवडणुका पुत्रप्रेमामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. विशेष म्हणजे या पुत्रप्रेमामुळे हे नेतेही अडचणीत सापडले आहेत.

आपल्या मुलाला राजकारणात फ्लॅटफॉर्म निर्माण करून त्यांना पदे मिळवून देणे हे नवीन नाही. एकेकाळी काँग्रेसच्या घराणेशाहीविरुद्ध बोलणाऱ्या विरोधी पक्षांनीसुद्धा तीच री ओढत आपल्या मुलांना सत्तेची दारे उघडून दिली. त्यामुळे नाशिकमध्ये घडलेल्या गोष्टीत नवलाई नसली तरी हे पुत्रप्रेम मात्र या निवडणुकीत चांगलेच चर्चेत आले आहे. या निवडणुकीत केवळ या दोनच घटना घडल्या नाही, तर शहर व जिल्ह्यात या घटना घडल्या व त्यांच्या चर्चाही रंगल्या. भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या मुलीला उमेदवारी न दिल्यामुळे त्या नाराज आहेत, तर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपला मुलगा समीरला जिल्हा परिषदेच्या रणांगणात उतरवल्यामुळे भाजपचे कार्यकर्त्यांतही नाराजी आहे. या चार घटनांबरोबरच शिवसेनेचे नेते सुधाकर बुडगुजर यांचा मुलगा दीपक याला पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेली नसताना त्यांनी थेट एबी फॉर्म मिळवून विद्यमान नगरसेवक अरविंद शेळके यांच्या अगोदर नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे शेळके यांची गोची झाली. त्यानंतर ही गोष्ट पक्षाच्या लक्षात आल्यानंतर थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यात लक्ष घालून दीपक यांना माघार घेण्याचे आदेश दिले. एकीकडे या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटील यांनी आपल्या काकांविरुद्धच दंड थोपटले आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक असलेल्या दिनकर पाटील यांना पुतण्याबरोबरच निवडणुकीच्या रिंगणात सामना करावा लागणार आहे. या काही घटना चर्चेत आल्या असल्या तरी जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक नेत्यांनी मुलांना रिंगणात उतवल्यामुळे त्यावरही दबक्या आवाजात टीका सुरूच आहे. एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षात मुलाला प्लॅटफॉर्म करून देणाऱ्या मुलायमसिंह यांना पस्तावा करण्याची वेळ आलेली असताना नाशिकच्या या नेत्यांनी यातून काहीही धडा घेतलेला दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपविरोधात बंडखोरांची आघाडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत निष्ठावंतांना डावलून आयारामांना उमेदवारी देण्याचा प्रकार भाजपच्या चांगलाच अंगलट येणार आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली असून, बंडोबांना शांत करण्याचे भाजपचे प्रयत्न अयशस्वी ठरत आहे. विशेषतः मोठ्या पदाधिकाऱ्यांचेच पत्ते कापणे पक्षाच्या अंगलट आले असून, त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे सरचिटणीस सुरेश पाटील व कामगार आघाडीचे उपाध्यक्ष गोपाळ पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी बंडखोरांची आघाडी करण्याची योजना सुरू आहे.

महापालिकेसाठी भाजपने उमेदवारी वाटपात मोठा गोंधळ केला आहे. विशेषतः निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने पक्षात मोठी नाराजी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांबरोबरच बहुतांश पदाधिकाऱ्यांचीही उमेदवारी कापण्यात आली आहे. प्रदीप पेशकार, गोपाळ पाटील, सुरेश पाटील यांच्या प्रदेश पातळीवर नेत्यांचेही पत्ते कापण्यात आली आहेत. त्यामुळे निष्ठावंत संतापले असून, त्यांनी आता बंडखोरांचीच आघाडी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. गोपाळ पाटील प्रभाग क्र. २३ मधून अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत, तर सुरेश पाटील प्रभाग क्र. १२ मधून रिंगणात उतरणार आहेत. अन्य नाराज नेत्यांसोबतही बोलणी सुरू असून, एकत्र आघाडी करून भाजपला धडा शिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे निष्ठावंतांची नाराजी भाजपला भोवणार असल्याचे चित्र आहे. माघारीचा दिवस मंगळवारी संपल्यानंतर निष्ठावंत एकत्र येऊन थेट भाजपलाच आव्हान देणार आहेत. त्यामुळे बंडोबांना थंड करण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोप मनसेचे, उत्तर शिवसेनेला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या उमेदवारीसाठी दोन लाखांची मागणी करणारा व दहा लाख रुपये दिल्याचा दावा करणारे भाजपचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पक्षाची बदनामी टाळण्यासाठी सारवासारव सुरू केली आहे. शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्याऐवजी आमदार अपूर्व हिरे यांनी सोमवारी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. उमेदवारांकडून पक्षाने अधिकृतपणे दोन लाख रुपये घेतल्याचा दावा हिरे यांनी केला असून, हा खर्च उमेदवारांच्या खर्चात धरला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, तर या निवडणुकीत सर्वाधिक गोंधळ हा शिवसेनेत असून, या षडयंत्रामागेही शिवसेना असल्याचा आरोप हिरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे मनसेने आरोप केल्याने भाजपने मनसेला उत्तर देण्याऐवजी शिवसेनेला उत्तर दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भाजपचा कारभार चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. भाजप कार्यालयात दोन लाख रुपये उमेदवारांकडून घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची सारवासारव सुरू असतानाच, पुन्हा रविवारी दहा लाखांचा व्हिडीओ समोर आला. त्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली असून, सोशल मीडियावर भाजप लक्ष्य ठरला आहे. भाजपवर गंभीर स्वरूपाचे आरोप होत असतानाही, शहराध्यक्ष सानप व पालकमंत्री गिरीश महाजन गप्प आहेत. पक्षाची झालेली बदनामी थांबवण्यासाठी भाजपने अखेर आमदार हिरे यांना पुढे केले आहे. त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. हिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या दोन्ही घटनांबाबत सारवासारव केली आहे.

भाजपची उमेदवारयादी अंतिम झाल्यानंतर निवडणूक कामाच्या सामूहिक खर्चासाठी प्रत्येक उमेदवाराकडून दोन- दोन लाख रुपये घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा खर्च उमेदवाराच्या व पक्षाच्या खर्चात दाखवला जाणार असल्याचा दावा हिरे यांनी केला आहे. मात्र, उमेदवारांच्या खात्यातून पैसे का घेतले नाहीत, यावर मात्र हिरे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. उमेदवारी वाटप ही सर्व्हेच्या आधारे करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ सुरू असून, एबी फॉर्म वाटपात काय झाले, याची सर्वांनाच माहिती असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेने डबल एबी फॉर्म दिले. शिवसेनेनेच भाजपच्या बदनामीचे षडयंत्र रचल्याचे सांगत, जो पक्षच घोळात आहे, ते शहर कोणत्या दिशेनेने नेणार, असा सवाल या वेळी उपस्थित केला. भाजपची बदनामी करण्यापूर्वी शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेची छुपी आघाडी असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.

सीमा हिरेंचे मनोमीलन

पत्रकारांशी बोलताना आमदार हिरे यांनी आमदार सीमा हिरेंची नाराजी दूर झाल्याचा दावा केला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली असून, त्यात सीमा हिरे उपस्थित होत्या. उमेदवारी वाटपात काहींना झुकते माप मिळाले असले तरी उमेदवारी भाजपच्याच कार्यकर्त्याला मिळाली असल्याचे सांगत, माझ्या घरात कोणालाही उमेदवारी दिली नसल्याचा दावा केला. आमदार हिरे यांची नाराजी दूर झाली असून, आता एकदिलाने निवडणुकीचा सामना करण्याचा निर्णय झाल्याचे अपूर्व हिरे यांनी सांगितले.

अपूर्व हिरेंवर जबाबदारी

गेल्या दोन दिवसांपासून पक्षाची बदनामी होत असताना पक्षाची बाजू सावरण्यासाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे समोर आल्या होत्या. शहराध्यक्ष तोंड उघडत नसतानाही, त्यांनी एकतर्फी किल्ला लढवला होता. मात्र, आता पक्षाने निवडणूक काळात पक्षाच्या प्रवक्तेपदी आमदार फरांदे यांच्याऐवजी आमदार हिरेंची नियुक्ती केली आहे. निवडणूक काळात पक्षाची मते मांडण्याची जबाबदारी हिरेंवर देण्यात आल्याने त्यांचे आता पक्षात वजन वाढल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घराणेशाहीचा डंका

$
0
0

जिल्हा परिषदेसाठी २२८५ अर्ज दाखल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण दोन हजार २८५ अर्ज दाखल झाले आहेत. एकूण ७३ गटांसाठी ८५०, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी तब्बल १४३५ अर्ज दाखल झाले. पक्षांनी सोमवारी झाकली मूठ उघडली, पण उमेदवारी न मिळालेल्या सर्वच पक्षांमधील इच्छुकांनी बंडाचे निशान फडकावले. यंदाही तिकीट वाटपावर घराणेशाहीचाच वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले असून, खासदार हेमंत गोडसे यांच्या मुलास एकलहरे गटातून उमेदवारी देण्यात आल्याने एकलहरेत दुकाने बंद ठेऊन निषेध नोंदविण्यात आला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच इच्छुकांनी तहसील कार्यालयांमध्ये गर्दी केली. या एकाच दिवसात जिल्हा परिषदेसाठी ५५६, तर पंचायत समितीसाठी रेकॉर्डब्रेक ८५० अर्ज दाखल झाले. निफाड तालुक्यात शेवटच्या दिवशी गटासाठी ८६, तर पंचायत समितीसाठी १३६ अर्ज दाखल झाले. सर्वात कमी अनुक्रमे १७ आणि २४ अर्ज सुरगाणा तालुक्यात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रतिष्ठेच्या बनलेल्या काही जागांवर ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आल्याने अनेक इच्छुकांनी बंडाचे निशान फडकावत अन्य पक्षातून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. तर काहींनी अपक्ष अर्ज सादर करीत आपले आव्हान कायम ठेवले आहे. सटाणा येथील जायखेडा गटात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी पत्नीला काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. खासदार हेमंत गोडसे यांचा मुलगा, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची पत्नी आणि मुलगा, आमदार निर्मला गावित यांची मुलगी यांसह अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी नातलगांनाच उमेदवारी देऊन घराणेशाहीवर शिक्कामोर्तब केले आहे. मनसेने बनावट नोटा प्रकरणातील बहुचर्चित विलास पांगारकर यांना नांदुर शिंगोटे गटातून पुरस्कृत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनधरणी, आश्वासनांचे गाजर अन् सौदेबाजी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी बंडखोरांनी राजकीय पक्षांना माघारीसाठी अक्षरशः झुंजवले असून, विनवण्या करूनही बंडखोर ऐकत नसल्याने नेते बेजार झाले आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात शड्डू ठोकलेल्यांची मनधरणी करण्याबरोबरच आश्वासनांचे गाजर दाखवले जात आहे. आश्वासनांची खैरात करूनही ऐकत नसल्याने थेट सौदेबाजी केली जात असल्याने बंडखोरांचा भाव चांगलाच वधारला आहे.

बंडखोरांना आवरण्यासाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर केला जात असून, अनेकांना स्विकृत नगरसेवक, संघटनात्मक जबाबदारी, शिक्षण मंडळ आदींवर नियुक्त्या बहाल केल्या जात आहेत. मंगळवार माघारीचा शेवटचा दिवस असून, या दिवशी अपक्षांचा भाव चांगलाच वधारणार असून, मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडून येण्याचे मेरिट ग्राह्य धरत पक्षाबाहेरून येणाऱ्या आयारामांना मोठ्या प्रमाणावर तिकिटे दिली. त्यामुळे शिवसेना, भाजपात बंडखोरी वाढली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतही तुरळक बंडखोरी आहे. या बंडखोरांनी पक्षाच्याच अधिकृत उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शिवसेना व भाजपची मोठी अडचण झाली आहे. या बंडोबांना थंड केले नाही, तर थेट संभाव्य सत्तेलाच मुकावे लागणार आहे.

बंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. या बंडखोरांना पक्षाच्या कार्यालयातून फोन करून चर्चेचे आवतन दिले जात आहे. त्यामुळे काही अपक्ष नॉटरिचेबल झाले आहेत. अनेकांना शिक्षण मंडळ, स्विकृत नगरसेवकाचे गाजर दाखवले जात आहे. काहींना थेट संघटनात्मक पदांची ऑफर दिली जात आहे. काहींना महापालिकेचा ठेका दिला जाईल, असे गाजर दाखवले जात आहे. तसेच महापालिकेत नोकरभरती झाली तर, त्यात तुम्हाला कोटा देऊ असे आश्वासनही दिले जात आहे. मनधरणीने ऐकले नाही, तर थेट सौदेबाजी केली जात आहे. त्यामुळे अपक्षांचा भाव चांगलाच वधारला आहे. उमेदवारीसाठी आम्हाला फिरवले, आता आम्ही तुम्हाला फिरवू असा इशाराच बंडखोर देत आहेत.

तयारीचा खर्च देऊ

भाजपच्या वतीने तर अनेकांना निवडणुकीच्या अगोदरच तयारीला लागण्याचा आदेश नेत्यांकडून देण्यात आले होते. त्यामुळे अनेक इच्छुकांनी तयारी करीत विविध कार्यक्रम घेऊन प्रभागात आपली हवा निर्माण केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खिसाही रिकामा केला. परंतु, आता उमेदवारी मिळाली नसल्याने हा खर्च वाया जाणार आहे. हा खर्च तरी भरून निघावा यासाठी काहींनी अपक्ष म्हणून रिंगणात राहणे पसंत केले आहे. त्यामुळे ज्याला अधिकृत उमेदवारी मिळाली, त्याच्यावर अपक्षांना शांत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अपक्षांचे उपद्रवमूल्य पाहून काहींनी त्याचा खर्च सव्याज परत करण्याचीही तयारी दर्शवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये सेनेचा गोंधळ कायम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणुकीत पंचवटी विभागात प्रभाग क्रमांक ४ मध्ये एबी फॉर्मच्या गोंधळामुळे शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. आता या प्रभागात शिवसेनेने चार उमेदवारांना पुरस्कृतच करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यात पक्षाने अधिकृतपणे उमेदवारी दिलेल्या सविता बडवे यांचे नाव आता कापण्यात आले आहे. शिवसेनेने घोषित केलेल्या यादीत सविता महेंद्र बडवे यांचे नाव होते. मात्र, त्यांनी आपला अर्ज सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्याऐवजी नागरिकांचा मागासवर्ग गटातून भरल्यामुळे त्यांना शिवसेनेने पुरस्कृत केले नाही. त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवतात की माघार घेतात हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे.

नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वांत आधी सविता बडवे यांनी पक्षाकडून एबी फॉर्म मिळवला होता. त्या हा एबी फॉर्म दाखल करणार, तितक्यात शिवसेनेचे या प्रवर्गातून इच्छुक असलेले सतनाम राजपूत यांनी त्यांचा एबी फॉर्म फाडला. त्यामुळे गोंधळ उडाला. त्यानंतर उर्वरित उमेदवारांचे एबी फॉर्म आले नसल्याचे लक्षात आल्यानंतर गोंधळात आणखी भर पडली. नंतर पक्षाने पुन्हा चार कोरे एबी फॉर्म पाठवले. मात्र, वेळ संपल्यामुळे सर्वच उमेदवारांवर अपक्ष लढण्याची नामुष्की ओढवली आहे. आता या निवडणुकीत शिवसेनेने या चारही उमेदवारांना पुरस्कृत केलेले आहे. मात्र, या निवडणुकीत फॉर्म फाडणारे शिवसेनेचे सतनाम राजपूत यांची उमेदवारी कायम आहे, तर बडवेंचाही अर्ज शिल्लक आहे. त्यामुळे मंगळवारी माघारीनंतर या प्रभागाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

विरोधकांचा हात

शिवसेनेच्या या एबी फॉर्मच्या गोंधळात विरोधकांचा हात असल्याचेही आता शिवसेनेकडून बोलले जात आहे. त्यात शिवसेनेचे काही नेते सामील होते व त्यांनीच एबी फॉर्म उशिरा देऊन हा गोंधळ केला. त्यामुळे अशा नेत्यांना शोधून ही फिक्सिंगसुद्धा शोधून काढावी, अशी मागणी शिवसेनेच्या या प्रभागातील कार्यकर्त्यांनी केली आहे.

असे झाले बदल

शिवसेनेच्या अधिकृत यादीत प्रभाग क्रमांक चारमध्ये अ प्रवर्गातून प्रतिभा घोलप, ब प्रवर्गातून वर्षा गिते (पगारे), क प्रवर्गातून भगवान भोगे व ड प्रवर्गातून सविता बडवे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, आता प्रवर्ग डमध्येच भगवान भोगे व सविता बडवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे येथून एकाच उमेदवाराला पुरस्कृत करता येणार आहे. त्यामुळे बडवे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी पक्षाने चांगदेव गुंजाळ यांचे नाव पुढे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घराणेशाहीविरोधात कार्यकर्त्यांचे निषेधास्त्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेकडून कार्यकर्त्यांना डावलून घराणेशाहीला प्राधान्य देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या एकलहरे गटातून खासदार हेमंत गोडसे यांचे पुत्र अजिंक्य यांना संधी देण्यात आल्याने प्रमुख इच्छुक शंकर धनवटे यांच्या समर्थकांनी तीव्र निषेध व्यक्त केला. एकलहरे परिसरात सोमवारी बंद पाळत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला.

एकलहरे, पळसे, देवळाली हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात शिवसेनेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. जिल्हा परिषदेच्या एकलहरे गटातून विद्यमान सरपंच शंकर धनवटे शिवसेनेकडून प्रबळ दावेदार होते. परंतु, त्यांचा पत्ता ऐनवेळी कट करून खासदार गोडसे यांचे पुत्र अजिंक्य यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे धनवटे समर्थक शिवसैनिक संतापले. एकलहरे गावात सोमवारी बंद पाळून त्यांनी शिवसेनेच्या जिल्हा नेतृत्वाचा निषेध केला. उमेदवारीसाठी थेट नेतृत्वाविरोधात डरकाळी फोडण्याचा प्रकार ग्रामीण भागात प्रथमच घडला आहे.

भोवली ती निवडणूक
शंकर धनवटे यांनी १९९७ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी ‌मागितली होती. त्यावेळी भाऊसाहेब ढिकले यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यानंतर पुन्हा २००७ च्या निवडणुकीतही धनवटे यांना डावलण्यात आले. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा सामना शिवसेनेचे जगन आगळे आणि मनसेचे हेमंत गोडसे यांच्याशी झाला होता. त्या निवडणुकीत हेमंत गोडसे अवघे १६८ मताधिक्य घेत विजयी झाले. या निवडणुकीत धनवटे यांनी गोडसे यांना विजयासाठी झुंजविले होते. २०१२ च्या निवडणुकीत एकलहरे गट अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाला. त्यावेळी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या पत्नी सुशीला मेंगाळ निवडून आल्या. आता २०१७ च्या निवडणुकीत खुल्या गटासाठी झाल्याने धनवटे यांनी जोरदार तयारी केली. मात्र, २००७ च्या निवडणुकीतील बंडखोरी त्यांना आताच्या निवडणुकीत भोवली.


विद्यमान खासदारांनी पुत्रप्रेमापोटी निष्ठावंतांना डावलले. शिवसेनेत घराणेशाही मुरत आहे. पक्षाने संधी नाकारली तरी मी अपक्ष लढणार आहे. माझी लढाई शिवसेनेविरोधात नव्हे तर खासदार गोडसे यांच्याविरोधात आहे.
- शंकर धनवटे, इच्छुक उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेचे आंदोलन तर लोकसंग्रामची मेजवानी

$
0
0

पांझरा चौपाटी अतिक्रमणावरून धुळ्य ाात आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पांझरा नदीकिनारी असलेल्या चौपाटीचे अतिक्रमण वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या समर्थकांनी लोकसंग्रामच्या माध्यमातून ‘खाऊन पिऊन आत्मसंतुष्ट सत्याग्रह’ आंदोलन सुरू केले. तर त्यांच्यासमोर शिवसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

पांझरा चौपाटीवर मंगळवारी (दि. ७) या दोन्ही आंदोलनाच्यावेळी लोकसंग्रामने जोरदार घोषणाबाजी करून आंदोलनाच्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून त्यांचा आस्वाद घेतला. चौपाटीच्या वादावरून शिवसेना व लोकसंग्राम हे आमनेसामने उभे ठाकले आहेत. या दोन्ही आंदोलकांमध्ये कोणताही वाद होऊ नये यासाठी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील रस्ता बंद ठेऊन पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता.

याबाबत लोकसंग्राम पक्षाकडून जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले. अमोल सूर्यवंशी, दिलीप साळुंखे, प्रशांत भदाणे, डॉ. अनिल पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. तर शिवसेनेकडूनही जिल्हाधिकाऱ्यांना चौपाटी उठविण्याबाबत निवेदन देताना नगरसेवक नरेंद्र परदेशी, फारुक शहा, विष्णू गवळी, भरत मोरे उपस्थित होते.

आरोप करणारे भ्रष्ट

चौपाटीचे अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत काढण्यात येणार नाही. पांझरा नदीकिनारी ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. तेथे आमदार गोटे यांनी सुंदर आकर्षक अशी चौपाटी उभारली आहे. आमच्या विरोधात आंदोलन करणारे भ्रष्ट असल्याचा आरोप तेजस गोटे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचा पाठिंबा

आमदार गोटे यांनी शहरातील विविध ठिकाणचे भूखंड हडप केले असून मनपा हद्दीतील जागा बळकावत असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी केला आहे. तसेच कार्यवाहीत दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याचा इशारादेखील परदेशी यांनी दिला आहे. तर पांझरा नदीकिनारी उकिरड्यावर असलेली चौपाटी हटविण्याचा घाट शिवसेनेने घातला असताना त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images