Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सातपूर विभागाचे अखेर उघडले खाते

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज सादर करून सातपूर विभागाचे खाते उघडले आहे.
गंगापूर गावातील अरुण पाटील यांनी प्रभाग क्रमांक ८ मधून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र बेहरे यांच्याकडे सादर केला. अधिकृत पक्षांच्या इच्छुकांना मात्र चौथ्या दिवशीही उमेदवारीची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून आले. भाजप व शिवसेनेत सर्वाधिक इच्छुक उमेदवार असल्याने राष्ट्रवादी व काँग्रेसलादेखील बंडखोरांची प्रतीक्षा लागून असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आघाडीनेही उमेदवार जाहीर केलेले नाहीत. दुसरीकडे बसप, माकप, भारिप या पक्षांतील उमेदवारदेखील चार जणांचे प्रबळ पॅनल कसे तयार होईल ,यासाठी प्रयत्नशील आहेत. दिवसभरात प्रभाग ९ मधून जनाबाई ईघे व प्रभाग ११ मधून विलास गुंजाळ यांनी आपली अनामत रक्कम भरली. परंतु, पक्षाची उमेदवारी जाहीर झाली नसल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केलेला नाही.

मनसेच्या ‘टाळी’ची चर्चा
दरम्यान, मनसेने शिवसेनेला टाळी देण्याचे ठरविले असल्याची चर्चा दिवसभर रंगली होती. परंतु, शिवसेनेत सातपूर विभागात इच्छुकांची मोठी संख्या असल्याने मनसेच्या टाळीला शिवसेना साथ देईल का, यावरही इच्छुकांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसून आली. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या सातपूर विभागात भाजपने मोठी ताकद उभी केल्याने सर्वच प्रभागांतील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सात उमेदवारी अर्ज दाखल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांचा थंड प्रतिसाद कायम आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सोमवारी केवळ चार अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे एकूण अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या आता सात झाली आहे.

राजकीय पक्षांकडून अजूनही उमेदवारी याद्या घोषित केल्या जात नसल्याने शहरातील सर्व दहा निवडणूक कार्यालयांमध्ये शांतता आहे. असे असले तरी ऑनलाइन अर्ज भरण्याकडे इच्छुकांचा कल अधिक आहे. आतापर्यंत जवळपास ३५५ जणांनी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरले आहेत.

महापालिका निवडणुकांसाठी नामांकन भरण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. तीन फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल केले जाणार आहेत. शुक्रवारी पहिल्या दिवशी एकमेव अर्ज दाखल झाला होता. मात्र, हा अर्जही डमी होता. शनिवारी दोन अर्ज दाखल झाले. तर रविवारचा दिवस निरंक गेला. सोमवारी केवळ चार अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक १४ मध्ये राणी मिलिंद जगताप, प्रभाग क्रमांक १९ मध्ये नंदरकुमार रामदास आहेर, प्रभाग क्रमांक २६ मध्ये निर्मला भास्कर पवार, प्रभाग क्रमांक २७ मध्ये किरण हरी डवले यांनी अर्ज दाखल केले. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही. त्यामुळे दहा निवडणूक कार्यालयांमध्ये अजूनही शुकशुकाट दिसून येत आहे. तर ऑनलाइन अर्ज भरणाऱ्यांची संख्या ही ३५५ वर पोहचली आहे. त्यामध्ये अनेक विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

सिडकोत दोन अर्ज दाखल
सिडको : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सोमवारी सिडको विभागातून केवळ दोनच अर्ज दाखल झाले आहेत. अद्याप एकाही राजकीय पक्षाच्या इच्छुकांनी अर्ज दाखल केलेला नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच अर्ज दाखल करण्याचे संबंधितांचे म्हणणे असले, तरी उमेदवारी अर्जांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी इच्छुकांचे समर्थक धावपळ करीत असल्याचे दिसत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम शुक्रवार (दि. २७)पासून सुरू झालेले आहे. सिडकोतील सहा प्रभागांतून २४ नगरसेवक निवडून येणार आहेत. परिसरात इच्छुकांची संख्या जास्त असली, तरी अद्याप प्रभाग २६ ब मधून निर्मला भास्कर पवार यांनी नाशिक महानगर युवा आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला असून, दुसरा अर्ज प्रभाग २७ अ मधून किरण हरी ढवळे यांनी दाखल केला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर केली नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल होत नसल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये आज चक्काजाम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात मंगळवारी सकाळी मराठा मोर्चातर्फे निदर्शने, विविध मागण्यांसाठी रिक्षा संघटना, मालवाहतूकदार संघटनेतर्फे चक्का जाम आंदोलन होणार असल्याने जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. संभाव्य नुकसान ओळखून एसटी महामंडळाने सुरक्षेच्या कारणास्तव शहर बससेवा मंगळवारी दुपारपर्यंत बंद ठेवल्या आहेत. रिक्षा व बस बंद राहणार असल्याने विद्यार्थी, चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाने दरवाढ केल्याच्या निषेधार्थ विविध रिक्षा संघटना, तसेच मालवाहतूकदार संघटनांतर्फे मंगळवारी सकाळी ११ वाजता द्वारका येथे चक्का जाम आंदोलन छेडण्यात येणार आहे. दुसरीकडे मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आडगाव आणि सिन्नर फाटा येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. एकाच वेळी तीन ठिकाणी रास्ता रोको होणार असल्याने नाशिककरांसह परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.

पोलिस महासंचालकांकडून सूचना

पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी सोमवारी राज्यातील पोलिस आयुक्त, तसेच पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. चक्का जाम आंदोलन, तसेच निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेत समाजकंटकांवर कारवाई करण्याचे आदेश माथूर यांनी दिले आहेत.

शहर बस दुपारपर्यंत बंद

श्रमिक संघटनेच्या झेंड्याखाली सगळ्याच प्रमुख वाहतूकदार संघटनांनी आंदोलन पुकारल्याने सकाळपासून रिक्षा वाहतूक ठप्प होणार आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळाने शहर बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी दोन वाजेनंतरची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या बंदचा फटका शाळा, कॉलेजांतील विद्यार्थ्यांना बसेल.

शाळा, कॉलेज बंद?

एसटी बसेस, तसेच रिक्षा व्यावसायिक दुपारपर्यंत रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाही. त्यामुळे शाळा व कॉलेजांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावण्याची चिन्हे असून, पालकांनाच याबाबत सजग राहून निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असली तरी नाशिकमध्ये याबाबतचा निर्णय संध्याकाळी उशिरापर्यंत झालेला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची आज ७० जणांची यादी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी ,नाशिक

दहा प्रभागात घोडे अडल्यामुळे भाजपची सोमवारी जाहीर होणारी यादी आता मंगळवारी जाहीर केली जाणार आहे. या यादीत जवळपास ७० नावे जाहीर केली जाणार आहेत. या निवडणुकीत भाजपने यादी आधी प्रसिद्ध करुन विरोधकांना जोरदार धक्का देण्याचे नियोजन केले होते. पण इच्छुकांच्या वाढलेल्या संख्येमुळे भाजपकडे पेच निर्माण झाला. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सर्व सुत्रे आपल्या हाती घेवून सर्वांची चर्चा करून ही यादी मंगळवारी जाहीर करणार असल्याचे सांगितले.

पहिल्या यादीतील नावे फायनल करण्यासाठी त्र्यंबक नाक्याजवळ एका नेत्याच्या बंगल्यावर बैठक झाली. त्यात पालकमंत्री गिरीष महाजन, भाजप संघटनमंत्री किशोर काळकर, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, अपूर्व हिरे, लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, वसंत गीते, डॉ. प्रशांत पाटील, प्रकाश लोंढे आदी उपस्थित होते. या सर्वांशी चर्चा करून ही यादी अंतीम करण्याचा निर्णय झाला त्यानंतर रात्री उशीरापर्यंत चर्चा सुरू होती. ३१ प्रभागापैकी १० प्रभागात उमेदवारी बाबत एकमत न झाल्यामुळे या यादीचे घोडे अडले होते. भाजपाने सर्वात अगोदर आघाडी घेत मुलाखती घेतल्या. १२२ जागांसाठी ६८४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. आता भाजपाला यातून उमेदवार निवडणे अवघड झाले असले तरी त्यांनी पहिले ७० उमेदवार निश्चित केले आहे. जवळपास २१ प्रभागात उमेदवार निश्चित झाले असून, उर्वरित दहा प्रभागाचा तिढा सोडवणे अवघड झाले आहे.

निवडून येणे हेच सूत्र

निवडून येणे हेच सूत्र धरत या बैठकीत चर्चा सुरू झाल्यामुळे अनेक दिग्गजांचे समर्थकांचे नाव गळाल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. एकाच प्रभागात तीन ते चार समर्थक असतांना दुसऱ्याला उमेदवारी निश्चित झाल्यामुळे काही नेत्यांना ते जिव्हारी लागले असले तरी त्यांनी मात्र मौन बाळगले आहे.

पहिली यादी जवळपास निश्चित झाली असून त्यात ७० नावे घोष‌ित केली जाणार आहे. उर्वरीत यादी टप्याटप्याने प्रसिद्ध केली जाईल. एकमताने सर्व नावे निश्चित केली जात आहेत.

-किशोर काळकर, संघटनमंत्री भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पदवीधर’चा प्रचार अंतिम टप्प्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यांत येऊन पोहोचली आहे. मतदानासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना प्रमुख लढत असलेल्या काँग्रेस अन् भाजपच्या उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यांत येऊन पोहोचला आहे. डाव्या आघाडीच्या उमेदवारानेही प्रचारासाठी जोर लावला आहे.

अंतिम टप्प्यांत वैयक्तिक गाठीभेठींसह विविध संघटना आणि सामाजिक मंडळांसोबत एकत्रित बैठका, चौक सभा आणि संपर्क साधनांचा पूर्णत: वापर वाढला आहे. शुक्रवारी होणाऱ्या या निवडणुकीसाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून सुमारे अडीच लाख उमेदवार मतदान करणार आहेत.

तांबे यांचा झंझावाती प्रचार

काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी सोमवारी नाशिकमध्ये झंझावाती प्रचार दौरा केला. मतदारांच्या दहाहून अधिक कॉर्नर बैठकांना संबोधीत करतांनाच माहेश्वरी आणि जैन समाजाने डॉ. तांबे यांच्या समर्थनार्थ आयोजित मेळाव्यांनाही त्यांनी हजेरी लावली. याशिवाय वैयक्तीक भेटी घेत डॉ. तांबे यांनी सहकार्याचे आवाहन केले. नाशिकरोड येथे चार, पंचवटीत दोन, गंगापूर रोडला एक आणि सातपूर भागात तीन अशा दहा कॉर्नर बैठका घेतल्या. विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या, गणेश एकता कला क्रीडा संस्था, पीएमए फ्रेंडशिप कप या क्रिकेट स्पर्धा येथे भेट देत नाशिकमधील प्रचाराचा दुसरा टप्पा त्यांनी पूर्ण केला. डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रचारासाठी नगर शहर व जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटना प्रचारात सक्रीय झाल्या आहेत. ‘होम टू होम’प्रचारासह नाशिकमधील सरकारी कार्यालयांमध्ये दुर्गा तांबे व कार्यकर्त्यांनी भेट देऊन प्रचारावर भर दिला. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज शिंदे पळसे, वैभव ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था, भोसला मिलिट्री स्कूल, डॉन बॉस्को स्कूल कॉलेज रोड, प्रबोधिनी विद्यामंदिर, रचना विद्यालय शरणपूर रोड, एस. टी. फ्रान्सिस स्कूल तिडके कॉलनी, नांदूर मधमेश्वर जलसंपदा विभाग, वनरक्षक कार्यालय, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय गडकरी चौक, जिल्हा उद्योग केंद्र, शासकिय तंत्रनिकेतन, व्यवसाय प्रशिक्षण कार्यालय, सहकारी दुय्यम निबंधक कार्यलय, राज्य माहिती आयोग, उपविभागीय कृषी कार्यलय आदी ठिकाणी भेटी दिल्या.

डॉ. पाटील यांच्या प्रचारालाही वेग

पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांच्या प्रचारासाठीही कार्यकर्त्यांनी दिवस रात्र एक केला आहे. शहर आणि जिल्हाभरातील विविध शासकीय, खासगी संस्थांसह वैयक्तिक गाठीभेटींवरही भर दिला आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन रचनांमध्ये प्रचारयंत्रणा उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यात कार्यरत आहे. सोमवारी डॉ. पाटील यांनी संस्थात्मक आणि वैयक्तिक भेटींवर भर देत दुसऱ्या टप्प्यातील प्रचार पूर्ण केला.

याशिवाय सोमवारी भिंगार मंडल नगरमध्ये कार्यकर्त्यांनी संपर्क अभियान राबविले. यावेळेस उपस्थित भाजप मंडल अध्यक्ष महेश नामदे, सुनील लालबोंद्रे, आरपीआयचे युवा अध्यक्ष अमित काले, नगरसेवक प्रकाश फुलारी, नगरसेवक रवींद्र लालबोंद्रे, महेंद्र जाधव, युवामोर्चा अध्यक्ष मयूर जोशी यात सहभाग घेतला. भिंगार शहर मधील पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी घेऊन डॉ. प्रशांत पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी भिंगार भाजपा मंडल अध्यक्ष महेश नामदे, सरचिटणीस नीलेश साठे, आदी उपस्थित होते.

देसले यांच्या गाठीभेटी

डाव्या आघाडीचे उमेदवार राजू देसले यांनीही प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रत्यक्षात गाठीभेठींवर भर दिला आहे. पदवीधरच्या बालेकिल्ल्यांसाठी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार दावा सांगत असले तरीही डाव्या आघाडीच्या उमेदवारास पडणारी मतेही निर्णायक ठरणार आहेत. तर, सरकारच्या विविध धोरणांवर टिका करत कष्टकरी आणि बहुजन वर्गाचा उमेदवार म्हणून रिंगणात असल्याची भूमिका देसले यांनी सोमवारच्या प्रचारादरम्यान मांडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक पतसंस्थेवर गुरूसेवा पॅनलची सत्ता

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था (लि. नाशिक)च्या व्यवस्थापक समितीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत गुरूसेवा पॅनलने संपूर्ण सतरा जागा जिंकून त्यांनी हा विजय मिळवला. पौर्णिमा बस स्टॉपजवळील समर्थ मंगल कार्यालयात सोमवारी मतमोजणी पार पडली.

संस्थेच्या व्यवस्थापक समितीसाठी रविवारी पंचवार्षिक निवडणूक पार पडली. सन २०१७ ते २०२१ या कालावधीसाठी जिल्ह्यातील बारा मतदान केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. संस्थेच्या १९६९ सभासदांपैकी १६७३ सभासदांनी म्हणजेच ८४ टक्के सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. गुरुसेवा पॅनल व शिक्षक क्रांती पॅनलमध्ये ही लढत रंगली. या निवडणुकीत सुभाष अहिरे, प्रकाश सोनवणे, अर्जुन तटकारे, केदू देशमाने, हेमंत पवार, धनंजय आहेर, संजय साळुंके, वामन खैरनार, अर्जुन भोये, राजाराम खैरनार, नंदू आव्हाड, प्रतिभा अहिरे, शोभा कापडणीस, संजय भोर, प्रदिप खैरनार, संजय दराडे, मनोहर वाघेरे हे उमेदवार निवडणुकीत बिनविरोध निवडून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधन गळतीप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

सिन्नर तालुक्यातील आगासखिंड येथे शुक्रवारी (दि.२७) रोजी सपाटीकरण सुरू असतांना रॉक ब्रेकरचा नांगर जमिनीत अडकल्याने डिझेल वाहिनी फुटली होती. यामुळे सुमारे १.२६ कोटी रुपयाचे डिझेल वाया गेले आहे. याबाबत सिन्नर पोल‌िस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, या ठिकाणी जमिनीतून सुमारे ३० हजार लिटर डिझेल पुन्हा जमा करण्यात यश आले असून, जेसीबीच्या सहाय्याने ५ चौरस फूट खड्डे घेण्यात आले होते. त्यानंतर जमिनीतून वर येणारे डिझेल व्हॅक्यूम यंत्राच्या सहाय्याने काढण्याचे काम गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. या प्रकरणी भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशनचे उपप्रबंधक मनीष बळवंत यांनी सिन्नर पोल‌िस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन जमीनमालक उमेश मोजाड व डोझर मशीनचालक श्रीराम राऊत (जांभूरटोल, जि. गोंद‌िया) यांच्या विरोधात पेट्रोलिअम अ‍ॅण्ड म‌िनरल पाइप अ‍ॅक्वीसेशन ऑफ अ‍ॅक्ट २०११ नुसार कलम १५ (२) अन्वये व कलम २८५, २७८, ३३६, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. नि. दत्तात्रय कोकरे करीत आहे. हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती बीपीसीएलचे देखभाल विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक स्वप्निल वराडकर यांनी दिली आहे. दरम्यान, काम पूर्ण झाल्यास पाइपमधून इंधनाचा प्रवाह तपासल्यानंतर नियमित इंधन वहन करणे शक्य होणार आहे.

माती परीक्षण होणार

ज्या शेतकऱ्याच्या जमिनीचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून माती परीक्षण करून देण्यात येईल. तसेच जमीन शेतीसाठी पुन्हा कशी उपयुक्त करता येईल का? याचेही परीक्षण केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यमुना सफेद’मुळे वाढणार उत्पादन क्षमता

0
0

सुनील कुमावत, निफाड

औषधी गुणधर्म असलेल्या लसणाचे भरगोस उत्पादन घेता येईल असे नवीन वाण एनएचआरडीएफ (राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठान)ने विकसित केल्याची माहिती डॉ. आर. पी. सिंग यांनी दिली. चितेगाव फाटा येथील या संस्थेने लसणाचे यमुना सफेद ९ (जी ३८६) या नवीन वाणाची निर्मिती केली आहे. सन २०१५-१६ मध्ये भारतात २.८१ लाख हेक्टर जमिनीवर १६.१७ लाख मेट्रिक टन लसणाचे उत्पादन घेतले गेले.


अशी करा लागवड

पेरणी करतांना दोन रांगांमध्ये १० ते १५ से. मी. आणि त्यातील कळ्यांमध्ये ७.५ ते १० से. मी. अंतर ठेवावे. सद्यस्थितीत लसूण शेती करताना कमी पाण्यात सिंचन पद्धतीचा उपयोग लाभदायक ठरत आहे. ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा उपयोग उपयुक्त आहे. या पद्धतीने लसणाचे पीक घेतल्यामुळे ४० टक्के पाण्याची बचत होऊ शकते. लसणाची पाने पिवळे पडल्यावर आणि वाळायला लागल्यावर लसूण परिपक्व झाला असे समजावे. त्याच्या काढणीनंतर ५ ते ७ दिवस त्याला सावलीत सुकवावे. त्यानंतर वाळलेल्या पानांसह त्याला हवेशीर ठिकाणी वर बांधावे.

असे आहे यमुना सफेद

n लसणाचा व्यास ४.५ पासून ५.५० से.मी.

n पाकळ्यांचा व्यास १.२५-१.५० सेमी

n वजन २ ते ३ ग्रॅम

n विलेय (टीएसएस) ४१ ते ४२ टक्के

n शुष्क पदार्थ ४२ ते ४३ टक्के

n प्रति हेक्टर १८० ते २२५ क्विंटल उत्पादन

n निर्यातीच्या दृष्टीने उत्कृष्ठ वाण

n १५० ते १६० दिवसात पीक तयार

n स्टेम फिलिअम, झुलसा आणि थ्रिप्स रोगांचा परिणाम होत नाही


अधिक उत्पादन आणि निर्यातक्षम असलेले यमुना सफेद ९ (जी३८६) हे लसणाचे नवीन वाण (बी) चितेगाव, सिन्नर, इंदूर (मध्य प्रदेश), कर्नाल (हरियाणा)या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्याच्या दरम्यान राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि प्रतिष्ठानच्या सेंटरमध्ये मिळेल.
- डॉ आर. पी. सिंग, संचालक, एनएचआरडीएफ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युनिसेफ फेस्ट‌िव्हलमध्ये नाशिकचे यश

0
0

एचपीटी कॉलेजला दोन पारितोषिके

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्स कॉलेज संचलित ना. गोपालकृष्ण गोखले स्कूल ऑफ मास कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम विभागाने मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय शॉर्ट फिल्म फेस्टीव्हलमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

युनिसेफ इंडिया आणि वुमन्स फिचर सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेत राज्यातील २० कॉलेजेसने सहभाग घेतला होता. अवघ्या तीन मिनिटांमध्ये अतिशय बोलक्या दृश्यांच्या माध्यमातून मनाला भिडणारे लघुपट यावेळी विभागाकडून सादर करण्यात आले.

दरवर्षी राज्यातील वृत्तपत्र विद्या विभाग चालविणाऱ्या कॉलेजेससाठी युनिसेफ इंडिया आणि वुमन्स फिचर सर्व्हिसेस यांच्याकडून महिला आणि लहान मुले यांच्याशी संबंधित विविध विषयांवर शॉर्ट फिल्मस फेस्ट‌िव्हलचे आयोजन करण्यात येते. यंदा या स्पर्धेत एचपीटी कॉलेजकडून ५ लघुपट पाठविण्यात आले होते. यात ‘गोईंग बॅक होम’या लघुपटाला साडे सात हजार रुपयांचे दुसरे तर स्क्रॅच या लघुपटला पाच हजार रुपयांचे तिसरे पारितोषिक मिळाले आहे. स्पर्धेसाठी अशोक राणे (चित्रपट समीक्षक), उर्वी जुवेकर (लेखक आणि दिग्दर्शक) आणि गणेश पंडीत (चित्रपट लेखक) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयाने दोन पारितोषिके पटकावल्यानंतर परिक्षकांनी शाब्बासकी दिली. लघुपट बनविण्यासाठी प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी आणि विभागप्रमुख डॉ. वृंदा भार्गवे, रमेश शेजवळ, मेघा वैद्य यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तर वैदही, प्रशांत, सपना,यश, प्राची, मयूर, रोहित आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

स्क्रॅच

कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांचे शोषण केले जाते. यातून स्व:ताचे संरक्षण करणारी स्त्री याचे केवळ १ मिनिटांचे चित्रण स्क्रॅच लघुपटात असून प्रेक्षकांना अचंबित करते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती तुरुंगात, संचालक भाजपात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे तुरुंगात असतानाच त्यांचे काही खास समर्थक व विद्यमान संचालकांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. यात विद्यमान सहा संचालक व दोन माजी संचालकांचा समावेश आहे. विद्यमान संचालकांत विश्वास नागरे, तुकाराम पेखळे, युवराज कोठुळे, भाऊसाहेब खांडबहाले, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे यांचा समावेश आहे. तर माजी संचालकांमध्ये बाजार समितीचे उपसभापती सुरेश गंगापुत्र व माजी संचालक राजाराम धनवटे यांचा समावेश आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या खात्यातून धनादेशांद्वारे पैसे काढून ते बळकावल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कृउबा सभापती व माजी खासदार देवीदास पिंगळे यांना अटक केली. त्यानंतर ते तुरुंगातच आहे. त्यांच्या समर्थकांना कोणताच आधार नसल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची संधी शोधत आपल्या समर्थकांसह प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी तालुक्यातील विविध गावांतील सरपंच, सोसायटीचे संचालक यांनीही प्रवेश केला. या संचालकांमध्ये काहींना भाजपकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे त्यांनी घाईत हा प्रवेश सोहळा करून घेतला. यातील बहुतांश संचालक हे राष्ट्रवादीत होते. त्यामुळे राष्ट्रवादीलाही यामुळे मोठा धक्का बसला आहे.

१५ संचालक समर्थक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर पिंगळे यांचे गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीपासून वर्चस्व आहे. १८ संचालकांपैकी पिंगळेंचे १५ जण समर्थक आहेत. त्यांनी या निवडणुका विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेवून लढवल्या असल्या, तरी त्यात राष्ट्रवादी समर्थकांचेचे प्रमाण अधिक आहे. एकाच वेळी सहा संचालक भाजपात दाखल झाल्याने कृऊबात याच पक्षाचे वर्चस्व राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना, भाजपची बंडोबांसाठी कूटनीती

0
0

नाशिक : बंडखोरांकडे लक्ष ठेवून असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीला जेरीस आणण्याचे काम भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडून सध्या सुरू आहे. इच्छुक उमेदवारांना शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे ३ फेब्रुवारीपर्यंत झुलवत ठेवण्याची व्यूहरचना आखण्यात आली असून, कमीत कमी बंडखोरी व्हावी, याची दक्षता या दोन्ही पक्षांकडून घेतली जात आहे.

मुलाखती पार पडून दोन दिवस उलटले तरीही कोणत्याही पक्षाने आपली यादी प्रसिद्ध केलेली नाही. महापालिका निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना एबी फॉर्मसह अर्ज सादर करावा लागणार आहे. या अर्जासाठी शिवसेना-भाजपकडे एका जागेसाठी किमान चार ते पाच इच्छुक आहेत. एकालाच उमेदवारी अर्ज मिळणार असल्याने उर्वरित कार्यकर्त्यांना सोबत ठेवण्याची कसरत पक्षाला करावी लागणार आहे. दुसरीकडे शिवसेना, भाजपमधील बंडखोरांवर मनसे, काँग्रेस राष्ट्रवादी लक्ष ठेवून आहे. बंडखोरांना सोबत घेऊन रिंगणात उतरण्याची व्यूहरचना या पक्षांनी आखली आहे. यादी प्रसिद्ध करण्यास टाळटाळ करीत इतर विरोधी पक्षांना शिवसेना- भाजपने शह दिल्याची चर्चा सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दोन फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता इच्छुकांच्या हाती एबी फॉर्म देण्यात येणार आहे. फारच किचकट वाद असलेल्या जागांबाबत विचारविमर्श सुरू ठेवायचा आणि ३ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता इच्छुकांच्या हाती एबी फॉर्म देण्यात येणार आहे. उर्वरित कार्यकर्त्यांना काहीही करून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार नाही, याची दक्षता दोन्ही पक्षांकडून घेतली जात आहे. शिवसेना, भाजपच्या या कूटनीतीमुळे मनसे, काँग्रेस- राष्ट्रवादी यांचेही घोडे अडले असून, राजकीय बाजारपेठ गरम राहणार असल्याचे दिसते.


माघी गणेश जयंती शांत
आज, मंगळवारी माघी गणेश जयंती असल्याने अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुहूर्त काढून ठेवला होता. मात्र, पक्षीय पातळीवरील राजकारणामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला. आता नक्की कोणत्या दिवसाचा मुहूर्त काढायचा, हा इच्छुकांसमोर प्रश्न असून, नेमक्या मुहूर्ताला एबी फॉर्म मिळणार काय, याची प्रतीक्षाही कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविश्रांत मेहनतीतून फुलला ताटवा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
बाहेर तप्त ऊन पडलेले असताना ‘येथे’ आत मात्र प्रचंड गारवा आहे. येथे अनेकरंगी फुले आहेत, लाल, पिवळी, केशरी, गुलाबी इतकेच काय जांभळी फुलेदेखील येथे आहेत. फुलांचे शेकडो प्रकार या बागेत आहेत आणि ही सर्व फुले फुलवली आहेत एकाच माणसाने. त्याच्या अविश्रांत मेहनतीला फळ आले असून, यातून हा सुगंधी ताटवा बहरला आहे. त्यातून मनाला प्रसन्नता प्रदान करीत आहेत.
अतिशय रखरखीत असलेल्या नाशिकरोड रस्त्याने जाताना नासर्डी पुलाच्या उजव्या बाजूला असलेल्या नाशिक क्लबजवळ आल्यावर मात्र मनाला आल्हाददायक वाटते. तेथील हिरवाई मनाला भावते. अनेकविध रंगांची फुले येथे सध्या फुलली आहेत. सिनर, कार्वेशन, केल, टेटीयम अशी एकापेक्षा एक सरस फुले येथे आहेत. तब्बल ५५ जातीची फुले येथे सुखनैव नांदत आहेत. १४० प्रकारचे गुलाब तर १८० प्रकारचे अॅडेनियम येथे आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात केवळ एक दोन ठिकाणीच इतक्या प्रकारचे अॅडेनियम पहायला मिळतात, त्यातील एक ठिकाण म्हणजे ही बाग आहे. मनाला उल्हास देणारी ही फुले फुलवली आहेत रामेश्वर सारडा यांनी. एक फुल म्हणजे आनंद अशी त्यांची साधी सोपी व्याख्या आहे. फुले पाहण्यातून जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो. तो आनंद नाशिककरांना विनामूल्य मिळावा या अपेक्षेने सारडा यांनी ही बाग फुलवली असून ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत येथे पुष्पोत्सव भरविण्यात आला आहे. या पुष्पोत्सवात ही सर्व फुले नाशिककरांना पाहता येणार आहे.
‘वर्षभरापूर्वी मनाशी ठरवून फुले लावली, बंगळूरू येथील प्रसिध्द लालबाग पुष्पोत्सव, मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत येथील मोठमोठे पुष्पोत्सव नजरेखालून घातले आणि मनाशी ठरवले, नाशिककरांना आपण फुलांतून आनंद वाटायचा.’ रामेश्वर सारडा सांगत होते. ‘आपल्याला ज्यात आवड आहे ते काम करायला मिळाले तर आणखी काय हवे, मी बाग फुलवली.’ या पुष्पोत्सवासाठी सारडा यांनी प्रचंड मेहनत घेतली असून प्रत्येक फुलाला नाव देण्यात येणार आहे. बॉटनीच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. शहरातील विविध शाळांतील मुलांसाठी दुपारची वेळ ठेवण्यात आली आहे. सकाळी ९.३० पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
नाशिक शहरात पुष्पप्रदर्शनच होत नाही. मनपा, पीडब्ल्यूडी विभागाचा पुष्पोत्सव होत असे. परंतु सौंदर्यदृष्टी नसलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तो बंद पडला. लिलियमसारखी परदेशातील फुले नाशिककरांना दाखविण्यासाठी हाडाचा उद्योजक असणारा एक माणूस आपले ध्येय काही क्षणांसाठी बाजूला ठेवून आपल्या छंदाला वेळ देत दिवसरात्र फुलांसाठी झटत आहे. फुलांतून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो, हे सांगत एकटा हजारो फुले फुलवून दाखवतो आहे, ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे.

माणसाला एकतरी छंद असावा. मला फुले फुलविण्याचा छंद आहे. मला त्यांची निगा राखायला आवडते. आज माझ्या बागेत हजारो फुले आहेत व त्यांनी मला संतुष्ट केलेले आहे. मला कोणत्याही झाडाच्या फांदीत त्याचे फुल दिसते. म्हणून मी फांदी वाढवतो, प्रेमाचे सिंचन करतो, त्यातून फुले उमलतात.
- रामेश्वर सारडा, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औद्योगिक संघटना मोठ्या उद्योगांना जागा देणार का?

0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहर व जिल्ह्यात उद्योगांचे मोठे जाळे पसरले असताना अनेक कारखाने बंद अवस्थेत आहेत. त्यातच नुकतेच नाशिकभेटीला आलेले टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नाशकात मोठा उद्योग आणावा यासाठी साकडे घातले. परंतु, मोठ्या उद्योगांना औद्योगिक संघटना भूखंड उपलब्ध करून देणार का, असा सवाल उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे. शेकडोहून अधिक बंद असलेल्या कारखान्यांची समस्या मार्गी लावणार कोण, असा सवालही उपस्थित होत आहे. अशा बंद कारखान्यांबाबत औद्योगिक संघटना दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

शहरातील उद्योजकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या निमा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकभेटीला आलेल्या रतन टाटा यांच्याकडे मोठा उद्योग नाशिकला आणण्याबाबत मागणी केली. अनेकदा मोठे उद्योजक नाशिकला आल्यावर निमा व आयमाकडून असी मागणी केली जाते. परंतु, मोठ्या उद्योगांना लागणारी जागा औद्योगिक संघटना उपलब्ध करून देणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. काही वर्षांपूर्वी वोक्सवॅगन या कारनिर्मितीतील बड्या उद्योगाने नाशिक जिल्ह्यात कारखान्यासाठी जागा मिळावी यासाठी अथक प्रयत्न केले होते. परंतु, दलालांमुळे हजारो हातांना मिळणारे काम नाशिकमधून औरंगाबादला गेले. यावेळी संबंधित कारखान्याच्या प्रतिनिधींनी औद्योगिक संघटनांकडेदेखील धाव घेतली होती. परंतु, त्या कारखान्याच्या प्रतिनिधींना पाहिजे ती मदतच मिळाली नाही. दुसरीकडे जिल्ह्यात अनेक मोठे कारखाने गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. अशा बंद कारखान्यांची शेकडो एकर जागा धूळ खात पडून आहे. यात अनेक प्रोफेशन दलालांचे लागबंधे असल्याने मनासारखी किंमत मिळाल्यावरच बंद कारखान्यांची जागा लिलावात काढण्यात येत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. बंद कारखान्यांच्या मोक्याच्या जागा पडून असल्याने शासनाचेदेखील मोठे नुकसान होत आहे. काही उद्योगांना जागा पाहिजे असूनही ती मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे एमआयडीसी व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी बंद कारखान्यांबाबत एकत्रित येऊन निर्णय घ्यावा, असे मत जाणकार उद्योजकांनी व्यक्त केले आहे.


एकत्रित उपाय शोधावेत

जिल्ह्यात अनेक मोठे कारखाने गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. एमआयडीसी व औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अशा बंद कारखान्यांबाबत विचारल्यास न्यायप्रविष्ट बाब, असे उत्तर देऊन ते मोकळे होतात. परंतु, शासनाची लीजवर असलेली बंद कारखान्यांची जागा धूळ खात पडून असल्याने कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. एमआयडीसी व औद्योगिक संघटनांनी एकत्रित उपाय का शोधू नयेत, असा सवालही उद्योगवर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक खर्च मर्यादा झाली दुप्पट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचे रण आता चांगलेच तापू लागले आहे. ज्या मुद्द्यांकडे संभाव्य उमेदवारांचे लक्ष लागून राहीले होते ती निवडणूक खर्च मर्यादा अखेर निवडणूक विभागाने जाहीर केली आहे. आयोगाने या खर्चासाठी घालून दिलेल्या बंधनानुसार नाशिक मनपासाठीच्या उमेदवारांना ८ लाख रुपयांपर्यंत तर जिल्हा परिषद सदस्य पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ६ लाखांपर्यंत आणि पंचायत समिती सदस्यत्वासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ४ लाख रुपयांपर्यंत निवडणूक खर्च करता येणार आहे. अगोदरच्या तरतूदींमध्ये सुधारणा करत बदलांसह आयोगाने ही खर्च मर्यादा मंगळवारी जाहीर केली.

गत निवडणुकांच्या तुलनेत यंदा आयोगाने उमेदवारांसाठी खर्च मर्यादा ही दुपटीने वाढविली आहे. गत पालिका निवडणुकांमध्ये उमेदवारांसाठी ही खर्च मर्यादी ४ लाखांच्या घरात होती. ती वाढवून आता ८ लाखांवर नेण्यात आली आहे. तर जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी लढणाऱ्या उमेदवारांकरीता ३ लाखांहून ही मर्यादा आता ६ लाखांवर आणण्यात आली आहे. पं.स. साठी खर्च २ लाखांहून आता ४ लाखांवर आणण्यात आला आहे.


हिशेबाची जुळवाजुळव

निवडणुकीच्या आखाड्यात उतरणाऱ्या उमेदवारांनी साम दाम दंड आणि भेद या तंत्राचा उपयोग करण्याची रणनीती आखली आहे. हाय व्होल्टेज मतदारसंघात पेट्यांच्या भाषेत पैसा ओतण्याची तयारीही खासगी चर्चांमध्ये काही उमेदवारांकडून दाखविली जात आहे. त्या तुलनेत आयोगाने जाहीर केलेली मर्यादा ही अवघी सरकारी खर्चाच्या परिभाषेत मोडणारी आहे. मूळ खर्चाऐवजी हिशेब सादरीकरण करताना बहुतांश उमेदवारांना जुळवाजुळव करण्यावर भर द्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज यादी, उद्या प्रचार शुभारंभ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने उमेदवारांची पहिली यादी बुधवारी (१ फेब्रुवारी) जाहीर केली जाणार आहे. तसेच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे गुरुवारी (२ फेब्रुवारी) नाशिकमध्ये सेनेच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील १२२ जागांसाठी ८१० इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्याचा एकत्रित अहवाल संपर्कप्रमुख अजय जौधरी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे. त्यावर उद्धव हे अंतिम निर्णय घेणार असून, उमेदवारांची यादी बुधवारी सादर होणार असल्याचे सेनेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

शहरातील प्रमुख पक्षांपैकी एकानेही अद्याप उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या यादीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बुधवारी ही यादी जाहिर झाल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पक्षाच्यावतीने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे गुरुवारी करणार
आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेस-राष्ट्रवादीचे सूर जुळले!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आघाडी करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आघाडीसंदर्भातील बैठक तीन दिवसापूर्वी निष्फळ ठरल्यानंतर पुन्हा या पक्षाचे सूर जुळले आहेत. तीन प्रभागांवरून आघाडीचे घोडे अडल्यानंतर हा तिढा आता स्थानिक पातळीवर सोडवला जाणार आहे. त्यासाठी स्थानिक नेत्यांची प्रदीर्घ बैठक नाशिकमध्ये झाली. त्यावर खलबत्ते व चर्चा रात्री उश‌िरापर्यंत करण्यात आले.

मुंबईत राष्ट्रवादीचे प्रभारी आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत अंतिम तोडगा निघण्याची चर्चा होती. या बैठकीनंतर हा प्रश्न पुन्हा स्थानिक पातळीवरच टोलावण्यात आला आहे. त्यामुळे यावर लवकरच निर्णय होईल असे सुत्रांकडून सांगण्यात आले. ४, १२, १६ या तीन प्रभागांवरून एकमत न झाल्यामुळे बैठक निष्फळ ठरली होती.

शिवसेना व भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र यावे, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्यामुळे एकत्र लढवण्याचा दोन्ही पक्षांनी निर्धार व्यक्त केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार जयंत जाधव यांच्यासह दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठकीत उपस्थित राहत एकमत करण्यावर जोर दिला आहे. भारतीय जनता पक्ष आणि ‌शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. त्यातच आता काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीसाठी सकारात्मक वातवरण तयार केल्यामुळे निवडणुकांमध्ये रंगत वाढणार आहे.

आम्ही स्थानिक पातळीवरच हा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेतली असून, आघाडीत सकारात्मक चर्चा झाली आहे. निर्णय घेवून तो प्रदेशकडे पाठवून आघाडी अंतिम केली जाईल.

-शरद आहेर, काँग्रेस शहराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची लागणार कसोटी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पदवीधर मतदारसंघासाठी ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. शहरात यासाठी बहुतांश पोलिस स्टेशनच्या हद्दीत मतदान केंद्रे असणार आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पोलिसांसाठी पदवीधरची एक्झरसाईज महत्त्वाची ठरणार आहे. पोलिस स्टेशननिहाय रुटमार्च सुरू झाले असून, याच दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी पक्षांकडून उमेदवारी निश्चित केली जाणार असल्याने पोलिसांना दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

राज्यातील बदलत्या घडामोडींचा प्रभाव पदवीधर निवडणुकीवर पडतो आहे. युती फिस्कटल्याने निवडणुकीची गणितेही बदलली आहेत. या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीला मतदान पार होणार आहे. शहरातील एखाद-दुसरे पोलिस स्टेशनचा अपवाद वगळता इतर ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. याच दिवशी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. पक्षाकडून दिला जाणारा एबी फॉर्म मिळणे, उमेदवारी नाकारणे यामुळे राजकीय पटलावरील वातावरण गरम राहण्याची चिन्हे आहेत. त्यातच पदवीदर उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने दुहेरी ताण पोलिसांना सांभाळावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची व्युहरचना आखली आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी याबाबत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते.

पदवीधरसाठी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पोलिस स्टेशननिहाय रूटमार्च करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शिवाय संशयितांची धरपकड, नोट‌िसा बजावणे आदी कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. याबाबत सूत्रांनी माहिती देताना सांगितले की, राजकीय कार्यकर्त्यांविरोधात व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. १४९ नुसार नोट‌िसा बजावण्यात येत असून, प्रसंगी संशयितांना ताब्यात घेण्यात येत आहे. समाजकंटकांना कोणतीही मुभा नसून, पोलिस कठोर कारवाई करतीलच, असे संबंध‌ित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवण तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील पाळे खुर्द येथील तरुण शेतकरी रंगनाथ रामदास निकम (वय ३२) यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ठप्प झालेली आर्थिक उलाढाल व कर्जाच्या परतफेडीत निर्माण झालेली अडचण यामुळे ते वैतागले होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

रंगनाथ निकम यांनी स्टेट बँकेकडून पावणेतीन लाख रुपये पीककर्ज, तसेच ट्रॅक्टरसाठी वित्तीय संस्थेकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सुमारे पाच एकर शेती असलेल्या निकम यांना तीन वर्षांपासून असलेला दुष्काळ, तसेच बिगमोसमी पाऊस व गारपीट यामुळे नापिकीला सामोरे जावे लागले होते. त्यातच पीककर्ज व ट्रॅक्टर कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी बँकेकडून वसुलीसाठी तगादा सुरू झाल्याने निकम अस्वस्थ होते. या कर्जाला वैतागून ३० जानेवारी रोजी ते बाहेर गेले. त्यांचा शोध घेतला असता, त्यांच्या भावाला झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत निकम यांचा मृतदेह आढळला. रंगनाथ निकम यांच्या मागे दोन भाऊ, वृद्ध आईवडील असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परप्रांतीयावर चाकूहल्ला

0
0

म. टा. प्रतिन‌िधी, नाशिक

शहरातील राजकीय वातावरण तापलेले असतांनाच सोमवारी (दि.३०) रात्री परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्यावर दोघांनी चाकू हल्ला करीत जखमी केले. ही घटना उपनगर परिसरात घडली. या प्रकरणी दोघा अज्ञात तरूणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोनू मदनलाल गनगोरीया (वय २७, रा. पंचशिलनगर,शिवाजीनगर, मूळ मध्यप्रदेश) या युवकाने तक्रार केली आहे. सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास कन्हैया स्वीट जवळील मशीजवळ पाणीपुरी विक्री करीत असताना हा प्रकार घडला. पाणीपुरी खाण्यासाठी आलेल्या दोघांकडे त्याने पैसे मागितल्यानंतर वादास सुरूवात झाली. यावेळी दोघांपैकी एकाने त्याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केला तर दुसऱ्याने डोक्यात वजनी वस्तू मारली. यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेचा अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.

प्रवाशास लुटले

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमधील तिघांनी एकास लुटल्याची घटना मुंबई आग्रा हायवेवरील दहावा मैल येथे घडली. मालेगाव येथील प्रवाशाकडील मोबाइलसह रोकड बळजबरीने काढून घेण्यात आली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे. किशोर पंजाबराव ठाकरे (वय ४४, रा. जलधारा कॉलनी, चर्च मागे, मालेगाव) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. रविवारी कामानिमित्त ठाकरे शहरात आले होते. रात्री काम आटोपून मालेगाव येथे जाण्यासाठी ते द्वारका सर्कल येथील बस स्टॉपवर पोहचले. बसची प्रतिक्षा करीत असताना एक एक लाल रंगाची कार त्यांच्या जवळ येऊन थांबली. मालेगावला जायचे का अशी कारचालकाने विचारणा केली. लवकर पोहचू या अपेक्षेने ठाकरे कारमध्ये बसले. मात्र आडगावपासून काही अंतरावर पुढे जाताच कारचालकासह अन्य दोघांनी ठाकरे यांना दमबाजी केली. दहावा मैल येथे मारहाण करीत कारमधील संशयितांनी त्यांच्याकडील मोबाइल व खिशातील पाच हजार रुपयांची रोकड काढून घेण्यात आली. कारमधून उतरल्यानंतर ठाकरे यांनी भद्रकाली पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक बागुल करीत आहेत.

मद्यपी चालकाची धडक

मद्याच्या नशेत बेफाम करा चालवून दोघांना धडक देणाऱ्या कारचालकाविरोधात गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत दोघे पादचारी जखमी झाले आहेत. सागर सुरेश विसे (२१) असे संशयित कारचालकाचे नाव आहे. गंगापूररोडवरील गुप्ता लॉन्स समोर रविवारी सायंकाळी ही घटना घडली. मद्याच्या नशेत संशयित आरोपी गंगापूर गावाकडून भरधाव वेगात कारने (एमएच १५ एफ एफ ४७७६) जात असताना हा अपघात झाला. गुप्ता लॉन्ससमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शब्बीर शेख या युवकास कारने धडक दिली. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात पुढे जावून संशयिताने आकाश बोडके यास धडक दिली. या अपघातात दोघे पादचारी जखमी झाले असून सागर विसे विरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास नाईक झनकर करीत आहेत.

सिडकोत घरफोडी

सिडकोतील विजयनगर भागातील घर फोडून चोरट्याने ६९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना सचिन मालविया (रा. मिश्रा दुकानामागे, मोरवाडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. २७ ते २९ जानेवारी दरम्यान मालविया कुटूंबिय बाहेरगावी गेले होते. या दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तसेच लोखंडी कपाटातून सुमारे ६९ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरी केले. अधिक तपास निरीक्षक खडके करीत आहेत.

महिला ठार

भरधाव वेगात जाणाऱ्या स्कुटरने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रशांत चंद्रकांत देसाई या स्कूटर चालकाविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा सुभाष शिरोडे (५८ रा. धनश्री कॉलनी, डिजीपीनगर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भामरे सिडकोतील भामरे ट्रेंडर्स येथे किराणा घेण्यासाठी गेल्या होत्या. गणेश स्विट समोरून त्या पायी जात असताना भरधाव स्कुटर (एमएच १५ एफएल ५६७९)ने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिरोडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

मंगळसूत्राची चोरी

नाशिकरोड ः हळदीकुंकू कार्यक्रम करून घरी परतणाऱ्या महिलेची पाच तोळ्याची पोत मोटरसायकलस्वारांनी लांबवली. यामिनी दत्तात्रय चंद्रात्रे (४७, रा. फ्लॅट नं. १६, आभिष सोसायटी, शिवाजीनगर, दत्तमंदिराजवळ, नाशिकरोड) ही महिला मैत्रिणीसह क्षत्रिय मंगल कार्यालय येथे हळदी कुंकू कार्यक्रम आटोपून घरी परतत होती. मुक्ताई हॉस्पिटलजवळ काळ्या मोटारसायकलवर आलेल्या युवकाने त‌िच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची व एक लाखाची सोन्याची पोत लांबवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझरमध्ये शाळकरी मुलाचा खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळेच्या मैदानावर कवायतीचा तास सुरू असताना इयत्ता नववीतील अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्याच सहकाऱ्याचा भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. ओझर टाऊनशिपमधील एचएएल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा प्रकार घडला. सौरभ मनोजकुमार पाल (वय १५) असे मरण पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

डोक्यात टपली मारून लपून बसण्याच्या कारणावरून सौरभचा वर्गातील संशयित अल्पवयीन विद्यार्थ्याशी दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. मंगळवारी दुपारी शाळेच्या मैदानावर कवायतीचा तास सुरू असताना दोघांमध्ये पुन्हा वाद उद््भवला. संशयित विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने सौरभच्या छातीत भोसकले. सौरभ रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिल्यानंतर शिक्षकांनी त्याला एचएएल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. ओझर पोलिसांनी संशयित विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. शाळेतील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाल्याची शक्यता असून, हे फूटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याचे दिसते. अद्याप प्राथमिक चौकशी सुरू असून, गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images