Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एचपीटी-आरवायकेचा संघ अजिंक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके कॉलेजतर्फे आयोजित सर डॉ. एम. एस. गोसावी निमंत्रित टी-२० क्रिकेट स्पर्धेत एचपीटी- आरवायकेच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. ही स्पर्धा बीवायके कॉलेजच्या मैदानावर झाली. विकास वाघमारे उत्कृष्ट गोलंदाज, तर सागर कराडने सामनावीराचा बहुमान मिळवला.

स्पर्धेत एचपीटी-आरवायके संघाने प्रथम मुंबई विद्यापीठाचा १७ धावांनी पराभव करत उपांत्यफेरी गाठली. उपांत्यफेरीत बीवायके कॉलेजचा ७ विकेटने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत पुण्याच्या नेस वाडिया कॉलेजने एचपीटी- आरवायकेसमोर १५४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात एचपीटी-आरवायकेच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची दमदार भागीदारी करत विजयी लक्ष्य आवाक्यात आणले. जयेश आहिरे याने ३९ व सागर कराड याने ५० धावा केल्या. कर्णधार रोहित परब झटपट बाद झाल्यानंतर सुजय महाजन व रामकृष्ण घोष यांनी सामन्याची सूत्रे हाती घेत दोन चेंडू राखून विजय मिळवला. सुजय महाजन याने विजयी षटकार मारला. विजेत्या एचपीटी- आरवायके संघाला एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि ट्रॉफीने गौरविण्यात आले. स्पर्धेत नेस वाडिया कॉलेजसह नगर कॉलेज, मुंबई विद्यापीठ, मालेगावचे एमएसजी कॉलेज, बीवायके कॉलेज, केटीएचएम कॉलेजचा समावेश होता.

विजेता संघ ः रोहित परब (कर्णधार), रामकृष्ण घोष (उपकर्णधार), विकास वाघमारे, जयेश आहिरे, सुजय महाजन, वैभव पुरे, विजय जंझाल, अभिजित जाधव, सौरभ फुल्कर, अक्षय भोसले, योहान गावित, ऋषिकेश धामणे, रंजित भदरगे, सागर कराड, अनुज मौर्य.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भावभक्तीचा रंगला सोहळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

फुलांनी सजलेली पालखी अन् रथ, टाळ मृदगांचा गजर, फुगडी खेळणाऱ्या महिला भाविक, कलशधारी महिला आणि भजनात तल्लीन झालेले वारकरी अशा भक्तिमय वातावरण आणि अहोरात्र हरिनामाच्या गजराने त्र्यंबकनगरी भावभक्तीचा सोहळा रंगला होता.

संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी चांदीच्या रथातून भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनाला आली तेव्हा हरिनामाचा एकच गजर झाला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पूर्वपरंपरेने श्री संत निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी मंदिरापासून चांदीच्या रथातून पालखी निघाली. मंगलवाद्यांच्या पाठोपाठ तुळसधारी व कलशधारी महिला होत्या. भावभक्तीचा हा अत्यंत मनोरम असा सोहळा संपन्न झाला. भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिरात विश्वस्त कैलास घुले, अॅड. श्रीकांत गायधनी, सचिन पाचोरकर आदींनी स्वागत केले. पालखी मंदिरात आली. येथे भजन कीर्तन झाले. विणेकरी व टाळकऱ्यांनी आपली सेवा बजावली. रथ संत निवृत्तिनाथ महाराज मंदिराकडे परतला तेव्हा रात्र झाली होती. वारकरी भजनात तल्लीन झाले आणि अहोरात्र हरिनामाचा गजर झाला.

रेल्वेच्या प्रवाशांवर त्र्यंबकराजा प्रसन्न

नाशिकरोड : त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेने एक खूशखबर दिली आहे. भाविकांसाठी रेल्वे रिझर्व्हेशन सुविधा त्र्यंबकनगरीतील पोस्ट खात्यात उपलब्ध करण्यात आल्याची माहिती रेल्वेचे भुसावळ विभागाचे वरिष्ठ महाप्रबंधक सुनील मिश्रा यांनी दिली. भाविक त्र्यंबकेश्वरच्या टपाल कार्यालयात जाऊन तिकीट रिझर्व्हेशन व कॅन्सलेशन करू शकतील. भुसावळ विभागात धार्मिक ठिकाणी अशी सुविधा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. साधी तिकिटे मात्र येथे मिळणार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजगार मिळाल्यास शहराच्या विकासात भर

$
0
0

‘आयमा’चे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये उच्चशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून अशा विद्यार्थ्यांना नाशिकमध्येच नोकरी मिळाली तर शहराच्या विकासात मोठी भर पडेल, असे प्रतिपादन अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे (आयमा) अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी केले.

महावीर एज्युकेशन सोसायटी, संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग नाशिक आणि आयमा यांच्या संयुक्त वतीने महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या म्हसरुळ वरवंडी रोड येथील कॅम्पसमध्ये सोमवारी मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी अहिरे बोलत होते. नाशिकमधील बीई, एमई आणि फार्मसीच्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा घेण्यात येत आहे. आयमा आणि संघवी कॉलेज ऑफ इंजीनिरिगमध्ये अशाप्रकारचे उपक्रम पुढील काळातही घेणार असल्याचे आश्वासन अहिरे यांनी दिले. तर संस्थेचे अध्यक्ष हरीश संघवी म्हणाले की, संघवी इंजिनिअरींगतर्फे अशा महारोजगार मेळाव्याचे आयोजन नियमित करण्यात येणार आहे. या मेळाव्यास विद्यार्थी उत्स्फूर्त संख्येने उपस्थित राहिलेत, हे या मेळाव्याचे यश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच यातून कुशल आणि गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच संधी मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरीश संघवी, संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य जयंत पत्तीवार, आयमा आणि निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, आयमाचे जनरल सेक्रेटरी निखील पांचाल, इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेलचे अध्यक्ष सौमित्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापूजेमुळे गारठले वारकरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्री संत निवृत्त‌िनाथांची शासकीय महापूजा पहाटे पाच वाजेच्या सुमारास नगराध्याक्षा विजया लढ्ढा यांच्या हस्ते झाली. विजया लढ्ढा आणि श्री दीपक लढ्ढा महापूजेस बसले त्यांच्या समवेत उपनगराध्यक्ष अभिजीत काण्णव आणि हेमांगी काण्णव उपस्थित होते. मात्र दोन ते तीन पूजा होत असतांना रांगेत उभे असलेले वारकरी चांगलेच गारठले होते. दरवर्षी होणाऱ्या होणाऱ्या या विलंबामुळे वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, यावर्षी निवडणूक आचारसंहितामुळे पालकमंत्री गिरीश महाजन येथे येऊ शकले नाही. तथापि खासदार हेमंत अप्पा गोडसे यांची उपस्थिती लाभली. महापूजेनंतर झालेल्या ऋणनिर्देश प्रसंगी नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी समाधी मंदिराचा सर्वागिण विकास करण्यासाठी नगरपालिका कट्ट‌िबद्ध असून, वारकऱ्यांना कायमस्वरूपी पायाभूत सुविधा देण्यावर भर देणार असे आश्वासन दिले.

याप्रसंगी सहा. धर्मादाय आयुक्त प्रदीप घुले, वारकरी संप्रदाय मुंबईचे अध्यक्ष रामेश्वर शास्त्री उपस्थित होते. संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष संजय धोडगे यांनी प्रास्ताविक करून दोन वर्षांत संस्थानतर्फे करण्यात आलेल्या कामाची माह‌िती दिली. तसेच भव्य समाधी मंदिर उभारण्याचा मानस असून, यासाठी खासदार व नगराध्यक्ष यांनी शासनाकडून तीर्थक्षेत्राप्रमाणे निधी आणण्यासाठी संस्थानच्या पाठीशी उभे राहून वारकऱ्यांच्या आद्यपीठाचा विकास करावा, अशी मागणी केली.
योगेश तुंगार, नगरसेवक संतोष कदम, श्यामराव गंगापुत्र, प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार महेंद्र पवार, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे-मानुरे, पवनकुमार भुतडा, त्र्यंबकराव गायकवाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या तरुणाईचा उमेदवारीवर दावा

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, ना‌‌शिक

महापालिका आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नव्या दमाच्या युवा कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसमधील तरुण कार्यकर्ते करू लागले आहेत. या दोन्ही निवडणुकांमध्ये प्रत्येकी १५ जागा लढविण्याची तयारी युवक काँग्रेस आणि पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या ‘एनएसयूआय’ने केली आहे. उमेदवारी देण्याबाबत पक्ष काय भूमिका घेतो याकडे तरुणाईचे लक्ष लागले आहे.

‘एनएसयूआय’, तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक एम. जी.रोडवरील काँग्रेस कार्यालयात पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, ‘एनएसयूआय’चे अध्यक्ष नितीन काकड, उपाध्यक्ष राहुल कदम, कुशल लुथरा, सुनील आव्हाड, सचिन भुजबळ, चित्रा लोखंडे आदींसह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काळा पैसा बाहेर यावा, यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच भाजपकडून सांगितले जात आहे. परंतु, महागाईवर भाजप सरकारचा अंकुश नसल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधील शुल्क अनेक पटींनी वाढविण्यात आले. मोदी सरकारकडून सामान्यांची फसवणूक केली जात असून विरोध होऊच द्यायचा नाही, अशी रणनीती भाजप सरकार अवलंबत आहे. असे अनेक मुद्दे नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. परंतु, नवीन आणि उमद्या कार्यकर्त्यांची मोठी फळी पक्षाकडे आहे. त्यांच्यासाठी महापालिका, तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येकी १५ जागा राखून ठेवाव्यात. तरुण कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी दिली जावी, अशी मागणी शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यापुढे मांडण्यात आली. पक्षाने अपेक्षित संधी दिली नाही, तरी पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकदिलाने पक्षाच्या उमेदवारांना पाठबळ देतील, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी दाखविला. निवडून येण्याची क्षमता बाळगणाऱ्या युवक काँग्रेस, ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आपण निश्चितच पक्षात वरिष्ठांपर्यंत पाठपुरावा करू, अशी ग्वाही आहेर यांनी दिली.


इच्छुक मुलाखतींना सामोरे

महापालिका निवडणुकीत पक्षाद्वारे उमेदवारी करण्याची संधी मिळावी यासाठी अनेक पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यासाठी पक्षाने सोमवारी (दि. २३) बोलावलेल्या मुलाखतींना युवक काँग्रेस आणि ‘एनएसयूआय’मधील इच्छुक उमेदवार सामाेरे गेले.


युवा नेतृत्व तयार व्हावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुणांना संधी मिळायला हवी. पक्षाच्या विजयासाठी आम्ही खिंड लढवू. आमच्यापैकी काहींना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही तरी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करू.

- नितीन काकड, ग्रामीण अध्यक्ष, एनएसयूआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाखतसत्रात घड्याळाचाही गजर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही इच्छुकांची गजबज वाढली असून, रविवारी कार्यालय गजबजले. शहरातील १६ प्रभागांसाठी १३० इच्छुक उमेदवारांनी शनिवारी मुलाखती दिल्या, तर रविवारी १५ प्रभागासाठी १२७ उमेदवार उपस्थित होते. १२२ प्रभागांसाठी झालेल्या या मुलाखतीत राष्ट्रवादीकडे आता दोन्ही दिवसांच्या मुलाखतींतून २५७ इच्छुक असल्यामुळे नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या मुलाखतील जुन्या नाशिक व जेलरोडच्या एका प्रभागातून इच्छुकांची संख्या मोठी होती.

या मुलाखतप्रक्रियेसाठी राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेच उपस्थित होते. प्रदेश चिटणीस नाना महाले, अर्जुन टिळे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीता निमसे, मनपा विरोधी आघाडीच्या नेत्या कविता कर्डक, गौरव गोवर्धने, भारत जाधव यांच्या समितीने मुलाखती घेतल्या.

आमदार जाधव जि.प.कडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतेही मोठे नेते मुलाखतीसाठी उपस्थित नसल्यामुळे विधान परिषदेचे आमदार जयंत जाधव शनिवारी मुलाखतीसाठी उपस्थित होते. मात्र, रविवारी त्यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या अन्य तालुक्यांची जबाबदारी असल्यामुळे ते अनुपस्थित होते. स्थानिक नेत्यांनीच ही मुलाखतप्रक्रिया पार पाडली.

या प्रभागांसाठी झाल्या मुलाखती

पश्चिम विभागातील ७, १२, १३, पूर्व विभागातील १४, १५, १६, २३, ३०, नाशिक रोड विभागातील १७, १८, १९, २०, २१, २२ या प्रभागांतील मुलाखती रविवारी घेण्यात आल्या. एकूण १५ प्रभागांतील ६० जागांसाठी या मुलाखती झाल्या.

प्रभाग १४ व १७ मध्ये गर्दी

जुन्या नाशिकमधील मुस्लिमबहुल प्रभाग क्रमांक १४ मध्ये १४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. याच प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन विद्यमान नगरसेवक आहेत. त्यामुळे येथे राष्ट्रवादीची ताकद असल्यामुळे येथे सर्वच तुल्यबळ इच्छुक मुलाखतीसाठी आले. त्याचप्रमाणे नाशिकरोडमधील जेलरोड भागातील प्रभाग क्रमांक १७ मध्येही मोठी गर्दी होती. यात दहा जणांनी मुलाखती दिल्या.

विद्यमान नगरसेवकांनी दिल्या मुलाखती

दुसऱ्या दिवसाच्या मुलाखतीत विद्यमान नगरसेवक व नगरसेविकांनी हजेरी लावली. यात शोभा आवारे, वैशाली दाणी, छाया ठाकरे, सुफी जीन, संजय साबळे, रंजना पवार, शबाना पठाण यांनी मुलाखती दिल्या. त्याचप्रमाणे शंकरभाई मंडलिक, तानाजी लोखंडे, चैतन्य देशमुख या प्रमुख इच्छुकांनीसुद्धा मुलाखती दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपाट उघडणार, बाल्कनी अडकणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने पुणे शहरासाठी मंजूर केलेल्या विकास नियंत्रण नियमावलीत बाल्कनी ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे हाच नियम नाशिकसाठीही लागू होण्याची शक्यता असल्याने या विकास नियंत्रण नियमावलीत कपाटाचा ६०टक्के प्रश्न सुटणार असला तरी, बाल्कनीचा गुंता मात्र वाढणार आहे. पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये विकास नियंत्रण नियमावली लागू झाल्यास प्रीम‌ियम आकारून बाल्कनी बंद‌िस्त करण्याची पद्धत बंद होणार असल्याने या व्यवसायाची पुन्हा कोंडी होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बिल्डर धास्तावले आहेत.
शहराचा विकास आराखडा भागशः मंजूर झाला असला तरी विकास नियंत्रण नियमावली अजूनही सरकार दरबारी अडकली आहे. पुणे शहराचा विकास आराखडा मंजूर करण्याबरोबरच शहर विकास नियंत्रण नियमावलीदेखील सरकारने मंजूर केली. त्यात बाल्कनी बंद‌िस्त न करण्याची तरतूद करण्यात आली आहे. हाच नियम नाशिकमध्ये लागू झाल्यास बांधकाम व्यवसायाची पुन्हा कोंडी होणार आहे.
२५० प्रकरणांना नकारघंटा
राज्य सरकारने जानेवारी २०१६ मध्ये जाहीर केलेल्या नव्या टीडीआर धोरणामुळे टीडीआर लोड करण्यासंदर्भातील २५० प्रकरणे प्रलंबित आहेत. नाशिकमध्ये करारनामा न करताच टीडीआर लोड करण्याची पद्धत होती. नवीन पॉलिसी लागू करण्याच्या आत दाखल ‌केलेली ही प्रकरणे अडचणीत सापडली होती. परंतु, नाशिकमध्ये प्रचलीत पद्धतीनुसार त्यांना मंजुरी मिळावी याबाबत आयुक्तांनी ही प्रकरणे राज्यसरकारकडे पाठवली होती. सरकारने करारनामा असेल तरच, टीडीआर लोड होईल असे स्पष्टीकरण दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकरोड बनलाय अपघातरोड!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. परिणामी त्र्यंबकेश्वररोडवर वर्षभर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु, वाढत्या वाहनांच्या संख्येत पुरेशा नियोजनाअभावी त्र्यंबकरोडवर अपघातांची मालिकाच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्र्यंबकरोड जणू अपघातरोडच बनला असल्याची भावना भाविक व्यक्त करीत आहेत. पोलिस प्रशासन, महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने त्र्यंबकरोडवर गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकावेत, अशी मागणी भाविकांसह वाहनचालकांनी केली आहे.

महादेवाच्या दर्शनासाठी आणि विविध विधी करण्यासाठी भाविकांची त्र्यंबकेश्वरला वर्षभर गर्दी होत असते. देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरला येत असल्याने रोजच वाहनांची मोठी वर्दळ या रस्त्यावर दिसून येते. मात्र, शहर आणि ग्रामीण अशा दोन भागांत असलेल्या त्र्यंबकरोडवर अपघातांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली असल्याची स्थिती आहे. त्यातच शहरात असलेल्या त्र्यंबकरोडला तब्बल तीसहून अधिक पंक्चर ठेवण्यात आल्याने वाहनचालकांना रोजच कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत. केवळ सहा किलोमीटर अंतरावर गरज नसलेले पंक्चर ठेवण्यात आल्याने रस्ता ओलांडताना पादचारी व वाहनचालक यांच्यात किरकोळ अपघात नित्याचेच झाले आहेत.

गतिरोधकांची आवश्यकता

सातपूरच्या सर्वच पक्षांनी अनेकदा सातपूर-त्र्यंबकरोडवर होत असलेल्या अपघातांबाबत पोलिस प्रशासन व महापालिका यांच्याकडे समस्या मांडल्या आहेत. परंतु, येथील अपघातांकडे दुर्लक्ष होत असल्याने निष्पाप नागरिकांवर जीव गमावण्याची वेळ येत आहे. येथील अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका, पोलिस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकत्रित सर्व्हे करून गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी भाविक, वाहनचालकांनी केली आहे.

दोन दिवसांत दोन बळी

रविवारीच नेहमीप्रमाणे दूधवाटपासाठी सातपूर भागात निघालेल्या समाधान सदगीर या तरुणाचा अॅम्ब्युलन्सने धडक दिल्याने जागीच मृत्यू ओढावला होता. सदगीर यांच्या मृत्यूला एक दिवस उलटत नाही, तोच महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयासमोर रस्ता ओलांडून येणाऱ्या सुजाता रवींद्र निकम या महिलेला दुहेरी वाहनांच्या अपघातात जीव गमवावा लागला. त्यामुळे त्र्यंबकरोड यमसदनाचाच मार्ग बनला असल्याची भावना व्यक्त होत आहे.


पंक्चरमुळे अपघातांत वाढ

भाविकांची सतत वर्दळ असलेला त्र्यंबकरोड गेल्या काही महिन्यांपासून जणू अपघातरोडच बनला आहे. शहरातून जाणाऱ्या त्र्यंबकरोडला तब्बल तीसहून अधिक पंक्चर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे तेथून रस्ता ओलांडताना रोजच किरकोळ अपघात होत असतात. त्यातच वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे झालेल्या अपघातांत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्ती केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनुभवा पाडगावकरांच्या स्मृतींचे ‘आनंदगाणे’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
प्रेमाची भाषा बोलणारे आणि शब्दांची वीण घट्ट असलेले प्रख्यात कवी मंगेश पाडगावकर यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लबतर्फे शुक्रवार २७ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता ‘मंगेश पाडगावकर : एक आनंदगाणे’ या काव्य तसेच गीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मैफल महाकवी कालिदास कलामंदिर येथे होणार आहे.
नवरसांनी परिपूर्ण काव्यनिर्मिती करणारे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या बाबतीत असे म्हणावे लागते की कवींना वार्धक्य आणि मृत्यू यांचे भय कधीच नसते. कारण ते त्यांच्या यशरुपी कार्याने नेहमीच अमर असतात. हाच धागा पकडून मनामनात आनंद निर्माण करणाऱ्या ‘आनंदयात्री मी आनंदयात्री’ म्हणणाऱ्या कविकर्व मंगेश पाडगावकरांना जाऊन वर्ष लोटले. त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून माणिक एन्टरटेन्मेंटने दृकश्राव्य कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.
साहित्य संमेलनांत कवी संमेलने होतात, होळी, दसरा, पाडवा अशा सणांच्या निमित्तानेही होतात. एरवीही सभेच्या निमित्ताने चार माणसे जमली की एखादा कवी कार्यक्रमाच्या अध्येमध्ये आपल्या कविता ऐकवतो. परंतु, केवळ कविता वाचनासाठी आमंत्रित केले जाणारे नारायण सुर्वे, नांदगावकर, बा. भ. बोरकर, अनिल, इंदिरा संत, संजीवनी असे कवी तसे विरळाच होते. त्यातच एक नाव म्हणजे पाडगावकर. पाडगावकरांना आमंत्रणांची कधीही ददात पडली नाही. काव्यवाचनासाठी महाराष्ट्राचा दौरा करणारे कवी तर अतिशय कमी. मंगेश पाडगावकर हे असे विरळा कवींपैकी होते.
वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या काव्यवाचनाची भूल मराठी मनाला अशी पडली होती की, ज्या गावात त्यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम असे, तिथे रसिक जथ्थ्या- जथ्थ्याने येत. काव्यरसिकांवर गारुड करणारी एक अजब बेहोषी या तिघांच्या काव्यवाचनात असायची. १९५० ते १९९० अशी तब्बल चार दशके या तिघांच्या काव्यवाचनाची मोहिनी कायम होती. १९९०च्या दशकानंतर मात्र उतारवयामुळे तिघांनीही कार्यक्रम कमी केले आणि नंतर या त्रयीतले एकेक जण गळायला लागले. आधी वसंत बापट गेले, नंतर विंदांनी निरोप घेतला आणि शेवटी 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' म्हणणारे मंगेश पाडगावकरही गेले. मात्र बापट-पाडगावकर-करंदीकर कुणीही नसलं, तरी त्यांनी रुजवलेली काव्यवाचनाची गोडी मात्र मराठी मनामनात झिरपली आहे. त्याची आठवण म्हणून एक आनंदगाणे या मैफलीची निर्मिती झाली आहे.
धनंजय म्हसकर, मंदार आपटे आणि अर्चना गोरे यांच्या सुरेल आवाजात माझे जीवनगाणे, लाजून हासणे, नीज माझ्या नंदलाला ही सुरेल गाणी होणार आहेत. प्रशांत लळीत यांचे संगीत संयोजन या कार्यक्रमाला लाभलेले आहे. मंगेश पाडगावकरांचे चिरंजीव डॉ. अजित आपल्याला काही अंशी परिचित असलेल्या पाडगावकरांची बाबा म्हणून नव्याने ओळख करून देणार आहे. तसेच त्यांच्या पाऊस कविता डॉ. अजित यांनी संपादीत करून पाऊस गाणी हा काव्यसंग्रह आणलेला आहे. त्यातील काही गाणी संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबध्‍द केलेली असून कार्यक्रमाचा ती भाग असतात. अशा तऱ्हेची ही मैफल २७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचेही ‘एकला चलो रे’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपने महापालिका निवडणुकांसाठी ‘एकला चलो रे’चा नारा दिल्यानंतर आता शिवसेनेनेही तीच री ओढली आहे. शिवसेनेने स्वबळाच्या चाचणीसाठी सोमवारपासून इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या असून, पहिल्या दिवशी २० प्रभागांतील ५७० इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. शिवसंपर्क अभियानात काय योगदान, सामाजिक कार्य, निवडणुकीची काय तयारी अशा प्रश्नांचा भडिमार इच्छुकांवर करण्यात आला. भाजपपासून धडा घेत आर्थिक स्थितीची चाचपणी मात्र या मुलाखतीत करण्यात आली नाही. इच्छुकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. शिवसेनेची स्वबळाची तयारी असून, युतीचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, अशी माहिती संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी दिली आहे. उर्वरित ११ प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी होणार आहेत.

गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबतची युती एकतर्फी तोडली होती. त्यामुळे शिवसेनेने या वेळी सावध होत, एकला चलो रेची तयारी करून ठेवली आहे. भाजपच्या मुलाखती संपल्यानंतर सोमवारपासून सेनेनेही मुलाखतीचा फड गाजवला. सेनेकडे ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी ८१० इच्छुकांनी अर्ज केले. त्यापैकी पहिल्या दिवशी २० प्रभागांतील ५७० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. भाजपप्रमाणेच शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी मुलाखती देणाऱ्यांमध्ये महिलांचा समावेश अधिक होता. मुलाखत देणाऱ्यांमध्ये माजी महापौर यतीन वाघ, विनायक पांडे, नगरसेवक विनायक खैरे, मनीषा हेकरे, विलास शिंदे, सुरेखा नागरे, प्रतिभा घोलप, जयश्री चव्हाण, जी. टी. शिंदे, भगवान भोगे आदी दिग्गजांचा समावेश होता. संपर्कप्रमुख अजय चौधरी यांच्या मुलाखत पॅनलमध्ये जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, नगरसेवक सुधाकर बडगुजर, शिवाजी सहाणे, माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, महिला आघाडी शहर संघटक श्यामला दीक्षित यांचा समावेश होता.

इच्छुकांवर प्रश्नांचा मारा

शिवसेना पक्षात केलेले कार्य, विविध आंदोलनांतील सहभाग, स्वतः राबवलेले कार्यक्रम, सामाजिक संस्था व उत्सव मंडळात सहभाग व संपर्क, प्रभागातील राजकीय परिस्थिती, प्रभागातील जातीनिहाय प्राबल्य, प्रभागातील प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क व संबंध, प्रभागात केलेले कार्य या प्रश्नांचा मारा इच्छुकांवर करण्यात येत होता. उमेदवाराची वैयक्तिक माहिती व शिवसेनेच्या वतीने निवडणुका का लढवायची आहे, अशा प्रकारचे प्रश्नही विचारले जात होते. शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत प्रभागात प्रत्यक्ष दिलेल्या भेटी, कुटुंबांची माहिती, फोन नंबर, फोटोग्राफ याचीदेखील माहिती घेऊन इच्छुकांची चाचपणी करण्यात येत होती.

इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन

मुलाखतीसाठी येणाऱ्या पक्षातील नगरसेवकांसह इच्छुकांनी या वेळी मोठ्या प्रमाणवर शक्तिप्रदर्शन करत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्यामागे प्रभागात किती लोक आहेत हे दाखवण्यासाठी इच्छुकांनी बी. डी. भालेकर मैदानावरच शक्तिप्रदर्शन केले. तेथून वाजतगाजत इच्छुक सेना कार्यालयात येत होते. त्यामुळे नागरिकांचेही चांगलेच मनोरंजन होत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्नास हजारांची लाच घेताना अधिकाऱ्यास अटक

$
0
0

नंदुरबार एसीबीची कारवाई

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांना पन्नास हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नंदुरबार पथकाने मंगळवारी (दि. २४) अटक केली आहे. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा धाक दाखवून पन्नास हजारांची लाच या अधिकाऱ्याने मागितली असल्याचे समजते.

दरम्यान, जिल्हा परिषदेत केल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. तर शेजारी असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीदेखील अधिकाऱ्यांवर कारवाई झाली हे पाहण्यासाठी जमले होते. धुळे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांच्याकडे कार्यालयीन कामासाठी गेलेल्या तक्रारदाराकडून शिपाई संजय बोरसे यांच्यामार्फत लाच मागण्यात आली होती.

याबाबत तक्रारदाराने नंदुरबार जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून याप्रकरणी सापळा रचून मंगळवारी, दुपारी तक्रारदाराकडून शिपाई संजय बोरसेंमार्फत पन्नास हजारांची लाच घेताना अधिकारी रौंदळ यांच्यासह शिपाई बोरसेला अटक करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे बनले हगणदारी मुक्त शहर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य सरकारच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सातत्याने काम करणाऱ्या धुळे शहराला अखेर हगणदारीमुक्त शहर म्हणून जाहीर करण्यात आले आहे. याबाबत मंगळवारी (दि. २४) मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. तर केवळ सफाई कामगारांमुळेच हे शक्य झाल्याची भावना आयुक्त संगीता धायगुडे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत भरीव काम झालेले आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. नामदेव भोसले असताना त्यांनी नालेसफाई व साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबवून या उपक्रमाला चालना दिली होती. तसेच मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ‘गुड मॉर्निंग पथक’ स्थापन करून शहर हगणदारीमुक्त होण्यासाठी मोठ्या शर्यतीने प्रयत्न सुरू होते. डॉ. भोसले यांच्यानंतर आयुक्त म्हणून रूजू झाल्यावर पहिल्याच दिवसांपासून स्वच्छतेवर भर देण्याचे काम सुरू केले, असे आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.

शहरात हगणदारी मुक्त व स्वच्छतेसाठी नियोजनबद्धरित्या काम सुरू करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करण्यालाही बळ देण्यात येत आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून मनपातील अधिकारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेत काम पूर्णत्वास नेले.

नुकतीच या कामाची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरीय समितीने दोन दिवस शहरातील विविध ठिकाणी परिसर पाहून अहवाल सादर केला होता. या पूर्ण मोहिमेत उपायुक्त रवींद्र जाधव, सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, शहर अभियंता कैलास शिंदे, पाणीपुरवठा अभियंता चंद्रकांत ओगले, आरोग्याधिकारी महेश मोरे, सहाय्यक आरोग्यधिकारी रत्नाकर माळी, यांच्यासह कर्मचारी, सफाई कामगारांचे अभिनंदन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार सिडींगच्या कामांना मिळणार वेग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात पुरवठा विभागातर्फे आधार सिडींगचे काम सुरू असून नाशिक विभागात तातडीने हे काम पूर्ण करा, असे आदेश पुरवठा विभागाचे सचिव महेश पाठक यांनी मंगळवारी दिले. रेशन दुकानांमध्ये कॅशलेस व्यवहार सुरू व्हावेत यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करण्याची जबाबदारीही पुरवठा अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या पुरवठा तसेच सहाय्यक पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक पाठक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यावेळी नाशिक विभागाचे पुरवठा उपायुक्त रघुनाथ गावडे यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे पुरवठा तसेच सहायक पुरवठा अधिकारी उपस्थित होते. स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेमध्ये यापुढे पीओएस (पाइंट ऑफ सेल) प्रणाली सुरू करावयाची असून त्यासाठी पुरवठा विभागाने पुढाकार घ्यावा असे निर्देश पाठक यांनी दिले.

दरम्यान, येत्या महिन्यात विभागात एक हजार तर मार्च अखेरपर्यंत दोन हजार पीओएस मशिन्स दिले जातील अशी माहिती पाठक यांनी दिली. रेशन दुकानदारांना हक्काचे मानधन मिळावे यासाठी दुकानातून बँकिंग सेवा पुरविण्याची सरकारची योजना आहे. ही सेवा ऐच्छिक असली तरी जास्तीत जास्त दुकानदारांना यामध्ये सहभागी करून घ्यावे असे निर्देश पाठक यांनी दिले. पाठक यांनी यावेळी ऑनलाइन, सप्लाय मॅनेजमेंट चेन यांसह विविध विषयांची माहिती देऊन त्याच्या अंमलबजावणीबाबतही सूचना दिल्या. दरम्यान, गोदामांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह एसएमएस योजना, अन्नदिनाच्या आयोजनाबाबत पाठक यांनी नाशिक जिल्हा पुरवठा विभागाचे कौतुक केले. सकारात्मक दृष्ट‌िकोन ठेवणाऱ्या आणि चांगली काम करणाऱ्या दुकानदारांचा यावेळी पाठक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अर्ध्या तासात मॅरेथॉन आढावा
सकाळी सव्वाअकराच्या सुमारास बैठक सुरू झाली. मात्र आजची ही मॅरेथॉन बैठक ठरली. अवघ्या अर्ध्या तासात सचिवांनी पाच जिल्ह्यातील रेशन वितरण व्यवस्था व त्यासंबंधीच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्ट‌िक ध्वज बाळगल्यास गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रजासत्ताक दिनानिमित्त प्लास्ट‌िक ध्वजांची निर्मिती, विक्री किंवा त्यांचा वापर करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. भारतीय ध्वजाची अवमानना होऊ नये, या दृष्ट‌िकोनातून हा आदेश काढण्यात आला असून, पोलिस निर्णयाची अंमलबजावणी करणार आहेत.

शहरात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. सरकारी कार्यालये, शाळा कॉलेज, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था आदी ठिकाणी हा सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने शहरामध्ये प्लास्ट‌िक राष्ट्रध्वजाचा वापर केला जातो. प्लास्ट‌िकचे ध्वज नष्ट होत नसल्याने ते या दिवसानंतर रस्त्याच्या कडेला किंवा इतरत्र फेकले जातात. राष्ट्रध्वजाचा असा अपमान होणे ही गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर प्लास्ट‌िक राष्ट्रध्वजाकरीता केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने मान्यता दिलेली नाही. त्या अनुषंगाने शहर पोलिसांनी प्लास्ट‌िक ध्वज व त्याचा वापर याबाबत मनाई आदेश जारी केले आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्लास्ट‌िक राष्ट्रध्वजाची निर्मिती व विक्री करणाऱ्या प्रिंट‌िंग प्रेस अथवा संस्थांनी ती करू नये. एखादी व्यक्ती या मनाई आदेशाचे उल्लंघन करीत राष्ट्रध्वजाचा अपमान करेल, तर अशा व्यक्तीविरोधात राष्ट्रीय ध्वज अवमान प्रतिबंधक कायदा १९७१ च्या कलमानुसार तसेच मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

निर्णयाचे स्वागत

काही वर्षांपासून देशभरात प्लास्ट‌िक ध्वजांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. प्रजासत्ताक दिन तसेच स्वातंत्र्य दिनी हे प्लास्ट‌िक ध्वज मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. एक दिवस वाहनांवर हे ध्वज मिरवल्यानंतर अक्षरशः फेकून दिले जातात. यामुळे राष्ट्रध्वजांचा अपमान होतो. वास्तविक हा नियम पूर्वीपासून अस्तित्वात आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत होते. आता पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतल्याने हे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

२५ ते २८ दरम्यान निर्बंध

प्रजासत्ताक दिनाची तयारी प्रशासनाकडून सुरू असून या काळात प्लास्ट‌िकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होऊ नये यासाठी त्याच्या निर्मिती, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. पोलिस उप आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून २५ ते २८ जानेवारी या कालावधीत हे निर्बंध लागू असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊर्जासंवर्धनाचा नाशिकला पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सौरऊर्जेवरील पथदिवे बसवून त्याचा पुरेपूर वापर करणाऱ्या जिल्ह्यात देशात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या नाशिक जिल्हा प्रशासनाचा दिल्ली येथे सन्मान करण्यात आला. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी मंगळवारी हा पुरस्कार स्वीकारला.

महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा)च्या वतीने वीज बचतीसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. सौरऊर्जेच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांची, तसेच शहरांची केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने ‘सौर शहरे’ विकसित करण्याच्या कार्यक्रमांतर्गत निवड करण्यात येते. सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर केला जावा यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जातात. याच उपक्रमांतर्गत राज्यातून नाशिकसह पुणे व अन्य काही शहरांची निवड करण्यात आली होती. यामध्ये सोलर पॅनल आणि सौर पथदिवे अशी वर्गवारी करण्यात आली. जिल्ह्याने सौर पथदिवे उपक्रमांतर्गत जिल्ह्यात खेडोपाड्यांत, वाड्या-वस्त्यांवर ५,८०० सौर पथदिवे बसविले. याकरिता जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजन समिती, तसेच विविध हेडअंतर्गत सुमारे ७ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. पुणे जिल्ह्याला देशातील ऊर्जासंवधर्नासाठी प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेचे लक्ष आता पक्षप्रमुखांच्या घोषणेकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपपाठोपाठ महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेनेही इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण केल्या असून, इच्छुकांच्या यादीवर आता संपर्कप्रमुख अजय चौधरी अंतिम हात फिरवणार आहेत. अंतिम उमेदवारी तयार केल्यानंतर संबंधित उमेदवारांचा अहवाल हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे बुधवारी किंवा गुरुवारी सादर केला जाणार आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी ११ प्रभागांमध्ये जवळपास ३२५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या नजरा आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या घोषणेकडे लागल्या आहेत.

शिवसेनेने स्वबळाच्या चाचणीसाठी सोमवारपासून इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या असून, पहिल्या दिवशी २० प्रभागांतील ५७० इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबतची युती एकतर्फी तोडली होती. त्यामुळे शिवसेनेने या वेळी सावध होत ‘एकला चलो रे’ची तयारी करून ठेवली आहे. भाजपच्या मुलाखती संपल्यानंतर सोमवारपासून शिवसेनेनेही मुलाखती सुरू केल्या. शिवसेनेकडे ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी ८१० इच्छुकांनी अर्ज केले, तर दुसऱ्या दिवशी ३२५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यामुळे इच्छुकांचा आकडा वाढला आहे. मंगळवारी २१ ते ३१ प्रभागांच्या मुलाखती झाल्या. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. संपर्कप्रमुख अजय चौधरी यांच्या मुलाखत पॅनलमध्ये जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, नगरसेवक सुधाकर बडगुजर, शिवाजी सहाणे, माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, महिला आघाडीच्या शहर संघटक श्यामला दीक्षित यांचा समावेश होता. शिवसंपर्क अभियानात काय योगदान, सामाजिक कार्य, निवडणुकीची काय तयारी अशा प्रश्नांचा भडिमार इच्छुकांवर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रमुख उमेदवारांचा कस लागणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेसाठीच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात पाचही जिल्ह्यांत उमेदवारांच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. या निवडणुकीच्या रिंगणातील विविध पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी प्रचारात स्वत:ला झोकून दिल्याने रंगत भरली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचा कस लागणार आहे. नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नगर या पाचही जिल्ह्यांमधील विविध शिक्षणसंस्था, कॉलेज, शाळांवर विविध गटांतील मतदारांसोबत वैयक्तिक संपर्कावर भाजपचे डॉ. प्रशांत पाटील व काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी भर दिला आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अवघे आठ दिवस शिल्लक आहेत. प्रशासन स्तरावर या निवडणुकीच्या व्यवस्थापनासाठी कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या मतदारसंघासाठी अर्जमाघारीनंतर रिंगणात १७ उमेदवार शिल्लक आहेत. या उमेदवारांमध्ये सरळ लढत होत असल्याचे चित्र आहे. हाती उरलेल्या अत्यल्प कालावधीत विभागातील सुमारे २ लाख ४० हजार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रामुख्याने पक्षपुरस्कृत उमेदवारांनी व्यूहरचना सुरू केली आहे. या मतदारसंघात काँग्रेस आघाडी व भाजप युतीच्या उमेदवारांत सरळ लढत होत असली तरीही डाव्या पक्षाचे उमेदवार व अपक्षांना होणारे मतदानही निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.

डॉ. पाटील यांचा प्रचार यंत्रणेवर जोर

भाजपच्या वतीने विधान परिषदेच्या रिंगणातील डॉ. प्रशांत पाटील यांनी प्रचार यंत्रणेच्या व्यूहरचनेवर भर दिला आहे. त्यांच्यासाठी शिक्षक मतदारसंघाचे आमदार अपूर्व हिरे, भाजपचे प्रदेश संघटनमंत्री प्रा. रवींद्र भुसारी आणि प्रदेश प्रभारी आमदार नरेंद्र पवार यांनी शहरात बैठकी घेतल्या आहेत. डॉ. पाटील यांनी सोमवारी जळगाव जिल्ह्याचा दौरा करून ठिकठिकाणी मेळावेही घेतले. पालकमंत्री गिरीश महाजन आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही भाजपस सहकार्य करण्याचे आवाहन केले. नगर जिल्ह्यातही पालकमंत्री राम शिंदे यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. या वेळी भाजपतर्फे नगरवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

डॉ. सुधीर तांबेंच्या गाठीभेटी

काँग्रेस-राष्ट्रवादी काँगेस आघाडीचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी पाचही जिल्ह्यांत प्रचारावर भर दिला आहे. पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना गत सहा वर्षांच्या कार्यकाळातील सातत्याच्या संपर्काचा फायदा ते या प्रचार मोहिमांमध्ये उठविण्याच्या प्रयत्नात आहेत. पाचही जिल्ह्यांमध्ये त्यांनी स्थानिक समर्थकांच्या माध्यमातून मतदारांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्कावर भर दिला आहे. प्रामुख्याने संस्थाचालक, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतरांच्या संघटनांच्या माध्यमातून संपर्करचना करताना त्यांनी टीडीएफच्या यंत्रणेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर प्रचाराच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनामागेही लागली रांग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या असून, मंगळवारी तब्बल २४३ इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली. मनसेची पहिली यादी ३० जानेवारीला जाहीर होणार असून, मनसेचा अंडर करंट कायम असल्याचे पक्षाचे संपर्क नेते अविनाश अभ्यंकर यांनी या वेळी सांगितले.

महापालिका निवडणुकीचे वेध लागल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भगदाड पडण्यास सुरुवात झाली. यातून मनसे सावरणार काय, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच मंगळवारी ठक्कर बाजार येथील राजगड कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पंचवटी प्रभाग १ ते ६ व नाशिकरोड विभागातील प्रभाग १७, १८, १९, २०, २१, २२, तसेच मध्य नाशिकमधील प्रभाग ७, १४, १६, २३ मधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मनसेचे नेते बाळा नांदगांवकर, संपर्क नेते अविनाश अभ्यंकर, डॉ. प्रदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, राज्य सचिव प्रमोद पाटील, स्थायी समितीचे सभापती सलीम मामा शेख, गटनेते अनिल मटाले, जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम यांच्या उपस्थितीत मुलाखती पार पडल्या. जवळपास १६ प्रभागांमध्ये २४३ इच्छुक उमेदवार पुढे आले. विद्यमान नगरसेवकांनीही मुलाखती दिल्या. मनसेकडे एकूण ४७३ इच्छुक उमेदवार आले असून, उर्वरित उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी होणार आहेत. यामध्ये मध्य नाशिकमधील प्रभाग १२, १३, १५ सिडकोतील २४, २५, २७, २८, तसेच प्रभाग २९, ३०, ३१ त्यानंतर सातपूर विभागातील ८, ९, १०, ११, २६ या प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

पक्षनिष्ठा हा महत्त्वाचा फॅक्टर

पक्षाकडून लढण्यासाठी डॉक्टर, इंजिनीअर, उच्चशिक्षित उमेदवार पुढे येत आहेत. लेखी परीक्षा रद्द झाली असली तरी मुलाखत हीदेखील परीक्षाच आहे. पक्षनिष्ठा, प्रभागातील समस्यांची जाणीव असलेले, प्रभागाची भौगोलिक रचना माहीत असलेले, त्या प्रभागात एक ओळख असलेला उमेदवार अपेक्षित आहे. या निकषांवर खऱ्या उतरणाऱ्या उमेदवारांची माहिती पक्षप्रमुख राज ठाकरे यांना देण्यात येईल. त्यानंतर उमेदवारी निश्चित होईल, अशी प्रतिक्रिया अभ्यंकर यांनी दिली. साधारणतः ३० जानेवारी रोजी पहिली यादी जाहीर होणार असल्याचे अभ्यंकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापौर अशोक मुर्तडक, तसेच मनसे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांचीही रीतसर मुलाखत घेण्यात आली.

गद्दारांना स्थान नाही

इतर पक्षांतील प्रबळ, मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले काही इच्छुक पक्षाच्या संपर्कात आहेत. त्यात लवकरच मोठी वाढ होईल. अशा उमेदवारांबाबत पक्ष विचार करेल. पक्षप्रमुख राज ठाकरे अंतिम निर्णय घेतील. मात्र, पक्षातून बाहेर पडलेल्या नगरसेवकांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पक्षात स्थान मिळणार नाही, असे अभ्यंकर यांनी स्पष्ट केले. काही नगरसेवकांनी तसा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, पक्षाची पॉलिसी अंतिम असून, त्यात बदल होणार नाही, असे अभ्यंकर यांनी स्पष्ट केले.

बाळा नांदगावकरांचे गुफ्तगू

नेते बाळा नांदगावकर यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास मुलाखतीतून वेळ काढून सुरेखा भोसले, सुजाता डेरे, अर्चना जाधव, कांचन पाटील, मेघा साळवे, नितीन साळवे, सविता काळे यांच्यासह माजी आमदार नितीन भोसले यांच्याशी गुफ्तगू केले. निवडणुकीपूर्वी उद््भवलेल्या समस्या व आता त्यावर निघणारे पर्याय याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांच्या ‘श्रीमंती’चा आता जाहीर पंचनामा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गुन्हेगारी पार्श्वभूमी, काळा पैसा आणि बेहिशेबी संपत्तीच्या जोरावर निवडणुका जिंकणाऱ्या उमेदवारांची सर्व बाजूने कोंडी करण्याचे धोरण राज्य निवडणूक आयोगाने स्वीकारले आहे. उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात दिलेला तपशील हा थेट प्रसारमाध्यमांमध्येही प्रसिद्ध करण्याचे मंगळवारी सर्व महापालिकांना आदेश दिले आहेत. पाच वर्षांपूर्वीच्या आणि सध्याच्या संपत्तीचा तपशीलच मतदारांसमोर मांडला जाणार असल्याने उमेदवारांच्या अडचणी वाढणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निष्पक्ष वातावरणात होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. साम, दाम, दंड व भेदाच्या जोरावर निवडणुका जिंकणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी अनेक नियम तयार केले असून, उमेदवारांवर कडक वॉच ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. इच्छुक उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचा आढावा घेण्यासाठी पाच प्रा‌‌प्तिकर अधिकाऱ्यांची यापूर्वीच नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांकडून उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवले जाणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त जे. ए. सहारिया यांनी मंगळवारी महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी भरलेले प्रतिज्ञापत्र व संपत्तीचे विवरण थेट वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. प्रत्येक उमदेवाराने या अगोदर पाच वर्षांपूर्वी सादर केलेल्या चलप-अचल संपत्तीचा तपशील व गेल्या पाच वर्षांत जमवलेल्या संपत्तीचा तपशीलच मतदारांसमोर सादर केला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांची झटपट श्रीमंती थेट मतदारांसमोर जाणार असल्याने उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीही चव्हाट्यावर

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना पायबंद घालण्यासाठी मतदान केंद्रात त्यांच्यावरील गुन्ह्यांचा तपशील व त्यांची संपत्ती फोटो स्वरुपात लावली जाणार आहे. त्यामुळे अगोदरच चिंतेत असलेल्या उमेदवारांना आणखी एक धक्का राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे.

प्राप्तिकरचे अधिकारी दाखल

मतदारांच्या खर्चाचा लेखाजोखा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेसाठी नियुक्त करण्यात आलेले प्राप्तिकर विभागाचे पाच अधिकारी मंगळवारी दाखल झाले. या सर्वांनी आयुक्तांसोबच चर्चा केली. बी. एस. झाला (धुळे), संजयकुमार सिंग (मालेगाव), अनिमेस नासकर (औरंगाबाद), एस. एच मेंढे (जळगाव), मनिषकुमार सोनी (औरंगाबाद) यांनी पदभार घेतला.

तक्रारींसाठी अॅप

उमेदवारांकडून आचारसंहितेच्या तक्रारी दाबल्या जाण्याची शक्यता गृहित धरून आयोगाने दोन अॅप मतदारांसाठी सुरू केले आहेत. सिटीझन ऑन पेट्रोलिंग या अॅपद्वारे थेट आचारसंहिता भंगाची तक्रार आयोगाकडे करता येणार आहे. त्यामुळे तत्काळ संबंधिताविरोधात कारवाई करता येणार आहे. सोबत टू वोटर हे अॅप उमेदवारांसाठी उपलब्ध केले असून, दैनंदिन खर्चाचा तपशील उमेदवाराने या अॅपवर अपलोड करायचा आहे. त्यामुळे या दोन्ही अॅपमुळे उमेदवारांची गोची होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा तालुक्यांमध्ये आघाडीची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये आघाडीस अनुकूल असे वातावरण आहे. काही तालुक्यांमध्ये स्वबळाचा नारा दिला जाऊ शकतो, तर तर काही तालुक्यांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होतील, असे चित्र आहे. नांदगाव, कळवण, येवला, नाशिक, निफाड, सिन्नर या तालुक्यांमध्ये आघाडीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

जिल्हा परिषदेत सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसही आक्रमक झाली आहे. या दोन्ही पक्षांनी आघाडीचे अधिकार स्थानिक पातळीवर सोपविले आहेत. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये आघाडीला अनुकूल असे वातावरण आहे. राष्ट्रवादीने सन्मानपूर्वक आघाडीचा प्रस्ताव दिल्यास आघाडी केली जाईल, असे संकेत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

एमजी रोडवरील जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये मंगळवारी निवड समितीची बैठक झाली. या वेळी ग्रामीणचे जिल्हा प्रभारी के. सी. पाडवी, सहप्रभारी डी. जी. पाटील, श्याम सनेर, आमदार निर्मला गावित, जिल्हाध्यक्ष पानगव्हाणे, माजी आमदार शिरीष कोतवाल, अनिल आहेर, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. ममता पाटील, डॉ. सुचेता बच्छाव, डॉ. तुषार शेवाळे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेतील ७३ गट आणि १४६ गणांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. काही जागांवर दोनहून अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या जागांचा पेच निवड समितीने सोडविण्यासाठी तालुकाध्यक्ष व तालुका निरीक्षकांशी चर्चा केली. दहा ते बारा गटांत पेच निर्माण झाला असून, प्रदेश पातळीवरच त्याचा निपटारा केला जावा यावर एकमत झाले आहे. काही तालुक्यांतील पेच स्थानिक पातळीवर सोडविता यावा, यासाठी पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.

तालुका स्तरावर तालुका निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठकी पार पडल्या. यामध्ये राष्ट्रवादीशी आघाडी करण्याबाबत नांदगाव, कळवण, येवला, नाशिक, निफाड व सिन्नर या तालुक्यांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे, तर चांदवड, दिंडोरी, मालेगाव, बागलाण, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांतून स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. आघाडी आम्हालाही हवी असली तरी सन्मानाने प्रस्ताव यावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. काही गटांमध्ये दोन्ही पक्षांकडे तुल्यबळ उमेदवार असून, तेथे मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images