Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आचारसंहितेनंतर सुटणार शिक्षकभरतीचा तिढा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मार्चअखेरपर्यंत शिक्षकसंच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करतानाच रिक्त जागांवर आचारसंहितेनंतर शिक्षकभरती प्रक्रिया राबविली जाईल, असे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा आचारसंहितेनंतरच करण्यात येईल, असा खुलासाही त्यांनी केला. पंचवटी एमबीए कॉलेजमध्ये आयोजित शिक्षणसंस्था चालकांच्या बैठकीदरम्यान ते बोलत होते. ‘खरं बोलू का बरं बोलू?’ या प्रश्नाने त्यांनी संस्थाचालकांसोबतच्या संवादाला सुरुवात केली; पण खरं तेच बोलेन, बरं बोलणार नाही, असा इशारा देत संस्थाचालकांना कानपिचक्या द्यायलाही तावडे विसरले नाहीत.

ते म्हणाले, ‘‘संस्थाचालकांनी पैसे घेऊन नियुक्त केलेल्या शिक्षकांची वर्णी भविष्यातील भरतीप्रक्रियेत अजिबात लागू केली जाणार नाही. राज्य सरकारने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांनाच यात प्राधान्य देण्यात येणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. शिक्षक संघटनांच्या सहविचार सभेत त्यांनी हा मुद्दा मांडला. या वेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. अपूर्व हिरे, आमदार नरेंद्र पवार विचारमंचावर उपस्थित होते. या वेळी शिक्षणमंत्र्यांनी शिक्षक संघटनांच्या प्रश्नांना त्यांनी आचारसंहितेच्या चौकटीत उत्तरे दिली. शंभर टक्के अनुदानित शाळेतील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी डी. आर. नारायणे यांनी केली. अपंग शिक्षकांची भरती आणि पदोन्नतीत तीन टक्के आरक्षणाचे नियम धुडकावले जात असल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी केला. एखादी संस्था यात दोषी असल्याचे पुरावे दिल्यास त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. संचमान्यतेत शिक्षणाधिकारी, संस्थाचालक संगनमताने निर्णय घेतात. त्यामुळे शिक्षकांवर अन्याय होत असून, संचमान्यता होऊनदेखील रिक्त जागांवर नवीन शिक्षकांची नियुक्ती झालेली नाही. तथापि, शिक्षकभरती प्रक्रियेसंबंधी चिपळूणकर समितीने ठरवून दिलेले नियम आणि २३ ऑक्टोबरच्या शासन निर्णयातील निकषांमध्ये फेरबदल करून मध्यम मार्ग काढण्यात आला आहे. यापुढील शिक्षक, शिक्षकेतर पदांची भरती या नियम आणि निकषांच्या अनुषंगानेच भरली जाणार आहे. रिक्त पदे भरण्याचा अधिकार संस्थाचालकांना असणार नाही, असेही ते म्हणाले. या वेळी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव राजेंद्रप्रसाद मारवाडी, शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, प्रवीण अहिरे, डॅा. प्रशांत पाटील, शिक्षक संघटनेचे के. के. अहिरे, शिखर सावंत, किरण पगार, विलास सोनार, दिनेश पवार आदी उपस्थित होते.

संस्थाचालकांसाठी मार्चमध्ये बैठक

संस्थाचालकांच्या विविध धोरणात्मक आणि संस्था पातळीवरील समस्यांना तोंड द्यावे लागते. याविषयी प्रत्येक संस्था पातळीवर तोडगा काढण्यासाठी येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात संस्थाचालकांची स्वंतत्र बैठक घेण्यात येईल. बैठकीत प्रत्येक संस्थेचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले, तसेच पेसा क्षेत्रातील संस्थाचालकांना भरतीप्रक्रियेत नियम व निकषांमध्ये शिथिलता देण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस डॉ. प्रशांत हिरे, मविप्र संस्थेचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती अॅड. नितीन ठाकरे, माजी आमदार शिवराम झोले, ‘नाफेड’चे संचालक नानासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

संप मागे घेण्याचे संघटनांना आवाहन

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी उद्यापासून (१८ जानेवारी) तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुद्द्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन देत तावडे यांनी शिक्षक संघटनांना संप मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, संघटनांकडून यावर कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्येष्ठ साहित्यिक प्रा. पुरुषोत्तम पाटील कालवश

0
0

कवितेचा जाणकार गमावल्याच्या प्रतिक्रिया

म. टा. वृत्तसेवा, धुळे

‘कविता-रती’ या काव्याला वाहिलेल्या मासिकाला प्रदीर्घ काळ टिकवून ठेवणारे साक्षेपी संपादक, ज्येष्ठ कवी, साहित्यिक प्रा. पुरुषोत्तम पाटील यांचे सोमवारी (दि. १६) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. संपूर्ण मराठी साहित्य जगतात त्यांची ‘पुपाजी’ म्हणून ओळख होती. आपल्या अभ्यासपूर्ण लेखनाने ते गेल्या ३० वर्षांपासून ते ‘कविता-रती’ नावाचे द्वैमासिक चालवित होते. त्यांच्या निधनामुळे कवितेचा जाणकार संपादक गेल्याची भावना साहित्य जगतातून व्यक्त होत आहे.

पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म (दि. ३ मार्च १९२८) ला बहादरपूर (ता. पारोळा, जि. जळगाव) या त्यांच्या मामांच्या गावी झाला. ते मुळचे ढेकू (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील रहिवासी होते. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण बहादरपूर येथे झाले. त्यानंतरचे शिक्षण प्रताप हायस्कूल येथे झाले. याकाळात त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. ते पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेले. तेथील समृद्ध वाङ्मयीन पर्यावरणामुळे त्यांच्या काव्य लेखनाला अनुकूल वातावरण लाभले.

अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले

प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी लिहिलेल्या साहित्याला महाराष्ट्र सरकारसह अनेक खासगी संस्थांनी पारितोषिके देऊन गौरविले होते. त्यांच्या कविता संग्रहांना सरकारचा ‘केशवसुत’ आणि ‘बालकवी’ पुरस्कार मिळाले आहेत. ‘तळातल्या सावल्या’, ‘परिदान’, ‘तुकारामाची काठी’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे ते सदस्य होते. कवी कुसुमाग्रज हे त्यांचे प्रेरणास्थान होते.केवळ काव्याला वाहिलेल्या ‘कवितारती’ या द्वैमासिकाचे तसेच ‘अनुष्टूभ’ या साहित्य विषयक मासिकाचे ते संपादक होते. ज्येष्ठ दिवंगत कवी बा. भ. बोरकर, ज्ञानपिठाचे सन्मानार्थी वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी कार्य केले होते. तर वि. दा. करंदीकर, रणजित देसाई आदींसह अनेक ख्यातनाम लेखक, कवी यांचा प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्याकडे सातत्याने राबता होता. पुरुषोत्तम पाटील यांनी शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजात मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली होती. या काळात त्यांनी अनेक त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली, नातू, पणतू असा परिवार आहे.

------------------------

प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या निधनाने ‘कवितेतील पुरुषोत्तम’च हरपला. खान्देशातील साहित्य क्षेत्रात पुरुषोत्तम पाटील (पुपा) यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे साहित्य क्षेत्रात त्यांचे योगदान भरीव आहे.

- भगवान भटकर, जळगाव

कविवर्य ‘पुपा’ हे धुळ्याचे भूषण होते. छोट्या शहरात राहूनही ‘अनुष्ठूभ’ सारखे दर्जेदार मासिक काढणारे प्रा. पुरुषोत्तम पाटील एकमेवच. कविवर्य ‘पुपां’च्या निधनाने अवघे मराठी साहित्य विश्व पोरके झाले आहे. त्यांनी आपल्या मासिकांतून कविता जनमानसात पोहोचवली.

-प्राचार्य डॉ. कृष्णा पोतदार, धुळे

------------------------

मराठी भाषेमधील कवितांसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे लेखक, कविज्येष्ठ संपादक प्रा. पुरुषोत्तम पाटील होते. त्यांनी ‘कविता-रती’ या मासिकातून कवितेला एक नवीन आयाम दिला. पुपांनी मराठी मनामध्ये कविता सजवली, जगवली आणि वाढवली. पत्रकार, प्राध्यापक, प्राचार्य आणि कवी अशा चार भूमिकेतून समर्थपणे आपले आयुष्य जगले.

- जगदीश देवपूरकर, धुळे

------------------------

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. पुरुषोत्तम पाटील हे उत्तम व सरल कवितांसोबत अर्थपूर्ण आणि सकस गद्य लेखक होते. ते उत्तम काव्य समीक्षक होते. कविता-रती या कवितेला वाहिलेल्या मराठीतल्या एकमेव व्दैमासिकाद्वारे मराठी भाषा व काव्य यातील त्यांचे प्रचंड योगदान होते. काव्यावर एवढे निरपेक्ष प्रेम करणारा माणूस होणे विरळच!

- प्र. श्रा. चौधरी, जळगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदेशी मद्याचा साठा जप्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडनजीक सापळा रचून राज्यात अवैधरित्या वाहून आणलेला विदेशी मद्याचा साठा जप्त केल्याची कारवाई दि. १६ रोजी सायंकाळी केली. ही माहिती दुय्यम निरीक्षक डी. टी. शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भरारी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे दुय्यम निरीक्षक डी. टी. शेवाळे, धनंजय भदरगे, उदय शिंदे, दीपक पाटील आदींसह पथकाने महामार्गावर चांदवडनजीक मंगरूळ फाटा, हॉटेल साईलीला ठब्यासमोर सापळा रचला होता. दारूबंदी गुन्ह्यांतर्गत हरियाणा राज्यात उत्पादित झालेला देशी बनावटीचा विदेशी मद्यसाठा वाहून नेणारा ट्रक (यूपी ८३ एटी ३९६८) थांबून त्याची तपासणी केली असता हा साठा आढळून आला.

या ट्रकमध्ये पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हरियाणा राज्यातील उत्पादित भारतीय बनावटीचे विदेशी मद्याचे बॉक्स हे एका बंद असलेल्या वॉटर फिल्टर मशिनमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. या गुन्ह्यातील वाहनचालक धर्मेंद्र सिंग परमानंद सिंग यास मुंबई दारूबंदी कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत ८६० बॉक्ससह एकूण १ कोटी ५६ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पुढील तपास दुय्यम निरीक्षक डी. टी शेवाळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४ उमेदवारांनी केले ३९ अर्ज दाखल

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनविलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २४ उमेदवारांनी एकूण ३९ उमेदवारी अर्ज दाखल केले. असे असले तरी खरी लढत भाजप-सेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व डाव्या आघाडीचे उमेदवरांतच होण्याची चिन्हे आहेत.

आज, (दि. १८) उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, शुक्रवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातून सर्वात जास्त ११, तर त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यातून ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय जळगाव जिल्ह्यातून ३, धुळे जिल्ह्यातून केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातून एकही उमेदवारी अर्ज

दाखल झाला नाही.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची मंगळवारी शेवटची मुदत होती. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरलेल्यांची संख्या २४ वर जाऊन पोहचली. या २४ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे ३९ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येत्या ३ फेब्रुवारीस मतदान होणार असून, दि. ६ फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे.

उमेदवारी अर्ज

सुभाष डांगे (श्रीगोंदा), मनोज पवार (मालेगाव), महेश कडुस (नगर), डॉ. प्रशांत पाटील (नाशिक), बापू रणधीर (संगमनेर), कॉ. प्रकाश देसले (नाशिक), संजय सूर्यवंशी (जळगाव), विजय गायकवाड (नगर), बाळासाहेब पवार (नगर), अॅड. संतोष इंगळे (जळगाव), शरद तायडे (नाशिकरोड), नितीन सरोदे (नाशिक), अॅड. सचिन पठारे (पारनेर), बाळासाहेब लांडे (नगर), डॉ. सुधीर भास्कर तांबे (नगर), विठ्ठल नेमुजी गुंजाळ (नगर), विवेक देवीदास ठाकरे (जळगाव), अशोक शंकर पाटील (धुळे), आशिष युवराज बागूल (नगर), शंकर गोविंद सोमवंशी (नाशिक), संजय गांधी (मनमाड), मंगेश ढगे (सिन्नर), सुरेश ताके (नगर) व पुरुषोत्तम रकिबे (नाशिक).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती-आघाडीत रंगणार लढत

0
0

Jitendra.tarte@timesgroup.com

Tweeter : @mtjitendratarte

नाशिक : राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचे रण बनलेल्या पदवीधर मतदारसंघात अर्ज भरण्याच्या मुदतीअखेर चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. या मतदारसंघात भाजप व शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार सुधीर तांबे यांच्यात प्रमुख लढत होत असली तरीही डाव्या आघाडीचे उमेदवार राजू देसले यांच्या एंट्रीने चुरस वाढली आहे.

प्राथमिक टप्प्यात या निवडणुकीस राजकीय पक्षांनी विशेष गांभीर्याने घेतल्याचे चित्र नव्हते. मात्र , गतवेळी या मतदारसंघाचा कौल घेऊन निवडून गेलेले डॉ. सुधीर तांबे यांनाच पुन्हा काँग्रेसने उमेदवारी घोषित केल्याने वर्चस्व टिकविण्याचे आव्हान तांबे यांच्यासमोर आहे. त्यांच्या विरोधात डॉ. प्रशांत पाटील यांच्या रूपाने तुल्यबळ उमेदवार उभा करीत भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सोमवारी अर्ज भरण्याच्या दिवशी डॉ. पाटील यांच्या शक्तिप्रदर्शनासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्र्यांसह भाजपातील सर्व मातब्बरांची शक्ती एकवटली होती. विद्यमान आमदार तांबे यांची बलस्थाने लक्षात घेत शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न मार्गी लावण्याची अप्रत्यक्ष आश्वासने देत खुद्द शिक्षणमंत्र्यांनीही संस्थाचालकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. यावर आक्षेप नोंदवत डाव्या आघाडीचे उमेदवार राजू देसले यांनी आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पदवीधरचा बालेकिल्ला पुन्हा मिळवून देण्याच्या घोषणेवरच शांत न बसता प्रसंगी जोखीम स्वीकारण्याचीही तयारी भाजपने ठेवल्याचे चित्र या प्रसंगातून स्पष्ट झाले. भाजपच्या शक्तिप्रदर्शनाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न मंगळवारी काँग्रेसने सुधीर तांबे यांचा अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने केला. काँग्रेससह राष्ट्रवादी, टीडीएफ आणि मित्रपक्षांची मोट बांधत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, विजय बहाळकर आदींनी स झाडून हजेरी लावली.

अपक्षांकडे लक्ष

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या आघाडीच्या वतीने अर्ज दाखल करताना भाकपचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे, स्मिता पानसरे, सुनील मालुसरे, माकपचे जिल्हा सचिव व्ही. डी. धनवटे यांनीही सहभाग घेतला. पदवीधरच्या लढतीत देसले व इतर अपक्ष उमेदवारांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. हे उमेदवार किती मतांचे धनी होणार, यावरही मुख्य लढतीची समीकरणे विशेषत्वाने अवलंबून असल्याने या निवडणुकीकडे सुशिक्षित मतदारांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामाचे ब्रँडिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचार करण्यासाठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी मंगळवारी शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन विकासकामांची पाहणी केली. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे हेदेखील शहरात उपस्थित होते. त्यांनी यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेत गाठीभेटी घेतल्या.
महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरीही ठराविक पक्ष वगळता काही पक्षांच्या कार्यालयांमध्ये आजही सामसूम आहे. मागील निवडणुकीत नाशिक महापालिकेत ४० नगरसेवकांची फौज कार्यरत असताना काही दिवसांपासून या पक्षाला उतरती कळा लगली होती. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. ही मरगळ झटकून टाकण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी चित्रपट सृष्टीतील तारे-तारकांनी शहरातील विविध विकासकामांना भेटी दिल्या. मंगळवारी दुपारी हे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक शहरात दाखल झाले. यात महेश मांजरेकर, संजय नॉर्वेकर, वैभव मांगले, पुष्कर श्रोत्री, सिद्धार्थ जाधव, सायली संजीव, मुग्धा कर्णिक, मेघा धाडे, माधवी निमकर, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, सचित पाटील, आनंद इंगळे, स्मिता तांबे, सविता मालपेकर, अमित राज, सागर कारंडे यांच्यासमवेत अमित ठाकरे तसेच मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर उपस्थित होते. सर्व कलाकारांनी प्रथम तिडके कॉलनीत असलेल्या चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कला भेट दिली. यावेळी मनसेचे नाशिक शहराचे प्रवक्ते पराग शिंत्रे यांनी पार्कची माहिती दिली. यावेळी पुष्कर श्रोत्री म्हणाला की, आम्ही नाशिक शहरात बरेच फिरलो. परंतु आम्हाला कुठेही खड्डे आढळले नाहीत. त्यामुळे येथील विकास नक्की झाला आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क ही काळाची गरज आहे. येणाऱ्या भावी पिढीला यातून नक्कीच चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळेल व रस्त्यांवर अपघात होणार नाहीत. जितेंद्र जोशी म्हणाला, मनसेचे ज्या पध्दतीने शहरात काम सुरू आहे ती बाब निश्चित कौतुकास्पद आहे. यावेळी संजय नार्वेकर, सायली संजीव यांनीही शहराविषयी भावना प्रकट केल्या. चिल्ड्रन पार्कच्या भेटीनंतर कलाकारांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शस्त्रसंग्रहालय, महाराष्ट्रातील सर्वात उंच शंभरफुटी कारंजा, होळकर पुलाखालील वॅाटर कर्टन, बोटॅनिकल गार्डन, उड्डाणपुलाखालील सुशोभिकरण, सुशोभित वाहतूक बेटे इत्यादी ठिकाणांचा दौरा केली. या निमित्ताने मनसेने पुन्हा एकदा शहरात वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानाच्या चौकशी अहवालाचे गूढ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेतील राजकारण दिवसेंदिवस गूढ बनत चालले असून चौकशी अहवाल सादरीकरणाच्या निमित्ताने यावर कळसच चढला. अहवाल सादर झाला की नाही याबाबत पदाधिकाऱ्यांपैकी कुणीही दुजोरा देत नसताना समितीच्या एका सदस्याने मात्र पत्रकार परिषदेत अहवालालाच आक्षेप घेत या साऱ्याच प्रकरणातील गूढ वाढवले आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात सावाना अध्यक्षांनी तीन पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर आक्षेप घेत त्यांना पदच्यूत केले होते. या एकूणच प्रकाराबाबत अॅड. नागनाथ गोरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करून सावानाच्या कामकाजाबाबत अभ्यास करून अहवाल सादर करावा, असे अभिप्रेत होते. मात्र, अॅड. नागनाथ गोरवाडकर, बी. जी. काळे, विश्वास ठाकूर, दिगंबर गाडगीळ आणि रमेश देशमुख अशा पाच सदस्यीय समितीतील बी. जी. काळे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिला होता. अहवाल सादर करण्यासाठी पाचच दिवस राहिले असताना हा राजीनामा आल्याने त्यांच्या जागी अध्यक्षांनी अॅड. श्रीधर व्यवहारे यांची नेमणूक केली. अभ्यासासाठी अधिक दिवस लागणार असल्याचे सांगत अहवाल लांबणीवर टाकला. त्यानंतर जानेवारी महिन्यात चौकशी समितीचे काम सुरू होते. १६ जानेवारी रोजी अचानकच अहवाल सादर करण्यात आला. या अहवालाला आपली मान्यता नसल्याचे अॅड. श्रीधर व्यवहारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले असून, आपण अभ्यास केलेल्या अनेक मुद्द्यांचा या अहवालात समावेश करण्यात आलेला नसल्याने त्याला आक्षेप असल्याचे व्यवहारे यांनी म्हटले आहे. तर अहवाल अध्यक्षांना सादर होतो, तो अहवाल बाहेरही आलेला नाही, तोच सभासदपदी पुन्हा प्रतिष्ठापणा झालेला एकजण पत्रकार परिषद बोलावतो व त्या परिषदेत चौकशी समितीचा एक सदस्य या अहवालाला जोरदार आक्षेप घेतो, यामुळे सावानाचे राजकारण चांगलेच तापले असून या अहवालाचे नक्की गूढ काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनतळे बनलीत कार मॉल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
चारचाकी विक्रेत्या दलालांनी नामी शक्कल लढवली असून, शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पार्किंग झोनमध्ये गाड्या उभ्या करुन विक्री करण्यास सुरुवात केली आहे. ना जागेचे भाडे, ना कोणतेही कर त्यामुळे शहरातील फूटपाथ व पार्किंगच्या जागा या ‘कार मॉल’ होऊ लागल्या आहेत.
एखाद्या व्यक्तीला आपल्या कारची विक्री करायची असल्यास तो गिऱ्हाईक शोधण्याची झंझट टाळण्यासाठी आपली गाडी कार मॉलमध्ये जाऊन लावतो. या ठिकाणी ज्याला कार घ्यायची आहे ती व्यक्तीदेखील चांगल्या कारचा शोध घेण्यासाठी कार मॉलचा सहारा घेते. गाडी शिकल्यानंतर नवीन कार खरेदी करण्याऐवजी जुनी कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे अनेक ग्राहक जुन्या कारच्या खरेदीला प्राधान्य देतात. या कार खरेदी करण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी कार मॉल्स उभे राह‌िले असून, त्यांच्याकडून जुन्या कारची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. या जुन्या कार विक्री करण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता भासते. त्यामुळे साहजिकच जागेचे भाडे भरण्याचा भार उचलावा लागतो. हा जागेच्या भाड्याचा खर्च टाळण्यासाठी दलालांनी शहरातील मोक्याच्या जागा शोधल्या आहेत. या ठिकाणी गाडी पार्क करायची व त्या गाडीवर ‘सेल’ची पाटी लावून आपला कॉन्टॅक्ट नंबर दिला जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात द्यावे लागणारे भाडे द्यावे वाचत असून, दलालांना हक्काची जागा मिळाली आहे.
दलालांच्या या पार्किंगमुळे सामान्य माणसांना गाड्या पार्क करणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे पार्किंग हे कारच्या विक्रीसाठी आहे की नागरिकांसाठी आहे, असा प्रश्न नागरिकांना पडतो आहे. शहरात राजीव गांधी भवन, पारिजात नगर, मुंबईनाका येथे अनेक ठिकाणी असे मॉल सुरू झाले असून, त्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शहरात फुटपाथ पादचाऱ्यांसाठी आहेत की कार विक्रेत्यांसाठी हा मोठा प्रश्न आहे. अनेक भागात कार विक्रेत्यांनी ठाण मांडले असून रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे.
- किशोर सिन्नरकर, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बाबाज्’ एकांकिका स्पर्धा सुरू

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
बाबाज थिएटर आणि एबीसीएल फिल्म प्रॉडक्शन अॅण्ड इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयेजित बाबाज् करंडक एकांकिका स्पर्धेस मंगळवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तब्बल १० एकांकिकांच्या सादरीकरणाने परशुराम साईखेडकर नाट्यगृह दणाणून गेले होते.
यावेळी व्यासपीठावर समाजसेविका आणि चित्रपट निर्मात्या गीता कपूर, आनंद बच्छाव, अॅड. विजया माहेश्वरी, अॅड. शुभांगी कडवे, अंजली पाटील, प्रकाश साळवे, राज पाटील, परीक्षक विजय खानविलकर, देवेन कापडणीस, श्र‌िया जोशी यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. गीता कपूर म्हणाल्या की, नाटक हे चित्रपटात जाण्याचे सर्वात मोठे माध्यम आहे. जो कलाकार उत्कृष्ट काम करेल त्याला चित्रपटात घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी बाबाज् करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजक प्रशांत जुन्नरे म्हणाले की, दरवर्षी सातत्याने या स्पर्धा भरवल्या जातात. एकूण ३७ प्रवेशिका आल्या होत्या. परंतु वेळेअभावी आम्हाला २६ एकांकिकाच प्रदर्शित कराव्या लागत आहेत. पहिल्या दिवशी ‘वेटिंग फॉर सेन्सेशनल’, ‘मुलगी उद्याची शान’, ‘रेनमेकर’, ‘पाऊस पाड्या’, ‘क्रिएटिव्ह‌िटी’, ‘हाईड अॅण्ड सिक’, ‘गिनीपिग्स’, ‘दर्देपोरा’, ‘काळ्या बंबाळ अंधारी’, ‘फुगडी’ या एकांकिका सादर झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

0
0

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Gautam.Sancheti

@timesgroup.com

Tweet : @sanchetigMT

नाशिक : थंडीचा कडाका वाढत असताना तोंडावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. चौकाचौकांत रंगणाऱ्या गप्पा, इच्छुकांची मतदारभेटीसाठीची धावपळ, तुरळक प्रमाणात सुरू झालेल्या पार्ट्या यामुळे निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पक्षांच्या बैठकी, इच्छुकांच्या मुलाखतींमुळे रस्सीखेचही सुरू आहे. त्यामुळे अंतिम चित्र अद्याप स्पष्ट नसले, तरी रंगमंच मात्र तयार झाला आहे. आता पात्रांची निवड झाली की प्रचाराला रंगत येणार आहे. शहरातील सहा विभागांतील पहिला विभाग पंचवटी असून, तो सध्या दिग्गजांच्या अस्तित्वाच्या लढाईमुळे चर्चेत आहे.

पंचवटीमधील सहा प्रभागांमधून २४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. स्थलांतरीत, नववसाहत, झोपडपट्टी, जुने नाशिक अशा संमिश्र भागात गेल्यावेळी मनसे व भाजपने वर्चस्व राखत प्रत्येकी सात जागा मिळविल्या होत्या. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने पाच तर शिवसेनेला अवघ्या एक जागेवर समाधान मानावे लागले. या विभागात काँग्रेस दोन जागेवर स्थिरावला तर दोन अपक्षांनी सुध्दा बाजी मारली होती.

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार, नगरसेवक बाळासाहेब सानप यांची बालेकिल्ल्यात प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महापालिकेसह पक्षातही वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अधिकाधिक नगरसेवक निवडून आणणे हे त्यांचे लक्ष्य आहे. या विभागात मनसेचे महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरुमीत बग्गा हे वेगवेगळ्या प्रभागातून रिंगणात उतरणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी असा प्रवास करून भाजपवासी झालेले सुनील बागुल हे कमळ फुलवण्यासाठी मातोश्री किंवा बंधू यांना या भागातून रिंगणात उतरविणार आहेत. ‘राष्ट्रवादी’चे माजी खासदार माधवराव पाटील यांचे पुत्र संजय पाटील या भागातूनच भाजपच्या तिकीटीवर निवडणूक लढवणार आहे. विभागात भाजपचा वरचष्मा दिसत असला तरी पक्षापुढे इच्छुकांची वाढती संख्या डोकेदुखी ठरली आहे. आमदार बाळासाहेब सानप यांनी सर्व इच्छुकांना तयारी करण्यासाठी सांगितले आहे. मात्र, संधी उपलब्ध न झालेल्या इच्छुकांकडून बंडखोरी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रभाग एक

जुन्यांना आव्हान नव्यांचे

किशोर सूर्यवंशी मार्ग, बोरगड, चामरलेणी, म्हसोबावाडी, प्रभातनगर, ओमकारनगर, गोरक्षनगर, पोकार कॉलनी, गायत्रीनगर, कलानगर, गजपंथ सोसायटी परिसर, म्हसरुळ गावठाण व शेतीशिवार असा भाग असलेल्या या प्रभागाने निकालाची ओपनिंग होणार आहे. त्यामुळे त्याला वेगळे महत्त्व आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये सलग चार वेळा निवडणूक जिंकणाऱ्या रंजना भानसी पुन्हा रिंगणात असणार आहेत. दोन वेळा नगरसेविका झालेल्या शालिनी पवार यांच्याऐवजी त्यांचे पती अरुण पवार रिंगणात उतरतील. मनसेकडून विजयी झालेले गणेश चव्हाण शिवसेनेत गेले आहेत. त्यांची पत्नी निवडणूक लढविणार आहे. याव्यतिरिक्त अन्य तरुण नेत्यांनीही जोरदार तयारी केल्याचे दिसते.

प्रभाग दोन

हौशा-नवश्यांची गर्दी

प्रभाग क्रमांक दोनमध्ये आडगाव मळे परिसर, एमईटी कॉलेज, ग्रामीण पोलिस वसाहत, आडगाव एमव्हीपी मेडिकल कॉलेज, आडगाव गावठाण परिसर, कोणार्कनगर, जत्रा हॉटेलमागील परिसर, अमृतधाम, विडी कामगार वसाहत, दुर्गानगर, नांदूर-मानूर गाव व शेती शिवाराचा परिसर आहे. तीन वेळा नगरसेवक राहिलेले शेकापचे अॅड. जे. टी. शिंदे यांनी प्रथमच शिवसनेच्या तिकिटावर रिंगणात उतरणार आहेत. दोन वेळा नगरसेवक झालेले काँग्रेसचे उध्दव निमसे भाजपवासी झाले आहेत. तर माजी नगरसेवक अनंत सूर्यवंशी मनसेच्या इंजिनावर स्वार होणार आहेत. ‘राष्ट्रवादी’च्या विद्यमान नगरसेविका सुनीता निमसे यंदा निवडणुकीसाठी लढवण्यात फारसे उत्सुक नाहीत. याबरोबरच येथे काही काही हौशे नवशेही रिंगणात असणार आहे.

प्रभाग तीन

बंडखोरीचे संकट गहिरे

प्रभाग तीनमध्ये रासबिहारी शाळेमागील परिसर, गोपाळनगर, शिवकृपानगर, कमलनगर, मीनाताई ठाकरे स्टेडियममागील परिसर, लाटेनगर, हिरावाडीरोड परिसर, विजयनगर, जनार्दन स्वामीनगर, त्रिमूर्तीनगर, महालक्ष्मीनगर, ओमनगर, क्षीरसागर कॉलनी, बाप्पा सीताराम परिसर, कृष्णनगर, टकलेनगर,एसटी डेपोमागील परिसर, पंचवटी अमरधाम परिसर, शेरी मळा, गणेशवाडी आयुर्वेदिक कॉलेज, केवडीबन, डेंटल कॉलेज परिसर, स्वामी नारायणनगर, चव्हाण मळा परिसर, स्वातंत्र्यवीर सावरकर परिसर आहे. यात भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप सलग चार वेळा निवडून आले आहेत. याच भागाने त्यांना उपमहापौर, महापौर आणि आमदारपदापर्यंत नेले. यंदा त्यांनी मुलगा मच्छिंद्रला रिंगणात उतरवित आहेत. मनसेच्या तिकिटावर निवडून आलेले रुची कुंभारकर आता भाजपवासी झाले आहेत. या‌शिवाय माजी नगरसेवक शरद कोशिरे, सुनीता शिंदे यांच्यासह अनेक जण नशिब अजमावणार आहेत. गेल्या वेळी भाजपकडून निवडून आलेल्या ज्योती गांगुर्डे यांच्या पतीचा खून झाल्याचे प्रकरण गाजले. त्यांच्याविषयी मतदारांमध्ये सहानुभूती आहे. या प्रभागात बंडखोरीचे संकट घोंघावत आहे. ११ जणांच्या भाजपच्या इच्छुकांनी एक गट तयार केला आहे. भाजपने संधी नाकारल्यास यातील दोघांना शिवसेनेने तिकीट द्यावे, अशी त्यांची रणनीती आहे.

प्रभाग चार

झोपडीवासीयांचा

कौल मोलाचा

प्रभाग चारमध्ये नामको कॅन्सर हॉस्पिटलमागील परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती, सीडीओ-मेरी, आदिवासी वसतिगृह परिसर, मेरी वसाहत, तारवालानगर, लामखेडे मळा, वज्रेश्वरी झोपडपट्टी, फुलेनगर, वैशालीनगर, भराडवाडी, सम्राटनगर, कालिकानगर, राहुलवाडी, महापालिका पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र, विद्युतनगरी, पंचवटी पोलिस स्टेशन, महालक्ष्मी थिएटर परिसर, लोकसहकारनगर, आदित्यकुंज, संजयनगर, वाल्मीकनगर, मजूरवाडी, निमाणी बस स्टॅण्ड, आर. पी. विद्यालय, सूर्या आर्केड, सुविधा हॉटेल परिसराचा समावेश आहे. प्रभागात झोपडपट्टीचा मोठा भाग आहे. मनसेचे नगरसेवक डॉ. विलास घोलप शिवसेनेत गेले आहेत. राखीव प्रवर्ग नसल्याने त्यांना सर्वसाधारण गटातून नशीब अजमावावे लागणार आहेत. माजी नगरसेवक भगवान भोगे, रिमा भोगे शिवसेनेकडून रिंगणात उतरतील. तर ‘राष्ट्रवादी’च्या कविता कर्डक यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

प्रभाग पाच

लढा प्रतिष्ठा जपण्यासाठी

प्रभाग पाचमध्ये कुमावतनगर, दत्तनगर, जाणता राजा कॉलनी, सुदर्शन कॉलनी, शिंदेनगर, नवनाथनगर, ड्रीम कॅसल, जाधव कॉलनी, मधुबन कॉलनी, गजानन कॉलनी, नवनिर्माण चौक, राजपाल कॉलनी, रोहिणीनगर, भक्तिधाम, पेठ नाका परिसर, चित्रकुट सोसायटी, दिंडोरीरोड कृषी उत्पन्न समितीमागील परिसर, एरंडवाडी, मखमलाबाद नाका परिसर, चिंचबन, इंद्रकुंड, जाजूवाडी, मालेगाव स्टॅण्ड, रामकुंड परिसर, शनी चौक, सरदार चौक, काळाराम मंदिर, सीतागुंफा परिसर, ढिकलेनगर, नाग चौक हा परिसर आहे. येथे लढत प्रतिष्ठेसाठीच होणार आहे. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी विविध पक्षाच्या दिग्गजांना घेऊन आघाडी तयार केली आहे. माजी नगरसेवक उल्हास धनवटे, विमल पाटील, नंदिनी बोडके यांचा पॅनलमध्ये समावेश होण्याची चर्चा आहे. तर माजी खासदार माधवराव पाटील यांचे पुत्र संजय पाटील भाजपकडून निवडणुकीत उतरतील. कमलेश बोडके, चंद्रकला धुमाळ हेही इच्छुक आहेत.

प्रभाग सहा

महापौरांचा होणार फैसला

प्रभाग सहामध्ये मखमलाबाद गावठाण व शेती शिवार परिसर, इंद्रप्रस्थनगरी, स्वामी विवेकानंदनगर, मेहेरधाम मागील परिसर, अश्वमेघनगर, कर्णनगर, यशोदानगर, शांतीनगर, रामकृष्णनगर, एरिगेशन कॉलनी, विद्यानगर, वडजाईमातानगर, महादेव कॉलनी, गांधारवाडी, मोरे मळा, जगझाप मळा, कोशिरे मळा, नागरे मळा, चौधरी मळा, हनुमानवाडी, प्रोफेसर कॉलनी, क्रांतीनगर, उदयनगर, तळेनगर, आदर्शनगर, कौशल्यानगर, रामवाडी हा भाग आहे. येथून मनसेचे महापौर अशोक मुर्तडक, भाजपवासी झालेले दामोदर मानकर, सिंधू खोडे, शिवसेनेकडून मनीषा हेकरे यांच्यासह भाजपचे सुनील बागुल यांच्या मातोश्री सिंधुताई बागुल किंवा त्यांचे बंधू संजय बागुल हे लढवणार आहेत. महापौरांमुळे सर्वात लक्षवेधी असलेल्या या प्रभागावरही सर्वांची नजर असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरविकासासाठीचे मंथन...

0
0

शहरविकासासाठीचे मंथन...

प्राचार्य डॉ. हरीश आडके

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नाशिकमधील अनेक विषय केंद्रस्थानी ठेवून ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांत ‘मटा जाहीरनामा’ या व्यासपीठाद्वारे चर्चा घडवून आणली. अनेक मान्यवरांनी चर्चेदरम्यान शहर विकासासंदर्भात महापालिकेची कार्यपद्धती, सोयी-सुविधा आदींबाबत वर्तमान स्थिती व भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन मते मांडली, अपेक्षा व्यक्त केल्या आणि सोबतच गुणदान करून महापालिकेचे प्रगतिपुस्तकच जनतेला उपलब्ध करून दिले. विविध समाजघटकांच्या शहर विकासाप्रतिच्या भावना शब्दबद्ध करणाऱ्या महिनाभराहून अधिक काळ चाललेल्या या विशेष अभियानातून जाणवलेले काही निष्कर्ष वाचकांच्या माहितीसाठी देत आहे.

नाशिक महापालिका अस्तित्वात आल्यानंतर म्हणजे ७ नोव्हेंबर १९८२ पासून आजवर अनेक विकासाभिमुख लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिले आहेत. महापालिकेचे कामकाज सामान्य प्रशासन, अतिक्रमण, लेखा, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग, उद्यान विभाग, पाणीपुरवठा, नगरविकास, अग्निशमन विभाग, आपत्कालीन व्यवस्थापन, महिला व बालविकास, आरोग्य, शालेय विभाग, मलनिस्सारण अशा विविध विभागांकडून पार पाडले जाते.

घरपट्टी वसुलीत

हवे गांभीर्य

महापालिकेच्या २०१६-२०१७ च्या अंदाजपत्रकावर नजर टाकली, तरी असे दिसते की लोकप्रतिनिधींना केवळ रस्ते व गटारी व समाजगृहे बांधण्यात रस आहे. तो रस का आहे हे जनतेला चांगलेच समजते. वाजत-गाजत निर्माण झालेली भुयारी गटार योजना ऐन महापुरात कशी निकामी ठरली याचा अनुभव नाशिकच्या जनतेने घेतला आहे. ट्री गार्ड व वॉर्डात ठिकठिकाणी बसवलेली बाके काही दिवसांतच का बदलली जातात आणि जातात तर कुठे जातात याचा कुणालाही थांगपत्ता लागत नाही. गोदापार्कची वाताहत, फाळके स्मारकाची वाताहत, कचरा व खत डेपो, दवाखाने, भाजीबाजार, वाढदिवस व अभिनंदनाचे फ्लेक्स व बॅनर्स-होर्डिंग्ज याबाबत नाशिककरांमध्ये नक्कीच संतापाची भावना आहे. गोदावरीमध्ये वारंवार आढळणाऱ्या पाणवेली सार्वजनिक आरोग्याबाबत महापालिकेची उदासीनता दर्शवितात. नवीन नाशिकमधील अतिक्रमणांचा प्रश्न आजही निकाली निघालेला नाही. दूरदूर अंतरापर्यंत स्वच्छतागृहांची अनुपलब्धता हे तर नाशिक महापालिकेचे मोठे अपयश म्हणावे लागेल. घरपट्टी वसुलीचे प्रमाण केवळ ५६.५८ टक्के असून, कर्मचाऱ्यांनी केवळ घरपट्टी वसुली जरी गंभीरपणे केली, तरी महापालिकेच्या आर्थिक समस्या सोडविल्या जाऊ शकतात व नवीन करवाढ करण्याचीसुद्धा गरज भासणार नाही.

..तरी नियोजन

होईल शक्य

‘मटा जाहीरनामा’ या चर्चासत्रात सहभागी झालेल्या मान्यवरांच्या महापालिकेकडून अपेक्षा जरी लक्षात घेतल्या, तरी नियोजन करणे महापालिकेला शक्य होऊन विकासाचा टप्पा गाठणे शक्य होणार आहे. त्यासाठी मात्र जनतेच्या भावना जाणणारा लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून देणे आवश्यक आहे.

या अपेक्षा फार मोठ्या नाहीत, उदाहरणार्थ- डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ला हेल्पफुल नगरसेवक हवा आहे, ज्येष्ठ नागरिक संघटनांची मध्यवर्ती संघटना– फेस्कॉमला ज्येष्ठांना महापालिकेत प्रतिनिधित्व हवे आहे, निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छ प्रतिमेचा नगरसेवक हवा आहे, रिक्षा व टॅक्सी संघटनेला असे वाटते, की नाशिक स्मार्ट होताना वाहतुकीला शिस्त असली पाहिजे, महापालिका शाळांतील शिक्षक व त्यांचे प्रतिनिधी अपेक्षा करतात, की बदलत्या काळानुसार त्यांना साहित्य व सामग्रीची उपलब्धता व्हावी, साधन-सुविधा मिळाल्यास इतरांबरोबर स्पर्धा करता येईल, आयटी व अंबड-सातपूर परिसरातील उद्योजक व आयमा, निमा या उद्योजकांच्या संघटनेला असे वाटते, की नाशिक हे आयटी डेस्टिनेशन बनावे, नाशिक बार असोसिएशनला नवीन न्यायालयासाठी जागा हवी आहे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधीना आपला एक प्रतिनिधी महापालिकेत असावा असे वाटते, हॉटेल्स असोसिएशनच्या मते लायसन्स राज संपून पर्यटन व्यवसायाला महापालिकेकडून उत्तेजन मिळावे, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या पर्यावरणप्रेमी लोकांना असे वाटते, की गोदा तर स्वच्छ व्हावीच; पण त्याचबरोबर नासर्डी, वाघाडी यांसारख्या नद्याही स्वच्छ व्हाव्यात, आर्किटेक्ट आणि इंजिनीअर्सना असे वाटते, की विकासासंदर्भात महापालिकेने त्यांची मदत घ्यावी, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ नाशिक- तान व टुरिझम व्यावसायिकांच्या मते पर्यटनाला उद्योगाचा दर्जा मिळावा, कचरा वेचणाऱ्या महिलांना स्वच्छतेसाठी आपली मदत व्हावी असे वाटते, बांधकाम व्यावसायिकांची संघटना- क्रेडाईच्या मते नाशिक शहरासाठी व्हिजन डॉक्युमेंट असावे, अशाप्रकारे ज्येष्ठ रंगकर्मी, गायक, चित्रपट महामंडळ, हेरिटज- वारसा जतन, घरेलू महिला कामगार प्रतिनिधी, माजी महापालिका अधिकारी व कर्मचारी, खासगी विनाअनुदानित शाळा, विद्यार्थी प्रतिनिधी, ग्राहक पंचायत, कॉलेजेसचे शिक्षक-प्राध्यापक, चार्डर्ड अकाैंटंट्स- कर सल्लागार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सहकारी बँकांचे प्रतिनिधी, गृहनिर्माण सोसायटी प्रतिनिधी, सामाजिक संस्था प्रतिनिधी यांच्याही अपेक्षा विकासाभिमुख आहेत, गरज आहे ती फक्त लोकभावना जाणून घेऊन कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींची.

या पार्श्वभूमीवर वरील सर्व मत-मतांतरांचा विचार करता ‘महाराष्ट्र टाइम्स’ने विविध समाजघटकांच्या जनभावना बरोबर शब्दबद्ध केल्या आहेत आणि या उपक्रमाद्वारे नागरिकांच्या अपेक्षांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. या दिशेने जनतेने सुयोग्य लोकप्रतिनिधी निवडून दिले, तर नाशिक महापालिका विकासाचा अत्युच्च टप्पा गाठेल यात शंका नाही.


विभागांचा लेखाजोखा स्पष्ट

‘मटा जाहीरनामा’मधून यापैकी विविध विभागांच्या कार्याचा लेखाजोखा स्पष्ट झाला आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा असतात. आजची स्थिती पाहता लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना फार यश मिळाले आहे, असे म्हणता येत नाही. एकट्या शिक्षण विभागाचा विचार करता महापालिका शाळांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे दिसते. एकीकडे खासगी इंग्रजी शाळांची चालती दिसते, तर सर्वसामान्य नागरिकांची मुले ज्या शाळांमध्ये शिकतात तेथे ज्ञानदान, स्वच्छता व सुविधांची वानवा असल्याचे दिसते. जेथे देशाचे भावी नागरिक घडतात, तेथेच ही परिस्थिती असेल, तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल, याचा आपणास अंदाज येतो. (समाप्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेवर आता राहणार ‘सोशल वॉच’!

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिक, जिल्हा परिषद, तसेच २१६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याकडे निवडणूक आयोगाने लक्ष पुरविले आहे. नागरिकांनाही आचारसंहिता भंगाबाबतच्या तक्रारी बिनदिक्कतपणे देण्यात याव्यात यासाठी सिटिझन्स ऑन पॅट्रोल (कॉप) हे मोबाइल अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आचारसंहिताभंगावर प्रशासन आणि आयोगाचा ‘सोशल वॉच’ राहणार आहे.

या अॅपचा वापर कसा करावा याबाबतचे परिपत्रक राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालये, तसेच महापालिकांना काढले आहे. या निवडणुका निर्भय, मुक्त, तसेच पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. सामान्य जनतेला आचारसंहिताभंगाच्या तक्रारी दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने हे अॅप सुरू करण्यात आले आहे.

आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जात नाही. त्यामुळे लोक तक्रारी करण्यास पुढे येत नाहीत, तसेच तक्रार प्राप्त होईपर्यंत व तक्रार प्राप्त झाल्यापासून कारवाई होईपर्यंत बराचसा कालावधी जात असल्याने परिणामकारक कारवाई होत नसल्याची नागरिकांची धारणा झाली आहे. अशा कमतरता दूर करण्यासाठी, तसेच आचारसंहितेची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘कॉप’ हे मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे. स्वत:चे नाव गोपनीय ठेवून आचारसंहिताभंग होत असलेल्या ठिकाणावरून नागरिक तक्रार नोंदवू शकतात. ही तक्रार प्राप्त होताच दोन किलोमीटर परिसरात हजर असलेल्या व निवडणुकीशी संबंधित काम पाहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पोहोचेल. ते लगेचच त्यानुसार योग्य ती कार्यवाही करू शकणार आहेत. महापालिका, तसेच जिल्हा प्रशासनाशी संबंधित अधिकाऱ्यांनी हे अॅप डाउनलोड करावे, अधिकाऱ्यांची यादी avinash.sanas@nic.in या इमेल आयडीवर पाठवावी, तसेच या अॅपबाबत लोकांना माहिती मिळावी यासाठी प्रशासन स्तरावरून प्रचार आणि प्रसार करावा, असे आदेश आयोगाने जिल्हाधिकारी, तसेच महापालिका आयुक्तांना दिले आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातूनच अॅपची नोंदणी करावी लागणार आहे.

फोटो डाउनलोड बंधनकारक

या अॅपचा वापर प्रभावीपणे केला जावा, त्यातून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पळवाटा काढू नयेत यासाठी प्राप्त तक्रारींनुसार कारवाईसाठी जाणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा, कारवाईचा फोटो अॅपवर डाउनलोड करणे बंधनकारक राहणार आहे. प्राप्त तक्रारी व त्यावर केलेली कारवाई याबाबतचा अहवाल दर आठवड्याला पाठवावा, असे आदेशही प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठशेवर शेड भंगारात

0
0

आठशेवर शेड भंगारात

Namdev.Pawar

महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरलेला अनधिकृत भंगार बाजार महापालिकेने अखेर पोलिसांच्या मदतीने हटविला आहे. परंतु, अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत काढण्यात आलेले आठशेहून अधिक शेड भंगार व्यावसायिकांच्या हट्टापायी भंगारात निघाले असून, त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. भंगार व्यावसायिकांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांचे ऐकले असते, तर कदाचित अतिक्रमण निर्मूलन मोहिमेतून भंगार व्यावसायिकांना शेडचे नुकसान वाचविता आले असते, तसेच आर्थिक फटकाही सोसावा लागला नसता. परंतु, भंगार बाजारातील तथाकथित पुढाऱ्यामुळेच हे नुकसान सहन करावे लागले असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींच्या अगदी मध्यभागी अनधिकृत भंगार बाजार गेल्या तीस वर्षांपासून वसला होता. हा अनधिकृत भंगार बाजार हटवावा यासाठी सर्वच पक्षांनी आंदोलने केली होती. तब्बल तीस वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनांत शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर अखेर न्यायालयात गेले होते. महापालिकेलादेखील न्यायालयाने अनधिकृत भंगार बाजार काढण्याबाबत वेळोवेळी सांगितले होते. परंतु, अनेकदा अनधिकृत भंगार बाजार उठविण्याला ‘खो’ दिला जात असल्याने दुकानांची संख्या सातत्याने वाढतच होती. दातीर यांच्या न्यायालयीन पाठपुराव्याला अखेर यश मिळत न्यायालयाने महापालिकेला भंगार बाजार हटविण्याबाबत आदेशित केले होते. महापालिका आयुक्तांनी लागलीच न्यायालयाचा आदेश मानत भंगार बाजारात स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसीचे फलक लावत आवाहन केले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता कोट्यवधी रुपयांचे शेड व्यावसायिकांना भंगारात विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या नुकसानीला जबाबदार असलेल्या भंगार बाजारातील पुढाऱ्यावर व्यावसायिकांचा मोठा रोष आहे. अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू झाल्यावर भंगार बाजारातील पुढारी गायब झाले आहेत. भविष्यात भंगार बाजारातील पुढारी परतला, तर त्याच्यावर भंगार व्यावसायिकांचा रोष निघणार हे मात्र निश्चित.

...तर टळले असते नुकसान

दरम्यान, भंगार बाजारातील पुढारी न्यायालयातून पुन्हा ‘स्टे’ आणणार असल्याचे व्यावसायिकांना सांगत होते. काही भंगार व्यावसायिक महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी गेले असता स्वतःहून दुकानांचे अतिक्रमण काढून घ्या, असे आयुक्तांनी सांगितले होते. परंतु, पैशाच्या जोरावर ‘स्टे’ आणूनच असा पवित्रा भंगार बाजारातील तथाकथित पुढाऱ्याने घेतला असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत व्यावसायिकांनी आपले शेडच हटविले नाहीत. त्यानंतर मात्र महापालिकेने पोलिसांच्या मदतीने तीन दिवसांत आठशेहून अधिक भंगार दुकानांची अतिक्रमणे हटविली होती. ही अतिक्रमणे काढताना सर्वाधिक नुकसान भंगार व्यावसायिकांनी उभारलेल्या मोठ्या लोखंडी शेडचेच झाले आहे. येथील व्यावसायिकांनी आयुक्तांचे एेकले असते, तर त्यांचे नुकसान टळू शकले असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आम्हाला डावलू नका, निवडणुकीत बळ द्या’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे अशा अनेक पक्षांमधून येणाऱ्या इच्छुकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पक्षाची ताकद निश्चितच वाढणार असली, तरी उमेदवारी देताना मात्र पक्षातील निष्ठावंतांना प्राधान्य द्या, आपण या निवडणुकीत बाजी मारू शकतो. पण, त्यासाठी कृपा करा, कार्यकर्त्यांना बळ द्या, अशी विनंती ग्रामीण भागातील काँग्रेसच्या तळागाळीतील निष्ठावंतांनी केली.

जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती एम. जी. रोडवरील काँग्रेस कार्यालयात सोमवारी घेण्यात आल्या. त्यासाठी दुपारी एकची वेळ देण्यात आली होती. परंतु बऱ्याच विलंबाने या मुलाखतींना सुरुवात झाली. सर्वप्रथम तालुक्याच्या अध्यक्षांना बोलण्याची संधी देण्यात आली. पक्षाचे पाठबळ मिळाले तर निश्चितच आपण या निवडणुकीत बाजी मारू शकतो, असा विश्वास इच्छुकांकडून व्यक्त करण्यात आला. येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसची चलती होती तेव्हा त्यांनी आपल्याला वाऱ्यावर सोडले. आता आपली वेळ आली असून, राष्ट्रवादीसोबत आघाडी नकोच, अशी आग्रही भूमिका तेथील कार्यकर्त्यांनी मांडली. जिल्ह्यात राष्ट्रवादीची प्रतिमा मलीन झाली असली, तरी गाफील राहू नका, असा सल्ला माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी दिली. नाशिक तालुक्यातील गिरणारे गटात पक्षाने उमेदवारी दिली अथवा नाही दिली तरी निवडणूक लढविणार असल्याचे एका महिला उमेदवाराने स्पष्ट केले.

गेल्यावेळी मतदार संघात पदाधिकाऱ्यांच्या सभा देखील न मिळाल्याबद्दल इच्छुक उमेदवारांनी या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. या निवडणुकीत असे करू नका, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हे कोण श्यामाप्रसाद अन् पं. दीनदयाल उपाध्याय?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपल्या प्रभागामधून संभाव्य प्रबळ प्रतिस्पर्धी उमेदवार शोधूनही सापडणार नसल्याच्या आविर्भावात छाती काढून भाजपच्या निवड समितीसमोर तोंडी परीक्षेसाठी गेलेले आयाराम मंगळवारी चांगलेच तोंडावर आपटले, तर त्याच न्यायाने परीक्षकांचीही फिरकी घेत काही इच्छुकांनी हा मुलाखत वर्ग गाजवला. जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, जनसंघाचे पहिले सरचिटणीस पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे छायाचित्रच इच्छुकांसमोर ठेवण्यात आले. मात्र, बहुसंख्य इच्छुकांना त्यांची ओळखच पटली नसल्याने मुलाखतकर्त्यांना या वेळी कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली, तर काही इच्छुकांनी मुलाखत घेणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांचा पक्षातील इतिहास विचारत त्यांना निरुत्तर केले.

भाजपकडून नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखतींना सोमवारपासून भाजप कार्यालयात प्रारंभ झाला. आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या अध्यक्षतेखालील १४ जणांच्या समितीत विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत झालेला मुलाखतीचा कार्यक्रम चांगलाच रंजक अन किस्सेदार झाला. राज्यात अन् केंद्रात भाजपची सत्ता असल्याने या लाटेवर स्वार होण्यासाठी भाजपकडे महापालिकेसाठी इच्छुकांची रांग लागली आहे. त्यात स्वपक्षींयासोबत पक्षाबाहेरील आयारामांचा सर्वाधिक भरणा आहे. त्यामुळेच मग पक्षानेही या आयारामांची छाननी करण्याचा निर्णय घेतला अन् त्यांचे भाजपबद्दलचे ज्ञान चाचपडले.

समितीने मंगळवारी घेतलेल्या या मुलाखतींसाठी आलेल्या इतर पक्षांतील आयारामांची उत्तरे ऐकून सदस्यही अवाक् झाले. भाजप कार्यालयात जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, जनसंघाचे पहिले सरचिटणीस पंडित दीनदयाल उपाध्याय यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. छायाचित्रांतील व्यक्ती कोण असा प्रश्न विचारल्यावर आयारामांची बोबडीच वळली. पक्षात आलेल्या बहुसंख्य आयारामांनी भाजपच्या या दोन आधारस्तंभाना ओळखलेच नाही. भाजपतर्फे इच्छुक असलेल्या काही आयारामांना तर पक्षाची स्थापना कधी झाली याचेही सामान्यज्ञान नव्हते. पक्षातर्फे इच्छुक असलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण माहितीही नसल्याने यांच्या हाती पक्षाचे भविष्य द्यायचे कसे, असा विचार करीत मुलाखत घेणाऱ्यांनी कपाळावर हात मारून घेतला. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी पक्षांतर करणाऱ्या या इच्छुकांनाही मग समितीतील बुद्धिजीवींनी आपल्या स्टाइलने माघारी फिरवले.

तुमचा इतिहास सांगा

मुलाखत घेणाऱ्यांमध्ये नुकतेच पक्षात नव्याने आलेल्यांचाही समावेश होता. त्यातील एका आमदाराने थेट एका इच्छुकाचे वय काढत, तुम्हाला अजून वेळ असल्याचा टोला हाणला. तुम्ही पक्षात कधीपासून आहात, तसेच तुम्हाला अजून वेळ आहे या त्यांच्या उत्तराने इच्छुक कार्यकर्ता संतापला. मग या इच्छुकाने प्रश्नकर्त्याचाच इतिहास विचारला. तुम्ही पक्षात येण्याच्या अगोदरपासून आपण पक्षात असल्याचे इच्छुकाने प्रश्नकर्त्याला सुनावले.

‘झेरॉक्स इच्छुक’

मुलाखतींना इच्छुक महिला उमेदवारांची संख्याही लक्षणीय होती. आरक्षणामुळे पुरुषांचा पत्ता कट झाल्यानंतर महिलांना पुढे करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनीही या वेळी हजेरी लावली होती. मुलाखत घेताना महिलांसोबतच या ‘झेरॉक्स इच्छुक’ उमेदवारांनाही आत प्रवेश देण्यात येत होता, तसेच मुलाखत घेताना महिलांऐवजी हे इच्छुक झेरॉक्सच उत्तरे देत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारचा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

0
0

धुळ्यात बहुजन मोर्चाप्रसंगी वामन मेश्राम यांचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्यातील सत्ताधारी हे मराठा व दलित यांच्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा करत आहेत. एकीकडे मराठा दलित तर दुसरीकडे ओबीसी व एससी, एसटी, एनटी, व्हीजे यांच्यातही वाद पेटविला जातो आहे, असा आरोप भारतमुक्ती मोर्चाचे पदाधिकारी वामन मेश्राम यांनी केला. ते बुधवारी (दि. १८) धुळे शहरात काढण्यात आलेल्या बहुजन क्रांती मोर्चात बोलत होते. राज्यात अॅट्रॉसिटी कडक करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. तसेच जातीय तेढ निर्माण करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत, अशा आरोपाचा पुनरुच्चार त्यांनी केला.

या मोर्चाची सुरुवात धुळे शहरातील जेल रोड परिसरातून करण्यात आली. या मोर्चावेळी व्यासपीठावर एम. जी. धिवरे, राजेंद्र पाटील, जुबेर शेख, प्रा. महादेव जमदाडे, तानाजी तडवी, रावसाहेब पाटील, राजेंद्र सपकाळे, अॅड. संतोष जाधव, राजदीप आगळे, आनंद सैंदाणे आदी उपस्थित होते. मेश्राम म्हणाले की, मराठा व दलित वाद निर्माण करण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला राज्यभर मोर्चे काढण्यास परवानगी दिली, असा आरोपही मेश्राम यांनी केला. बहुजन मोर्चामुळेच शासनाला ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्याची घोषणा करावी लागली. परंतु, अजून १० पैशांचे बजेट नाही मग १ एप्रिलपासून मंत्रालय सुरू कसे करणार? शिवाय ओबीसी महामंडळ हे ओबीसी मंत्र्यांच्या नियंत्रणात न देता मुख्यमंत्री फडणवीस काय साधू पाहत आहेत, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. मोर्चात जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यांनी घटनेचा अवमान केला

मुळात अॅट्रॉसिटी विरोधात मोर्चा काढणे हे कायद्याबाहेर आहे. परंतु, याविरोधात कोठेही पोलिसात तक्रार अथवा कोणाला आजवर अटकही झाली नाही. केवळ बोलून अॅट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक होणार नाही. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा करा, अशी मागणीही यावेळी मोर्चाद्वारे करण्यात आली. अॅट्रॉसिटीच्या घटना राज्यभर वाढत आहेत. कायद्याचे राज्य निर्माण करेल, अशी शपथ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना केली होती. परंतु, तसे केले नाही. यातून फडणवीस यांनी घटनेचा अवमान केला, असा आरोपही मेश्राम यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुक ठरताहेत ‘बिन बुलाये बाराती’

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
मतदारांच्या भेटीगाठींसाठी लग्नकार्याचे ठिकाण इच्छुक निवडू लागले असल्याने आमंत्रण असो-नसो, ते हमखास येऊन वधू-वरांना शुभेच्छा देऊ लागले आहेत.
महापालिका निवडणूक महिनाभरावर येऊन ठेपली आहे. अपेक्ष‌ित पक्षांची उमेदवारी अजून कुणालाही घोषित करण्यात आलेली नसली तरी जुना पक्ष सोडून नव्या पक्षात प्रवेश केलेल्या विद्यमान नगरसेवकांनी आपली उमेदवारी फिक्स समजून प्रचाराला सुरुवात केली आहे. मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधत घरोघरी जाऊन तीळगुळ देण्याबरोबरच ‘लक्षही असू द्या’ असेही सांगितले. प्रभागाची व्याप्ती लक्षात घेता सर्वच प्रभागांत घरोघरी जाऊन भेटीगाठी घेणे शक्य होणार नसल्याने इच्छुकांनी प्रभागातील लग्नकार्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. आपल्या प्रभागातील कुणाचेही लग्न असो, दशक्रिया विधी असो, वाढदिवस असो, वर्षश्राद्ध असो इच्छुक हमखास दिसतातच. त्यात त्यांना केवळ ज्यांच्याकडे कार्य आहे तेच नव्हे तर त्या कार्याला आलेल्या प्रत्येकाला एकाच ठिकाणी भेटण्याची संधी मिळते. त्याचा ते पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करीत मतदारांपर्यंत पोहचत आहेत.
मतदारांच्या भेटीत मतदारही कोणत्या चिन्हावर लढविणार असे विचारत आहेत. त्यावर अनेक पक्षांकडे सेटींग सुरू असल्याचे सांगितले जात आहे. वेळ आली तर अपक्षांची आघाडी तयार करूनही लढण्याची तयारीही करण्यात आलेले इच्छुकांकडून बोलले जात आहे. या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप आणि राज्यात भाजप सोबत असलेल्या शिवसेना या दोन पक्षांकडे इच्छुकांचा कल जास्त आहे. एका प्रभागातील तीस-चाळीस उमेदवार इच्छुक असल्याने कुणाला उमेदवारी द्यायची आणि कुणाची उमेदवारी टाळायची असा प्रश्न पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना पडलेला असल्याने नाराजी होऊन बंडखोरीचा फटका या पक्षांना बसणार असल्याचे बोलले
जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इकॉनॉमी!

0
0

इकॉनॉमी!

- संपत थेटे


प्रत्येक इलेक्शन काही तरी देवून जातं... कुणाला जीत, तर अनेकांना हार... काहींना मिळते अनुभवाची शिदोरी, तर काहींना आयुष्यभरासाठी धडा... मग, या धामधुमीत काही तगतात, तर हा नाद नकोच म्हणत मार्ग बदलणारेही असंख्य असतात... असं सगळं बरं-वाईट घडत असलं तरी काहींसाठी इलेक्शन पर्वणीच ठरत असतं... खासकरून आपल्यासारखे कार्यकर्ते त्यावरच तर तगत असतात... उमेदवाराच्या मागं फिरता-फिरता रायबा-सायबाचा संवाद सुरू होता... खोटं-खोटं हसून, लोकांना हात दाखवून कंटाळा आल्यानं धीरगंभीर रायबानं हा टॉपिक छेडला होता.
रायबा : लई कंटाळायचं काम आहे राव. पाय नको-नको म्हणतात तरी पण चालावं लागतंय. उमेदवार बघ कसं भराभर पळतंय. कुठून येतेय त्यांना एवढी शक्ती? सकाळी उठल्यापासून नुसतं पळतंय…
सायबा : इलेक्शन एक नशाच आहे मास्तर. मला कशी चढली होती दोन दिवसांपूर्वी? तुम्ही त्या रात्री घरी आला नसता तर मी होतं नव्हतं त्ये सगळं घालवून बसलो असतो. (सायबाचा चेहरा गंभीर झाला होता. )
रायबा : होय... होय! बरं झालं लवकर उतरलं तुझं भूत. आम्ही तर जाम टेन्शनमध्ये होतो राव. अरं ह्ये इलेक्शन आपल्यासारख्यांसाठी नाहीच. ते आपल्यासाठी फक्त एक संधी असतंय, दोन पैसे कमविण्याची. इलेक्शन म्हणजे सुगी. इकॉनॉम‌ित पैसे फिरण्याचं एक मोठं साधन!
सायबा : ते कसं म्हणायचं? (इकॉनॉमीसारखा शब्द ऐकून सायबा बुचकळ्यात पडला होता. प्रश्नार्थक भाव करून तो बघत होता. सोबतच रायबाला इकॉनॉमी कळत असल्याचंही त्याला अप्रुप वाटत होतं.)
रायबा : अरं इलेक्शनमध्ये असा पैसा बाहेर येतोय, जो नोटाबंदीत सुद्धा आला नाही! फक्त तो डायरेक्ट सरकारला जात नाही. इलेक्शन इकॉनॉमी फिरवतं. मंदीत संधी देणारा तो एक उपक्रमच. महिना-दीड महिन्यात खर्च होणारे लाखो-कोट्यवधी रुपये वायफळ जातच नाहीत.
सायबा : म्हणजे? (सायबा पुरता गांगरला होता.)
रायबा : अरं वेड्या मंडपवाल्यांपासून ते बॅण्डवाले, कापडवाल्यापासून ते भांडीकुंडीवाला, मोठ्या व्यावसायिकापासून ते मजुरांपर्यंत पैसा नीटनेटका झिरपत असतो. एखाद्या सरकारी योजनेत सुद्धा एवढा शंभर टक्के पैसा खालपर्यंत पोचणार नाही इतका एक-एक रुपया तळात पोहोचतो. इकॉनॉमी एकदम फ्रेश होऊन जाते.
सायबा : म्हणजे सुगीच की सगळ्यांसाठी!
(आता सायबाचा चेहरा खुलला होता. त्याला इलेक्शन अन् इकॉनॉमीचं समीकरण समजलं होतं. रायबाच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करीत आता तो एखाद्या अर्थतज्ज्ञाप्रमाणं विचार करू लागला होता. एवढा पैसा तळापर्यंत येतो अन् सरकारी योजेनेप्रमाणं त्यात भष्टाचाराचा एक आरोप होत नाही, याचंही त्याला अप्रूप वाटत होतं. सरकारी योजना राबवण्याऐवजी शहरात दर सहा महिन्याला इलेक्शनच का खेळवलं तर जात नाही, असा विचार सायबाच्या डोक्यात घर करू लागला. जे रायबाला कळलं ते सरकारला कसं कळत नाही, याबद्दलही त्याला आश्चर्य वाटत होतं.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरीचा मुद्दा दोन महिन्यांत निकाली काढा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीचे प्रदूषण व नदीतल्या प्राचीन व नैसर्गिक ज‌िवंत पाण्याचे स्रोत पूर्ववत करण्यासंदर्भातील याचिकाकर्ते देवांग जानी यांचे सादरीकरण पाहून संबंधित मुद्दा दोन महिन्यांत निकाली काढण्याचे आदेश हायकोर्टाने पालिकेला दिले आहेत. रामकुंडासह गोदावरीच्या पाण्याच्या शुध्दीकरणाबाबत हायकोर्टाने पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे. जानी यांच्याकडून दाखल केलेल्या जनह‌ित याचिकेवर हायकोर्टाने आदेश दिले असून, प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा गाजणार आहे.

गोदावरीचे प्रदूषण व नैसर्गिक जिवंत पाण्याच्या स्रोतांबाबत देवांग जानी यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.त्यावर मुख्य न्यायाधीश डॉ.मंजुळा चेल्लूर व जी.एस.कुलकर्णी यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यां वेळी हायकोर्टाने गोदावरी नदी संबंधी दाखल जनहित याचिका निकाली काढत, याचिकेकर्ते देवांग जानी याचिकेतीत नमूद तपशीलवार तक्रारीचे सादरीकरण महापालिकेला करण्याचे आदेश दिले. तसेच सदरचे तक्रारीचे सादरीकरण मिळाल्यापासून दोन महिन्यांच्या आत प्रतिवादी महापालिकेने सर्व मुद्दे निकाली काढण्याचे आदेश दिलेत. गोदावरी नदी पात्रात तत्कालीन महापुरुषांनी १६ प्राचीन कुंड बांधलेले होते. सन १९१७ सालच्या सिटी सर्व्हेच्या मूळ नकाशामध्ये स्पष्टपणे कुंडांच्या आकृती मोजदादीसह आहेत. त्याच्या आधारे उच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आली होती. सदरचे प्राचीन कुंड नाशिक महानगरपालिकेने सन २००२ मध्ये कुंभमेळापूर्व काँक्रिटीकरणात स्लॅब टाकून बुजवण्यात आले. त्यामुळे कुंडाच्या खाली असणारे जिवंत पाण्याचे स्त्रोत मृत झाले. त्यामुळे नदी अधिक प्रदूषित झाली.


अरुणा नदीचा श्वास कोंडला

रामकुंडात अरुणा व गोदावरी नदीचा संगम आहे. अरुणा नदी रामशेज किल्ल्यावरुन इंद्रकुंडामार्गे रामकुंडाच्या आतील गोमुखात येते. परंतु, नाशिक महानगरपालिकेने सन १९९२च्या कुंभमेळ्यात अरुणा नदीच्या प्रवाहावर पायऱ्या बांधून अरुणा नदी पाइपलाइनद्वारे रामकुंडातील गोमुखात सोडली. सन २०१५मध्ये महापालिकेने सदरच्या पायऱ्या तोडून मालेगाव स्टॅण्डला समांतर रस्तारूपी उतार बांधला. दोन्ही वेळेस काम करताना महापालिकेने अरुणा नदीचा विचार न करता तिला रस्त्याखाली दाबून टाकले. पेशवे कुंडात वरुणा (वाघाडी), सरस्वती, गायत्री, सावित्री व श्रद्धा या पंचनद्यांचा संगम आहे. तो काँक्रिटीकरणामुळे मृत पावला. सदरच्या संगम पूर्ववत करणे, दशाश्वमेघ कुंड व सूर्य कुंड यात बांधलेला रस्ता व पायऱ्या त्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन महापुराचा धोका वाढलेला असल्याचा दावा जानी यांनी हायकोर्टात केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यादी गोंधळामुळे प्रशासनाला फुटला घाम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये झालेला घोळ महापालिका प्रशासनाच्या चांगलाच अंगलट आला आहे. तब्बल ६८४ हरकती व ६० हजार मतदारांची अदलाबदली तसेच नावातील गोंधळ सावरतांना प्रशासनाला पहिल्याच दिवशी घाम फुटला आहे.

येत्या २१ जानेवारीपर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध करायची असली तरी, हकतींच्या निपटाऱ्याची गती पाहता हे आव्हान पेलणे आता प्रशासनाला कठीण झाले आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांमध्येच सुंदोपसुंदी होत असून, टोलवाटोलवी सुरू झाली आहे. आतापर्यंत पावणेदोनशे हरकती निकाली निघाल्याचा दावा केला जात असला तरी, ६० हजार नावांचा गुंता वेळेत सोडविणे अवघड झाल्याने नियत कालावधीत यादी प्रसिद्ध होण्याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा गुंता सोडविणे शक्य नसल्याने इच्छुक उमेदवार आणि मतदारांचा रोष प्रशासनावर ओढावण्याची शक्यता आहे.

महापालिकेने गुरुवारपासून प्रभागनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मतदारांनी याद्या बघून १७ जानेवारीपर्यंत हरकती नोंदवायच्या होत्या. पाच दिवसांत जवळपास ६८४ हरकती प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक हरकती या नगरसेवकांच्या असून, सिडकोतून सर्वाधिक हरकती आल्या आहेत. शेवटच्या दिवशी मंगळवारी सुमारे चारशे हरकती प्रशासनाला प्राप्त झाल्या. विशेष म्हणजे सुमारे ६० ते ७० हजार मतदारांच्या नावांची हेराफेरी झाली असून त्यांचे मूळ प्रभागच बदलण्यात आले आहेत. त्यामुळे नगरसेवकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. येत्या २१ जानेवारीला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार असून, हरकतींचा निपटारा करण्यासाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हरकतींच्या छानणीचे काम धीम्या गतीने सुरू आहे. जवळपास ६० हजार मतदारांची पडताळणी करून त्यांचा अहवाल सादर करण्याचे खडतर आव्हान प्रशासनासमोर आहे. परंतु, या पडताळणीसाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी हे रात्री उश‌िरापर्यंत काम करत आहेत. बुधवारपर्यंत जवळपास पावणेदोनशेच हरकतींचा निपटारा झाला आहे. त्यामुळे अजूनही पाचशेच्या वर हरकती या प्रलंबित असून, येत्या दोन दिवसांत त्यांची पडताळणी करणे अशक्य दिसत आहे. त्यामुळे हरकतींचा व मतदारांच्या गोंधळाचा आकडा पाहून अधिकाऱ्यांसह प्रशासनालाच घाम फुटला असून, आता अधिकाऱ्यांकडून जबाबदारीची टोलवाटोलवी सुरू झाली आहे.


यादी प्रसिध्दीबद्दल संभ्रम

हरकतींची पडताळणी करुन अंतिम यादी ही राज्य निवडणूक आयोगासमोर सादर करून त्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. परंतु, सध्याचे उपलब्ध मनुष्यबळ पाहता आणि पडताळणीची गती पाहता २१ पर्यंत यादी प्रसिद्ध होईल की नाही याबाबतच आता संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तसेच मतदारांच्या नावाच्या प्रभागाच्या अदलाबदलीचा विषय सुटणार असला तरी, आडनावांतील बदल सोडवणे सध्या शक्य दिसत नाही.

कामकाज झाले ठप्प

महापालिकेची पूर्ण यंत्रणाच सध्या निवडणुकीच्या कामाला लागली आहे. त्यामुळे सध्या दैनंदिन कामकाज जवळपास ठप्पच झाले आहे. त्यामुळे नागरिकाना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे वेळेत मतदार याद्यांचा गोंधळ मिटवण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असताना दुसरीकडे नागरिकांचा रोषही ओढवून घ्यावा लागत असल्याने प्रशासन दुहेरी कात्रीत सापडले आहे.


मटा भूमिका

मतदार यादी हा निवडणूक प्रक्रियेतील कळीचा घटक असला तरी नेहमीच त्याकडे प्रशासन अत्यंत बेफिकिरीने पाहते. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याची प्रचिती येत आहे. तब्बल साठ हजार मतदारांच्या नावांची हेराफेरी केली गेल्याने अंतिम मतदार यादी दोन दिवसांत कशी तयार होणार अन् ती पुन्हा निर्दोष व अचूक कशी असणार हा प्रश्न सर्वांनाच सतावतो आहे. मतदार यादीवर सातशेहून अधिक हरकती आल्या आहेत. नावातील बदल, पत्ता चुकीचा वगैरे मुद्दे नेहमीचे असले तरी हजारो नावे भलत्याच प्रभागात जोडण्याचा भीमपराक्रम नोकरशाहीने करून ठेवला असून, आता मात्र ही जबाबदारीच झटकण्याचा प्रयत्न होणे ही निवडणूक यंत्रणेचीच चेष्टा म्हणावी लागेल. वास्तविक मतदार याद्या तयारच असतात, त्यात फक्त नवीन नावे समाविष्ट करणे, मयतांची व व्दिरुक्ती झालेली नावे वगळणे एवढाच काय तो सोपस्कार असतो. असे असतांना म्हसरुळच्या यादीत नाशिकरोडची नावे टाकून कर्मचाऱ्यांनी बुध्दी व जबाबदारीच गहाण टाकल्याचे स्पष्ट झाले. आता आयुक्तांनीच यातून तात्काळ तोडगा काढणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images