Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ईशान्य राज्यांसाठी रेल्वेचाच ‘रेड सिग्नल’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
नाशिकधील शेतकऱ्यांचा शेतमाल पूर्वोत्तर राज्यांत अर्थात ‘सेव्हन सिस्टर्स’ मध्ये पाठविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असले तरी रेल्वेने मात्र या महत्वाकांक्षी योजनेला तांत्रिक समस्यांचा रेड सिग्नल दाखविला आहे. त्यामुळे आता ही प्रस्तावित योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य सरकारला थेट दिल्ली दरबारी आपले वजन वापरावे लागणार आहे.
नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट पूर्वोत्तर राज्यांत हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नाशिकहून स्वतंत्र रेल्वे वॅगन प्रकल्प योजना राबविण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी राज्याचे कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत रेल्वे अधिकारी व कॉकर अधिकारी यांची एक बैठक झाली. या बैठकीस स्टेट मार्केट‌िंग बोर्डाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. बैठकीत नाशिकचा शेतमाल थेट पूर्वोत्तर राज्यांत पाठविण्यासाठी स्वतंत्र रेल्वे वॅगन उपलब्ध करुन देण्यावर चर्चा झाली. स्टेट मार्केटिंग बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहिजे तेव्हा पूर्ण क्षमतेने रेल्वे वॅगन उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली. त्यामुळे शेतमालाची गुणवत्ता ढासळून त्याची नासाडी होते व त्याचा आर्थिक फटका बसत असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतमाल वाहतुकीसाठी पाहिजे तेव्हा व पाहिजे त्या प्रमाणात रेल्वे वॅगन उपलब्ध करुन देण्याची त्यांनी आग्रही मागणी केली.

रेल्वेच्या तांत्रिक अडचणी
स्टेट मार्केटिंग बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीवर उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेपुढील तांत्रिक अडचणी मांडताना सांगितले की, शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वॅगन कायम उपलब्ध नसतात. त्या चक्राकार पद्धतीने उपलब्ध होत असतात. याशिवाय ४२ वॅगनचा एक रेक लोडिंगसाठी रेल्वेने ९ तासांचा वेळ निर्धारित केलेला असतो. परंतु जिल्ह्यातील ज्या स्टेशनवर रेक लोडिंग केला जातो, त्यास १६ तासांपेक्षा जास्तीचा अवधी लागतो. शिवाय प्रत्येक वॅगनची ६१ टन वाहतूक क्षमता असतानाही केवळ ४५ टन इतक्याच कांद्याची प्रत्येक वॅगनमधून वाहतूक करता येते. त्यामुळे नाईलाजाने भाडे मात्र ६१ टनांचेच वसूल केले जाते. प्रत्येक लोडिंगच्या ठिकाणी कामगार व कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रकची संख्या खूपच कमी असल्याने लोड‌िंगला दुपटीने जास्त वेळ लागत असल्याची अडचणही यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी मांडली.

कमळाबाईत दंग!

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आघाडी सरकारला सळो की पळो करुन सोडणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व सध्या राज्याचे कृषी, फलोत्पादन व पणन खात्याचे राज्यमंत्री असलेले सदाभाऊ खोत सध्या ‘कमळाई’ उद्यानातच जास्त रमले असल्याचा प्रत्यय आला.

‘कृषी’त भांडवली गुंतवणूक हवी
राज्यातील कृषी क्षेत्रातील असंख्य प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून पडून असल्याने त्याचे डबके साचलेले आहे. त्याला प्रवाहीत करण्याचे काम यापूर्वी कधी झालेच नाही, अशा शब्दांत राज्याचे कृषी, फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील यूतीपुर्वीच्या सरकारला दोषी धरले. शेतकऱ्यांची आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्यासाठी कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणुकीची व पायाभूत सुविधा उभारण्याची आवश्यकता असल्याचे ते यावेळी म्हणाले.
राज्यमंत्री सदाभाऊ खोत गुरुवारी नाशिकच्या प्रशासकीय दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान नाशिकचा शेतमाल पूर्वोत्तर राज्यांत पाठविण्यासाठी स्वतंत्र रेल्वे वॅगन प्रकल्प राबविण्याविषयी त्यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसह स्टेट मार्केटिंग बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर नाशिकरोड येथील ‘मित्रा’ संस्थेच्या सभागृहात बैठक घेतली.
नाशिकचा शेतमाल थेट उत्तर पूर्वेतील ‘सेव्हन सिस्टर्स’राज्यात पाठविण्यासाठीचा अहवाल पाठविण्याचे आदेश पणन खात्याला दिल्याचे सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले. आसाम व बंगालच्या दौऱ्याचा अहवालही पणन खात्याला दिलेला आहे. नाशिकमधील भाजीपाला व इतर सर्व प्रकारचा शेतमाल पूर्वोत्तर राज्यांत पाठविणे प्रस्तावित आहे. त्यासाठी रेल्वे विभागाचे म्हणणे प्रथम ऐकून घेतले असून, आता रेल्वे खात्याला त्याबाबतचा रीतसर प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.


रेल्वे प्रशासनाने शेतमालाची वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांशी कधीही स्वतःहून संपर्क केला नाही. यातून रेल्वेचे व्यापारधार्जिणे रुप उघड होते.
- सदाभाऊ खोत, राज्यमंत्री, कृषी, फलोत्पादन व पणन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाकीटमार महिला गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बस प्रवासात गर्दीची संधी साधत महिलांच्या पर्समधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबविणाऱ्या औरंगाबाद येथील दोघा महिलांना नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना सीबीएस बसस्थानकात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटकेत असलेल्या महिलांकडे पोलिस चौकशी करीत आहेत.

अनिता पारलेस काळे (२२) व ज्योती सुकदेव पवार (२१, दोघीही रा. चिखलठाणा, औरगांबाद) अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित महिलांची नावे आहे. निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील आरती राजेंद्र राख ही महिला बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत संशयित महिलांनी गळ्यातील पर्समधील मुद्देमाल चोरण्याचा प्रयत्न केला. ही घटना पाठीमागे असलेल्या प्रवाशांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ दोघांनी पकडून जाब विचारला. यावेळी आक्रमक झालेल्या प्रवाशांनी दोघांना बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हांडे खून प्रकरणात दोघांना जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मखमलाबाद नाक्यावरील कोठारवाडी परिसरातील प्रवीण उर्फ समीर हांडे या युवकाच्या हत्येप्रकरणात कोर्टाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठवली. तर या प्रकरणातील चौघांची कोर्टाने पुराव्याअभावी सुटका केली.

पंचवटीतील उदय कॉलनी येथे ९ मार्च रोजी हांडेची तोंडावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सुरेश हांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलिसांनी हत्या, आर्म्स अॅक्टसह इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी तपास करीत आरोपी तुकाराम चोथवे, निलेश नेरूकर, अमोल चांगले, प्रवीण कुमावत, पप्पू खैरे व किशोर बरू अशा सहा जणांकडे मोर्चा वळवला. घटनेनंतर पोलिसांनी काही संशयितांना लागलीच ताब्यात घेतले होते तर काही फरार झाले. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांच्या कोर्टात झाली. पोलिसांनी सादर केलेल्या साक्षी पुराव्यानुसार कोर्टाने मुख्य संशयित तुकाराम दत्तू चोथवे आणि निलेश नंदकुमार मेरूकर यांना दोषी ठरवत आजन्म कारावास तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास तीन वर्षाची शिक्षा ठोठवली. या व्यतिरिक्त अन्य दोन कलमानुसार आरोपी दोषी ठरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्मोद्योग घोटाळा; तीन जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सामाजिक न्याय विभागाच्या चर्मोद्योग व अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या वतीने मागास वर्गातील गरजू लाभार्थींना स्वयंरोजगारासाठी देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारीनुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात मुंबई नाका पोलिसांनी तिघांना अटक केली. संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जिजाबाई संजय वाघ, राजेंद्र सोनू शमशेर आणि विजय बाळा चंद्रात्रे अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, बनावट कागदपत्रांच्या आधारे सामाजिक न्याय विभागाच्या नाशिक विभागीय कार्यालयात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची शक्यता व्यक्त होते आहे. गंगापूर रोडवरील रहिवासी विठ्ठल रामदास कचरे यांना कारण नसताना समाजकल्याण विभागाच्या कर्जवसुलीच्या नोट‌िसा वारंवार मिळाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. या प्रकरणात काही स्थानिक एजंट आणि काही कर्मचारी सहभागी असावेत, अशी शक्यता व्यक्त होते आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी चौकशी करीत वर्षाअखेरीस गुन्हा दाखल केला होता. संशयित आरोपींना गुरूवारी कोर्टात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा

$
0
0

विनापरवाना बांधकामक्षेत्र वाढवून तसेच इमारतीवर मोबाइल टॉवर बसवून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी चौधरी बिल्डर्सच्या संचालिका प्रतिभा मधुकर चौधरी यांच्याविरोधात विरूध्द इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
महेंद्रकुमार विजय नागरे (रा. चौधरी प्लाझा, राजीवनगर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. चौधरी प्लाझाचे बांधकाम १९९६ मध्ये पूर्ण झाले. बिल्डर चौधरी यांनी विनापरवाना सुमारे ५० टक्के इमारत बांधकामाचे क्षेत्रफळ वाढवून बांधकाम केले. बिल्डींगमध्ये चार गाळ्यांची परवानगी असताना त्यांनी ११ गाळे विकसित केले. त्यानंतर इमारतीतील सर्व सदनिका आणि गाळ्यांची विक्री केली. तसेच रहिवासी परवानगी आणि कायदेशीर परवानग्या न घेता बांधकाम व्यावसायिका चौधरी यांनी इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर विविध कंपन्यांकडून भरघोस मोबदला घेऊन मोबाइल टॉवर उभारले. प्रतिभा चौधरी यांनी नियमबाह्य काम केल्याचा आरोप करीत नागरे यांनी इंदिरानगर पोलिसांकडे धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा प्रशासनाला ‘मॅन पॉवर’ची चिंता

$
0
0

इतर जिल्ह्यांतून मागवणार कर्मचारी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात एकाचवेळी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाला मॅन पॉवरचा प्रश्न सतावत आहे. सर्वच ठिकाणी अधिकारी व कर्मचारी गुंतल्यामुळे एवढ्या मोठ्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी कमी पडणार असल्याचा अंदाज आल्यामुळे अगोदर सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून किती कर्मचारी व अधिकारी लागतील, याचा आकडा मागवण्यात आला आहे.


जिल्ह्यात जर कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या कमी असली तरी इतर जिल्ह्यातून ते मागवले जाणार आहे. नाशिक विभागात नाशिक महापालिका व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आहे. त्याचप्रमाणे जळगाव व अहमदनगर येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातून कर्मचारी व अधिकारी मिळणार नाही. परिणामी, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून हे कर्मचारी व अधिकारी मागवता येणार असल्याचे आता बोलले जात आहे.



मनपात बूथची संख्या वाढली

नाशिक महापालिका निवडणुकीत दुप्पटीने बूथ संख्या वाढणार आहे. त्यामुळे येथे गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा जास्त कर्मचारी लागणार आहेत. येथे महापालिकेचे कर्मचारी व इतर शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षकांचा या प्रक्रियेत समावेश असणार आहे.


झेडपीत बूथची संख्या कमी

एकीकडे नाशिक महानगर पालिकेत बूथची संख्या वाढलेली असताना या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बूथ संख्या कमी होणार आहे. पण दोन मशिन वेगवेगळ्या ठेवण्यात येणार असल्यामुळे जास्त कर्मचारी संख्या येथे लागणार आहे.


नगरपालिका व नगरपंचायतचे कर्मचारी

जिल्ह्यात महापालिका व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांकडे निवडणुकीसंबंधी काम नसणार आहे. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कामात नियुक्ती करण्याचा विचार जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-शिवसेनेचा स्वबळाचा नारा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकींमध्ये युती करण्यासंदर्भात भाजप व शिवसेनेत चर्चा सुरू झाल्याने नाशिकमध्ये या दोन्ही पक्षांतील इच्छुक बिथरले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबतची युती एकतर्फी तोडून स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या. परंतु, आता गेल्या वेळेपेक्षा भाजपची स्थिती चांगली असल्याने या पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी युतीविरोधात आहेत. शिवसेनेनेही स्वबळाची तयारी करीत, इतर पक्षातील नगरसेवकांना कवेत घेतले आहे. युती झाल्यास बंडखोरी होऊन त्याचा फटका दोघा पक्षांना बसू शकतो. त्यामुळे महापालिकेत तरी भाजप-सेना एकत्र येण्याची शक्यता कमी आहे.

नाशिकमध्ये महापालिका जिंकण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून भाजप व शिवसेनेने स्वतंत्र तयारी केली असून, वातावरण निर्मितीही केली आहे. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी थेट युतीच्या विरोधात आहेत. गेल्या महापालिकेच्या वेळेस भाजपने युती तोडून स्वबळावरच निवडणूक लढवली होती.

पाच वर्षांत शिवसेनेपेक्षा ताकद वाढल्याचा दावा भाजप करीत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे तीन आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे वाढलेल्या ताकदीचा अंदाज घेत, भाजपने स्वबळाचा नारा दिला असून, शंभर प्लसचे मिशन ठेवले आहे. त्यासाठी सक्षम उमेदवारांचा शोध घेत, त्यांना पक्षात प्रवेशही दिले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेनेही निवडणुकांचा अंदाज घेत ताकद वाढवली आहे. शाखाप्रमुख ते बुथप्रमुख असे

नेटवर्क तयार केले असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर नाशिकचे पालकत्व सोपवले आहे. महापालिकेत मनसेच्या सर्वाधिक नगरसेवकांनी शिवसेनेला पसंती दिली आहे.

आम्ही भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यंशी चर्चा केली असून, सगळ्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे. आता शिवसेनेबरोबर युती अशक्य आहे. गेल्या वेळेसही आम्ही स्बळावरच लढलो अन् यावेळेसही स्वबळावरच लढणार आहोत.

बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप

महापालिकेत युती करण्यासंदर्भातील सर्व अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत. परंतु, नाशिकची शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार आहे. महापालिकेवर स्वबळानेच भगवा फडकवण्यास आम्ही तयार आहोत.

अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला भाजपमध्ये फेरबदल

$
0
0

तालुकाध्यक्ष साताळकर यांची उचलबांगडी

म. टा. वृत्तसेवा, येवला

भाजपच्या येवला शहर व तालुका पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी अन् अंतर्गत कुरघोडीचे राजकारण याची परिणीती पक्षाचे तालुकाध्यक्ष एकनाथ साताळकर यांची उचलबांगडी होण्यात झाली आहे. तालुक्यात पक्षसंघटना मजबूत करण्याच्या नावाखाली भाजप जिल्हाध्यक्षांनी हा फेरबदल केला असला, तरी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि येवला पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावरच हा बदल केल्याने पक्षातील एका गटात मोठी खळबळ उडाली आहे. अचानक उचलबांगडी झालेले एकनाथ साताळकर यांच्याच तालुक्यातील नागडे या गावचे रहिवाशी असलेले राजूसिंग परदेशी यांची नूतन तालुकाध्यक्ष म्हणून वर्णी लावण्यात आली आहे.

जिल्हा परिषद व येवला पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बदल घडवण्यात आला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात भाजपच्या येथील एका गटाने जोर लावल्याने पक्षाचे विद्यमान तालुकाध्यक्ष एकनाथ साताळकर यांना तालुकाध्यक्षपद गमवावे लागले आहे. साताळकर हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक प्रमोद सस्कर यांच्या गटातील समजले जातात. साताळकर यांची उचलबांगडी ही सस्कर गटाला शहदेखील समजला जात आहे. परदेशी यांना खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, येवला प्रभारी दिनेश देवरे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पहिल्या दिवशी अठरा हरकती

$
0
0

प्रभागनिहाय मतदारयादीबाबत सुनावणीसाठी समितीची स्थापना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय फोडलेल्या मतदार याद्या गुरुवार (दि. १२) पासून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदारांना त्या याद्या पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. सहा विभागीय कार्यालये व ९ मनपाचे वसुली केंद्रांवर या याद्या लावण्यात आल्या असून नागरिकांकडून त्यावर हरकती मागवल्या आहेत.

पहिल्या दिवशी तब्बल अठरा हरकती प्राप्त झाल्या असून हरकतदारांमध्ये नगरसेवकांचाही समावेश आहे. प्रसिद्ध करण्यापूर्वी २५ हरकती प्राप्त झाल्या असून या हरकतींची संख्या आतापर्यंत ४३ वर पोहचली आहे. येत्या २१ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून हरकतींचा निर्वाळा करण्यासाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणुकीसाठी विधानसभेची मूळ यादी ग्राह्य धरण्यात आली असून नव्या मतदारांची नोंद झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या फोडण्यात आल्या आहेत. परंतु, या याद्यांमध्ये मोठा घोळ असून त्यात मतदारांचे प्रभागांची अदलाबदल करण्यात आली आहे. नागरिकांना आपल्या नावाची तपासणी करण्यासाठी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी त्या प्रभागातील नागरिकांना पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी, महापालिकेच्या विभागीय कार्यालयांसह अन्यत्र ९ कार्यालयांमध्ये त्या प्रसिद्ध केल्या आहेत. पहिल्या दिवशी पालिकेला प्राप्त झालेल्या हरकतींमध्ये भाजपचे नगरसेवक सतीश कुलकर्णी, काँग्रेसचे लक्ष्मण जायभावे, कन्हैय्या साळवे आणि डी. जी. सूर्यवंशी यांनी केल्या आहेत. तर यादी प्रसिद्धीपूर्वी पालिकेला २५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात सुधाकर बडगुजर व विलास शिंदे यांच्या हरकतींचा समावेश आहे. त्यामुळे हरकतींचा आकडा हा ४२ पर्यंत पोहचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भागीदारीच्या नावाखाली दीड कोटींची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फर्मच्या भागीदारीचे आमिष दाखवून तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी कॅनडा कार्नर भागात राहणाऱ्या संशयित दाम्पत्याविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रशेखर श्रीरामसिंग परदेशी व मीना चंद्रशेखर परदेशी (रा. कॅनडा टॉवर्स, शरणपूररोड) असे फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याचे नावे आहेत. ठाणे येथील अफताब अमिन मर्चंट (रा. ज्युपिटर हॉस्पिटलजवळ, भाजीवाडा, ठाणे) यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. परदेशी दाम्पत्याने मर्चट कुटुंबीयांशी कौटुंबिक संबध आहेत. २०१२ मध्ये परदेशी दाम्पत्याने आय होप हॉस्पिटीलिटी प्रा. लि. नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीत भागीदारी केल्यास मोठा फायदा होईल, असे आमिष दाखवून दाम्पत्याने अमिन पिरमहंमद मर्चंट यांना भागिदारी करण्यास प्रोत्साहित केले. परदेशी दाम्पत्याने मर्चंट यांना कंपनीचे संचालकपद आणि पाच हजार शेअर्स नावावर करून देण्याचे आमिष दाखविले. कौटुंबिक संबंधामुळे मर्चंट यांनी व्यवहारास सहमती दर्शवली. यानंतर मर्चंट यांना वेळोवेळी एक कोटी ५० लाख ११ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. दरम्यान, पैसे गुंतवल्यानंतरही परदेशी दाम्पत्याने कोणताही मोबादला दिला नाही. या काळात मर्चंट यांचा मृत्यू झाला. मात्र, मर्चंट यांच्या वारसांना मोबदला न देण्यासाठी संशयितांनी नोंदणी कार्यालयात कंपनीची नोंदणी केली. यावेळी मर्चंट यांच्या संचालकपदी बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तसेच २०११ ते २०१४ दरम्यानचा बनावट वार्षिक अहवाल तयार करून तो कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करण्यात आला. त्यात मर्चट यांचा हिस्सा देण्यात आल्याचे दाखवून परदेशी दाम्पत्याने आर्थिक अपहार केला. वडिलांच्या मृत्युनंतर फिर्यादी अफताब मर्चंट यांनी परदेशी दाम्पत्याची भेट घेत गुंतवणूक व शेअर्स रकमेची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे अफताब मर्चंट यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठून आपली कैफियत मांडली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओल्या-सुक्या कचऱ्याला खो

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेने नव्याने खरेदी केलेल्या घंटागाड्यांमध्ये कचरा संकलन करताना ओला व सुका असे दोन भाग करण्यात आले असल्याचे उद्घाटनावेळी जाहीर करण्यात आले होते. मात्र, घंटागाडी कर्मचारी नेहमीप्रमाणे एकत्रितच कचरा संकलन करीत असल्याने ओला व सुका कचरा संकलन गेले कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातच कचरा संकलन करणाऱ्या अनेक घंटागाड्यांचे आजही ‘आरटीओ’ने पासिंगच केले नसल्याने विनाक्रमांकाच्याच घंटागाड्या कचरा संकलन करीत आहेत. त्यांचीही संख्या मर्यादित असल्यामुळे अनेक रस्त्यांवर साचणारे ढीग दिसत आहेत.

मनसेची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत नवीन घंटागाड्यांच्या उद्घाटनाला संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे येणार होते. परंतु, घंटागाड्यांची मांडणी व्यवस्थित नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कार्यक्रमाला न येणेच पसंत केले, अशी चर्चा असतानाच वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते महापौर अशोक मुतर्डक यांनी नवीन घंटागाड्यांचे उद्घाटन उरकले होते. परंतु, उद्घाटन झालेल्या घंटागाड्या अपुऱ्या कामांमुळे अनेक दिवस कचरा संकलनासाठी उपलब्ध झाल्याच नाहीत. त्यानंतर नगरसेवकांनी ओरड केल्याने हळूहळू घंटागाड्या प्रभागात कचरा संकलन करण्यासाठी देण्यात आल्या. दरम्यान, उद्घाटनाप्रसंगी नवीन खरेदी करण्यात आलेल्या घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा संकलन करून टाकण्याची व्यवस्था असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात ओला व सुका कचरा घंटागाडी कर्मचारी एकत्रच गोळा करताना दिसत आहेत.

दुसरीकडे घंटागाड्या रस्त्यावर आणण्याची अतिघाईही समोर आली आहे. नवीन खरेदी केलेल्या अनेक घंटागाड्यांना ‘आरटीओ’कडून पासिंग मिळाले नसल्याने एखादा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी पासिंग नसलेल्या घंटागाड्या त्वरित ‘आरटीओ’कडून पासिंग करून घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.

ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याबाबतचे आवाहन नागरिकांनादेखील करण्यात आले होते. मात्र, बहुतांश नागरिकांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याने एकत्रितच कचरा संकलनाचे काम घंटागाडी कर्मचारी करताना दिसत आहेत. त्यामुळे यासंदर्भात जनजागृती करण्याची अपेक्षादेखील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेने अतिघाई करीत नवीन घंटागाड्या कचरा संकलनासाठी दाखल केल्या होत्या. उद्घाटनावेळी ओला व सुका असे दोन पार्ट कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांना असणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात कचरा गोळा करताना तो एकत्रितच केला जात आहे. अनेक घंटागाड्यांचे पासिंगच करण्यात आलेले नाही.

-रुपेश तिवारी, अशोकनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांकडून मतदारयाद्यांची जुळवाजुळव

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अनेक नवीन मतदारांनी नोंदणी केली होती. परंतु, नोंदणी करण्यात आलेल्या अनेकांची नावे दुसऱ्याच प्रभागात गेली असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मतदारयाद्यांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू झाले आहे. प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात असतील, तर पुन्हा प्रभागात आणण्याचाही प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे.

महापालिकेच्या सातपूर विभागात प्रभाग ८, ९, १० व ११ च्या सुधारित मतदारयाद्या मतदारांना नाव तपासण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. महापालिकेत पहिल्यांदाच चार सदस्यांचा एक प्रभाग अशी निवडणूक होत आहे. यात २५ ते ३५ हजार मतदारांचा एक प्रभाग असणार आहे. त्यातच चारचा प्रभाग असल्याने प्रत्येक पक्ष आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा करणार आहे. दरम्यान, महापालिका व जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अगोदरच नवीन मतदारांना नावनोंदणीचे आवाहन केले होते. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तरुणांनी आपली नोंदणी केली आहे. नवीन मतदार नोंदणी केलेल्यांच्या याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. परंतु, सातपूर भागातील अनेकांची नावे इतर भागात गेली आहेत, तर शहरातील काही मतदारांची नावे सातपूर भागात आली आहेत. यात इच्छुक उमेदवारांनीदेखील मतदारयाद्यांमधील नावांची जुळवाजुळव सुरू केली आहे. महापालिकेनेदेखील सातपूर विभागातील मतदारांसाठी सुधारित मतदारयाद्या नाव तपासण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. उपलब्ध मतदारयाद्यांचा लाभ मतदारांकडून घेतला जात आहे.


नावे शोधताना दमछाक

राहत असलेल्या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नाव गेलेल्या मतदारांचा शोध इच्छुक उमेदवार घेताना दिसत आहेत. सर्वच पक्षांतील इच्छुक उमेदवार आपल्या कार्यालयात हक्काच्या मतदाराचे नाव दुसऱ्या प्रभागात गेले की काय यासंबंधीची माहिती घेताना दिसत आहेत. परंतु, पहिल्यांदाच चार सदस्यांचा प्रभाग असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची मतदारांची नावे शोधताना दमछाक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिळगूळ घ्या...

$
0
0

तिळगूळ घ्या...

इलेक्शन लागल्यानं रायबा अन् सायबाची धावपळ सुरू झाली होती. काल-परवापर्यंत कामच नसल्यानं जड पडलेल्या बॉडीची अचानक मेहनत सुरू झाल्यानं दोघांचीही हाडं जाम दुखत होती. परंतु, आता महिना-सव्वामहिना काहीच पाहायचं नाही अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. दोघांचा कर्ताधर्ता असलेल्या ठकसेनचीही अवस्था वेगळी नव्हतीच. त्याला चार मोबाइलही कमी पडू लागले होते. रायबा आणि सायबा ऐन कडाक्याच्या थंडीत ठकसेनच्या घरी दाखल झाले होते. आतून घंटीचा तेवढा आवाज येत होता.

रायबा : काय राव गारठं आहे! आणखी दोन-चार दिवसांत रामकुंड गोठंल असं वाटतं. पुढारी मंडळींना एवढ्या गारठ्यात लोकांच्या दारात जावं लागतंय. मला तर लई वाईट वाटतंय (गालात हसून)... रेल्वे इंजिनवाले म्हणं आपल्या नेत्याप्रमाणं अलार्म लावून सकाळी सकाळी उठायला लागलेत. इंजिन परत धावतंय की काय?

सायबा : धावेल की इंजिन... कमळसुद्धा फुलेल अन् बाणसुद्धा चालेल. आपल्याला काय? आपण ऑल पार्टी मेंबर. जिकडे नोट तिकडे आपण. राहिला विषय इंजिनवाल्यांचा.. ते थोडं आधीपासूनच उठले असते तर बरं झालं असतं राव. आपलीसुद्धा मेहनत वाचली असती. काल सकाळपासून हॅण्डल वाटत फिरत होतो राव. पोरं जाम वैतागली होती.

रायबा : खरं आहे. इंजिनाला ट्रॅक राहिला नाही, घड्याळाची बॅटरी डाऊन झालीय अन् पंजासुद्धा गारठ्यात पार आकडून गेलाय... खरं सांगू का, पार्टी कोणतीही आली तरी काय फरक पडत नाही, ह्येच बरोबर. सगळे एकाच माळेचे मणी. आता गारठ्यात उठतात, नंतर वॉर्डातला माणूस पाहिला, की गाडीच्या काळ्या काचा वर घेतात...

सायबा : म्हणूनच, काय छापायचे ते आत्ताच छापून घ्यायचे. साला, पाच वर्षांत व्होटर तिथंच. आपणसुद्धा तिथंच अन् शहरही! (इतक्यात आतून जोरात खाकरण्याचा आवाज आला. त्यानंतर दोघांनीही विषय ताबडतोब थांबवला. बहुदा ठकसेननं दोघांचं संभाषण ऐकलं असावं.)

रायबा : यंदासुद्धा कमळावाले आणि बाणवाल्यांच्या युतीच्या बाता सुरू झाल्यात. आधी भांड भांड भांडतात... हमरीतुमरीवर येतात अन् मग युतीच्या गोष्टी करतात.

सायबा : नाहीतर काय! पण युतीची आवई उठल्यापासून लई जणांची कालवाकालव झालीय म्हणं... गटबदलूंची तर झोपच उडालीय. कालच एका ऑफिसातल्या पंटरनं आपल्या बॉसला फोन लावून दुखणं कथन केलं. काही करा पण ही युतीची भानगड टाळा. आपण लई जणांना प्रवेश दिलाय, तोंडावर पडू आम्ही!

(इतक्यात ठकसेन घरातून बाहेर आला होता. तिळगूळ घ्या अन् गोड गोड बोला, असं म्हणतं त्यानं रायबा अन् सायबाच्या हातावर चार-चार तीळ ठेवले. दिवसभरात ऑल पार्टी मेंबरांकडं जायचं असल्याचं त्यानं दोघांना निक्षून सांगितलं. प्रत्येक ठिकाणी जाताना हातात अन् जिभेवरही तीळ असायलाच हवा, असं त्यानं बजावलं. पोटापाण्याचा प्रश्न असल्यानं रायबा आणि सायबा काय समजायचे ते समजून चुकले...)

- संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारांच्या भेटीगाठींत महिलांची आघाडी

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी आता वेगवान राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवारांनी तिकीट निश्चित होण्याअगोरच घरोघरी जाऊन सुरू केलेल्या भेटीगाठींत महिलांनी आघाडी घेतली असून, त्यांचे पती मात्र तिकीट मिळण्याच्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. काही जणांनी आपल्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी संपर्क साधून त्यांच्या कार्यालयात चकरा वाढवल्या आहेत.

अवघ्या ३८ दिवसांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीसाठी २१ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर खरा वेग येणार आहे. त्यानंतर किती मते आपल्या पारड्यात पडतील याचा हिशेब आखत उमेदवार वेगाने कामाला लागणार आहेत. राजकीय पक्षांच्या मुलाखती, त्यानंतर अंतिम यादी यासाठी बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे त्यानंतर प्रचारालाही कमी वेळ मिळणार असल्यामुळे आतापासून सर्वांनी घरोघरी जाऊन संपर्क सुरू केला आहे.

आचारसंहितेमुळे सावध

गेल्या काही दिवसांपासून विविध वस्तू भेट म्हणून मतदारांना देणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आचारसंहिता लागल्यामुळे सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे वस्तूंची भेट देण्याचे टाळले जात आहे. काही ठिकाणी मात्र नाव न टाकता या वस्तू देणे अजूनही सुरू आहे.

सोशल मीडियावर जोर

एकीकडे घरोघरी भेट देताना प्रत्येक घरातील प्रमुखांचा नंबर कार्यकर्ते घेत आहेत. त्यात व्हाॅट्सअॅप आहे का, असा प्रश्नही विचारला जात आहे. या नंबरच्या आधारे नंतर सोशल मीडियाचा वापर करून संपर्कात राहण्याचे तंत्र सर्वांचे आहे.

कागदपत्रांची जुळवाजुळव

एकीकडे प्रचार, तिकिटांसाठी नेत्यांच्या मागे फिरणे याबरोबरच नामनिर्देशनपत्रासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे. त्यासाठी खास कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकून त्यांना कामाला लावण्यात आले आहे. काही उमेदवार मात्र स्वतःच त्याबाबत खबरदारी घेत आहेत.


कॅशची मात्र चणचण

नोटाबंदीनंतर अजूनही मोठ्या प्रमाणात कॅश हातात नसल्यामुळे असंख्य इच्छुक उमेदवारांची चिंता वाढली आहे. त्यांना कॅशची अजूनही अडचण भासत असून, त्यासाठीही जमवाजमव सुरू आहे. काहींनी त्यासाठी नियोजन केले असले, तरी निवडणुकीसाठी लागणारी कॅश मात्र मोठ्या प्रमाणात लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयएम’ची यंदा एण्ट्री!

$
0
0

‘एमआयएम’ची यंदा एण्ट्री!

Gautam.Sancheti

@timesgroup.com

Tweet @SanchetigMT

नाशिक ः नगरसेवकांच्या पक्षांतरामुळे राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत यंदा एमआयएम हा पक्ष एण्ट्री मारणार आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)ने नाशकात औरंगाबाद पॅटर्न राबवितानाच पक्षाध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांच्या जाहीर सभेचेही आयोजन केले आहे. शहरात २५ उमेदवार उभे करण्याची रणनीती पक्षाने आखली आहे.

नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत एमआयएम पक्ष आैरंगाबाद पॅटर्न राबवून तब्बल २५ जागा लढवणार आहे. त्यासाठी या पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, ६ प्रभागांचा सर्व्हे केला आहे. त्यात काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांची माहिती घेऊन त्यांना तयारीला लागण्याचा संदेश दिला आहे.

राज्यातल्या नगरपालिका निवडणुकींत एमआयएम पाचव्या क्रमांकावर आल्यामुळे ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मनसेपेक्षा आमच्या जास्त जागा आल्याचाही त्यांना आनंद आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडणुकीत उभे करून त्यात यश मिळविण्याचा त्यांचा मनसुबा आहे. ‘एमआयएम’च्या या पवित्र्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेसला मोठा झटका बसणार असणार असल्यामुळे या पक्षाचीही चिंता वाढली आहे.

पक्षाने दिली जबाबदारी

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाने पक्षनिरीक्षक म्हणून कल्याणचे नगरसेवक अय्याज मौलवी यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. त्याचप्रमाणे पुणे येथील महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य अंजूम इनामदार हे नाशिकला तळ ठोकून असून, ते या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत.

दोन आमदार, ८५ नगरसेवक

पक्षाचे राज्य विधानसभेत दोन आमदार निवडून आले. त्यानंतर औरंगाबाद येथे २६ ,नांदेड येथे ११ व कल्याण येथे दोन नगरसेवक निवडून आले. इतर नगरपालिकांतील मिळून त्यांचे ८५ च्या आसपास नगरसेवक आहेत.


‘एमआयएम’ची ताकद

तेलंगणमध्ये ‘एमआयएम’ची मोठी शक्ती आहे. त्यानंतर महाराष्ट्रात या पक्षाची ताकद वाढत आहे. राज्यात आतापर्यंत झालेल्या विधानसभा, महापालिका व नगरपालिका निवडणुकांत यश मिळविल्यानंतर ‘एमआयएम’ने आता राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीत लक्ष घातले आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी हे त्यासाठी अनेक सभा, रॅली घेणार आहेत.

--

‘एमआयएम’चे मुस्लिम समाजासोबतच दलित समाजाला तिकीट देण्याचे धोरण असल्याने त्यांना आतापासूनच प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झालेली आहे. नाशिकमध्ये २५ हून अधिक उमेदवार उभे करण्याची तयारी आम्ही केली आहे. औरंगाबाद पॅटर्न नाशिकमध्येही राबविला जाणार आहे.

- रमजान पठाण, विधानसभा अध्यक्ष, ‘एमआयएम’, नाशिक मध्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त‌िळगुळासह रंगणार पतंगबाजी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नववर्षातील पहिलाच आणि आयुष्यभर गोड बोला असा संदेश देणारा मकर संक्रांतीचा सण आज (दि. १४ ) उत्साहात साजरा होणार आहे. पतंगबाजीला आतापासूनच उधाण आले आहे. आपल्या पतंगाला ‘आसमान’ दाखविण्यासाठी आणि इतरांचे पतंग ‘जम‌िनीवर’ आणण्यासाठी बच्चे कंपनीसह तरुणाई सज्ज झाली आहे. नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनीदेखील कंबर कसली आहे.
मकर संक्रांतीच्या सणाची बच्चेमंडळी अतिशय आतुरतेने प्रतीक्षा करीत असतात. या दिवशी पतंगबाजीला उधाण येते. शहरात पतंगबाजीला नाताळपासूनच सुरुवात झाली असली, तरी आज (दि. १४) खऱ्या अर्थाने सकाळपासूनच पतंगबाजी रंगणार आहे. त्यासाठी बहुतांश तयारी पूर्ण झाली असून, पतंग तसेच मांजाची खरेदीदेखील उरकण्यात आली आहे. पतंगबाजीचा हा उत्साह कोणासाठी विघ्न ठरू नये यासाठी पोलिसांनीदेखील कंबर कसली आहे. पशू, पक्षी आणि मानवासाठी जीवघेणा ठरणाऱ्या नायलॉन मांजाचा पतंगबाजीसाठी वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे. सिडको, नाशिकरोड, सातपूर, पंचवटी यांसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात घरांच्या टेरेसवर स्पीकर वाजवून पतंगबाजीचा आनंद लुटला जातो. अशा वेळी दारू पिणे, महिला तसेच मुलींची छेडछाड करणे टवाळखोरांना महागात पडणार आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालणाऱ्या पोलिसांची अशा अनुचित प्रकारांवर करडी नजर असणार आहे. टेरेसवर पंतंगबाजी करणाऱ्या मुलांची विचारपूस पोलिसांकडून केली जाणार आहे. नायलॉन मांजाचा वापर होत असल्यास तसेच सणाच्या निमित्ताने छेडछाडीसारखे गैरप्रकार होत असल्यास नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला १०० क्रमांकावर तर जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ०२५३–२३१७१५१ या क्रमांकावर किंवा १०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणाचा पतंग उडणार?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपसह शिवसेनेला महापालिकेतही अच्छे दिन आले असून, भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी तब्बल सातशे इच्छुकांनी अर्ज केले आहेत. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने आता भाजपने या सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १७ ते १९ जानेवारी असे तीन दिवस हा मुलाखतीचा कार्यक्रम चालणार आहे. शिवसेनेनेही चाचपणी सुरू केली असून, काँग्रेसने उमेदवार निवडीसाठी सोमवारी बैठक ठेवली आहे.
शिवसेना व भाजपने स्वबळाचा नारा दिला असल्याने व दोन्ही पक्षांना अनुकूल वातावरण असल्याने पालिकेसाठी इच्छुकांचा ओढा हा या दोन्ही पक्षांकडे सर्वाधिक आहे. त्यामुळे उमेदवारी देताना दोन्ही पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. भाजपने महापालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज भरून घेतले आहेत. भाजपकडे इच्छुकांचा आकडा हा सातशेवर पोहचला आहे. त्यासाठी १७ ते १९ दरम्यान पक्ष प्रभारी, निरीक्षकांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. भाजपमध्ये अन्य पक्षांतील १८ नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केला आहे. अजूनही इतर पक्षांतील अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे निष्ठावंतांना न्याय देण्यासह इतर पक्षातील इच्छुकांना संधी देण्याचे आव्हान असणार आहे.
शिवसेनेनेही उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. इच्छुकांची यादी तयार करण्यात येत असून इच्छुकांना शिवसेनेचा प्रचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मकर सक्रांतीनंतर इच्छुकांमधून अंतिम उमेदवारांची निवड केली जाणार आहे. काँग्रेसनेही उमेदवार निवडीसह राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्यासाठी सोमवारचा दिवस निश्चित केला आहे. प्रभारी डॉ. उल्हास पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचीही मंगळवारपासून उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तर मनसेकडून इच्छुकांचा शोध घेतला जात आहे.

उमेदवार निवडीसाठी काँग्रेसची बैठक

महानगरपालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता असून शहरातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. उमेदवारांच्या निवडीसाठी नाशिक शहर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. येत्या दोन दिवसात उमेदवारांच्या निवडीला सुरुवात होणार आहे. नाशिकचे प्रभारी डॉ. उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून त्यामध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांनी दिली. नाशिक शहर काँग्रेसने देखील स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाव्यवस्थापकांसाठी रेल्वे स्टेशन चकाचक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा हे विविध खातेप्रमुखांसह आज (दि. १४) वार्षिक निरीक्षण दौरा करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागीय कार्यालयाने दिली आहे. शर्मा हे इगतपुरी ते मनमाड दरम्यानच्या विविध स्थानकांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. देवळाली, नाशिकरोड, लासलगाव, मनमाड आदी स्थानकांची पाहणी केल्यानंतर ते सायंकाळी सात वाजता भुसावळ जंक्शनला भेट देतील. आज सकाळी साडेनऊला इगतपुरी येथे तर अकरा वाजता नाशिकरोड येथे शर्मा यांच्यासह अधिकाऱ्यांचे आगमन होईल. भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. गुप्ता यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी, नाशिकरोड स्थानकप्रमुख एम. बी. सक्सेना, वाणिज्य विभागप्रमुख आर. एस. गोसावी, मुख्य तिकीट तपासणीस जे. डी. जैन यांच्यासह विविध अधिकारी हजर राहणार आहेत. शर्मा यांचे आगमन होणार असल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानक चकाचक करण्यात आले आहे. भिकारी, भटके तसेच फिरते विक्रेते यांची गच्छंती करण्यात आली आहे. नाशिकरोड स्थानकातील विविध खात्यांचे प्रमुख जातीने आपल्या कामकाजावर लक्ष देऊन आहेत. कार्यालयीन रेकॉर्डस, पार्सल, गुडस, बुकींग, रिझर्व्हेशन यांचे रेकार्डस अपडेट करण्यात आले आहेत. तसेच स्थानकातील कार्यालये, वेटिंग रुम, स्वच्छतागृहे, प्रवाशांच्या सुविधा यांची योग्य देखभाल करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारांची होणार ‘पाठवणी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नगरपालिका निवडणूक काळात राज्यात तब्बल १० हजार जणांवर तात्पुरत्या तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका निर्भय वातावरणात व्हाव्यात, यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तींवर तडीपारीसारख्या कठोर प्रतिबंधात्मक कारवाया निश्चितपणे केल्या जातील. असे आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी दिली.
नाशिक दौऱ्यावर आलेल सहारिया म्हणाले, ‘या निवडणुका निर्भय वातावरणात व्हाव्यात यासाठी आयोगाने आणि प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. संवेदनशील तसेच अतिसंवेदनशील केंद्र निश्चितीची कार्यवाही सुरू असून तेथे मोठा पोलिस बंदोबस्त देण्याचे नियोजनही पोलिस विभाग करीत आहे. येऊ घातलेल्या निवडणुकांत मतदारांना मद्य, पैसे तसेच अन्य वस्तूंची आमिषे दाखविली जाऊ शकतात. असे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होईल अशी ग्वाही सहारिया यांनी दिली.
निवडणूक काळात धर्म तसेच जातीच्या आधारावर मते मागता येणार नाहीत, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने अल‌िकडच्याच काळात दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास निश्चित कारवाई केली जाईल, असा इशारा सहारिया यांनी दिला. वर्षानुवर्ष जात आणि धर्माच्या नावावरच निवडणूका लढविल्या जातात याकडे माध्यम प्रतिनिधींनी सहारिया यांचे लक्ष वेधले. राजकीय पक्ष किंवा राजकीय व्यक्ती अत्यंत जागरूक असल्याचा टोला सहारिया यांनी लगावला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोट प्रेसचे अप‌ील फेटाळले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
केंद्र सरकारची जमीन असल्याचे सांगून महापालिकेला सहा कोटींचा मालमत्ता कर भरणा करण्यास नकार देणाऱ्या करन्सी नोट प्रेस व इंड‌िया स‌िक्युरिटी प्रेसचे अप‌ील राज्य सरकारनेही फेटाळले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४०६ मूल्य निर्धारण व कर याबाबतच्या आदेशाविरोधात राज्य सरकारकडे अप‌ील करण्याची तरतूद नसल्याचे सांगून सरकारने हायकोर्टात जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही संस्थांना आता मालमत्ता कर भरण्याशिवाय पर्याय नसून, विविध कर विभागाने आता सीएनपी व आयएसपीला वसुलीसाठी पुन्हा नोटीस पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पालिकेच्या सहा कोटी रुपयांच्या वसुलीचा मार्ग मोकळा होणार आहे.
नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेसचे महामंडळात रुपांतर झाल्यानंतर सन २००८ पासून करन्सी नोट प्रेस व इंड‌िया स‌िक्युरिटी प्रेसने मालमत्ता कर भरण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारची जमीन असून संबंधित संस्था याही केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगून कर लागू होत नसल्याचा दावा या संस्थांनी केला आहे. परंतु, पालिकेने सीएनपी व आयएसपीचा हा दावा फेटाळून लावत त्यांना वसुलीच्या नोट‌िसा बजावल्या. परंतु, तरीही या संस्थांनी कर भरण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पालिकेने दोन्ही संस्थांना अंतिम वसुलीच्या नोट‌िसा गेल्या वर्षी बजावल्या होत्या. महापालिकेच्या नोट‌िसांविरोधात सीएनपी व आयएसपीने थेट राज्य सरकारकडे दाद मागितली होती.
सीएनपीने महापालिकेच्या कर आकारणीचे आदेश हे महापालिका अधिनियमातील कलम ४५१ नुसार विखंडीत करण्याची मागणी केली होती. परंतु, राज्य सरकारने सीएनपीचे अप‌िल फेटाळले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४०६ नुसार मूल्य निर्धारण व कर या बाबतच्या आदेशाविरोधात राज्य सरकारकडे अपील करण्याची तरतूद नसल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे.

महापालिकेकडून पुन्हा नोटीस
करन्सी नोट प्रेसकडे ५ कोटी ५३ लाख ५२ हजार रुपयांची थकबाकी आहे, तर इंड‌ियन स‌िक्युरिटी प्रेसकडे ५४ लाख ९१ हजार रुपये थकबाकी आहे. या रकमेच्या वसुलीसाठी पालिकेने वारंवार नोट‌िसा पाठवल्या. या कराच्या वसुलीविरोधातील, सीएनपी विरोधातील अपील राज्य सरकारने फेटाळल्यानंतर संबंधित संस्था हायकोर्टात जाण्यापूर्वीच पालिकेने वसुलीची कारवाई सुरू केली आहे. या संस्थांना पंधरा दिवसांच्या वसुलीचे पत्र पाठविण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा वसुलीच्या नोट‌िसा पाठविल्या जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images