Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मांजाविक्रेत्यांवर होणार थेट पोलिसी कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नायलॉन मांजा विक्री आणि वापराला बंदी असतानाही शहरात पतंगबाजीसाठी या मांजाचा वापर होत असल्याची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांचा आदेश धाब्यावर बसवून चोरी छुप्या पध्दतीने नायलॉन मांजाची विक्री तसेच वापर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी मंगळवारी दिला.

‘नायलॉन मांजाची राजरोस विक्री’ या शीर्षकाखाली महाराष्ट्र टाइम्सने मंगळवार (दि. २७) डिसेंबर रोजी वृत्त प्रसिध्द केले. ‘मटा’च्या प्रतिनिधीने त्रिमूर्ती चौक ते पवननगर परिसरातील काही दुकांनांना ग्राहक या नात्याने प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी काही विक्रेत्यांनी नायलॉन मांजा काही मिनिटांत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. याबाबतचा ‘ऑन दी स्पॉट रिपोर्ट’ ‘मटा’ने प्रसिध्द केला. शहर पोलिस तसेच जिल्हा प्रशासनाने या वृत्ताची दखल घेऊन नायलॉन मांजा विक्रेते आणि त्याच्या वापरकर्त्यांवर कठोर कारवाईचे आदेश जारी केले आहेत.

नायलॉन मांजा पशु, पक्षी आणि मनुष्यालाही घातक ठरत असून नायलॉन मांजाची विक्री करणारे तसेच त्याचा वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा आदेश पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी काढला आहे. मकर संक्रांतीनिमित्त शहरात उडविल्या जाणाऱ्या पतंगांना वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजा (दोरा) निर्मिती, विक्री व वापरावर २० जानेवारी २०१७ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

नायलॉन मांजाविक्री तसेच त्याचा वापर करणाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जातील. बाजारपेठेत विक्रेत्यांकडे बनावट ग्राहक पाठवून नायलॉन मांजा विक्रीबाबत खात्री केली जाईल. तो उपलब्ध झाल्यास विक्रेत्यावर कठोर कारवाई करू.
- डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नायलॉन मांजा बेताला जिवावर

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

बाजारात नायलॉन मांजा विक्रीस बंदी आहे. मात्र, हा मांजा सर्रासपणे विक्री केला जात असल्याने एका तरुणाच्या गळ्याला नायलॉन मांजामुळे दुखापत झाल्याची घटना मंगळवारी घडली. शिवशक्ती चौक येथून गाडीवरून जात असतांना हा प्रकार घडला. डोक्यात हेल्मेट असल्यामुळे मोठी हानी टळली.

गौरव कृष्णा कोठावदे हा युवक नेहमीप्रमाणे सकाळी गाडीवरून कामावर जात होता. अचानक गळ्याजवळ मांजा असल्याचे त्याला जाणविले. त्याने मांजा काढण्याचा प्रयत्न केला. गाडीवरील ताबा सुटल्याने तो खाली पडला. यात तो जखमी झाला. मांजामुळे गळ्याजवळ जखम झाल्याचे त्याला लक्षात आले. हेल्मेट असल्यामुळे चेहऱ्यापर्यंत मांजाचा पोहचू शकला नाही. त्यामुळे संभाव्य हानी टळली.

बंदी असतांनाही अनेक विक्रेते सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री करीत आहेत. प्रशासनाला याबाबत केव्हा जाग येणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सिडकोतील पवननगर, शिवाजी चौक, उत्तम नगर, त्रिमूर्ती चौक, राणेनगर, इंदिरानगर भागात तर नायलॉन मांजा सर्रासपणे विक्री होत आहे. महापालिका तसेच पोलिस प्रशासनाने यांनी नायलॉन मांजाविरोधात कडक भूमिका घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी मृत्यूशी झुंज देतात. तसेच अनेक नागरिकांना या मांजामुळे दुखापत होते. या प्रश्नी जागरुकतेची गरज व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्यूच्या दाढेतून ‘त्याची’ अखेर सुटका

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘ते’ जिवाच्या आकांताने ओरडत होते... बघ्यांना मात्र त्याची गंमत वाटत होती... ‘त्याचा’ मात्र जीव चालला होता. ओरडून ओरडून ‘ते’ थकले आणि मदतीसाठी आसपास पाहू लागले... याचवेळी एकजण देवदूतासारखा धावून आला आणि त्या भयानक अवस्थेतून ‘त्याची’ सुटका केली.

वेळ सकाळची, प्रत्येकजण आपल्या कामाच्या गडबडीत मात्र एका झाडावरून वटवाघळाच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. वटवाघूळ शक्यतो रात्रीच ओरडते मग दिवसा या वटवाघळाला काय झाले असावे? या कुतूहलापोटी तेथे बघ्यांची गर्दी होऊ लागली. परंतु, मदतीसाठी कुणी पुढे येईना. कुणी सेल्फी काढण्यात तर कुणी व्हिडीओ काढण्यात मग्न होते. अशावेळी अॅड. अक्षय कलंत्री यांनी प्रसंगावधान ओळखले. अग्निशमन विभागास फोन केला आणि या वटवाघळाची सुटका केली.

नाशिक न्यायालयामध्ये मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. गळ्यात नायलॉन मांजा अडकलेल्या वटवाघळाची अॅड. कलंत्री व अग्निशमन कर्मचाऱ्यांनी सुटका केली. एका झाडाला अडकलेल्या पतंगाच्या नायलॉन मांज्यामध्ये एक वटवाघुळ अडकले. दिवाणी न्यायालयास सुट्टी असल्याने कोर्टाच्या आवारात अतिशय तुरळक गर्दी होती. परंतु, गर्दी नुसतीच त्याला पहात होती. कुणी काही करू शकत नव्हते. गळ्याला फास बसल्याने ते वटवाघूळ जीवाच्या आकांताने मोकळे होण्याचा प्रयत्न करीत होते. ही बाब अॅड. कलंत्री यांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरित अग्निशमन विभागास ही गोष्ट कळवली.

अवघ्या काही मिनीटातच अग्निशमन विभागाचे नाना गांगुर्डे, बाळासाहेब लहामगे, विजय नागपुरे आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या वटवाघुळास झाडावरून उतरवून त्याच्या गळ्यात व पंखांमध्ये अडकलेला मांजा कापून त्याला अग्निशमन अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आले. हा मांजा नायलॉनचा असल्याचे निदर्शनास आले. यावेळी अग्निशमन दलाच्या तत्परतेचा व माणुसकीचा प्रत्यय आला.

नायलॉन मांजाचा वापर टाळा
माणसाच्या पतंग उडवण्याच्या, क्षणभराच्या आनंदासाठी अनेक मुक्या पक्ष्यांचे व प्राण्यांचे जीव टांगणीला लागतात. याची जाणीव प्रत्येकाला व्हायला हवी अशी ही घटना होती. सण साजरा जरूर करावा; परंतु त्यात निदान प्राणीमात्रांच्या जीवाचा विचार करावा आणि नायलॉन मांजाचा वापर टाळावा, असे आवाहन यानिमित्ताने अग्निशमन दलाने केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्‍घाटन कार्यक्रमासाठी पळविल्या घंटागाड्या!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवीन घंटागाड्यांची सेवा न दिल्याबद्दल ठेकेदारांना प्रतिदिन दहा हजाराचा दंड ठोठावणे सुरू असतांना ठेकेदारांनी नवीन घंटागाड्यांबाबत महापालिकेकडे अजब खुलासा केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चमकोगिरीची घाई झालेल्या नगरसेवकांकडून या नवीन घंटागाड्या कचरा गोळा करण्याऐवजी चक्क उद्‍घाटनासाठी पळविल्या जात आहेत. त्यामुळे त्या जीपीएसवर येण्यासाठी अडचणीत येत असल्याचा खुलासा एका ठेकेदाराने केला आहे. परिणामी आकारलेला दंड चुकीचा असल्याचा दावा त्याने केल्याने महापालिकाच आता कोंडीत सापडली आहे.

महापालिकेने नवीन घंटागाड्या रस्त्यावर आणण्यासाठी २० डिसेंबरची मुदत दिली होती. मात्र, अद्यापही ठेकेदारांनी सर्व घंटागाड्या रस्त्यावर आणलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेने जीपीएस मॅपिंगवर अनुपस्थित घंटागाड्याना प्रतिघंटागाडी दहा हजाराचा दंड सुरू केला आहे. तर जीटी पेस्ट कंट्रोल व सैय्यद असिफ अली या दोन ठेकेदारांना नोटीसा बजावण्यात आल्या. एका ठेकेदाराला तर ठेका रद्द का करू नये, अशी नोटीस बजावली आहे. तरीही ठेकेदारांकडून नवीन घंटागाड्या रस्त्यावर आणल्या जात नसल्याने आरोग्य विभाग हतबल झाला. त्यामुळे आता ठेकेदारांचे करायचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एका ठेकेदाराने नोटिसीला दिलेल्या उत्तरात नगरसेवकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच नगरसेवकांना आपल्या प्रभागात नवीन घंटागाड्यांच्या उद्‍घाटनाची घाई झाली आहे. त्यामुळे ज्या दिवशी घंटागाड्यांचे जीपीएसवर मोजदाद झाली, त्याचदिवशी काही नगरसेवकांनी उद्‍घाटनासाठी नवीन घंटागाड्या नेल्या होत्या. त्यामुळे या घंटागाड्या शहरात धावल्या नसल्याचा खुलासा केला असून या दिवशीचा दंड माफ करावा, अशी मागणी केली आहे. नगरसेवक उद्‍घाटनासाठी नवीन घंटागाड्या पळवत असल्याचा प्रत्यक्ष आरोप ठेकेदाराने केलेल्या खुलाशात केला आहे. त्यामुळे प्रशासनाचीच आता पंचाईत झाली आहे. हा खुलासा ग्राह्य धरला तर दंड माफ करावा लागेल. नाही केला तर ठेकेदाराकडून दंड वसूल कसा करायचा, अशा पेचात आता प्रशासन सापडले आहे.

दंड पोचला ६० लाखांवर
महापालिकेने प्रतिघंटागाडीला दहा हजाराचा दंड लावला असून, गेल्या २० डिसेंबरपासून हा दंड वसूल केला जात आहे. दररोज ७० ते ८० घंटागाड्या अनुपस्थितीत राहत आहेत. त्यामुळे दंडाची रक्कम आता सुमारे ६० लाखांवर पोहचला आहे. ठेकेदारांकडून सादर केल्या जाणाऱ्या बिलातून ही रक्कम काढली जाणार असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिले आहे. ठेकेदारांकडून अजूनही दहा ते पंधरा दिवस घंटागाड्यांची पूर्तता होणार नसल्याने दंडाचा आकडा एक कोटींच्या वर पोहचण्याची शक्यता आहे.

फायनान्सची अडचण?
जीटी पेस्ट कंट्रोल या कंपनीला सिडको व पंचवटी या दोन विभागांचे ठेके देण्यात आले आहेत. परंतु, या ठेकेदाराकडून नवीन घंटागाड्यांची पूर्तता अतिशय संथ गतीने केली जात आहे. महापालिकेने अल्टिमेटम देऊन आठ दिवस उलटले तरी पंचवटीत २०, तर सिडकोत १० घंटागाड्या उपलब्ध केल्या. अजुनही निम्मेच्या वर घंटागाड्या येणे बाकी असल्याने महापालिकेने ठेकेदाराला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला आहे. नवीन गाड्यांसाठी फायनान्सची अडचण असल्याचा दावा या ठेकेदाराने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडकर पुन्हा थंडीने गारठले!

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड परिसरातील तापमानात चढ उतार सुरू असून, सोमवारी ८.१ असलेले तापमान मंगळवारी दोन अंशाने खाली आले. त्यामुळे निफाडकर गारठले आहेत. मंगळवारी या हंगामात दुसऱ्यांदा तापमानात ६ अंशापर्यंत घसरण झाली आहे.

तालुक्यात थंडीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी जास्त होत आहे. मंगळवारी कुंदेवाडी (ता. निफाड) येथील गहू संशोधन केंद्रात ६.४ इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याचे वेधशाळा निरीक्षक मानकर यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत तापमानात कधी वाढ तर कधी घट होत आहे.

मागील पधरवड्यात १० डिसेंबरला ६.४ पर्यंत तापमान खाली आले होते. आणि नंतर ७, ८ इतक्या तापमानाची नोंद होत होती. मात्र थंडीची ही तीव्रता पुन्हा कमी होऊन गेल्या ३ ते ४ दिवसांत ८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहचले होते. गेल्या दोन दिवसात पुन्हा थंडीचा तडाखा जाणवत आहे. सायंकाळी हवेत गारवा असल्याने बोचरी थंडीने नागरिक हैराण झाले आहेत. तर पहाटेच्या वेळी थंडीचे प्रमाण अधिक असते. त्यातच पालखेड डाव्या कालव्याला पाण्याचे रोटेशन सुरू असल्याने या भागात थंडी वाढली आहे, असे कुंदेवाडी येथील वेधशाळा प्रमुख मानकर यांनी सांगितले.

आणखी घसरण होणार

कुंदेवाडी येथील या संशोधन केंद्रात सकाळी साडेसातच्या दरम्यान तापमान मोजले जाते. गेल्या चार दिवसात तापमान थेट ६.४ इतके खाली आले आहे. त्यामुळे येत्या काळात तापमान आणखी खाली येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नानाला आवडलं राज ठाकरेंचं काम

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

'राज जे काही करतो, ते पराकोटीचं चांगलं असतं. खूप छान काम करतो,' अशा शब्दांत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

नाशिकमधील पांडवलेणीच्या पायथ्याशी मनसेची सत्ता असलेल्या महापालिकेच्या वतीनं बोटॅनिकल गार्डन साकारण्यात आलं आहे. या उद्यानाचा लोकार्पण सोहळा काल राज यांच्या हस्ते झाला. नाना पाटेकर हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी आपल्या भावना मांडताना नानांनी राज यांच्या अभिनव कल्पनांचं व कामाचं कौतुक केलं. 'माणूस म्हणून मी राज यांचा खूप आभारी आहे. नाशिकमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलंय. राज यांचा पक्ष आणखी काही शहरात निवडून आला तर बरं होईल. तिथंही अशीच छान काम होतील,' असंही नानांनी सांगितलं. अभिनेते भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि दिग्दर्शक केदार शिंदेही यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान्देश गारठला

0
0

टीम मटा, जळगाव

जळगाव शहरात तापमानात चढ-उतार सुरूच आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी ११ अंश असलेले किमान तापमान तीन अंशांनी घसरून ८ अंश सेल्सिअसवर आले आहे. थंडीबरोबरच बोचऱ्या वाऱ्यांमुळे जळगावकर हैराण झाले आहेत. धुळे जिल्ह्याचे किमान तापमान घसरून ५. ४ अंश सेल्सिअसपर्यंत आल्याने जिल्हा अक्षरश: गारठला आहे

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच जळगावकरांनी थंडीची हुडहुडी अनुभवली. शहराचे किमान तापमान गेल्या काही दिवसांपासून ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. गेल्या दोन दिवसांत किमान तापमान घसरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. अंगाला झोंबणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यामुळे जळगावकर गारठून गेले आहेत. झोंबणारे हे गार वारे थंडीची हुडहुडी वाढवित आहेत. ऐन विकेंडला वाढलेल्या या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दिवसा ढवळ्याही जळगावकरांच्या अंगावर उबदार कपडे दिसत आहेत.

धुळ्यात २०११ नंतर प्रथमच घसरण

धुळे जिल्ह्यात थंडीने कहर केला असून धुळे शहरात तापमानाने निच्चांक नोंदवला आहे. गेल्या आठवड्यापासून थंडीची मोठी लाट आली आहे. शहराचे किमान तापमान गेल्या आठवड्यापासून ५ ते ७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. सर्वाधिक निच्चांकी तापमान ५.४ अंश नोंदविले गेले आहे. यापूर्वी सन १९९१ मध्ये जिल्ह्यात २.३ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर २०११ मध्ये तापमान ६.२ नोंदवले गेले होते. थंडीच्या लाटेने धुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री ८ वाजेपासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत रस्ते सामसूम होत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. थंडीचे प्रमाण वाढल्याने उबदार कपड्यांची विक्री कमालीची वाढली असून, जागोजागी शेकोट्या, चहाच्या टपरीवर गरमागरम चहाचा आस्वाद घेणारे नागरिक दिसून येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान टाकणारी ध्वनीयंत्रणा अन् प्रेझेंटेशनचा अभाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्षणाक्षणाला मान टाकणारी ध्वनीयंत्रणा, केंद्रीय मंत्री बैठक घेणार असूनही पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनचा अभाव, कागदावरील मजकूर वाचून दिली जाणारी माहिती अन् शेवटपर्यंत आवाज पोहोचत नसल्याने उपस्थितांची होणारी निराशा. ग्रामसभेमध्ये वाचन करावे तसे विविध विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर केलेल्या वाचनामुळे जिल्हा नियोजन हॉलमधील ढेपाळलेल्या नियोजनाचे केविलवाणे दर्शन घडले.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन हॉलमध्ये ही बैठक पार पडली. दरवर्षी खासदारांच्या मुख्य उपस्थितीत होणारी ही बैठक यंदा प्रथमच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. नियोजन हॉलमध्ये ही बैठक घेण्याचे पूर्व नियोजित असतानाही जिल्हा प्रशासनाने कोणतीच व्यवस्था केली नसल्याचा अनुभव उपस्थितांना आला. सभागृहातील ध्वनिक्षेपक यंत्रणेने मान टाकल्याचे या बैठकीच्या निमित्ताने स्पष्ट झाले.

सुरुवातीचा बराच वेळ डॉ. भामरे यांचा आवाजच हॉलमधील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नव्हता. त्यामुळे त्यांना माईक बदलून देण्यात आला. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा आवाज बैठकीत शेवटपर्यंत पोहोचूच शकला नाही, ही बाब वारंवार तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र कुणीच त्यास गांभीर्याने न घेतल्यामुळे उपस्थितांची निराशा झाली. डॉ. भामरे यांनी देखील या एकूणच प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वेच्छा निधीबाबत नकारघंटा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वेच्छा निधी खर्चाबाबत महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे मागितलेल्या मार्गदर्शनाला आयोगाने उत्तर दिले असून स्वेच्छा निधीबाबत आयोगाची नकारघंटा कायम आहे. सध्या मंजूर परंतु, आदेशांच्या प्रतीक्षेत असलेली कामेही निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पाडू शकतात. त्यामुळे सध्या पाइपलाइनमध्ये असलेली ३५ कोटींच्या कामांना सुरुवात करता येणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे मंजूर परंतु, आदेशाच्या प्रतीक्षेत असलेली जवळपास ३५ कोटींची कामे आता फ्रिज झाले आहेत. त्यामुळे नगरसेवकांच्या प्रयत्नावरही पाणी फेरले जाणार आहे.

महापालिकेची मुदत संपण्याच्या तीन महिने अगोदरपासूनच आदर्श आचारसंहिता लागू करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. विशेषतः मतदारांवर प्रभाव पडू नये यासाठी नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीलाच तीन महिने अगोदर ब्रेक लावला आहे. स्वेच्छा निधीची कामे १४ डिसेंबरपासून बंद करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पालिकेला दिले आहेत. त्या संदर्भातील पत्रच आयुक्तांनी सर्व विभागांना दिले आहे. त्यामुळे १४ डिसेंबरपासून सर्वच कामांना ब्रेक लागणार असल्याने नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला होता. महापालिकेत नगरसेवक निधी दिला जात नसतांनाही, स्वेच्छा निधी आडून कामांना ब्रेक लावला जात असल्याचा आरोप केला होता. या निधीच्या कचाट्यात नगरसेवकांची ५० लाखांची कामे अडकली आहेत. दोन वर्ष भांडून मिळवलेला ५० लाखांचा निधी हा आचारसंहितेमुळे वाया जाणार होता. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवले होते. त्याला पंधरा दिवसांनंतर राज्य निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासासाठी केंद्राकडून मोठा आर्थिक निधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेल्वे, रस्ते प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने मोठा आर्थिक निधी उपलब्ध करून दिला असून जिल्ह्यातील पायाभूत विकासाला त्यामुळे चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी बुधवारी (दि. २८) नाशिकमध्ये व्यक्त केला.

जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीची बैठक डॉ. भामरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम, जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष, अपर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, मालेगाव महापालिकेचे आयुक्त अजित जाधव, रेल्वे, भारत संचार निगम लिमिटेड, भारत पेट्रोलियम, महावितरण यासह केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. भामरे म्हणाले, केंद्र सरकारने जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांसह नवीन रेल्वेमार्गांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यामध्ये मनमाड-मालेगाव-धुळे मार्गे इंदौर या रेल्वेमार्गासाठी रेल्वे खात्याने पाच हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उर्वरित पाच हजार कोटींच्या निधीसाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने स्वतंत्र कंपनीची स्थापना करून त्या माध्यमातून आर्थिक तरतूद करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनचा मालेगाव ते दोंडाईचा, साक्री ते चांदवड हे दोन्ही महामार्ग चौपदरी करणे आणि पुणे–नाशिक महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामचुकार अधिकाऱ्यांना भामरेंचा दम

0
0

त्रोटक माहिती देऊन अधिकाऱ्यांची कुचराई; कारवाईचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कामचुकारपणा लपविता यावा यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत तोकडी माहिती सादर करीत दस्तूरखुद्द केंद्रीय मंत्र्यांनाच गुंडाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, अधिकाऱ्यांचा हा कुटील डाव मंत्री महोदयांनी हाणून पाडला. कामचुकार आणि कातडी बचाव वृत्तीच्या अधिकाऱ्यांवर कोरडे ओढत संरक्षण विभागाचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले. आमच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न करता का? आम्ही पंतप्रधान मोदींचे सैनिक आहोत. प्रेमात ऐकले नाही तर सुतासारखे सरळ करू, असा इशारा देण्यासही ते विसरले नाहीत.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या वतीने बुधवारी (दि. २८) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन हॉलमध्ये ही बैठक पार पडली. बैठकीला भामरे यांच्यासह खासदार हरिश्चंद्र चव्हाण, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जगताप यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. समाजातील शेवटच्या घटकाला लाभ मिळावा यासाठी केंद्राकडून विविध योजना राबविल्या जातात. त्यावर सरकार कोट्यवधींचा खर्च करते. या योजनांची प्रशासनातील अधिकारी प्रभावीपणे अंमलबजावणी करतात की नाही, हे जाणून घेण्याचा प्रयत्न डॉ. भामरे यांनी केला. काही विभागांचे अधिकारी ‘खोटे बोल पण रेटून बोल’चे धोरण अवलंबित दिशाभूल करण्याचा प्रयत्न करित असल्याचे डॉ. भामरे यांच्या लक्षात आले. कामे पूर्ण झाल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात असला तरी अनेक ठिकाणी कामेच पूर्ण झाली नसल्याचे त्यांनी उदाहरणांसह अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. अधिकाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या बनवेगिरीमुळे भामरे यांचा संताप अनावर झाला.

‘धूळफेक करणे बंद करा’

पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत किती कामे झाली याची यादीच संबंधित विभागाने डॉ. भामरे यांना सादर केली नाही. अपूर्ण माहिती दिली जात असेल तर आम्ही प्रश्न तरी काय विचारणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बहुतांश विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक दोन पानांतच माहिती दिल्याने आम्ही आढावा कसा आणि काय घेणार, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. हे सर्व कॉन्ट्रॅक्टरशी हात मिळवणी करून सामान्य लोकांच्या आणि सरकारच्या डोळ्यांत धूळफेक करणे बंद करा, अशा शब्दांत त्यांनी कृषी विभाग, जिल्हा परिषद, महावितरण, बीएसएनएल, आरोग्य, महापालिका विभागातील अधिकाऱ्यांना इशारा दिला. सरकारच्या लोकोपयोगी योजनांचा बट्ट्याबोळ सुरू असल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. ही बैठक अत्यंत निराशाजनक झाली असून अधिकाऱ्यांना योजनांचे गांभीर्य नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. जिल्ह्यात काही अधिकारी चांगले आहेत. परंतु, ग्रामीण भागातील काही अधिकारी स्वत:ला राजे समजत असून त्यांनी तसे समजू नये. अशा अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने आम्हाला सादर करावा, असे आदेश भामरे यांनी दिले.


कृषी विभागाच्या चौकशीचे आदेश

प्रधानमंत्री कृषी फसल योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचय योजनेच्या अंमलबजावणीची माहिती देताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बोबडी वळाली. शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे अनुदान मिळत नसेल तर तुमचा काय उपयोग, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खरेतर कृषी आणि आदिवासी विभागाला त्यांच्या कामगिरीबद्दल २६ जानेवारीला पुरस्कारच द्यायला हवा, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. कुंभकर्णी झोपेतील कृषी विभागाची चौकशी लावा, असे आदेश त्यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला एकात्मिक बालविकास, रेल्वेचे जबाबदार अधिकारी अनुपस्थित होते. या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्याच्यांवर कारवाई करा, असे आदेशही दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेसहा हजार रुग्णांची नोंदणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येत्या रविवारी, एक जानेवारी रोजी होणाऱ्या महाआरोग्य शिबिरासाठी जिल्ह्यातील विविध केंद्रात रुग्णांची तपासणी केली जात आहे. यात विविध आजारांमुळे पीडित असलेल्या एकूण ६ हजार ५६० रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

गोल्फ क्लब येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबिरासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा रुग्णाल, ग्रामीण रुग्णालय, महापालिका रुग्णालय, विविध खासगी रुग्णालयात गरजूंची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात असून, त्याद्वारे त्यांची शिबिरासाठी नोंदणी केली जात आहे.

तपासणीत जिल्ह्यातून नेत्ररोगाचे ८३५, हृदयरोग ३२६, अस्थि व्यंगोपचार ४०७, जनरल सर्जरी ४३१, मेंदूरोग १५९, बालरोग ९९, मूत्ररोग १३८, प्लास्टिक सर्जरी ४६, कान-नाक-घसा ३७०, स्त्रीरोग २९४, जनरल मेडिसीन ४५३, श्वसन विकार १३०, कर्करोग २८, ग्रंथीचे विकार ५३, रेडिओलॉजी ३०, दंतरोग १६८, लठ्ठपणा २६, आयुष व इतर पारंपरिक उपचारपद्धती ४६, त्वचारोग २१६ आणि मानसिक आरोग्यासंबंधी ६६ रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त नाशिक महापालिका क्षेत्रातून नेत्ररोगाचे २४४, हृदयरोग १०८, अस्थि व्यंगोपचार २०५, जनरल सर्जरी ५०, मेंदूरोग ६१, बालरोग १७, मूत्ररोग ३७, प्लास्टिक सर्जरी ४, कान-नाक-घसा १०६, स्त्रीरोग ५०, जनरल मेडिसीन ११५, श्वसन विकार ४१, कर्करोग ११, ग्रंथीचे विकार १२, रेडिओलॉजी ६, दंतरोग ५२, लठ्ठपणा १३, आयुष व इतर पारंपरिक उपचारपद्धती १, त्वचारोग ५४ आणि मानसिक आरोग्यासंबंधी ३ रुग्णांना संदर्भित करण्यात आले आहे. राजीव गांधी आरोग्यदायी योजनेतील रुग्णालयांमार्फत झालेल्या तपासणीत ७५० रुग्णांची महाआरोग्य शिबिरासाठी नोंदणी झाली आहे.

हॉस्पिटल्सचा सहभाग
प्राथमिक तपासणीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत वैद्यकीय महाविद्यालयांमधक्षल तज्ज्ञ डॉक्टरांची पर्यवेक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील आयुष रुग्णालय, सुयोग रुग्णालय, सिनर्जी रुग्णालय, संतकृपा रुग्णालय, सह्याद्री रुग्णालय नागजी चौक, शताब्दी रुग्णालय, क्युरी मानवता मुंबई नाका, श्री गुरुजी रुग्णालय, विजन रुग्णालय, चोपडा रुग्णालय, लाइफ केअर रुग्णालय, सायखेडकर रुग्णालय, वक्रतुंड रुग्णालय, सिक्स सिग्मा या हॉस्पिटल्समध्येही राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विविध समित्यांची स्थापना
ग्रामीण तसेच शहरी भागात आरोग्य तपासणीसाठी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समन्वयासाठी जिल्हास्तरावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे उपचार
गरीब आणि गरजू रुग्णांवर आरोग्य शिबिरात मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठी पद्मश्री डॉ. अमित मायदेव, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, पद्मश्री डॉ. रतन देशपांडे, पद्मविभूषण डॉ. कांतीलाल संचेती, डॉ. सुलतान प्रधान, प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा, डॉ. रणजीत जगताप, प्रख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. देवपुजारी, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज, डॉ. शरद हर्डीकर, डॉ. अजय चंदनवाले, डॉ. शैलेश पुणतांबेकर, डॉ. कैलास शर्मा, डॉ. जयश्री तोडकर यांच्यासह नामांकित डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.

विविध संस्थेचेही योगदान
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: विविध उद्योग संघटना, वैद्यकीय क्षेत्रातील संघटना, स्वयंसेवी संस्था आदींना पत्राद्वारे या जनसेवेच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा शिबिर यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करीत आहे.

नोंदणीसाठ‌ी मोबाइल अॅप
महाआरोग्य शिबिराची माहिती देण्यासाठी मोबाइल अॅप तयार करण्यात आले आहे. सदर अॅपद्वारे शिबिरासाठी नोंदणी करता येणार असून शिबिराबाबतची विस्तृत माहिती उपलब्ध होणार आहे. गुगल प्लेस्टोअरमध्ये नाशिक आरोग्य शिबिर टाइप करून हे अॅप डाऊनलोड करता येईल.

प्राथमिक तपासणीसाठी दवाखान्यांची यादी

जे. डी. सी. बिटको रुग्णालय, नाशिकरोड
डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, कथडा, द्वारका
इंदिरागांधी रुग्णालय, पंचवटी कारंजा, पंचवटी
श्री स्वामी समर्थ रुग्णालय, अंबड पोलिस स्टेशनसमोर, मोरवाडी
मायको दवाखाना, सातपूर
एम. एच. बी. कॉलनी दवाखाना, महाराष्ट्र हौसिंग कॉलनी, सातपूर
गंगापूर दवाखाना, गंगापूर
मनपा दवाखाना, शिवाजी चौक, सिडको
मनपा दवाखाना, पिंपळगावखांब
मनपा दवाखाना, वडनेर दुमाला
मनपा दवाखाना, सिन्नरफाटा
मनपा दवाखाना दसक पंचक
मनपा दवाखाना, उपनगर
जिजामाता दवाखाना, मेनरोड
मायको दवाखाना, टक्कळमाळ, पंचवटी
रेडक्रॉस दवाखाना, टिळकरोड, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्यांसाठी पायघड्या कुणाच्या कृपेने?

0
0

नवनाथ वाघचौरे, ‌सिन्नर फाटा
समाजात विध्वंसकपणे वागणाऱ्यांना न्यायव्यवस्थेच्या अनुमतीने चार भिंतींच्या आत ठेवण्याची जागा म्हणजेच कारागृह. पण याच विध्वंसक प्रवृत्तींचे चोचले पुरविण्याचा गोरखधंदा कारागृहात राजरोसपणे सुरू असेल तर न्याय व्यवस्थेचाही तो अवमानच ठरेल. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गेल्या वर्षभरापासून असेच काहीसे घडत आले असल्याचे वर्षाच्या अगदी शेवटी उघड झाले आहे.

राज्यातील सर्वात जास्त क्षमतेचे कारागृह अशी ओळख असलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाबाबत सध्या ‘कुंपणच शेत खातेय की काय?’ अशी शंका यायला लागली आहे. नाशिकारोड कारागृह संपूर्ण वर्षभर जेवढे चर्चेत आले नाही, तेवढे केवळ डिसेंबरमध्ये चर्चेत आले. चालू वर्षात या कारागृहात सर्वप्रथम एप्रिल महिन्यात दोन मोबाइल सापडल्याची घटना घडली. ही घटना केवळ हिमनगाचे एक टोक होते याची जाणीव तेव्हा कारागृह प्रशासनाला झाली नसावी. त्यानंतर मे, जून, नोव्हेंबर या महिन्यांपर्यंत या कारागृहात आढळलेल्या मोबाइलची संख्या नऊवर पोहचली. डिसेंबर महिन्याचा प्रारंभ शांततेत होता, पण ही वादळापूर्वीची शांतता होती. कारण १७ ते २५ डिसेंबर या आठवडाभरात कारागृहामध्ये तब्बल ४० मोबाइल फोन आढळून आले. मधल्या काळात किती मोबाइल फोन कैद्यांपर्यंत पोहचले असावेत, याचा अंदाज या घटनांवरून आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या कारागृहात कैद्यांना शिक्षा म्हणून ठेवलेले आहे की त्यांना विविध सेवा देण्यासाठी जनतेच्या घामाच्या पैशांवर आधारलेली ही सर्व व्यवस्था उभी केलेली आहे, याचा उलगडा करणे कठीण झाले आहे.

सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे
नाशिकरोड कारागृहात मोबाइल फोन आढळण्याच्या घटनांनी कारागृह सुरक्षा व्यवस्थेच्या अब्रुचे खोबरे झाले. त्यात तीन तुरुंगाधिकाऱ्यांचाही बळी गेला. विशेष म्हणजे त्यानंतरही कारागृहात तीन दिवसांत पुन्हा १५ मोबाइल फोन आढळून आले. यातून कारागृहात मोबाइल पुरविण्याचे काम किती आधीपासूनच सुरू होते याची कल्पना येते. मोबाइलव्यतिरिक्त कारागृहात अंमली पदार्थ आढळून आले. अंमली पदार्थ पुरविण्याचीही पद्धतशीर योजना कार्यान्वित होती. कैद्यांत आपापसांत हाणामाऱ्या, खून या घटनांच्याही या कारागृहाच्या भिंती साक्षीदार आहेत.

आता निलंबन कोणाचे?
सर्व बेकायदेशीर प्रकारांत कारागृह सुरक्षा यंत्रणा अथवा प्रशासनातील कोणीतरी सामील तर नाही ना, हेही येत्या काही दिवसांत उजेडात येईलच. तेव्हा कैद्यांना मेहरबाणीच्या पायघड्या टाकल्या म्हणून निलंबनाचे जाळे कुणाच्या गळ्यात अडकते, ते बघणे औत्सुक्याचे ठरेल.

मोबाइल चार्जिंगची स्वतंत्र व्यवस्था?
कारागृहातील कैद्यांशी सुरक्षा व्यवस्थेने विशिष्ट अंतर राखून कामकाज केले पाहिजे. परंतु, मोबाइल प्रकरणातून हा दंडक मैत्र‌ीत रुपांतरीत झालेला असण्याची खात्री पटते. त्याचा परिणाम उघड आहे. प्रशासनाच्याही ही बाब लक्षात न येणे हीदेखील अक्षम्य चूकच ठरली आहे. मोबाइल फोनचा सर्रास वापर कारागृहात होणे आता उघड झाले आहे. विशेष म्हणजे अद्याप एकाही घटनेत मोबाइलचे चार्जर मिळून आल्याची नोंद पोलिसांत झालेली नाही. याचा अर्थ हे मोबाइल चार्जिंग करण्यासाठीचे चार्जर्सदेखील कारागृहात दडवून ठेवलेले असण्याची शक्यता आहे.

(क्रमशः)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला होणार ‘स्किल इन्स्टिट्यूट’

0
0

Jitendra.tarte@timesgroup.com
Twitter : @jitendratartemt

नाशिक : कौशल्याधिष्ठीत प्रशिक्षण देऊन तरुणांना रोजगारक्षम करण्यासाठी कार्यरत स्किल इंडिया या महत्त्वाकांक्षी मोहिमेंतर्गत नाशिकमध्येही लवकरच केंद्राच्या मनुष्यबळ विभागाचे ‘स्किल इन्स्टिट्यूट’ साकारले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विभागाचे राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी ‘मटा’ शी बोलताना दिली.

एका सोहळ्यासाठी नाशिकमध्ये ते उपस्थित असताना त्यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कुशवाह म्हणाले, की प्रगत देशांच्या तुलनेत कौशल्य विकासात भारत तुलनेने विशेष पिछाडीवर आहे. हे अंतर भरून काढल्याखेरीज बलाढ्य देशांशी स्पर्धा करणे सोपे नाही. हे हेरून केंद्र सरकारने युवकांना कौशल्याधिष्ठीत शिक्षण व प्रशिक्षण पुरविण्याच्या महत्त्वाकांंक्षी योजना आखल्या आहेत. यात देशांतर्गत कौशल्यपूर्ण मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी सन् २०२० पर्यंत ४० कोटींपेक्षाही अधिक युवकांना उच्च आणि कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे आहे. महाराष्ट्राच्या नकाशावरील नाशिकसारख्या उगवत्या शहरास अशा महत्वाकांक्षी मोहिमेतून वगळून चालणार नाही, यासाठी येथेही लवकरच ‘स्किल इन्स्टिट्यूट’ साकारेल. देशभरात ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नाशिकही याच रांगेत असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. राजकीय वक्तव्य करण्यावर त्यांनी नकार दिला.

संशोधनात देश पिछाडीवर
इंजिनीअरिंगसारख्या उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमानंतरही युवकांना करिअरच्या संधी म्हणाव्या तशा उपलब्ध नाहीत. त्यांची उत्पादकता अवघी २५ टक्क्यांवर घसरली आहे. याशिवाय संशोधनातही देश पिछाडीवर गेला आहे. विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत भारत पहिल्या दोनशे देशांमध्येही नाही, या बाबी पीडादायक असल्याचे कुशवाह म्हणाले.

नोटबंदीला सहकार्य करा
चलन बदलाच्या निर्णयातून होणारा त्रास हा तात्कालीक आहे. देशासाठी थोडासा त्रास सहन करा अन् सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयास पूर्ण सहकार्य करा, देशाच्या विकासासाठी तेच गरजेचे आहे, असे आवाहन चलनबदलाच्या प्रश्नावर बोलताना कुशवाह यांनी केले.

नवे शैक्षणिक धोरणही अल्पावधीतच
विविध क्षेत्रातील घटकांकडून देशाच्या नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात सूचना आणि संकल्पना मागविण्यात आल्या होत्या. सद्यस्थितीत त्यांची छाननी सुरू आहे. हे नवे शैक्षणिक धोरणही अल्पावधीतच पुढ्यात येईल. त्यात प्रामुख्याने पारंपरिक अभ्यासक्रमास कौशल्य विकास, सामाजिक जबाबदारी, नैतिक शिक्षण या मुद्यांशी जोडण्याचा अजेंडा आहे, असेही कुशवाह यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३७ दशलक्ष नोटांची एकाच दिवसात छपाई

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड आणि देवासच्या करन्सी प्रेसमध्ये मंगळवारी (दि. २७) एकाच दिवसात एकूण ३७.५ दशलक्ष नोटांची छपाई करण्यात आली. हा एक नवीच विक्रम आहे. त्यामुळे चलनटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

सरकारने नोटबंदी जाहीर केल्यापासून नाशिकरोडच्या करन्सी प्रेसमध्ये आठ नोव्हेंबरपासून नोंटाची छपाई वेगात सुरू आहे. या प्रेसमध्ये गेल्या दीड महिन्यात कामगारांनी रविवारची साप्ताहिक सुटी न घेता नोटांची छपाई सुरू ठेवली आहे. येथून ओझरला व तेथून विमानाने देशभरात नोटा वितरित केल्या जात आहेत. तसेच रेल्वे आणि रस्ते वाहतुकीद्वारे देशभरात नोटा पाठविण्यात येत आहेत. देशात चार प्रेसमध्ये नोटांची छपाई केली जाते. नाशिकरोड, देवास या प्रेस महामंडळाच्या तर म्हैसूर (कर्नाटक) आणि सालबोनी (पश्चिम बंगाल) या रिझर्व्ह बँकेच्या प्रेसचा त्यामध्ये समावेश आहे. नाशिकरोड प्रेस आणि देवास (मध्य प्रदेश) प्रेसने मंगळवारी एकाच दिवसात एकूण ३७.५ दशलक्ष नोटा छापल्या. त्यामध्ये नाशिकरोडचा वाटा २०.५ दशलक्ष तर देवासचा वाटा १७ दशलक्षचा होता. ३७.५ दशलक्ष नोटांमध्ये पाचशेच्या २६.५ दशलक्ष नोटांचा समावेश आहे. उर्वरित नोटा वीस, पन्नास आणि शंभरच्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजारात मागणी झाली कमी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदी लागू झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शहरातील व्यावसायिक फारसे खुश नाहीत. सुरुवातीला व्यवहार करतांना त्रास झाला, पण नंतर परिस्थिती सुरळीत होऊ लागल्याचे सांगत काहींनी व्यवसायावर झालेल्या परिणामांचा लेखाजोखा मांडला. काहींनी परिस्थिती सुधारेल, असा आशावादही जागवला. पण नोटाबंदीमुळे व्यापारावर परिणाम झाल्याचे स्पष्ट चित्र असल्याचे निष्कर्षही पुढे आले. लोकांकडे पैसे नसल्यामुळे बाजारात मालास मागणी कमी झाल्याची बाबही या निमित्ताने पुढे आली.

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होऊन ५० दिवस उटल्यानंतरही सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरू झाले नाही. काही व्यवसायाला या बंदीचा मोठा फटका बसला तर काहींनी त्यातून मार्ग काढला. स्वाइप मिशन, पेटीएम वापराबरोबर इ- बँकिंगने व्यवहार करण्यास बऱ्यापैकी सुरूवात झाली असली तरी सर्वच ठिकाणी त्याचा वापर अद्याप सुरू झालेला नाही.

बँकांमध्ये निर्माण झालेल्या कॅशशॉर्टेजचा फटका या व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात बसला. करंट अकाऊंटमधून ५० हजारांची मर्यादा असतांनाही व्यवासायाच्या दृष्टाने ती खूपच कमी होती. त्यात ही कॅश पूर्णपणे मिळत नव्हती. त्यामुळे व्यापारातून आलेला पैसा त्यांनी व्यवसायातच वापरणे जास्त पसंद केले. या ५० दिवसांच्या काळात बँकांमधून पैसे काढण्याचे काम जास्त झाले कॅश भरणे सर्वांनी शक्यतो टाळले. व्यवसायात सर्वाधिक चेकचा वापर करण्यात आला असला तरी तो वटवण्यासाठी लागणारा वेळेचाही सर्वांनी अनुभव सांगितला. नेट बँकिंग व इ-पेमेंटचेही व्यवहार झाले असले तरी त्याचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे.

कामगारांची अवस्था बिकट
सरकारने कॅशलेस व्यवहार करण्यास सूचविले असले तरी त्यासाठी पुरेशी साधने दिली नसल्याच्या तक्रारीही मोठ्या होत्या. त्यात सर्वच लोकांकडे एटीएम कार्ड नसल्यामुळे त्यांनी चेकने व्यवहार करण्यावरच भर दिल्याचेही अनेक व्यावसायिकांनी सांगितले. उधारी वाढल्याच्याही तक्रारी अनेकांनी मांडल्या. तर रोजंदारीने काम करणाऱ्या कामगारांची अवस्था बिकट झाल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले.

कामगारांचे पगार असो इतर ठिकाणी लागणारी कॅश, याचा तुटवडा जाणवला. ५० हजाराची मर्यादा असली तरी त्यातून पूर्णपणे पैसे मिळाले नाही.
- राजेंद्र आहिरे, अध्यक्ष, आयमा

नोटाबंदीचा सर्वाधिक परिणाम सराफ व्यवसायवर झाला. डेबिट कार्ड, मास्टर कार्डवर बँक आकारत असलेले दर व्यवसायासाठी डोकेदुखी आहे.
- राजेंद्र ओढेकर, सराफ व्यावसायिक

कार विक्रीवर काही अंशी परीणाम झाला होता. आता सर्व व्यवहार सुरळीत होईल. नोटाबंदीतून सावरण्यास लोकांना थोडे वेळ लागेल. पण आता व्यवहार सुरळीत होत आहेत.
- ओम मोहरीर, वाहन व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅशलेसची मात्रा फलदायी

0
0

देवळाली कॅम्प : नोटाबंदीमुळे किरकोळ व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे प्रचंड हाल झाले. मात्र, आता रोख चलन उपलब्ध होऊ लागल्याने व्यवसायात थोडेफार प्रमाणात पूर्वपदावर आले आहेत. कॅशलेस व्यवहारांनी बाजारात सुलभता आणण्यास मदत केली.

देवळाली कॅम्पच्या लेव्हीट मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना सुटे पैसे परत देणे व्यावसायिकांना कठीण झाले. त्यांचे व्यवसाय ठप्प झाले. चहा पिण्यासाठीदेखील हॉटेलमध्ये पैसे देण्यासाठी ग्राहकांना सुटे पैसे जवळ बाळगावे लागत होते. दोन हजाराच्या नव्या नोटेने कोंडी केली. जुन्या नोटा बदलणे आणि सुटे पैसे घेणे यासाठी बँकांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. बँकांमधून सुटे पैसे मिळणे कठीण झाले. व्यावसायिकांनी स्वॅप मशिन स्वीकारल्याने पैसे घेण्यादेण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरदारांकडून गरजांना कात्री

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नोटाबंदी होऊन ५० दिवस उलटल्यानंतरही चलन टंचाई दूर न झाल्याने नोकरदारांना आपल्या अनेक गरजांना कात्री लावण्याची वेळ आली आहे.

देशात चलनाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली. ती अद्याप कायम आहे. त्यामुळे नोकरदारांना बँकेत खत्यावर पैसे असूनही त्याचा उपभोग घेता येण्यावर बंधने आली आहे. काही नोकरदार या परिस्थितीकडे सकारात्मक तर काही नकारात्मक दृष्टीने बघत आहेत. पैसे वेळेवर न मिळाल्याने रोखीने खरेदीचे व्यवहार करण्यावर बंधने आली. त्यामुळे काही क्षेत्रातील नोकरदारांकडून संतापही व्यक्त करण्यात येत आहे.

नोटाबंदीनंतर मोठ्या संख्येने नोकरदार वर्गात कॅशलेस व्यवहाराची सवय रुजण्यास मदत झाली आहे. बरेचसे नोकरदार टेक्नोसॅव्ही असल्याने त्यांना कॅशलेस व्यवहार करणे सोपे झाले आहे. परंतु, ज्या ठिकाणी कॅशलेस व्यवहाराची सोय नसते अशा ठिकाणी मात्र त्यांनाही अडचणींचा सामना अद्यापही करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचशेच्या नव्या नोटेची आज संपणार प्रतीक्षा!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदी जाहीर होऊन ५० दिवस उलटल्यानंतरही नवीन पाचशेची नोट व्यवहारात येऊ शकलेली नाही. येत्या काही दिवसात बँकांच्या एटीएममधून नागरिकांना नवीन पाचशेच्या नोटा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर शहरातील सर्व बँकांचे एटीएम येत्या काही दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्रला एटीएमसाठी ५०० च्या नव्या नोटांची रसद मिळाली आहे. देना बँकेसह इतरही बँकांना गुरुवारी (दि. २९) पतपुरवठा होणार आहेत. त्यामुळे आता नवीन वर्ष लागण्यापूर्वी ग्राहकांच्या हाती एटीएमद्वारे रक्कम मिळण्याची चिन्हे आहेत.

रिझर्व्ह बँकेने एटीएम केंद्रावर लक्ष केंद्रीत केले असून शहरात महाराष्ट्र बँकला एटीएमसाठी ४० कोटी दिले आहेत. या पैशांमुळे महाराष्ट्र बँकेचे येत्या दोन-तीन दिवसात जिल्ह्यातील ८७ एटीएम सुरू होणार आहेत. महाराष्ट्र बँकेप्रमाणेच देना बँकेलाही गुरुवारी दहा कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे देना बँकेचेही ४० एटीएम सुरू होण्याची शक्यता आहे. नोटा बंदीनंतर जिल्हयातील ९०३ पैकी फक्त १५० एटीएम सुरू आहेत. त्यांचे रिकॅलिब्रेशन करूनही हे एटीएम केंद्र निरुपयोगी ठरल्यामुळे एटीएमधारकांची घोर निराशा झाली.

नोटाबंदीनंतर स्टेट बँकेने फक्त आपल्या शाखेजवळील एटीएम सुरू ठेवले. रिकॅलिब्रेशन केल्यावर आठ दिवसानंतर सर्व एटीएम सुरू केले. पण त्यात केवळ दोन हजाराच्याच नोटा उपलब्ध होत असल्याने नागरिकांची निराशा झाली. यातील काही एटीएम केंद्रही चालू बंद होते. त्यानंतर तब्बल पन्नास दिवसानंतर आता महाराष्ट्र बँकेचे एटीएम सुरू होणार आहे. जिल्ह्यात स्टेट बँक, महाराष्ट्र बँक व देना बँकेच्या मोठ्या प्रमाणात शाखा आहे. त्यामुळे या मुख्य बँकेच्या एटीएम केंद्र सुरू झाले, तर कॅश तुटवडा कमी होण्यास मदत होणार आहे.

रांगा होणार कमी
जिल्ह्यात ९०३ पैकी १५० एटीएम स्टेट बँकेचे तर ८७ महाराष्ट्र बँकेचे आणि ४० देना बँकेचे एटीएम आहेत. नव्या नोटा मिळाल्यानंतर सुरू होणाऱ्या एटीएमची संख्या ३०० च्या आसपास जाईल. उर्वरित ६०० एटीएम बंद राहण्याची शक्यता आहे. हे एटीएम केंद्र केव्हा सुरू होतील याबाबत कोणत्याही बँकांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. बँकांकडे एटीएममध्ये टाकण्यासाठी पैसेच नाहीत. मात्र, एटीएम सुरू झाल्यास बँकांसमोरील रांगा कमी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरोहितांकडे घबाड

0
0

चौकशीत आढळली बेहिशेबी मालमत्ता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वरमध्ये प्राप्तिकर विभागाने सोमवारी दोन पुरोहितांकडे टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही पुरोहितांकडे साडेचार कोटी रुपयांचे सोने व दोन कोटी बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. तसेच, बुधवारी सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून, अजून बरीच माहिती समोर येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, त्र्यंबकमधील आणखी नऊ पुरोहितांना आयकर विभागाने नोटिसा बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.

नोटाबंदीनंतर त्र्यंबकेश्वरमध्ये प्राप्तिकर विभागाने सोमवारी चांदवडकर आणि शिखरे या दोन पुरोहितांची तपासणी केली. बुधवारी या कुटुंबीयांना प्राप्तिकर विभागाने चौकशीसाठी गडकरी चौकातील कार्यालयात बोलावले. त्यातून अजून माहिती व कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. त्र्यंबकेश्वर येथील चांदवडकर कुटुंबीय व शिखरे कुटुंबीयांची पहिल्या दिवशी सोने-चांदी मोजदाद, हिशेबांच्या वह्यांची माहिती घेतली. मंगळवारी बँक खात्यांची तपासणी, तीन वर्षांतील आयकर तपशील आणि इतर लिखित व्यवहारांची माहिती गोळा करून सोने जप्त केले. त्याचप्रमाणे बेहिशेबी मालमत्ता असल्याचेही त्यातून प्राप्तिकर विभागाला आढळले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images